रुचकर मेजवानी - {आजीचा खाऊ } - { मोतीपाक} - { मनीमोहोर }

Submitted by मनीमोहोर on 10 September, 2019 - 05:54

आपली खाद्य संकृती पंचक्रोशीच्या सीमा ओलांडून कधी पलीकडे गेली ते समजलं ही नाही. जिल्हा, प्रांत ह्यांच्या पलीकडे जाऊन आता आपण दुसऱ्या देशातले ही पदार्थ आपलेसे केले आहेत. घावन , आंबोळ्या ह्यांच्या बरोबर डोसे, अप्पम ह्यांनी ही न्ह्याहरी च्या ताटलीत मानाचे स्थान पटकावले आहे. आणि थलिपीठं, आणि कुरडया शेवया इतकाच नव्हे तर काकणभर अधिकच पिझ्झा आणि पास्ता आपल्याला आवडू लागला आहे. अर्थात त्यात काही गैर आहे असं ही नाही. सतत नावीन्याचा ध्यास, ओढ हे मानवी जीवनाचं प्रतीक आहे. ह्या मुळेच तर मानवाने इतकी प्रगती करून दाखवली आहे . असो.

काळाच्या ओघात नवीन पदार्थ येत असतात आणि जुने मागे पडत असतात. मायबोलीच्या ह्या वर्षीच्या ह्या स्पर्धेमुळे अश्या जुन्या पदार्थाना नवं संजीवनी मिळणार आहे. त्याबद्दल संयोजकांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. ह्या निमित्ताने मी आज तुम्हाला एक जुनाच , विस्मरणात गेलेला पदार्थ सांगणार आहे. स्पर्धेला प्रवेशिका अजून तरी खूपच कमी आल्या आहेत त्यामुळे निकाल एखाद वेळेस लागणार ही नाही तरी ही हा पदार्थ ह्या अनोख्या थीम मुळेच माझ्या ही लक्षात आला आणि तो मायबोलीकरां पर्यंत पोचू शकतोय हे समाधान ही खूप मोठे आहे.

कोकणच्या पदरात निसर्ग सौंदर्याची अनेक रत्ने देवाने टाकली असली तरी सधनता आणि समृद्धी देताना मात्र हात त्याने थोडा आखडताच घेतला आहे. परंतु कोकणी माणसाने कल्पकता आणि कष्ट ह्याच्या जोरावर त्यावर मात करत केवळ नारळ, गूळ आणि तांदूळ हे तीन घटक वापरून खांडवी, पातोळ्या, मोदक ( कोकणात मोदक म्हणजे उकडीचेच ), शिरवळ्या, खापरोळ्या , नारळीभात असे रंग रूप आणि चव ह्यात वैविध्य असणारे असे अनेक पदार्थ निर्माण केले आहेत. मी आज जो पदार्थ सांगणार आहे त्याचे ही मुख्य घटक वरचेच आहेत. कोकणात पूर्वी हा पदार्थ खूप वेळा होत असे हल्ली मात्र अगदीच विस्मृतीत गेला आहे. "नारळी उकड" असं अगदीच अरसिक नाव असणाऱ्या ह्या पदार्थाच मी " मोतीपाक" असं नवीन नामकरण केलं आहे. तुम्ही ही नवीन अधिक छान नाव सुचवू शकताच.

चला तर मग , आता कृतीकडे वळू या.

साहित्य : अगदी मोजकेच आणि घरात कायम असणारं असंच आहे.

१ ) तांदूळ पीठ १ वाटी
२ ) गूळ १/२ वाटी
३) नारळाचा चव १ वाटी , थोडं नारळाचं दूध
४) तूप, तेल , मीठ,
५) जायफळ पूड, सुका मेवा सजावटीसाठी .

कृती :

एक वाटी पाण्यात प्रत्येकी एक चमचा तेल, तूप आणि चवीपुरतं मीठ घालून गॅसवर ठेवावं. पाण्याला उकळी आल्यावर त्यात तांदुळाचे पीठ घालून मोदकांना काढतो तशी सेम उकड काढून घ्यावी. गरम असतानाच ती मळून घ्यावी. नंतर तिचे अगदी छोटे छोटे गोळे करावेत. एका कढईत थोडं तूप घालून हलक्या हाताने हे गोळे मंद गॅसवर परतून घ्यावेत . चांगले फुगले की झाले असे समजून ताटलीत काढून घ्यावेत. त्याच कढईत नारळाचा चव आणि गूळ घालून थोडं शिजवून घ्यावं. नंतर त्यात थोडं नारळाचं दूध ( असल्यास ) किंवा साधं दूध / पाणी घालावं आणि हे गोळे घालून पाच मिनिटं मंद गॅसवर शिजू द्यावेत. रस अंगाबरोबर असावा. लागलं तर थोडं पाणी किंवा ना दु घालू शकता. शेवटी त्यात जायफळ पूड घालावी आणि वर आवडेल तो सुका मेवा पेरावा.

आपला मोती पाक खाण्यासाठी तयार आहे.

IMG_20190910_144614.jpg

साधारण मोदकाच्या चवीच्या जवळ जाणारी चव असते ह्याची. घरात ही आवडले सगळ्याना आज. मोदक करणं हे खूप कौशल्याचं काम आहे. त्या मानाने हे खूप सोपे आहे. पूर्वी मोठ्या कुटुंबात पदार्थ मोठ्या प्रमाणावर करावा लागत असे. मोदक एकेक वळावा लागतो . इथे एकदा उकड काढली की घरातली मुलं ही गोळे वळण्याच काम करत असत. कमी कष्टाचा, पट्कन होणारा आणि सगळ्याना आवडणारा असा हा पदार्थ आहे.

२) कोकणातले पदार्थ जास्त करून उकडूनच केले जातात तसा हा ही उकडूनच केल्यामुळे healthy सदरात मोडायला हरकत नाही.

३) जायफळीण दारात असताना विकतची वेलची कोणी ही कोकणी माणूस वापरणार नाही. ☺ फक्त म्हणूनच जायफळ घातलं आहे. विकतच आणायचं असेल तर वेलची जायफळ काही ही घालू शकता.

४) पूर्वी आम्ही सुका मेवा वैगेरे वरून काही घालायचो नाही. हल्ली त्या शिवाय पान हलत नाही. ☺

५) गुळा ऐवजी साखर आणि आंब्याचा रस घालून ही करता येईल. आंब्याचा स्वाद ही छानच लागेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! मस्त ! माझ्यासारख्या साधे तळणीचे मोदक सुद्धा न जमणार्‍या बाईला पण हे नक्कीच जमेल. Happy ममो, पाकृ बरोबर तू जी माहिती देतेस ना, ती पण रोचक असते.

मला खरच कुठलेच मोदक जमत नाहीत. Sad माझी जाऊ हे सगळे करते.

BLACKCAT , पहिल्या वहिल्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद !

रश्मी , सोपं आहे , बघ करून ... एखाद वेळेस जाईल ही आवडून ☺

वेगळीच आणि छान पाकृ.
आणि ह्यावेळी खरंच पाकृ स्पर्धेला फार कमी प्रतिसाद आहे.
माबिच्या सुगरणी बिझी आहेत का?

अशी एक चायना सूप ची रेसिपी पाहिली होती, उकडीच्या गोळ्यात सारण भरून लहान गोळे करायचे, आले घालून गोड गरम पाणी करायचे व त्यात गोळे घालायचे.

आहा कसला tempting फोटो आहे. नाव पण किती चपखल सुंदर दिलंय तुम्ही ममो. मस्तच असेल चवीला. करून बघणार नक्की .

मस्त आहे ग पदार्थ. गूळखोबरे शिजत असताना जो घमघमाट सुटतो तो मला प्रचंड आवडतो. हा पदार्थ नक्की करून बघेन.

तुझी एन्ट्री बघून खूप आनंद झाला. नातवंडांच्या मागे धावताना आज्जीला पाकृ स्पर्धेसाठी वेळ मिळणार नाही अशी भीती वाटत होती. Happy

मस्त !
उकड काढली आणि सारण केलं की मोदकच करावेसे वाटतात. पण हा पर्याय नवा आहे आणि छान दिसतोय.

तोंपासु पाकृ.. Happy
दोन दिवसापुर्वीच मधुरा रेसिपीज च्या चॅनेलवर पाहिलेली..कोकणी थाळीच्या रेसिपीत.

तुमच्या एका धाग्यावर दिलेल्या पद्धतीने यावर्षी उकड काढुन मोदक केले.छान आणि सोपी पाकृ होती.लगेच जमली..हेही आवर्जुन इथेच सांगतीये... Happy

हेमाताई छानंच सर्वच. ओघवतं लेखन, सुंदर माहीती, रेसिपी आणि फोटोही मस्त.

मला माहीती नव्हता हा पदार्थ.

धन्यवाद सर्वांना. नाव आवडलं आवर्जून सांगितलंत त्याबद्दल ही आभार .

साधना , ह्या वर्षी काही करायला जमेल अस खरंच वाटत नव्हतं. पण तू म्हणलीस म्हणून उचल खाल्ली मनाने आणि भाग घेतला.

मन्या S , तांदूळ नारळ आणि गूळ ह्यांच्या उपलब्धतेमुळे किनारपट्टीवर जनरली ह्या पासूनच पदार्थ बनवले जातात. पदार्थ तोच असतो नाव वेगळं असत एवढंच. तसं ही विस्मृतीत गेलेला पदार्थ हीच थीम असल्याने जुनेच पदार्थ ह्या धाग्यावर येणार आहेत. आता मधुराने दाखवल्यावर कदाचित ह्या पदार्थाला ही चांगले दिवस येऊ ही शकतात. तस झालं ते आनंदच वाटेल. आपल्याला माझ्या पध्दतीने मोदकाची उकड काढायला नीट जमली ,आणि इथे ही सांगितलंत त्याबद्दल धन्यवाद.