खारीचा वाटा (भाग - २ ) - वरणगे गावाची अवस्था

Submitted by बेफ़िकीर on 17 September, 2019 - 22:04

समाजातील सहृदय नागरिकांनी हाकेला ओ देऊन दिलेली मदत कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना पोचवण्याचे काम दोन भागात केले. तिसर्‍या भागात होणार्‍या मदतीसाठी एक आठवड्याने पुन्हा जाणार आहेच. खारीचा वाटा (भाग एक) मध्ये सुमारे साडे बावीस हजार रुपयांचे साहित्य तर खारीचा वाटा (भाग दोन) मध्ये साडे एकोणीस हजार रुपयांचे साहित्य घेऊन गेलो होतो. यात प्रामुख्याने धान्य, साड्या, विविध गरजेच्या वस्तू, सॅनिटरी नॅपकीन्स, महिलांची अंतर्वस्त्रे व अंथरूण पांघरूणे होती. पुढील फेरीतही हेच साहित्य लागणार आहे व याशिवाय चटया आणि ब्लँकेट्स लागणार आहेत. पहिल्या भागात चित्रदुर्ग मठात आश्रयाला आलेल्या, लोहार व सुतार वस्तीतील पासष्ट कुटुंबातील सुमारे दोनशे लोकांना मदत दिली. कालव्याला लागून कच्ची घरे बांधून राहणार्‍या या बिचार्‍यांची पूर्ण घरे त्यातील चीजवस्तूसकट एका रात्रीत वाहून गेली. खारीचा वाटा - भाग दोन मध्ये वरणगे या गावातील साठ घरांमधील सुमारे चारशे नागरिकांना मदत दिली. या वरणगे गावाचा अल्प वृत्तांत देत आहे. तेथील परिस्थिती पाहून मन थिजून जाईल अशी अवस्था आहे. छायाचित्रे व मदत करणार्‍या नागरिकांची नांवे मुद्दाम येथे देत नाही. मात्र जी छायाचित्रे आहेत ती बघितल्यास दुरावस्थेची किंचित कल्पना येईल. प्रत्यक्षात त्याहून भयंकर परिस्थिती झालेली आहे. शिवाय, ही फक्त दोन ठिकाणे कव्हर केली गेली. या व्यतिरिक्त अनेक वस्त्या, वाड्या अशा आहेत जेथे अजून कित्येक दिवस मदतीची गरज आहे. एका रेशन कार्डावर शासनाने पाच हजार रुपये रोख इतकी मदत दिलेली आहे. मात्र अर्ध्या तासात ढासळलेली घरे आणि खाली दबले गेलेले संसार उभे करणे त्यातून शक्य नाही. हृदय थांबेल अशी अवस्था असूनही किंचित सावरलेले नागरिक मोठ्या धीराने आणि हसतमुखाने पुन्हा उभे राहण्यासाठी लढत आहेत. सर्व भेदाभेद विसरून एकमेकांना घरात ठेवून घेत आहेत.

दोन भागांपैकी दुसर्‍या भागातील वरणगे गावचा हा वृत्तांत!

=====

कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर कोल्हापूरपासून जेमतेम काही किलोमीटरवर कुंभी, कासारी, गुप्त सरस्वती, पंचगंगा आणि भोगावती या पाच नद्यांनी विळखा घातलेल्या वरणगे गावात एका रात्रीत पूर आला. एका बाजूने पाणी येत आहे हे पाहून त्या विरुद्ध दिशेला पळावे तर तिकडूनही पाणी येऊ लागले होते. सुरुवातीला पोटर्‍या भिजतील इतकेच पाणी आहे हे पाहून नागरिकांनी चीजवस्तू सुरक्षित राहतील याची काळजी घ्यायला सुरुवात केली. मात्र अल्पावधीतच पाण्याची पातळी वाढू लागली. पाणी घरात नुसते शिरले नाही तर काहीच वेळात ते चार ते साडे चार फूट पातळीवर चढले.

एक आजोबा सुरुवातीपासून घराच्या दारात बसून होते. तरुणांना सांगत होते की ते कित्येक वर्षे तेथे राहत आहेत आणि एवढे काही पाणी वगैरे येत नाही, काळजीचे कारण नाही. केवळ विसाव्या मिनिटाला अशी परिस्थिती उद्भवली की चार तरुणांना त्या आजोबांना कंबरेइतक्या पाण्यातून उचलून सुरक्षित ठिकाणी हलवायला लागले. त्या आजोबांच्या तोंडून फक्त 'इतकं पाणी आलवतं'या शिवाय शब्दही फुटत नाहीयेत.

तान्ह्या मुलांना, लहानग्यांना आणि म्हातार्‍या-कोतार्‍यांना घेऊन नागरिक शाळेत धावले. घरातील काही किरकोळ रोख रक्कम तेवढी जवळ ठेवायला वेळ मिळाला. काही दागदागिने असतील व ऐनवेळी हाताला लागले असतील तर तेवढे लागले म्हणायचे. बाकी घरातील एकसुद्धा वस्तू त्यांना कोठेही हलवता आली नाही. वीज नाही, सर्वत्र अंधार आणि आक्रोश अशा वातावरणात सगळे शाळेत जमले होते. बाकी सगळ्या जगाला जरी माध्यमांमधून समजत असले की त्या सगळ्या भागात पुराने हाहाकार मांडला आहे तरी त्या नागरिकांना स्वतःला काहीच माहिती कळत नव्हती. जावे तिकडून पाणीच पाणी येत होते. पाण्यातून वाट्टेल ते लहानसहान प्राणीही येत होते. आपल्या घराचे काय झाले असेल ही चिंता भेडसावणे दूरच, आधी आपण वाचतोय की नाही हाच प्रश्न होता. वस्तीतील प्रत्येक नागरिक सुरक्षित ठिकाणी आला आहे की नाही हे पाहण्यासाठी अनेक तरुण सरसावले होते.

पाणी ओसरलेच नाही. दुसर्‍या दिवशी प्रकाशात समजले की घरांची वाताहत झालेली आहे. कंबरेएवढ्या पाण्यातून जाऊन जो तो आपापले घर निरखत होता. साठपैकी सुमारे आठ घरे जमीनदोस्त झालेली होती. इतर घरांमध्ये अजूनही तीन, साडे तीन फूट पाणी होते. त्या सगळ्या राड्यामध्येच कपाटे, टीव्ही, भांडीकुंडी, कपडे या सगळ्या वस्तू दबल्या गेलेल्या होत्या. एवढे करून वापरायला पाणी नव्हतेच. नंतर तर असे समजले की अन्नाची पॅकेट्स घ्यायलाही लोकांनी नकार दिला कारण शौचालयाचीच उपलब्धता नव्हती. (हे विशिष्ट विधान कोल्हापूरमधील इतर भागाशी संबंधीत असून वरणगे गावाशी नव्हे). वरणगे गावात जिकडे बघावे तिकडे पाणी होते. एरवी सर्व बाजूंनी सहज दिसणारा ऊस दिसेनासा झाला होता.

आता समाजमंदिर, शाळा व पाण्यापासून वाचलेली घरे येथे नागरिक जमा झाले. एकमेकांच्या मदतीने स्वयंपाक करून बिचारे जसे जमेल तसे जेवत होते. उभे केलेले संसार एका रात्रीत जमीनदोस्त झाल्याच्या दु:खाने स्त्रियाच नाही तर पुरुषही ओक्साबोक्शी रडत होते. मात्र एकमेकांना तेवढा धीर देत होते.

एका आजींचे घर वाचले. घरही भरपूर मोठे, चार खोल्यांचे! आजी एका खोलीत स्वतःच्या सामानासकट शिफ्ट झाल्या आणि उरलेल्या तीनही खोल्या त्यांनी तीन पीडित कुटुंबांना राहायला देऊन टाकल्या. पाण्यातून चालत चालत मिळालेली भांडीकुंडी आणि कपडे घेऊन नव्याने संसार थाटले गेले. जे गेले ते गेले, जे मिळाले त्यावर पुन्हा चुली पेटल्या.

ही वस्ती वरणगे गावाच्या एका बाजूला, अगदी नदी काठाशी! वरणगे गावात प्रवेश करता येतो तेथेही पुरामुळे नुकसान झालेलेच होते. मदत घेऊन येणार्‍या गाड्या जाहिरातबाजी करत बॅनर लावून येत होत्या. त्यामुळे त्या मदत घेऊन आलेल्या गाड्या आहेत हे प्रवेशाच्याच ठिकाणी सगळ्यांना समजत होते. दांडगे लोक तेथे थांबून त्या गाड्या तेथेच थांबवून रिकाम्या करत होते. आतपर्यंत असलेल्या वस्त्यांना मदत पोचतच नव्हती. प्रवेशापाशीच आपापल्यांमध्ये मदतीचे वाटप करून लुटालूट सुरू झाली होती. संस्कृती, विकृती आणि कसला कसला अभद्र मिलाफ म्हणायचा हा!

चौफेर पाणी होते पण दोन दिवसांनी डोळ्यांचे पाणी थांबले ते आजही थांबलेलेच आहे. अविश्वसनीय अशा संकटानंतर काही माणसे अजूनही थिजून बोलत आहेत. काही माणसे सावरत आहेत. यात काहीच आश्चर्य नाही की स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक गतीने सावरून पुन्हा उभ्या राहत आहेत. त्यांचे चेहरे हसरे कसे असे विचारल्यावर म्हणत आहेत की सगळ्यांचेच सगळे गेले, सगळेच एका रात्रीत एकसमान झाले, आता रडायचे कशाला? त्या हेही म्हणतात की पहिल्या तीन दिवसांत आला असतात तर आक्रोशाशिवाय काहीच ऐकायला मिळाले नसते.

आता पाणी ओसरले असले तरी इतके पाणी होते की घरातील जमिनीची ओल जातच नाही. त्यात अजून ऊन पडलेले नाही. त्या ओलसर जमिनीवर तुरटी, जुनाट फ्लेक्स वगैरे टाकून लोक झोपत आहेत कारण अंथरुणे, पांघरुणांचा लगदा वाहून गेलेला आहे. तान्ह्या मुलांना कसेबसे पाळण्यात ठेवलेले आहे. एक मनुष्य त्या धक्क्याने हृदयविकाराचा झटका येऊन वारला. त्याची विधवा बायको जेमतेम तीस वर्षाची असून सासू आणि दोन छोट्या मुलांसह समाजमंदिरात राहत आहे. तिच्या चेहर्‍यावरील भाव पाहून कोणत्याही माणसाच्या काळजाला घरे पडतील.

आमच्याकडून झालेली मदत सर्वांनी एकोप्याने वाटून घेतली. आमच्या गाडीला अर्थातच कोणताही बॅनर वगैरे असणारच नव्हता व त्यामुळे आम्ही थेट प्रत्यक्ष लाभार्थींपर्यंत पोचू शकलो. याच गोष्टीचा त्यांना खूप आनंद झाला होता. साठच्या साठ घरांमध्ये मला हाताला धरून नेण्यात आले. प्रत्येकाने आपापली झालेली हानि दाखवली. सर्व घरांमध्ये कुबट वासाने ठाण मांडलेले आहे. सर्वत्र अंधारच आहे. विजेवर चालणार्‍या सर्व वस्तू बंद पडलेल्या आहेत. पडलेल्या घरांमध्ये माती व विटांचे आणि लाकडी खांबांचे ढिगारे आहेत. पाईपने लांबवर पाणी पोचवून नागरिक नैसर्गीक विधीसाठी जात आहेत. सगळे एकाच रात्रीत रस्त्यावर आल्यामुळे कोणतेही मतभेद आता राहिलेले नाहीत. माणसावर ओढवू शकणारी एक सर्वात दुर्दैवी वेळ आणि त्यातूनही फुललेले माणूसपण असे अनोखे मिश्रण तेथे आढळत आहे.

अजूनही कित्येक दिवस मदतीची गरज भासणार आहे. अनेकांना तर थेट आर्थिक मदतीचीच आवश्यकता आहे. खारीचा वाटा (भाग तीन) मध्ये आठ दिवसांनी पुन्हा जाण्याचे ठरवले आहे. मात्र या वेळी वरणगे गावालाच जाणार आहे कारण त्यांना तसा शब्द देऊन आलो आहोत.

जिथे भगदाड पडले आहे तेथे कण कण मदत घेऊन जाऊन काहीच होणार नाही हे खरे, पण निदान आपल्या मदतीतून माणसे दोन ते तीन दिवस पोटभर जेवली आणि त्यांना वापरायला कपडे मिळाले हेही समाधान खूप आहे. मात्र समाधानापेक्षाही मनावर त्या पुराच्या भीतीचा काळोखच अधिक पसरलेला आहे.

कोल्हापूरमधील काही भागात मदत अती झाली आहे तर काही भागात अजूनही प्रचंड मदतीची आवश्यकता आहे.

बेळगावहून म्हणे काही कन्नडभाषिक बरीच मदत घेऊन आले होते. त्यांना गावाच्या प्रवेशापाशीच थांबवून सगळे तेथेच उतरवून तिथल्यातिथेच आपापसात वाटून घेतले गेले. माणसातील माणूसपण आणि रानटीपण या दोन्हींचे आविष्कार तेथे दिसून येत आहेत.

काडेपेटी, चमचे आणि रुमाल येथपासून ते सर्व काही जमवत जमवत आपण आपापले घरटे उभे करतो. एका रात्रीत ते सगळे गेले की आयुष्याचा एक भयानक अर्थ नव्यानेच कळत असावा.

=====

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad
तुम्ही आणी बर्‍याच लोकांनी माणुसकी दाखवुन निदान खारीचा वाटा तरी उचललात. बाकी या दांडग्यांविषयी वाचुन खूप चीड आली. Angry ह्या असल्या लोकांमुळे गरीबांपर्यंत मदत पोहोचत नाहीच. पण तुम्ही बॅनर नाही लावले हेच बरे केले. निदान त्यांना मदत तरी मिळाली.

खूप वाईट वाटले परिस्थितीचं वर्णन वाचून. खारीचा वाटा उचलला व मदत पोचवल्याबद्दल समस्त माबोपरिवाराकडून आपले आभार व धन्यवाद.
तुरटी ऐवजी तरट ( गोण्यांचं बारदान) लिहायला हवं होतं का.

ओके

ते लोक तुरटी, तुरटी म्हणत होते म्हणून मीही तसेच लिहिले

खूप छान वाटले की तुमची मदत गरजू पर्यंत पोहचली.
आमच्या गावात सुद्धा पुराचे पाणी आले होते, अगदी पूर्ण नाही पण सुरुवातीची दोन घरे जी मुख्य गावापासून थोडी दूर आहेत ती अन गावाच्या त्या बाजूची शेती पाण्याखाली गेली. बऱ्याच नातेवाईकांचे खूप नुकसान झाले. चुलत भावाचे होंडाचे शोरूम चांगले आठवडाभर ५-६ फूट पाण्यात होते. कित्येक दिवस कुणाशीच संपर्क होत नव्हता. पण लांबच्या गावातून सगळे सुखरूप आहेत, एव्हडे कळले होते. गावी आमची काही शेती अगदी नदीकाठी असून सुद्धा असे कधीच झाले नव्हते. सगळी मोठी माणसे हेच म्हणतायेत की किमान ७० वर्ष तरी असा पाऊस अन पूर दोन्ही झाला नाही. उद्ध्वस्त झालेल्या घरांपैकी बरीचशी घरे जुनी मातीची होती. पण काही घरे तर कर्ज काढून नुकतीच बांधलेली होती. ज्यांची भात शेती आहे त्यांचे खूप नुकसान झाले. त्यामानाने ऊस शेती तग धरून आहे. भले नेहमी इतके उत्पन्न मिळणार नाही, तरी पूर्ण तोटा नाही. सुदैवाने यावर्षी आमच्या एकाच शेतात भात पेरला होता अन बाकीची ऊस शेती आहे.

ज्यांची घरे शेती वाहून गेली, त्यांची अवस्था तर खूपच विकट आहे. मुलांची पुस्तके, दाखले, महत्वाची कागदपत्रे नष्ट झाली आहेत, गावातील मुख्य दवाखाना सुद्धा उध्वस्त झाला. गावकरी, आजूबाजूचे गावकरी पूरग्रस्तांना मदत करत होते, तेवढेच, कारण सरकारला तिकडे पोहचे पर्यंत ६-७ दिवस उलटून गेले होते. तोवर तर त्यांची मदत ची अपेक्षा सुद्धा राहिली नव्हती.

खुप वाईट अवस्था झाली होती खरच.
फक्त वाचुन अस्वस्थ वाटल, तर तिथे काय भायानक अवस्था असेल.
- ईश्वर करो आणि तेथील परिस्तीथी लवकरात-लवकर पुर्ववत होऊदे.
- आपण केलेल्या मदतीचे खरोखर कौतुक आहे.

जामोप्या, वरणगे!

VB - हो, ऊस किंचित टिकलाय म्हणे! आणि हो, तरटी म्हणत असतील

सर्वांचे खूप आभार प्रतिसादासाठी

विचार केला तरी सुन्न व्हायला होतं. प्रत्यक्ष बघितल्यावर तर काय होत असेल?
अविनाश धर्माधिकारींंचं अस्वस्थ दशकाची डायरी नावाचं पुस्तक आहे. त्यात 'आंध्रानुभव' नावाचं प्रकरण आहे. त्याची आठवण झाली हे वाचताना.

तरटे म्हणजे पोते , शेती , वस्त्रोद्योग यातुन माल ये जा होत असल्याने अशी पोती खेड्यात भरपूर असतात , सतरंजीसारखी वापरतात

बेफि - फार चांगले काम सुरू आहे!

तेथील भीषण परिस्थितीबद्दलची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याबद्दलही धन्यवाद.

ओहह. . . खूप भयानक परिस्थितीला बदलायचं आहे. आपल्या कामाला खूप खूप शुभेच्छा! इथे नक्की शेअर करत राहा. मला प्रत्यक्ष मदतीला जाणं शक्य झालं नाही. पण मीसुद्धा मैत्री संस्थेच्या मदतकार्यामध्ये खारीचा वाटा घेतला आहे.

भयंकर आहे.तुम्हाला मदत करायची संधी मिळाली आणि मदत योग्य ठिकाणी पोहचली हे चांगले.
लोक गाड्या थांबवून रिकाम्या करतात हे वाचून नव्याने चिडायला झालं.बाकी जग दुःखात असताना दुसऱ्यासाठी असलेल्या वस्तू लाटून काय वर घेऊन जाणार आहेत का?

बाकी जग दुःखात असताना दुसऱ्यासाठी असलेल्या वस्तू लाटून काय वर घेऊन जाणार आहेत का?
>>> मोठ्या आपत्तीमुळे लोकांच्या मनात प्रचंड असुरक्षितता निर्माण होते. त्यामुळे सारासार विचार न करता मिळेल ते जमवण्यामागे लोक लागतात. लातूर भुकंपानंतर तेथील मुलं मदत आणणारांकडे भारीतली बिस्किटे मागत व साध्या बिस्कीट पुड्यांना नको म्हणत होती असे वाचले होते.