सुवर्णलता

Submitted by Asu on 21 September, 2019 - 06:27

सुवर्णलता ताई,
तुला अचानक कलर्स मराठी वरील 'स्वामिनी' मालिकेत कावेरीच्या आईच्या भूमिकेत बघितले आणि आश्चर्याचा व आनंदाचा सुखद धक्का बसला.
ठाण्याच्या 'पोएट्री मॅरेथॉन' या काव्यवाचनाच्या कार्यक्रमात आपली भेट झाली होती. तू स्वतःहून आपलेपणाने आम्हां उभयतांशी ओळख करून घेतली, माझं साहित्य वाचायला खूप आवडतं, त्याबद्दल मी सगळ्यांना सांगत असते असे म्हणून आमच्याबरोबर फोटो काढायची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे, तू कवयित्री आहेस हे माहिती होतं.
नोकरी करून हॉबी म्हणून डबिंग करतेस, हौस म्हणून आर्ट क्रिएशन्स चालवतेस. हेही तू सांगितले होतेस. तद्नंतर महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलास हेही वाचण्यात आले होतेच. पण तुला अभिनयाचेही अंग आहे, हे समजून आनंद द्विगुणीत झाला.
तुझ्या संवेदनशील व सुसंस्कारित व्यक्तिमत्त्वाची प्रथम भेटीतच मला जाण आली होती. तुझी कीर्ती तुझ्या नावाप्रमाणेच गगनाला भिडो. आणि या सुवर्णलतेला खतपाणी घालून सदैव तिच्या पाठीशी असणाऱ्या सहचराचे, श्वशुरांचे आणि पित्याचे मनःपूर्वक अभिनंदन!
तुझे बहुरंगी बहुढंगी व्यक्तिमत्व शब्दात पकडणे तसे कठीणच! पण, मी केलेला हा प्रयत्न कदाचित तुला आवडेल.

सुवर्णलता

काळ्या माती उपजली
सोन्याची नव वल्लरी
आनंदे अचंबित सगळे
नगरजन अन् शेतकरी

कौतुक तव जन्मदात्यांचे
धारिष्ट्य म्हणा वा द्रष्टे
सुवर्णलता नाव ठेविले
घडविले अन् तसेच कष्टे

रूप गुणांची खाण तू
सुवर्णकांती सोनपरी
नाव तुझे तू सार्थ करी
बावनकशी सोन्यापरी

प्रसन्नचित्ती सदैव हसरी
नयन तव जणू वैखरी
काव्यमंजिरी कनकवल्लरी
प्रतिभा तुझी बहुपदरी

भाग्यवान कुटुंब ठरले
ज्यात बहरली ही जाई
कीर्ती सुगंध तुझा पसरो
मातपित्यांची तव पुण्याई

काव्य अभिनय सौंदर्याचा
त्रिवेणी संगम तव ठायी
अभिमानी सर्व समाजबंधु
हेमलता नभी उंच जाई

डोंबिवली संस्कृतीनगरी
कलागुणांची असे खणी
किती रत्ने दिली आजवरी
त्यातलीच एक तू हिरकणी

- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
(दि.20.09 2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults