दिसेल का तिला?

Submitted by Aditiii on 10 September, 2019 - 02:26

ती येते, ती हसते, छान गप्पा मारून जाते
रोज छान कपडे आणि थोडेसे नखरे
मला आवडते तिचे असणे आणि हसणे
खरं तर मी हि तशीच असते
तेच असणे आणि तेच हसणे
रोज रोज तेच येणे आणि जाणे

पण मला कधी वाटते कि जर
मी बघितले डोकावून खोल खोल
डोळ्यांच्या आतून आरपार
आत्म्यावरून जर फिरवली नजर

तर दिसतील का मला खुणा
झेललेल्या घावांच्या आणि हरलेल्या युद्धांच्या
विश्वासघाताच्या, कैदेतील नैराश्याचा
टोचलेले शब्द आणि रोखलेले पाणी
सोडतेच खुणा मागे काहीतरी

मग जर तिने पहिले तर
दिसेल तिलाही पोळलेले
अंकुर फुटण्याच्या पलीकडे
मरणपंथाला लागलेलं मन

कुणास ठाऊक कधी कुणाला कळेल
पण आता कळावं असंही वाटत नाहीच
एके काळी आक्रोश करून उठलेले
आता पराजित आणि हताश

लढा देणार कुणाशी?
इथे ना रणांगण ना नियम
निशस्त्र असूनही वार झेलावे
हीच नियती माझी आणि कर्णाची

पण वीर मरण माही
केवळ मरण तेही मनाचं
पण तरीही मी येते हसते आणि
छान गप्पा मारून जाते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भिडणारी कविता!
"लढा देणार कुणाशी?
इथे ना रणांगण ना नियम" - अप्रतिम!