सुरेश भटांना मराठी माध्यमांची श्रद्धांजली

Submitted by pkarandikar50 on 14 April, 2009 - 04:56

सचिन तेंडुलकरच्या मेणाच्या पुतळ्याचं मुम्बईत अनावरण झालं. त्याची जी बातमी 'सकाळ'च्या पहिल्या पानावर [हेड लाईन] झळकली, तीचं शीर्षक होतं 'सेम टु सेम'! असा शब्द मराठींतच काय पण इंग्रजींतही नाही. लोकसत्तेतल्या एका हेडलाईन बातमीचा मथळा होता, 'कॅची.....!' खाली बातमी होती राहूल द्रविडने घेतलेल्या विक्रमी झेलांची. ह्याला हसावं की रडावं? पण त्याची चिंता माध्यमांना नाही.अशा धेडगुजरीपणाची किती उदाहरणं द्यावी?
सुरेश भट लिहून गेले,
" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
"
त्याऐवजी आता म्हणावंसं वाटतं,
"कपाळ अमुचे करंटे वाचतो मराठी
झालो खरेच भ्रष्ट ऐकतो मराठी
धर्म, पंथ जात एक जाणतो विक्री
एवढ्या जगांत माय मानतो टिआरपी"
किंवा
"पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
"
ऐवजी
"घरभेदी किती असंख्य पोसते मराठी
अपुल्या घरचे वासे मोजते मराठी
हे असे कितीक स्पोर्टस पहाते मराठी
शेवटी हताश गुडघे टेकते मराठी"
[सुरेशजी, माफ करा पण तुम्हाला जाऊन फार दिवस नाही झाले तोवरच आमच्यावर ही पाळी आलीय!]

आज-काल सामोपचाराची भाषा कुणालाच कळेनाशी झालीय. मात्र झुंडशाहीपुढे सगळेच झुकतात. त्यामुळे 'मुम्बईतल्या सगळ्या दुकानांवर मराठी पाट्या लावल्याच पाहीजेत, नाहीतर तुमची दुकाने जाळून टाकू, उध्वस्त करू' ही मात्रा बरोबर लागू पडते आणि झक मारत इंग्रजीबरोबरीने मराठी [देवनागरी] पाटीहि झळकू लागते! ह्यामुळे मराठीचा फार मोठा विजय झाला किंवा हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वापरलेला मार्ग उचित होता, असं मी म्हणणार नाही. [गुमास्ता कायद्यांत एक साधी दुरुस्ती करून ही हे साधता आलं असतं.]
पण जर का उद्या 'तुमच्या मथळ्यांमधले आणि मजकूरांतले मिंग्रजी हटवा नाही तर तुमचा स्टुडिओ किंवा प्रेस जाळून टाकू' अशी धमकी देणारे जमाव लाठ्या-काठ्या आणि घासलेटचे डबे घेऊन माध्यामांच्या दारांत जमा झाले, तर माझी खात्री आहे की चट सगळी माध्यमे 'लायनी'वर येतील. प्रश्न एव्हढाच आहे की आपण [आणि माध्यमांनी] तोपर्यंत वाट बघायची का? आणि दुसरं म्हणजे, त्याशिवाय मराठी माध्यमं वठणीवर येणारच नाहीत का?
-बापू करंदीकर

गुलमोहर: