प्लिटविस -क्रोएशिया

Submitted by स्मिता दत्ता on 8 September, 2019 - 09:24

सकाळी लवकरच जाग आली. कारण पहाटे ५-१५ लाच सूर्योदय झालेला आणि पांढरे पडदे असल्याने उजेड डोळ्यावर येऊ लागला. आणि अर्थातच आपल्या रोजच्या वेळेप्रमाणे उठायची वेळ झालेलीच. अजून आमचं बायोलॉजिकल क्लॉक अड्जस्ट झालेलं नव्हतं, हेही एक कारण होतंच. त्यामुळे पहाटे लवकरच जाग आली. तयारी करून आज बरोबर घ्यायच्या वस्तू काढून ठेवल्या, छत्री, जॅकेट हे सर्वात महत्वाचं ! पाण्याच्या बाटल्या, थोडे खायचे पदार्थ चिवडा, बिस्कीट इ. आमच्या ट्रिपमध्ये खाणं पिणं इन्क्लुड नव्हतं आणि कुठे काय मिळेल याची काहीच माहिती नव्हती. त्यामुळे थोड आपलं आपल्याबरोबर असलेलं बरं आणि अर्थातच ते नेहमीच तसे असलेलं बरं. स्वेटर, कॅप असं सारं ठेवलं .
इथे सगळीकडे आंघोळीसाठी शॉवरच असतात. आणि पूर्ण बिल्डींग् सेंट्रल वॉटर हिटर होता, तो 24 तास चालूच असतो. पण बराच वेळानंतर गरम पाणी येऊ लागल, तोपर्यंत तो तसाच चालू ठेवला होता. गरम पाणी पंधरा-वीस मिनिटांनी आलं, बापरे किती पाणी वाया घालवलं मी, कसंतरीच झालं. खरं तर आपल्याकडे असा पाणी वाया जाऊ देण्याचा विचारही आपण करू शकणार नाही. पण तिकडे पाण्याची सुबत्ताच असल्यामुळे इतका विचार करायची गरज नसते. त्यामुळेच तर तिकडे टब बाथ ची सोय सगळीकडे असते. भरपूर पाणी पण आपण इकडे त्या गोष्टी आंधळेपणाने उचलतो.

त्यांच्या सिंकलाही 24 तास गरम पाणी होता आंघोळ झाल्यावर मी आधी मस्त चहा ठेवला आणि उपमा तयार करून घेतला मग नाश्ता करून आम्ही बाहेर पडलो. म्हणजे आमच्या पिकअप पाशी जायचं होतं. साडेसात पावणे आठ झालेले. पाच मिनिटात आम्ही त्या बागेत म्हणजे आमच्या पिकअप पाशी पोहोचलो. तिथे अजून फक्त एक माणूस आमच्या आधी पोचलेला. आम्ही तिकडेच जरा बागेत फिरत बसलो. रस्त्यावर अजून फारशी रहदारी सुरू झालेली नव्हती . ट्राम तेवढ्या फिरत होत्या. थोड्या वेळाने दोन तीन गोऱ्या बायका, एक इंडियन जोडपं आले. तो इंडियन माणूस काहीतरी पॅक करून आणायला गेला. माझा नवरा पण समोर असलेल्या बेकरीत काहीतरी आणायला गेलेला. त्यामुळे आम्ही दोघीच तिथे उभ्या होतो. साहजिकच कुठून आलात म्हणून चौकशी झाली, तर तेही मराठीच निघाले. श्रुती आणि मंदार अशी त्यांची नाव. तेही आमच्यासारखेच एकएकटे फिरायला आलेले आणि एअर बिनबी मध्येच राहिलेले. त्यांचीही आमच्यासारखिच ट्रिप होती. ते लोक परवा आलेले. काल ज़ाग्रेब फिरून झालेलं., त्यामुळे आता इथून प्लिटविस आणि परस्पर स्प्लिट असा त्यांचा प्लॅन होता. त्यामुळेच आता ते सारं सामान घेऊन, घर सोडून आलेले. नॅशनल पार्क पाहून झाल्यावर तिथूनच पुढे स्प्लिट ला जाणार होते म्हणे. चांगला प्लॅन होता, म्हणजे एक दिवस हि वाचणार होता आणि पैसेही. आम्ही तो निवडला नाही. अजुन थोडा अभ्यास करायला हवा होता असं मला वाटलं.असो पण असं काहीतरी होणारच काहीतरी त्रुटी राहणारच. आपण आपला ट्रॅव्हल करण्यात हेच तर थ्रील असतं.

थोड्या वेळाने आमची बस आली. त्या जोडप्यासारखच अजून काही लोक डायरेक्ट स्प्लिटला जाणारे होते. तेही बॅगा घेऊन आलेले. तिथून बस निघाली बरोबर आठ वाजता , संध्याकाळी सहा वाजता परत याच ठिकाणी आम्ही परत येऊ, असा आमचा गाईड सांगत होता. वीस-बावीस वर्षांचा मिलान अगदी फ्लुएंट नाही तरी बरं इंग्लिश बोलत होता. त्याच्या उच्चारमुळे आणि थोड्या मिस्टेक मुळे ते काळजीपूर्वक ऐकायला लागत होतं. तिथून गावातून फिरत बस निघाली आणि याची कॉमेंट्री सुरू झाली. झाग्रेब हे नाव या गावाला कसं पडलं याची स्टोरी तो सांगत होता. चौदाव्या शतकात येथे खूप मोठा दुष्काळ पडला, त्यावेळी इथला राजा ऑगस्टीन याने तिथे म्हणजे आताच्या गेलाचीच स्क्वेअर इथे एक विहीर खोदली. त्यांला आश्चर्यकारक रित्या भरपूर पाणी लागलं, त्यामुळे त्यांच्या भाषेत खोदणे हा शब्द झा ग्राब असा होता म्हणून या शहराचं नाव झाग्रेब झालं. असो. दंतकथा मोठ्या रंजक असतात खऱ्या.!! प्रत्येक शहराची अशी एक कथा असेल का! असं मला उगीचच वाटले.

आमचं शहर हे अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. हे तुम्ही पाहू शकता आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असे तो सांगत होता. जुन्या गावातूनफिरत असताना बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या बागा, मेंटेन केलेली हिरवळीची बेटं असं दिसत होतं. तिथून एका हॉटेलातूनही काही लोकांना घेऊन हमरस्त्याला लागलो. मोठे रस्ते मध्ये खड्ड्यात हिरवळ, ट्राम, सायकल,बस चे वेगवेगळे रूट्स असलेल्या अशा विशाल रस्त्यावरून आम्ही चालेलेलो.

आमची बस छान वोल्वो होती. समोर आणि मागे मधल्या बाजूलाहि एक दरवाजा असलेली. हे पण त्यांच्याकडेच स्टॅण्डर्ड डिझाईन आहे. प्रवाशांना चढ-उतार करायला सोयीचं असतं. समोरून मागे जाणं खूपच त्रासदायक असतं. त्यामुळे असा हा मध्ये दरवाजा असतो बसला. झाग्रेब आता मागे पडल, गावाबाहेर कासा नदी दिसते. ती ओलांडून आम्ही आता पुढे आलो. लांबरुंद पात्र असलेली. पण आता अगदी थोडे पाणी होतं तिच्यात . त्यानंतर एक टोल नाका लागला. आमच्या ड्राइव्हर ने कार्ड लावलं आणि बस पुढे निघाली. अगदी दोन मिनीटात किती सोयीच आणि पारदर्शी आहे हे, असं वाटलं. आपल्याकडे पण अशी सोय झाली तर लोकांचा किती पैसा, वेळ आणि इंधन वाचेल आणि सगळा पैसा सरकार कडे जमा होईल. असंही वाटलं. अशा गोष्टी मनाला खटकत राहतात.

आमचा गाईड त्याच्या पूर्वाश्रमीच्या युगोस्लाविया आणि आताच्या क्रोएशिया विषयी काही टिप्पणी करत होता., म्हणाला की ," आम्ही तरुण लोक जास्त ब्रॉड माईंडेड आहोत. माझे मित्र सर्ब्सपण आहेत. माझे आई-वडिलांच्या मनात त्यांच्याबद्दल कडवट पणा आहे. त्यांना नाही पटत आम्ही सर्ब् लोकांशी मैत्री केलेली. पण आम्हाला तसं वाटत नाही. आपण मागचं विसरून भविष्याकडे पाहिले पाहिजे. " तसे योग्य होतं म्हणा ते, मागची पिढी सर्ब्ज नी केलेल आक्रमण , लढाई विसरू शकत नव्हती , कारण त्यांनी ते सारं अनुभवलं होतं. तरुण पिढी मात्र स्वातंत्र्यानंतर जन्मलेली, अर्थातच या युद्धाच्या झळा त्यांनी अनुभवलेल्या नसल्यामुळे तसा विचार ते करू शकत होते. सर्वांशी मैत्री करू शकत होते. चांगलंच आहे म्हणा ते.

तो अधून मधून गप्प बसायचा तेव्हा मी बाहेर पाहत होते. रस्त्यावरून काही गाड्या त्याच्यामागे छोट्या-छोट्या बोटी, सायकली,असं बरच काही कार मागच्या ट्रॉलीमध्ये घेऊन जाताना दिसल्या. काही गाड्यांच्या मागे लागलेल्या ट्रेलरमध्ये मध्ये मोटर सायकल हि होत्या. सगळ्या गोष्टीचा आनंद लोक घेत असतात. छान वाटत होतं. नवीन काहीतरी वेगळं बघायला मिळत होतं. आपल्याकडे हे दृश्य दिसत नाही.

थोड्यावेळाने गाडी नाश्त्यासाठी एका रेस्टॉरंटला थांबवली. छोटास कौलारू बैठं रेस्टॉरंट होतं. ब्रेडचा खमंग वास सुटला होता. बाहेर छोटेखानी गार्डनमध्ये मुलं खेळत होती. आत मध्ये काचेत बरेच पदार्थ मांडून ठेवलेले. नाव अर्थातच कळत नव्हती. पण आम्ही विचारून ऑर्डर दिली. वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा, बर्गर आमलेटअसं बरंच काही होतं. आम्ही त्यांच्या पद्धतीच कॅप्सिकम, चीज असलेलं आमलेट बनची ऑर्डर दिली. समोरच ज्यूस बनवून देत होते, तोही घेतला आणि आमच्या गाईडने सांगितलं की इथल्या सारखे डोनट्स तुम्हाला कुठेच मिळणार नाहीत, म्हणून तेही घेतले. अर्थातच तो मार्केटिंग गिमिक्स प्रकार होता. पण आम्ही तरी अस आवर्जून डोनट्स कशाला खाल्लं असतं.

नाश्ता करून आम्ही पुन्हा गाडीत बसलो. गाडी सुसाट धावत होती जंगलातून, कधी खडकाळ प्रदेशातून मध्ये मध्ये कोणकोणती गावे लागत होती. थोड्यावेळाने एक मोठे शहर लागल. आमचा गाईड सांगत होता ," हे स्ल्यून्ज एकेकाळी खूप मोठं औद्योगिक शहर होतं. तसंच सांस्कृतिक घडामोडीचही केंद्र होतं. पाच नद्यांनी घेरल्यामुळे तसं समृद्ध होतं आणि भरभराटीला आलेलं, पण कालांतरानं मंदी आली आणि गावानं बदल पचवला नाही. लोकही गाव सोडून गेले. त्यामुळे आता त्या गावाची पार रया गेली आहे म्हणे. तसे गाव फार छान वाटत होत. पण कुठे कुठे पडक्या इमारतीहि दिसत होत्या.

"काही वर्षांपूर्वी इथे पूर आलेला. त्यात गावाची रया पार गेली "असं मिलान म्हणत होता. आम्ही आता गावा बाहेर पडलो. तिथे सिमेंटची खूप सारी पोती एकावर एक रचून लाम्ब पर्यंत बांध पर्यंत बांध घातलेला दिसत होता. त्यावरही त्याने खोचक टिपण्णी केली म्हणाला,"सारं झाल्यावर आमच्या सरकारला जाग येते. पूर येऊन गेल्यावर या प्रतिबंधक भिंती उभारल्या." एकूण काय सरकार बद्दलची नाराजी सार्वत्रिकच म्हणाविशी.

Plitvic2Plitvic3

थोड्यावेळाने आम्ही रेस्टॊक या गावी आलो. गाडी दूरच थांबवली, नदीच्या अल्याड! गाव पल्याडच्या किनाऱ्यावर होतं. आम्ही चालत निघालो. उजवीकडे खाली नदी वाहत होती. हे ही अतिशय सुंदर गाव होतं. खूपच सुंदर धबधबे जिकडेतिकडे दिसत होते. अक्षरशा डोळ्याचे पारणे फेडणारे धबधबे पाहून हा पाहू कि तो असं वाटत होतं. त्या पाण्याचा आवाज फार छान वाटत होता कानाला. गावात प्रवेश केला सारं गाव जणू झऱ्यांवर उभारलेलं. पाणी साऱ्या घरांच्या आजुबाजूला वाहत होत. असं कोणतंहि गाव आपण कधीच पाहिलेले नसेल. इथं असलेल्या पाणी आणि दगडांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे हे शक्य झालय. मागच्या शतकात सगळं गावच पिठाची गिरणी म्हणून प्रसिद्ध होते म्हणे. प्रत्येक घरात पाण्यावर चालणारी पिठाची गिरणी होती. मका, गहू, बार्ली असं धान्य दळून देण्याच्या बदल्यात वस्तू घेत असत. घरोघरी अशा गिरण्या आढळत होत्या. आता फक्त एकच घरात राहिली आहे. त्या घराच्या समोरून आम्ही गेलो. पण गिरणी बघायची परवानगी देत नाहीत असं आमचा गाईड म्हणाला. पण बाहेरून दिसत होतं. घरात वाहणारा झरा आणि त्यावर गिरणी. समोर सुंदर तळं ,स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असेल का ? सगळी घरं पण छान पांढ-या रंगात रंगवलेली. काळ्या रंगाच्या खिडक्यांची आणि काळपट उतरत्या कौलांची चित्रातल्या सारखी अप्रतिम होतं . म्हणजे असं मध्ये छोटास तळं आणि त्याच्या आजूबाजूला काही घरं! बाहेर येऊन मस्तपैकी पाण्यात पाय सोडून बसायला काय मज्जा येत असेल ना! काही घरांच्या बाजुला छोटी-छोटी त्यांच्याच कंपाउंडमध्ये लाकडी पूल व पायवाट, निव्वळ अप्रतिम! प्रत्येक घराच्या आजूबाजूला असे धबधबे, झरे व तळी. आम्ही ते सारं दृश्य मनात साठवून पुन्हा गाडीत येऊन बसलो. अधून मधून काही टुमदार गावं जात होती.

Plitvic4Plitvic5

पण गाडी थेट प्लिटविसला थांबली. सकाळचे अकरा साडेअकरा वाजलेले. चांगलंच उकडत होतं. आम्ही बस मधून उतरलो. बाहेर कडकडीत ऊन होतं. पूर्ण प्रवासातहि खिडकीतून चांगलंच ऊन आत येत होतं. त्यामुळे आम्ही सोबत आणलेल्या छत्र्या, जॅकेट गाडीतच ठेऊन उतरलो. उगाच कशाला ओझं !फक्त खायच्या गोष्टी आणि पाणी इत्यादी घेऊन निघालो. किती वेळ लागेल त्याचा काही अंदाज नव्हता. पण त्यांन चार पाच किलोमीटरचा ट्रेल आहे असे सांगितले. त्याप्रमाणे साधारण दोन तीन तासात आम्ही परत येऊ असं वाटलं.

तिकिटापाशी अजून एक त्यांच्याच टुरिस्ट कंपनीची बस पण आलेली. तिच्यात एक गाईड मुलगी होती. छत्री पकडून ती तिच्या लोकांना एकत्र करून सूचना देत होती. आमचाही गाईड आमची तिकिटे घेऊन आला. आम्ही त्याच्यामागून निघालो. एका तळ्यापाशी येऊन पोहोचलो. हिरवट पाणी असलेला लांबुळका तलाव. दुसऱ्या बाजूला डोंगर दोन -तीन बोटी प्रवाशांची पलीकडच्या तीरावर ये-जा करत होत्या. समोर काही बदकं सुखनैव विहार करत होते. तळ्यात मासे सुळका मारत होते. आमच्या गाईडने सुचना केली की ज्यांना चालणे शक्य नाही, त्यांनी इथेच थांबावे कारण पुढे आम्ही अपर लेक ला जाणार असल्यामुळे चढण असणार होती. त्यामुळे त्यांना ते शक्य झालं नसतं. त्यामुळे इथेच थांबणं चांगल असं त्याचं मत. मग आमच्यातले काही म्हातारे, वयस्कर लोक तिथेच थांबले. काही जपानी , गोरे अमेरिकन किंवा युरोपियन व तत्सम असावे. बाकी आम्ही निघालो. पल्याडच्या तीरावर पोहोचलो पाचच मिनिटात. सगळीकडे हिरवाई आणि मध्ये वाहणारी नदी. उतरलो तर एका झऱ्यानेच आमचं स्वागत केलं. हि नांदीच जणू . एक लाकडी पूल होता, त्याच्या वरून आम्ही पुढे सरकलो. तर सगळीकडेच पाण्याचा नुसता खळाळ. आजूबाजूला सगळीकडे दगडा धोंड्यावर आपटत पाणी वाट काढत होत. जिकडेतिकडे लाकडी पूल बांधून त्याच्यावरून लोकांच्या चालण्याची सोय केलेली होती. त्याचे फेसाळ रूप पाहून हरखून जायला होत होतं. सगळीकडे छोटेखानी लाकडी पूल त्यावरून जाणारे येणारे लोक त्यामुळे एक साखळीच झालेली लोकांची.

Plitvic6

त्या पाण्यावर गर्द झाडीतून उन्हाचे कवडसे पडत होते. पायातल्या वनस्पतींवर निरनिराळी फुलपाखर रुंजी घालत होते. पतंगाचा रंग काय सुंदर होता मोरपंखी!! फोटो काढेपर्यंत गायब होत होता. पांढरी, पिवळी छोटी छोटी गवतफुलं त्या सार्‍या गालिच्यावर सुंदर नक्षी काढत होती. पण कुठेही जरा रेंगाळावं वाटलं तर ते मात्र शक्य नव्हतं, मागे लोकांची रांग लागलेली. प्रत्येकालाच पुढे जायचं होतं. त्यामुळे हळूहळू चालतच राहावं लागतं. आजूबाजूला पायाखाली वाहणारे झरे थांबण्याची विनंती करत होते . मात्र आम्हाला अजून पुढचा तितकाच सुंदर धबधबा स्वतःकडे आकर्षित करत होता आणि थोडं चढून वर आलो, तर समोरच थोडासा छोटेखानी धबधबा दगड-धोंड्यांवरून आपटून उड्या मारत होता. त्याचे तुषार अंगावर येत होते आपल्याला कुरवाळत होते. दगडावर तयार झालेललं शेवालं आणि उसळणारं पांढरे शुभ्र पाणी असं असा हा धबधबा कित्येक पोस्टवर पाहिलेला वाटत होता. आता असं पोस्टर कुठं दिसलं कि मी अभिमानानं म्हणू शकेन हे मी पाहिलंय!

तिथून आम्ही पुढे निघालो. आता डाव्या बाजूला एक छोटा तलाव लागला पाणी इतकं नितळ कि झाडांची मुळं, त्याचा तळ अगदी स्वच्छ दिसत होता. मुळावर चढलेली शेवाळंहि स्पष्ट दिसत होती. त्या पाण्यात दिवसभर डुंबू शकलो असतो , निदान पाण्यात पाय सोडून तरी बसायला कित्ती मज्जा अली असती, पण आमच्या गाइड ची सक्त सूचना होती की तिथं कशालाही हात लावायचा नाही, अगदी पाण्यालाही हात लावायचा नाही. मग पाय काय सोडून बसायची तर बातच दूर. त्यामुळे त्याच्या शेजारच्या पायवाटेवरुन आम्ही आपले आज्ञाधारक मुलासारखे निघालो. वाटेत पतंग, रानफुलं, हे होतेच साथीला. वळणावरून पुढे आलो तर समोर हा असा उंच धबधबा आमची वाट पाहत होता, पाच सहा वाहिन्या असलेला उंचावरून धाबाबा कोसळत होता, आम्हाला भिजवत होता. तेव्हढ्याशा त्या पाण्याच्या स्पर्शानंही मस्त मोहरायला होत होत. तेवढाच काय तो स्पर्श !!!त्या पाण्यावर उन्हाचे किरण पडून सुंदरसं इंद्रधनुष्य तयार झालेलं. निसर्ग आपले सारे अविष्कार दाखवत होता. इथं मात्र रंगळायला थोडी जागा होती. ते दृश्य डोळ्यात साठवून पुढे आलो. पुलावरून पुढे जाताना पायाखालचे खळाळ डोळ्यांना आणि कानांना सुखद अनुभूती देत होते. सगळीकडे नुसतं पाणीच पाणी ..झेपावणारं, खळाळणारं,झुळूझुळू वाहणारं,आणि संथ विसावलेलं. याच साठी केला होता अट्टाहास !!!!असंच मनात आलं... हेच पाहायला हि ट्रिप ठरवलेली.

समोर आता विशालसा जलाशय एखाद्या शांत तपस्वीसारखा निवांत बसलेला. त्यात मासे सुळ्कट होते कुठे बदक विहरत होती. मधेच एक साप सुळकन इकडून तिकडे जातांना दिसला. त्या जलाशयावर शेजारच्या वृक्षराजीचं हिरवं, आणि वरच्या आसमंताचं निळं प्रतिबिंब पडलेलं. पांढऱ्या ढगांची नक्षीची त्यावर तयार झालेली. झाडांची मुळे लांबवर पसरलेली. पाणी उन्हात चमकत होतं. निसर्गाचा खेळ पाहताना स्वतःला विसरायला होत होतं. चालून चालून पायाचे तुकडे पडायला लागलेले पण अजून बरंच काही पाहायचं होतं. हे बघून झाल्यावर लोअर लेक पाहायचा होता.

निसर्गाचा हा अद्भुत ठेवा १९९० च्या दशकात लोकांसमोर आला. वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये समाविष्ट झाला. आणि नंतर पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळं मर्यादा घालण्याचा निर्णय झाला. " पण ते इथे कोणी पाळत नाही." अशी टिपणी आमचा गाईड करत होता. उपहासात्मक विनोद आणि कोट्या करणं हे अपेक्षितच असतं त्यांनी तसं केल्याने माहिती कंटाळवाणी न होता जरा चटपटीत होते.
आता दुपारचे अडीच वाजलेले, भूकही लागलेली, त्याने जवळच असलेल्या एका रेस्टारंट पाशी सगळ्यांना सोडले. नंतर बसने आम्ही लोअर लेक ला जाणार होतो. ते अर्ध्या तासाने घेऊन जाणार होते. आम्ही आमच्या सोबत असलेल्या कपल बरोबर एका टेबलवर बसलो. आधी वॉशरूम मधून पाणी भरून घेतलं. कारण इथे युरोपात सगळीकडं टॅप वॉटर च पिलं जात. अतिशय स्वच्छ असत ते आणि कुठल्याही नळाचं पाणी तितकंच स्वच्छ तर असतच आणि विकतचे पाणी मुलखाचं महागपण असत. त्यामुळं सगळीकडं अगदी बिनदिक्कत टॅप वॉटर तुम्ही पिऊ शकता. वॉशरूम मध्ये सगळेच लोक पाण्याच्या बाटल्या भरून घेत होते, मीही घेतली.

खाण्यासाठी पिझ्झा बर्गर असंच काहीबाही होतं. मी सोबत नेलेला चिवडा काढला. त्या दोघांनाही दिला, तो त्यांनी आवडीने खाल्ला. दोन-चार दिवसातच इथलं आळणी खाऊन कंटाळलेल्या भारतीय जिभेला चमचमीत चिवडा खाल्याने चव आली म्हणाले. मग थोडा बर्गर आणि आइस्क्रीम पण घेतल आम्ही, बापरे केवढे मोठे आईस्क्रीम कॅंडी, बघूनच दडपण आलं. मी तर पूर्ण खाऊच शकले नाही तो चोकोबार. एकूणच साऱ्या गोष्टी इथल्यापेक्षा डबल किंवा त्याहीपेक्षा मोठ्या असतात. तिथूनआम्ही बस स्टॉप ला आलो. आमचा गाईडहि तिथे आमची वाट पाहत होता. तिथे गर्दीहि खूप झालेली. एक जोडबस आली मागोमाग दुसरी पण अली. जागा मिळेल त्यात बसून घ्या असे त्यांनं सांगितले. त्यामुळे सगळेच जिथे जागा मिळेल तिथे बसलो. बस गच्च भरली, बसायला. जागाच नव्हती. आम्ही उभेच राहिलो. इथे ..लोकांना स्पर्श झालेला आवडत नाही. त्यामुळं कितीही गर्दी असली तरी अंग चोरून उभा राहायच. शक्यतो लोकांना स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यायची. मला उगाचच मुंबईची लोकल आठवली... उंच डोंगरातून वळणं घेत बस चाललेली. इथं फक्त याच इलेक्ट्रिक बस असतात बाकी वाहनांना बंदी. आता पुन्हा बस उताराला लागली आणि एका ठिकाणी थांबली. इथे रेस्टॉरंट वगैरे बरंच काही होतं. आम्ही उतरून पुन्हा आमच्या गाईड ची वाट पहात थांबलो. तो म्हणाला आता इथून खाली जाणार आहोत. अजून वेगळे धबधबे तिथून दिसतात.

आता हळूहळू ढग जमायला लागले होते. एव्हाना अंधारून यायला लागलेले. सुर्य गायब झालेला, ढगांचा गडगडाट व्हायला लागला. थोडे थेंबही पडायला लागले. आम्ही वजन नको म्हणून गाडीतच ठेवलेल्या छत्री आणि जॅकेट ची आता प्रकर्षाने आठवण आली. युरोपात कधीही पाऊस कोसळू शकतो हे माहित होतं ;म्हणूनच बरोबर ते घेतलेले, पण कडकडीत उन्हानं चकवा दिला त्यामुळं आम्ही फसलो आणि आता पश्चाताप होत होता. पावसाचा जोर वाढला तस आमच्या गाईड ने विचारलं,"जायचं का थांबायचं?" काही लोक म्हणाले जायचं, काही नाही. तरी आम्ही जायचे ठरवले. पण पाचच मिनिटात जोराचा पाऊस सुरू झाला. आम्ही अगदी काठावरून चाललो होतो, अगदी चिंचोळी अशी पाऊलवाट होती आणि खाली दरी. निसरडं झाल्यावर घसरण्याची शक्यता होती हे उघड होतं. त्यामुळे आता मात्र परतण्याचा निर्णय घेतला आणि मागे फिरलो. काही अंतरावरच शेड दिसत होती तिथं पोहोचायचं होतं. पळत जाऊ लागलो. ते अगदी एखादा किलोमीटर अंतरही खूप वाटत होतं. जोरदार पावसाला सुरुवात झाली. धो धो पाऊस कोसळू लागला. जोरात पळत ती शेड गाठायचा प्रयत्न केला. आधीच बरीच गर्दी होती. लोक दाटीवाटीने उभे होते.

मी आत कुठे गेले,पण माझा नवरा मात्र कुठे दिसत नव्हता. त्या गर्दीत कुठे शोधूही शकत नव्हते. पावसाचा जोर वाढत होता तसा लोकांचा लोंढा वाढत होता. एक दोन वेळा त्या शेडच्या टोकाला जाऊन पाहिलं पण तो,दिसला नाही. मी नाही म्हटलं तरी थोडीशी नर्व्हस झालेच पण इलाज नव्हता. चिंब भिजलेली मी आणि बाकीचे सारे अंग चोरून उभे होतो. इतक्यात एक कुटुंब आलं, त्यांच्या घरात लहान मूल होतं, ते मूल रडत होतं बिचाऱ ,थंडी वाजत असणार त्याला. तो माणूस त्याच्या तोंडात बूच देवून त्याला शांत करायचा प्रयत्न करत होता.

आता बाहेर गाराही पडायला लागल्या. टपोऱ्या गारा आवाज करत सगळीकडे कोसळत होत्या. टाण टाण आवाज करत पडणाऱ्या गारांचा खच सगळीकडे तयार झालेला. गारांचा आणि पाण्याचा जोरात आवाज वरच्या पत्र्यावर पडल्यामुळे येत होता. त्यामुळे कुणालाच काही ऐकायला येत नव्हतं. येणारे लोक चिंब भिजून येत होते आणि आम्हालाही भिजवत होते. छत्र्या तर काहीच कामाच्या नव्हत्या, एकदोघांच्या तर उडूनही गेल्याचं ते सांगत होते. जोराचा वारा , कडाडणाऱ्या वीजा , धोधो पाऊस, गारा आणि आधारलेलं वातावरण सारं कायम लक्षात राहणार !!!

साधारण तासाभरानं पाऊस थांबला आणि झक्क ऊन पडलं. रस्ते सुकू लागले, सगळे लोक पांगले मीही बाहेर आले आणि माझ्या नवऱ्याला शोधु लागले, तोहि मलाच शोधात तिथे आला. किती बरं वाटलं मला, खरतर तसा तो हरवण्याची अजिबातच शक्यता नव्हती. पण त्या थोड्या वेळासाठीही किती अस्वस्थ व्हायला झालं होत. मलाच हसू आलं. गर्दीत हरवलेलं आपलं माणूस सापडल्यावर किती आनंद होते ते मी अनुभवलं.

३. ३० -४ वाजलेले. आम्ही सारे तसेच ओलेत्याने बसमध्ये बसलो.लोअर तळी बघायचा प्रोग्राम राहूनच केला त्याची रुखरुख लागली. युरोपचं लहरी वातावरण पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं . किती फटाफट बदललं होतं वातावरण.

"क्रेझी आहे पाऊस" असं आमचा गाईड म्हणत होता. आता आम्हाला तो जेवायला कुठंतरी घेऊन जाणार होता. अर्धा तासात आलो हॉटेलला तिथं आमच्या आधी पोचलेले लोक कपडे वाळवत बसले होते. आम्हीपण कपडे बदलून टाकले आणि काहीतरी खायला गेलो. तिथे एका मोठ्या सळई वर एक अख्खा बोकड लावून भाजण्यासाठी ठेवलेला. हा त्यांचा खास पदार्थ म्हणे. त्याचा वास सगळीकडे पसरलेला.

एका टेबलवर बसलो आणि काहीतरी खायला ऑर्डर केलं. जेवण करण्यासाठी एवढी भूक आणि वेळ दोन्ही नव्हता. त्यामुळं पिझ्झा, चिप्स असाच काहीबाही खाल्लं. आता बस मध्ये लोकांची अदलाबदल होणार होती. जे लोक स्प्लिटला जाणार होते ते त्या मुलीच्या बस मध्ये बसले आणि झाग्रेब चे लोक आमच्या बसमध्ये आले. ठाण्याचं ते कपल त्यांच्या बॅगा घेऊन स्प्लिट च्या बस मध्ये गेले. तेवढाच आमचा आणि त्यांचा ऋणानुबंध. आमची बस रिकामी झाली खूपच थोडे लोक आता उरले. जवळजवळ अर्धी रिकामी झाली. म्हणून मग मी पटकन माझा टॉप दुसऱ्या सीटवर वाळायला टाकला.

संध्याकाळी सहा वाजलेले. आता गाईडचं बोलणं बंद झाल्यामुळं मी बाहेरचा नजारा, गावं पाहत होते. सुंदर बाहेर मांडलेली टेबल, कुठे झोपाळे इत्यादी. एका घराच्या ओसरीत टेबलवर दोन जोडपी मस्त बिअर घेऊन गप्पा मारत बसलेली. कुठे एक म्हातारा ट्रॅक्‍टर घेऊन चाललेला. कुठे म्हातारी बाई हातात पिशव्या घेऊन जातेय. छान वाटत होत. येताना तीन तास लागलेले आम्हाला थांबत थांबत पण आता जाताना कुठेच थांबायचं नसल्यामुळे गाडी सुसाट पळत होती. बरोबर पावणेआठच्या सुमारास गाडी झाग्रेब मध्ये शिरली. आठ वाजता आमच्या स्टॉपला. बरोबर आठ वाजता त्यांनी टूर कम्प्लीट केली.

आता मात्र खूप थकवा आलेला. चालून चालून पायाची वाट लागलेली. घरापर्यंत जायला पण चालताना जड वाटत होतं. पाय बोलायला लागलेले. पाच मिनिटात घरी आलो. घरी येताना खालीच काहीतरी खाऊन आलो आणि बेडवर अंग टाकून दिलं. दिवसभरातील दृश्य नजरेसमोर तरळत असताना थकलेल्या शरीराने कधी डोळे मिटले कळलंच नाही.

(क्रोएशिया विषयी अजून काही पुढील भागांत .... )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिपावर लेख टाकून किती दिवस झाले. अजून पुढचा भाग आला नाही. मला पुढच्या भागाची उत्कंठा लागून राहिली आहे.

छान प्रवास वर्णन!
तो माणूस त्याच्या तोंडात बूच देवून त्याला शांत करायचा प्रयत्न>> चोखणी

Brilliant

छान !
देश सुंदरच आहे तो, सविस्तर लिहा तुमचे अनुभव.
पु भा प्र