नजर भर के जिसे तुम देख लो वो खुद ही मर जाये....

Submitted by सामो on 27 September, 2019 - 09:43

आपल्या प्रेयसीने आपल्याकडे एक नजर टाकावी म्हणुन जीवाचे रान करणार्‍या, युगानु युगे ताटकळणार्‍या आपल्यासारख्या सामान्यांचे प्रेम आणि बा भ बोरकर यांसारख्या दिग्गज, प्रतिभाशाली कविंचे प्रेम या दोहोत तसा दर्जात्मक फरक काहीच नसतो. फरक असतो तो अभिव्यक्तीत. प्रेमपात्राच्या एका नजरेने जसे आपण जायबंदी होतो, घायाळ होतो तसेच कविही होतात. आपणही तोच eternity च्या डोळ्यात डोळे घालून पहाण्याचा क्षण अनुभवलेला असतो, ज्या क्षणी, काळ ही चवथी मितीच लोप पावलेली असते. फक्त हा क्षण आपल्याला शब्दबद्ध करता येत नाही. जरा सावरल्यानंतर आपण हिंदी गाणे गुणगुणतो-
.
"जरा नजरोंसे कह दो जी निशाना चूक ना जाये,
मझा जब है तुम्हारी हर अदा कातिलही कहलाये
ये भोलापन तुम्हारा ये शरारत और ये शोखी
जरुरत क्या तुम्हे तलवारकी तीरोंकी खंजरकी
नजर भर के जिसे तुम देख लो वो खुद ही मर जाये.."

.
तर बा.भ. मात्र सहजसुंदर प्रकटनामध्ये प्रेयसीच्या याच नेत्रकटाक्षाचे वर्णन करुन जातात की-
सखे तुझ्या डोळ्यांच्या पापण्या किंचित हलल्या काय, पर्वताच्या पार टोकावरती आलेल्या माझ्या मनाचा कडेलोट झाला. तू डोळ्यांच्या पाकळ्या किंचीत उचलून कटाक्ष टाकलास आणि जसे कमलपत्रावरील जलबिंदू डहुळतो तसे माझे आख्खे त्रिभुवनच डळमळून गेले. क्या बात है! कविने केलेल्या वर्णनात, कोणती अतिशयोक्ती आहे बरे. जर कविच्या हृदयातूनच गोड कळ उमटली असेल, कवि देहभान पुरते विसरला असेल तर त्याचे विश्वच डाळमळल्याचा त्याला भास झाला यात नवल ते काय! आणि मग त्रिभुवन डळमळाल्यानंतर काय उत्पात घडून आला तर तारे तारका झाडावरुन फुले टपटपावीत तसे गळून पडू लागले, आपापल्या वाहनांवरती आरुढ होऊन गगनी विहार करणारे देव गंधर्व त्या नेत्रकटाक्षाने धरणीवर कोसळून पडले. एवढेच नाही तर काय आश्चर्य!राखुंडे, सन्यस्त आणि विवेकचूडामणी असे तपस्वी, योगी, मुनी चळले. हां हां म्हणता त्यांची युगानुयुगांची तपश्चर्या भंग पावली. ऋतुचक्राचा आस गर्र्कन फिरला, पृथ्वीवरती पार उलथापालथ झाली, पर्वतोत्पात घडले आणि मग आकाशातून घनगंभीर शब्द उमटले - हे सुंदरी,
.
"आवर आवर अपुले भाले,
मीन जळी तळमळले ग!"

.
आवर तुझ्या मासोळीसम डोळ्यांची भाले, रुपेरी वर्खाचे, जळामधील मासे तळमळले, विव्हल झाले की आपल्याहूनही सुंदर, तेजस्वी हे कोण दोन मासे धरणीवर प्रकटले! या आकाशवाणीनंतर सलज्ज प्रेयसीने नजर जमिनीकडे वळवली आणि कविने सुटकेचा निश्वास सोडला की हुश्श! पुनरपि जग सावरले, भानावर आले. अर्थात कवि भावसमाधीतून जागा झाला. पुनः ऋतु पूर्ववत सुरु झाले, सृष्टीचक्र परत अव्याहत चालू झाले, तपोभ्रष्ट ऋषीमुनी परत पहील्यापासून तपश्चर्या करण्यास सुसज्ज झाले आणि मुख्य म्हणजे या नजरेच्या चकमकीनंतर, जादूनंतर कविच्या हृदयी जी ठिणगी पडली, जी चकमक घडली त्यामुळे प्रेमज्वाला दुप्पट तेजाने तेजाळली.
किती सुंदर काव्यमय वर्णन! अफाट प्रतिभा. उत्तुंग कल्पकता.
.
दुसरे कवि, आदि शंकराचार्य घ्या, महान तत्ववेत्ते, अद्वैत सिद्धांताचे जनक आणि प्रणेते, प्रखर बुद्धीनिष्ठ आणि तरीही हृदयाने तरल कवि,त्यांना सुद्धा रमणीच्या या सलज्ज कटाक्षांचे, विभ्रमांचे वर्णन चुकले नाही. फरक एवढाच, त्यांची प्रणयभावना, अत्युच्च भक्तीमध्ये लीन, झालेली दिसते, transcend झालेली दिसते.कनकधारा स्तोत्रातील पहीले ३ श्लोक -
.
अंग हरे: पुलकभूषणमाश्रयन्ती भृंगांगनेव मुकुलाभरणं तमालम ।
अंगीकृताखिल विभूतिरपांगलीला मांगल्यदाsस्तु मम मंगलदेवताया: ।।1।।
मुग्धा मुहुर्विदधती वदने मुरारे: प्रेमत्रपाप्रणिहितानि गतागतानि ।
माला दृशोर्मधुकरीव महोत्पले या सा मे श्रियं दिशतु सागरसम्भवाया: ।।2।।
विश्वामरेन्द्रपदविभ्रमदान दक्षमानन्दहेतुरधिकं मुरविद्विषोsपि ।
ईषन्निषीदतु मयि क्षण मीक्षणार्ध मिन्दीवरोदर सहोदरमिन्दिराया: ।।3।।

.
शेषशायी , समाधीस्त श्रीविष्णू हे जणू काळ्याशार तमाल वृक्षासम दिसत आहेत आणि ज्याप्रमाणे बहरलेल्या तमालवृक्षाकडे काळे भुंगे आकर्षित होतात त्याप्रमाणे क्षीरसमुद्भवा म्हणजे क्षिरसागरामधून जिचा जन्म झाला अशा, महालक्ष्मीचे भुंग्यासारखे काळेभोर आणि चंचल नेत्र परत परत , श्रीविष्णूंच्या ध्यानस्थ, सुंदर मुखकमलाकडे वेधले जात आहेत. निद्रीस्त, समाधीस्त शांत मुखकमल किती न्याहाळू आणि किती नाही असे रमेस होत आहे आणि ती परत परत मुखाकडे तिरपे कटाक्ष टाकत आहे. ध्यानस्थ मुकंदास कल्पनाही नाही, आणि या संधीचा फायदा घेण्यात रमेकडून कोणतीही कुचराई नाही. तिच्या काळ्याभोर डोळ्यांनी टाकलेले हे कटाक्ष म्हणजे जणू निळ्या कौस्तुभ मण्यांची वैजयंतीमालाच आहे जी की श्रीविष्णूंच्या वक्षावरती रुळते आहे. हे कटाक्षही कसे आहेत तर साक्षात श्रीहरींचे मनोरथ पूर्ण करु शकण्यासारखे, त्यांची कामनापूर्ती करु शकण्याइतके प्रासादिक आहेत. काय सुंदर कल्पना आहे.
बा भं ची विलक्षण सुंदर कविता आणि प्रासादिक कनकधारा स्तोत्र ही दोन्ही काव्ये वाचल्यानंतरची असीम शांती फक्त अनुभवण्याची गोष्ट आहे ती शब्दात मांडता येत नाही. त्यांच्या सौंदर्याने हृदय फक्त उमलून येते आणि ही अनुभूती उपभोगणे, एवढेच रसिक वाचकाच्या हातात रहाते

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर लिखाण.‌
<<आपणही तोच eternity च्या डोळ्यात डोळे घालून पहाण्याचा क्षण अनुभवलेला असतो, ज्या क्षणी, काळ ही चवथी मितीच लोप पावलेली असते. >> या विषयावर रंगनाथ पठारे यांनी एक पुस्तक लिहिले आहे. बरंच अश्लील वाटतं ते वाचताना, इतरही त्यांच लिखाण भडक वाटलं मला.

अप्रतीम ....
तुमच्या व्यासंगाला, वेधक दृष्टीला , आणि रसग्रहण- वृत्तीला स ला म !!