गप्पा मारू या बाप्पा

Submitted by डॉ.सतीश अ. कानविंदे on 5 September, 2019 - 12:57

*गप्पा मारू या बाप्पा*

बसा ना बाप्पा मारू या गप्पा
घाई कशाला करताय राव
उकडीचे मोदक करतेय आई
झाले की त्यावर मारू या ताव

शेव, चिवडा अन् बुंदीचे लाडू
तोवर तुम्ही खाणार कां?
यंदा तरी मुक्काम वाढवून
खूप खूप दिवस राहणार कां?

नेहमीच लौकर निघून जाता
पुन्हा मग येता वर्षाने
रागावतो आम्ही तरीही तुमचं
स्वागत करतो हर्षाने

कसं काय वाटलं मखर हे नवं
आणि आरास ही यंदाची?
डिझाईन होतं माझं तरीही
मेहनत सगळी चंदाची

स्वयंपाकघरात वाकून बघताय
मोदकांचा वास येतोय कां?
पोटातला कावळा कावकाव करून
भूकेची सूचना देतोय कां?

उंदीरमामांना सांगा ना जरा
एकाच जागी बसायला
चावतील म्हणून घाबरतोय मी
अन् यांना येतंय हसायला

नैवेद्याची तयारी सगळी
केलीय वाटतं आईने
गप्पा मारीत सावकाश जेवू
खायचं नाही हं घाईने

जेवणानंतर काढा झोप
मखरात बघा लावलाय फॅन
लाईट गेले तर वारा घालेल
बॅटरीवर चालणारा सुप्परमॅन

आरतीच्या वेळी दिसेल तुम्हाला
घर एकदम भरलेलं
आरत्या सगळे जोरात म्हणणार
हे शंभर टक्के ठरलेलं

आरत्या म्हणणार तेव्हां कान
खाली नाही हं पाडायचे
'ध्वनीप्रदूषण' विषयावरती
लेक्चर नाही हं झोडायचे

अकरा दिवसांच्या पी.एल.ला
सीक लिव्ह थोडी जोडून घ्या
सर्टीफिकेट माझे बाबाच देतील
त्याची काळजी सोडून द्या

Group content visibility: 
Use group defaults