आठवणीतील चाळ...

Submitted by आरुश्री on 25 September, 2019 - 06:05

लहानपणीची एक गमतीशीर आठवण सहज आठवली म्हणून..

चाळ हि संकल्पना आजकाल जरी लोपत चालली असली, तरीही माझं बालपण मात्र याच चाळीमध्ये गेलंय.
तब्बल 10 बिऱ्हाडाची असलेली ती दोन मजली चाळ. प्रत्येक घरात फक्त 2 खोल्या ( म्हणजे आताच 1रूम kitchen).
पु. ल. च्या बटाट्याच्या चाळी सारख्या व्यक्ती आणि वल्ली जरी आमच्या चाळीत नसल्या, तरी काही नमुने मात्र होते.
प्रत्येक घरामध्यें किमान 1 तरी लहान मुलं असायचेच. शाळा सुटली कि आम्हा बालचमुंचा मस्त क्रिकेट, लगोरी, आबादबी, गोटया, विट्टी दांडू असल्या खेळांचा डाव रंगत असे, ते अगदी सूर्यास्त होईपर्यंत. चाळीसमोरच मोठं मैदान पसरलेलं होत, नाही म्हणायला तिथे एक वेल्डिंग च दुकान आणि एक पिठाची गिरणी होती. त्या गिरणीवाल्याला सगळे पिठाळ्या म्हणत असत, पण चुकून एकदा त्याच्याच बायकोसमोर त्याला पिठाळ्या म्हटल्यामुळे आम्हाला जो मार खावा लागलाय... त्याचे वर्णन आत्ता न केलेलेच बरे. आमच्या खेळायच्या मैदानाचा आर्धा भाग त्या दुकानांनी व्यापल्यामुळे आम्ही मुले मुद्दामच दुकानवाल्याला त्रास द्यायचो. तो दुसऱ्या मजल्याबरच्या पहिल्याच खोलीत रहायचा आणि गिऱ्हाईक आले की ते खालूनच त्याच्या नावाने ओरडायचे "आवटे आवटे" (त्याचे आडनाव) म्हणून. मग तो खाली यायचा, हे आम्ही एकदम चांगले न्याहाळले होते. त्यानंतर आमचा रोजचाच कार्यक्रम चालू झाला, कोणी आऊट झालं की मुद्दामच आवटे आवटे (आऊट आहे, आउट आहे) असं मोठमोठ्याने ओरडायच. आमच्या नादात बिचारा रोज खाली चकरा मारायचा आणि गिऱ्हाईक नाही पाहून परत घरी जायचा. त्यानंतर पुढे त्याने आम्हाला खाऊ आणि आकाशात उडणाऱ्या भिंगऱ्या दिल्यापासून, आम्ही मुलांनी त्याला आमचा दादा बनवले आणि त्रास देणे सोडून दिले.
संपूर्ण चाळीसाठी पाणी भरायला एकच नळ आणि पाण्याची वेळही फक्त 1च तास असल्याने, खेड्याकडे पहायला भेटणारा आणि आजकाल दुर्मिळ होत चाललेला "नळावरच भांडण" हा कार्यक्रम आम्हाला न चुकता संध्याकाळी 6 ते 7 आणि सकाळी 7 ते 8 या वेळेत अगदी फुकटात पहायला मिळायचा.
मधल्या काळामद्ये चोरांचा सुळसुळाट झाल्याने, सर्व चाळकर्यानी मिळून एक गुरखा रात्री पाळतीवर ठेवला होता, आणि सर्वजण मिळून त्याला प्रत्येकी घरटी 5 रुपये म्हणचे 50 रुपये महिना देत असत, त्या बदल्यात तो रोज रात्री येऊन प्रत्येकाच्या दारासमोर मोठ्याने काठी वाजवून जात असे, जर कोणाच्या दारासमोर काठी नाही वाजवली, तर दुसऱ्या दिवशी त्याला सज्जड दम दिला जायचा. असा त्याचा रोजचा दिनक्रम, नव्हे रात्रक्रम चालू झाला. 2 च्या सुमारास येऊन सर्वांच्या दारासमोर काठी आणि शिट्टी वाजवून जाणे. पण त्या रात्री झाले असे कि, गुरख्याने आमच्या दारासमोर काठी आणि शिट्टी वाजवायचा, कुत्री भुंकायचा, आणि मला काहीतरी भयंकर स्वप्न पडून मी जाग होण्याचा योगायोग असा काही जुळून आला की, मी झोपेतच मोठ्याने ओरडले, माझा आवाज ऐकून, माझ्या शेजारीच झोपलेले माझे वडीलही मोठ्याने ओरडले (हि त्यांची जुनी सवय, माझ्या पाठोपाठ ओरडायची), त्यानंतर आई, दादा आणि लहान भाऊ अश्या सगळ्या मिळून एकापाठोपाठ पाच आरोळ्या (नव्हे किंकाळ्याचं) चाळीतील लोकांना जाग करायला खूप होत्या. या आरोळ्या ऐकून बिचारा गुरखा जे तेथून पसार झाला ते सकाळी 6 लाच आमच्या दारात हजर, नाही म्हणायला त्याच्यासोबत आजूबाजूच्या 4 साळकाया माळकाया, 2-3 म्हातारे, शेम्बडी पोर आणि काही मुरलेले राजकारणी (जे कुठल्याही गोष्टीवर मनसोक्त तोंडसुख घेऊ शकतात आणि स्वतःला नसलेली अक्कल पाजळू शकतात अशी लोक) हे सुद्धा जमा झालेलेच. त्या 5 किंकाळ्याची गोष्ट अगदी प्रत्येकजण आपआपल्या बाजूने रंगवून सांगत होता. आणि आमचे दार कधी उघडतय याच प्रतीक्षेत सगळे दारावर डोळे लावून बसलेले. इकडे दुसऱ्या बाजूला हम पांच (अशोक सराफांच्या हम पांच पेक्षा काही कमी नाही बरका) रात्री आरडाओरडा आणि गाव जाग करून अगदी ढाराढुर झोपलेलो, जणू काय काही घडलेच नाही. शेवटी कडी जोरजोरात वाजल्यावर वडिलांनी झोपेतच दरवाजा उघडला, तर प्रत्येक जण घरात स्वतः डिटेक्टिव्ह असल्यासारखं डोकावत होता,
शेवटी वडिलांनी बाहेर जाऊन दरवाजा लावून घेतला, आणि गुरख्याच्या हातावर 5 रूपये टेकवले, आणि सांगून दिले तुझे महिन्याचे 5 रुपये मी नियमितपणे आधीच देत जाईन, पण बाबा रे यापुढे आमच्या दारात काठी वाजवत जाऊ नकोस, माझी लहान मुलगी घाबरते आणि झोपेत किंचाळते. अजून प्रश्नांची सरबत्ती होण्या आधी त्यांनी आत पळ काढला आणि दरवाजा लावून घेतला. त्यानंतर घरात जो काही हशा पिकलाय, तो वेगळ्या शब्दात सांगायला नकोच...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाहाहा. त्या आवटे व्यक्तीची दया पण आली , हसू पण आलं Happy
____
>>काही मुरलेले राजकारणी (जे कुठल्याही गोष्टीवर मनसोक्त तोंडसुख घेऊ शकतात आणि स्वतःला नसलेली अक्कल पाजळू शकतात अशी लोक) >> मस्त निरीक्षण आहे.
लिहीत रहा आरुश्री.

हा हा हा. लै भारी. गुरखा खुष झाला असेल. आवटेने लाच देऊन पाठीमागची पिडा दूर केली म्हणायची.

आधी आवटेबद्दल दया आली होती. लहान मुलं नकळत क्रूर असतात.
नंतर त्याने वापरलेल्या ट्रिकवरून हुशार आहे आवटे असं वाटलं.

बादवे गुरखा किंकाळ्या ऐकून पळून गेला होता ना? मग वडलांनी त्याच्या हातावर ५₹ कधी टेकवले?

आणि किंचाळून झाल्यावर सगळे परत डाराडूर झोपले होते ते परत सगळेच्यासगळे शेजाऱ्यांच्या दार वाजवण्यामुळे उठले का?

आणि इथलं माबोवरच ऍव्हरेज वय अंदाजे ४० आहे त्यामुळे चाळीत/वाड्यात रहाण्याचा अनुभव बर्याचजनाकडे असेल असे वाटते.

>> गुरखा किंकाळ्या ऐकून पळून गेला होता ना? >> तुम्ही जर लेख नीट वाचला असेल, तर त्यात दिलय कि गुरखा रोज रात्री 2 ला काठी वाजवत असे. तो रात्री पसार झालेला, तो सकाळी उगवला. आणि ढाराढुर झोपलेले सगळे, कडी जोरजोरात वाजवल्यामुळे उठले. आणि राहता राहिला चाळीत रहाण्याचा अनुभव तर तो सर्वांनाच असेलही, पण मी असं लिहलय कि 'चाळ हि संकल्पना आजकाल लोप पावत चालली आहे". म्हणजेच तिची जागा आजकाल फ्लॅट्स ने घेतलीये. त्याचा अनुभव कोणाला नाही, असा त्याचा अर्थ होत नाही.