निळा पक्षी

Submitted by सामो on 21 September, 2019 - 20:24

साठीला आली होती ती. क्षणांची वाळू झरझर झपाट्यानी काळाच्या चाळणीतून गळून जात होती. आताशा रोज तिची कंबर दुखत असे, हाडं कुरकुरत, पायात गोळे येत असत
पण अजूनही निळा मखमली पक्षी दिसायचं नाव नव्हतं. परंतु त्या पक्षाची आस, त्याचं तिच्या मनावरचं गारुड तसूभरही कमी झालं नव्हतं. लहानपणी निळ्या मखमली पक्षाला भेटण्याचं जितकं वेड होतं त्याहीपेक्षा जास्त वेड आता तिला लागलं होतं. या पक्षाचं गुपित नक्की केव्हा तिने ऐकलं तिलाही सांगता येणार नाही कारण ते तसं कोणी सांगीतलच नव्हतं तिला. ते तिला मनोमन आकळलं होतं. तिला जोपर्यंत आठवत होतं तोपर्यंत तिला त्याला भेटण्याच्या ध्यासानी झापटलेलं होतं हेच आठवतं होतं. लहानपणी वाटलं तरुणपणी भेटेल, तरुणपणी वाटलं आता भेटेल - मग भेटेल असं करता करता आता बरच वय झालं होतं. ती मात्र त्याच निष्ठेने वाट पहात होती.
आतापर्यंतच्या आयुष्यात तिने बरच काही पचवलं होतं. भलेबुरे अनुभव घेतले होते. खूप चांगल्या लोकांनाही ती भेटली होती. त्यातलीच एक जी प्रत्यक्ष निळ्या मखमली पक्षाला भेटून आलेली. तिला हिनी विचारलं होतं "कसा असतो तो पक्षी दिसायला?" आणि उत्तर मिळालं होतं -
"खूप, अतिशय, अतोनात सुंदर, अद्भुत!
त्याची निळाई पहाताना असं वाटतं शरीराला हजारो डोळे फुटावे आणि त्याचं लावण्य उपभोगावं
त्याचं मान वेळावणं, पिसांत चोच खुपसणं, परत लाडीक कटाक्ष टाकणं, अंग फुलवणं सारं मनात साठवून घेण्यास एक जन्म अपुरा पडतो.
त्याची आर्त शीळ मनात अनामिक हळव्या आठवणींच्या लाटा घेऊन येते ज्या की शब्दांत व्यक्त करता येत नाही.
फार अल्प काळ तो दर्शन देतो मात्र त्याच्या अस्तित्वाचे मोहक पडसाद कायमचे हृदयात उमटवून जातो."
मग हिनी विचारलं "कशावरून तो तोच पक्षी आहे हे ओळखायचं?"
उत्तर मिळालं " त्याच्या अस्तित्वाइतकेच, त्याच्या दर्शनाचे पडसाद त्याची ओळख आहेत. तो उडून गेल्यानंतर प्रत्येक दिवशी तुमचं हृदय त्याच्या स्मृतीकिरणांनी जणू कोमल कमळ बनून हळूहळू उमलतं. तुमच्या आत्म्याला त्याचा मंजूळ कलरव वेढून रहातो आणि आत्मा अधिक प्रकाशमान होतो. मनात येणारी अनाठायी विचारवादळं स्तब्ध होऊ लागतात. शीतल शांती मिळू लागते."
तिला नीटसं कळलं नाही नक्की काय आणि का होतं ते पण तिची उत्कंठा अधिकच वाढली. आणि जरी पाय दुखत असले, हाडे कुरकुरत असली , सांधे मी मी म्हणत असले तरी ती परत वाट पाहू लागली, त्याच तन्मयतेनी. तिला एक दिवस तो पक्षी नक्की भेटणार होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users