कपाटाचा खालचा कप्पा

Submitted by Mrudu on 18 September, 2019 - 01:07

आज “कपाट लावणे” या महाकार्यासाठी तिने मुहूर्त काढला होता. वरचे कप्पे उरकले होते. आता फक्त शेवटचा, कपाटाचा खालचा कप्पा की झालं!

किती आणि काय काय भरलंय या कप्प्यात? तिच्या मनात आलं. खरं तर फारशा न लागणार्‍या, पुढे कधीतरी लागतील म्हणून ठेवलेल्या गोष्टींचा हा कप्पा. गोष्टी कसल्या, आठवणीच् त्या. ही सगळ्या पर्सेस ठेवलेली पिशवी, जसा कार्यक्रम तशी पर्स असावी म्हणून ठेवलेली. पण दर वेळी निघताना घाई होते आणि जी हाताला लागेल ती पर्स घेऊन आपण बाहेर पडतो. मग का ठेवल्यात या आपण? कशा देऊन टाकणार त्या आठवणी? ही आईने नवीन ऑफिसला जाताना दिली होती. ही सासूबाईंनी पहिल्यांदा घरी आले तेव्हा देलेली भेट. ही मावशीची आठवण, तर ही तिच्या पहिल्या परदेश प्रवासाची आठवण.

हे जुने कपडे पावसाळ्यात लागतात. ड्रेस बोहारणीकडे गेल्यामुळे गुपचुप बसलेल्या ओढण्या अचानक नवीन ड्रेसला मॅच होतात. तिथेच मागे लपलेला तो जुना फोटो अल्बम हाताला लागला. सगळ्या मैत्रिणींचे ते हसणारे दिवस त्यात सापडले तिला. इतक्यात ती डायरी दिसली-कवितांची. काही कविता तिच्या तर काही तिच्या आवडत्या कवींच्या.

एवढंच नाही, याच कप्प्यात सगळे रूमाल,मोजे,स्वेटर अशा ऋतूनुसार लागणार्‍या गोष्टी मिळेल त्या जागेत आनंदाने राहिल्यात. या कप्प्याचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग अर्थातच् “सर्वसमावेशकता”. जे काही बाकीच्या कप्प्यांना वर्ज्य, ते या कप्प्यात नक्की स्वीकारलं जातं. आपण कपाट उघडलं की पहिल्यांदा लक्ष जातं वरच्या कप्प्यांकडे. त्यामुळेच कपाट आवरताना आपण वरचे कप्पे आधी आवरतो, ते अगदी छान,नीटनेटके करतो. खालचा कप्पा मात्र तेव्हा थोडा मागे पडतो. त्याची आठवण तेव्हाच येते जेव्हा काहीतरी शोधायचं असतं.

या खालच्या कप्प्याची हीच तर गंमत आहे. रोज लागणार्‍या गोष्टींसाठी भले बाकीचे कप्पे असोत, आपल्या आठवणी जपून ठेवणारा, महत्त्वाच्या गोष्टी साठवणारा, नीटस न दिसणारा पण आपल्या गरजा नीट ओळखणारा हा कपाटाचा खालचा कप्पा. त्याचं आणि त्याच्यामुळे इतर गोष्टींचं महत्त्व समजलेली ती हसली आणि तो कप्पा होता तसा परत लावायला लागली.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय

मी चुकून ते कट्टपाचा खालचा कप्पा असे वाचले

छान Happy