हसल

Submitted by सई केसकर on 5 September, 2019 - 07:52

पराभूत वाटणे हा माझा स्थायीभाव आहे एवढे तरी आता लक्षात आले आहे. आयुष्याच्या रणांगणात कायमच पराभव झाल्यासारखे वाटणे हा आपल्यातल्या रासायनिक बिघाड असल्यामुळे त्याकडे लक्ष न देणे उत्तम असे समजावे. पण तसे समजावले तरी पराभवाशी झुंजायची खोड मात्र जात नाही. मनाच्या आर्काइव्हमध्ये जाऊन थोडे संशोधन केले की लक्षात येते की पूर्वी ज्या परीस्थितिमध्ये पराभूत वाटायचे तीच जर आता पुन्हा आली तर आत्ताच्या घडीला दणदणीत विजय झाला असे वाटेल. उदाहरणार्थ,  २००५ साली ५८ किलो वजन आहे म्हणून अश्रू ढाळल्याचे आठवते आहे. किंवा २०११ साली गाईड नियमित ऑफिसला येत नाही आणि माझा पेपर वाचत नाही म्हणून पराभूत वाटल्याचे आठवते आहे. अगदी मागच्या वर्षी, दोन वेळा फ्रिजमध्ये ठेवलेली साय खराब झाली म्हणूनही पराभूत वाटल्याचे आठवते आहे. सायीवर येणारी गुलाबी बुरशी ही बुरशी नसून बॅक्टेरिया आहे, एवढी ज्ञानात भर पडूनही आपण गृहिणी म्हणून अतिशय अपयशी आहोत असे वाटणे काही कमी नाही झाले.  मग कुठल्यातरी आगाऊ आत्मविश्वास असलेल्या मैत्रिणीने माझी टर उडवली, "शी! घरी कशाला करायचं तूप? हल्ली बाजारात सगळं विकत मिळतं!". मग काही दिवस तसं केलं. पण मग आपण विकत घेतलेल्या दुधाचा ८% भाग असाच उडवतोय याची हळू हळू खंत वाटू लागली. प्रोसेस इंजिनियरिंगमध्ये लोक पाव पाव टक्क्यासाठी लढत असतात आणि आपण साधा दुधाचा मास बॅलन्स ठेऊ शकत नाही याची खंत वाटू लागली. मग यथावकाश घरातले निर्जंतुकीकरण सुधारून साजूक तुपाचे डबे भरायला सुरुवात झाली. पण त्यामुळे मानसिक स्वास्थ्यात कोणताही सुधार झाला नाही.

मध्यंतरी पिंटरेस्ट आणि तत्सम स्थळांवर "हसल" हा शब्द कुठल्या कुठल्या उत्साहवर्धक सुविचारांमध्ये वाचला. पराभवाच्या गर्तेत सापडलेले लोक पिंटरेस्टवर सापडतात. अर्थात, तिथे देखील आपण समजतो त्यापेक्षा जास्त अपयशी आहोत असे वाटायला लावणाऱ्या बायका असतात. "मुलांच्या डब्याच्या कल्पना" असा बोर्ड असतो त्या बायकांचा. त्यावर मिकीमाऊसच्या आकारात कापलेली गाजरं, सप्तरंगी (ऑरगॅनिक भाज्यांचे) पराठे, बोटीच्या आकारात दुमडलेले डोसे, सूर्यफुलाच्या आकाराची आणि रंगांची (मैदाविरहित) बिस्किटं असले काही काही असते. पण ते  असो. आपण त्यांच्या बोर्डावर वाट चुकूनही जात नाही. आमच्यासारखे लोक पिंटरेस्टवर स्वतःची समजूत घालायला किंवा दुसऱ्याला थेट बोलता येत नाही म्हणून पॅसिव्ह अग्रेसिव्ह सुविचार शोधायला जातात. कुणी आपल्याबद्दल गॉसिप करते आहे असे कळले की व्हॅट्सऍपच्या स्टेटसवर किंवा फेसबुकवर (जिथे बोलणारी व्यक्ती नक्की बघेल अशा ठिकाणी), "डोन्ट वरी अबाऊट दोज टॉकिंग बेहाइंड युअर बॅक. दे आर बेहाइंड फॉर ए रिझन", असा धबदब्याच्या चित्रावर टाकलेला सुविचार टाकायचा. मग सारखं कुणी कुणी स्टेट्स पाहिलंय ते चेक करायचं."त्या" व्यक्तीने पाहिलं की दुर्मिळ विजयाची चाहूल लागते.

तर "हसल" म्हणजे सारखं काहीतरी करत राहायचं. अविरत, न थकता, न थांबता. आणि पिंटरेस्टीय समुदायाच्या मते असं सारखं हसलत राहिलं की काही वर्षांनी मागे वळून पाहता आपण कुठून कुठे आलो आणि किती यशस्वी झालो असं वाटतं. एमटीव्हीने हसल नावाचा कार्यक्रम चालू केला आहे. त्यात हिंदीमध्ये "हसल"  अशी पाटी सेटवर लावलेली असते. माझ्या नवऱ्याने एकदा अतिशय निरागसपणे, "ये देखो एमटीव्ही ने कुछ मराठी चालू किया हैं. हसलं करके", अशी हाक मारली. आपण अशा माणसाशी लग्न केलंय ज्याला एमटीव्ही "हसलं" असा कार्यक्रम चालू करेल असं वाटतं, हे पाहून मला आणखीनच खिन्न वाटलं. पण तेही जाऊदे. सतत काहीतरी करत राहिल्याने बाकीच्यांना काय वाटतं माहित नाही पण मला आठवड्याच्या शेवटी मेल्यासारखं वाटतं. त्यात आपल्या एकूण ओळखींमध्ये "आई" ही ओळख आली की भवसागरात गटांगळ्या खाल्ल्याचे अनुभवच जास्त येऊ लागतात.

शाळेत गाण्याच्या स्पर्धेचा पहिला राउंड सक्तीचा असतो. इथेच खरंतर हार मानायला हवी आणि आपल्या पाल्याला खोटी आजारपणाची चिट्ठी देऊन त्या दिवशी घरी बसवावे. हा सगळ्यात सोपा, सुटसुटीत आणि सगळ्या भागधारकांना (मी, माझं लग्न, मुलगा, त्याची शिक्षिका आणि वर्गमित्र) सुसह्य असा मार्ग आहे. पण नाही. आपण जसे आयुष्यभर पराभवाशी लढत आलो तसेच आपल्या जेनेटिक मटेरियलनी लढावे हा अट्टाहास. मग मुलाला किंचाळू नकोस, टीचर बहिऱ्या होतील अशा सूचनेने गाणं शिकवण्याची सुरुवात होते. पण त्याला मात्र त्याचे गाणे सर्वोत्तम आहे असा दणदणीत आत्मविश्वास असतो. अर्थात, काही सुरेल बाल लता मंगेशकरना पुढील फेरीत प्रवेश मिळतो आणि माझा मुलगा, "टीचरनी मला तीन वेळा थांबवलं हळू आवाजात म्हण म्हणून. त्यामुळे मी पुढचं गाणं विसरलो. आणि हे सगळं मुद्दाम केलं जात आहे", असं म्हणत रुसून घरी येतो. या सगळ्यात त्याला शाळेत न पाठवणे हाच योग्य मार्ग असतो. पण मग, "पराभवाला तोंड द्यायला मुलं कधी शिकणार?"

काही लोक सुरुवातीपासूनच यशस्वी होण्यासाठी बनलेले असतात. त्यांना फार अभ्यास न करता मार्क मिळतात, कॅम्पसमध्ये पहिली नोकरी मिळते, आणि नोकरीवाल्यांवर उपकार केल्यासारखे ते नोकरी करत करत जीआरई देतात. तेवढ्यातच त्यांना जीवनसाथी मिळतो. म्हणजे अगदी बरोबर तेवढ्याच टाइमलाईनमध्ये. मग ते दोघे अमेरिकेला जातात. तिथेदेखील त्यांना प्रत्येक सुट्टीत ऍपल, गूगल, मायक्रोसॉफ्ट वगैरेमध्ये काम मिळते. मग टू बॉडी प्रॉब्लम वगैरे काहीही न होता त्यांना नोकऱ्या मिळतात आणि स्टुडन्ट ते प्रोफेशनल व्हिसाच्या मधल्या सुट्टीत ते लग्न करतात. या अशा लोकांनीच पुढे आपला वंश वगैरे वाढवावा. कारण त्यांना अशा अधिकाधिक वाढणाऱ्या जबाबदाऱ्या झेलुनही हसतमुख यशस्वी राहायची सवय असते.

आमच्या इथे म्हणजे सोमवारी सकाळी तीनही युनिफॉर्म वॉशिंग मशीन मध्ये आहेत असे लक्षात येते. आणि मूल पाणावलेल्या डोळ्यांनी त्या गोलगोल फिरणाऱ्या कपड्यांकडे मशीनच्या खिडकीतून बघू लागते. मग अशा वेळी शाळा बुडवावी की त्याला वेगळ्या कपड्यात पाठवावे यावर उभयतांचे वाद होतात. यात शाळा बुडवायला आई उत्सुक असते. पण मूल पिवळा शर्ट घालून शाळेला जाते. संध्याकाळी "माझा वाढदिवस आहे का?" या प्रश्नाला मी "हो" म्हंटलं म्हणून माझ्यासाठी सगळ्यांनी गाणं म्हंटलं, असे सांगून आपण त्याला वर्गात वाटायला चॉकलेट का दिले नाहीत म्हणून खडसावते. तर काही दिवसांनी शाळेत येल्लो डे असतो. शाळेतील आयांच्या व्हॅट्सऍप ग्रुपवर खूप चिवचिवाट आहे म्हणून आपण तो ग्रुप सायलेंट केलेला असतो. आणि येल्लो डेला आपले मूल कडक इस्त्रीचा युनिफॉर्म घालून शाळेत जाते. आणि परत येऊन आपल्या विसराळूपणासाठी खडसावते. अशावेळी आपण खूप अपयशी आहोत असे वाटल्याशिवाय राहत नाही.

"हॅविंग इट ऑल" असं काहीतरी म्हंटलं जातं. तो वाक्प्रचार ऐकला की मला नेहमी एखाद्या चकचकीत कन्व्हेयर बेल्टवरून अलगद पुढे सरकणारी एखादी नाजूक बॅलेरिना डोळ्यासमोर येते. तशा टवटवीत प्रतिमा आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात. बुधवारी ऑफिसच्या लोकांबरोबर जेवायला जाणारी, शुक्रवारी नवऱ्याबरोबर "मूव्ही डेट" असा सेल्फी टाकणारी, रविवारी झूमध्ये मुलांबरोबर फोटो टाकणारी अशी एखादी तरी सुपरवूमन आपल्या आयुष्यात असतेच. न राहवून, "हिला कसं जमतं हे सगळं?" अशी असूयायुक्त उत्सुकता मनात येते. पण त्या चकचकीत कन्व्हेयर बेल्टवर न पडता टिकून राहताना तिलाही असंच वाटत असेल का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Hustle सतत busy राहणे अशा अर्थाने वापरल्याचे पाहिले आहे. विशेषतः महिलांच्या slang मध्ये. ग्रीटवर एक अतिशय चांगला टेड टॉक पाहिला होता. "रिझल्ट ओरिएंटेड" हे डिस्क्रिप्शन बरोबर वाटतेय. पण एकूण अर्थ मी तरी सतत बिझी राहणे (कामासाठी) असा घेते.
शुम्पी आणि अमितव, बरं वाटलं तुमचे कॉमेंट्स वाचून. :p

>>>छान लिहिलंय. फक्त त्याला hustle का म्हटलंय कळलं नाही. सध्याच्या context मध्ये Hustle किंवा hustle economy , gig economy, side hustle हे करियरशी - त्यातही creative/offbeat

Hustle हा, hustle and bustle मधून आला आहे. आणि मूळ शब्द हा constant activity अशा अर्थाने वापरला जातो. त्याचे multiple context आहेत. स्त्रियांच्या बाबतीत अनेक ठिकाणी घर/ऑफिस सांभाळणं वगैरे बाबतीत वापरताना बघितला आहे.

लेख प्रचंड आवडला.

'अशा' माणसाशी आपण लग्न केलंय ही खिन्नता वाचून तुफान हसले Happy Happy

आज काहीही करत नसले तरी भविष्यात कधीतरी सगळे सगळे करणार आहे यावर विश्वास ठेवून फेबु, इंस्टा, पिंटवर बागडणाऱ्या तमाम यशस्वी स्त्री पुरुषांमुळे स्वतःला अपराधगंड जाणवण्यापासून स्वतःला दूर ठेवण्यात मी यशस्वी झालेय. मी आनंदाने फेसबुक पिंटरेस्ट इंस्टाग्राम पाहते आणि बाब्बोSSS कित्ती ते हुश्शआर लोक, मी पण नक्की करणार हे म्हणत स्क्रीन शॉटस घेऊन ठेवते. दोन तीन महिन्यांनी मोबाईल फोटोंनी भरला की नाईलाजाने सगळे डिलीट करते आणि बाब्बोSSS म्हणत नवे स्क्रीशॉ घेते.

चांगलं लिहिलय. अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं सगळं.
मुळात येनकेन प्रकारेण प्रत्येक गोष्टीत यश मिळावे, ही अपेक्षाच मुळात "हसल"ला उद्युक्त करत नाही का? जसं-जसं वय झालं तसा तसा यातला फोलपणा मला जाणवू लागला आणि Let it go अशी वृत्ती बनली हळूहळू. आता बरं वाटतंय त्याच्यामुळे आणि आयुष्यात slow-down केल्यामुळे.

@विक्रमसिंह
<<< skill असल्या शिवाय result नाही. Except accidents. >>>
प्रत्येक वेळी skill असूनही अपेक्षित रिझल्ट मिळेल याची खात्री नसते, त्यासाठी नशीब लागते. आणि नशीब असेल तर मग skill ची गरज नसते.

भारी आहे!
मी आधी शीर्षक हझल वाचले आणि दचकलो!

प्रोक्रास्टीनेटर क्लबचा जन्मजात सदस्य असल्याने मला हे फारच रिलेट झालं लेखन. सुदैवाने नशीब फॅक्टर बरा असल्याने फार नुकसान झालं नाही.

नशीब फॅक्टर आहेच. पण कुणीतरी वर म्हटल्याप्रमाणे सगळं उत्तम आलं पाहिजे हे प्रेशरसुध्दा आपण अनकॉन्शियसली घेत असतो उगाच. एखादवेळी कुठल्यातरी कार्यक्रमाला नाही म्हणून सांगितलं की इतकं बरं वाटतं. आणि मग वाटतं कुणी सक्ती केलीच नाहीये. आपणच उगाच सगळीकडे असायचा अट्टाहास करतो.
सगळ्यांचे आभार!

Pages