हसल

Submitted by सई केसकर on 5 September, 2019 - 07:52

पराभूत वाटणे हा माझा स्थायीभाव आहे एवढे तरी आता लक्षात आले आहे. आयुष्याच्या रणांगणात कायमच पराभव झाल्यासारखे वाटणे हा आपल्यातल्या रासायनिक बिघाड असल्यामुळे त्याकडे लक्ष न देणे उत्तम असे समजावे. पण तसे समजावले तरी पराभवाशी झुंजायची खोड मात्र जात नाही. मनाच्या आर्काइव्हमध्ये जाऊन थोडे संशोधन केले की लक्षात येते की पूर्वी ज्या परीस्थितिमध्ये पराभूत वाटायचे तीच जर आता पुन्हा आली तर आत्ताच्या घडीला दणदणीत विजय झाला असे वाटेल. उदाहरणार्थ,  २००५ साली ५८ किलो वजन आहे म्हणून अश्रू ढाळल्याचे आठवते आहे. किंवा २०११ साली गाईड नियमित ऑफिसला येत नाही आणि माझा पेपर वाचत नाही म्हणून पराभूत वाटल्याचे आठवते आहे. अगदी मागच्या वर्षी, दोन वेळा फ्रिजमध्ये ठेवलेली साय खराब झाली म्हणूनही पराभूत वाटल्याचे आठवते आहे. सायीवर येणारी गुलाबी बुरशी ही बुरशी नसून बॅक्टेरिया आहे, एवढी ज्ञानात भर पडूनही आपण गृहिणी म्हणून अतिशय अपयशी आहोत असे वाटणे काही कमी नाही झाले.  मग कुठल्यातरी आगाऊ आत्मविश्वास असलेल्या मैत्रिणीने माझी टर उडवली, "शी! घरी कशाला करायचं तूप? हल्ली बाजारात सगळं विकत मिळतं!". मग काही दिवस तसं केलं. पण मग आपण विकत घेतलेल्या दुधाचा ८% भाग असाच उडवतोय याची हळू हळू खंत वाटू लागली. प्रोसेस इंजिनियरिंगमध्ये लोक पाव पाव टक्क्यासाठी लढत असतात आणि आपण साधा दुधाचा मास बॅलन्स ठेऊ शकत नाही याची खंत वाटू लागली. मग यथावकाश घरातले निर्जंतुकीकरण सुधारून साजूक तुपाचे डबे भरायला सुरुवात झाली. पण त्यामुळे मानसिक स्वास्थ्यात कोणताही सुधार झाला नाही.

मध्यंतरी पिंटरेस्ट आणि तत्सम स्थळांवर "हसल" हा शब्द कुठल्या कुठल्या उत्साहवर्धक सुविचारांमध्ये वाचला. पराभवाच्या गर्तेत सापडलेले लोक पिंटरेस्टवर सापडतात. अर्थात, तिथे देखील आपण समजतो त्यापेक्षा जास्त अपयशी आहोत असे वाटायला लावणाऱ्या बायका असतात. "मुलांच्या डब्याच्या कल्पना" असा बोर्ड असतो त्या बायकांचा. त्यावर मिकीमाऊसच्या आकारात कापलेली गाजरं, सप्तरंगी (ऑरगॅनिक भाज्यांचे) पराठे, बोटीच्या आकारात दुमडलेले डोसे, सूर्यफुलाच्या आकाराची आणि रंगांची (मैदाविरहित) बिस्किटं असले काही काही असते. पण ते  असो. आपण त्यांच्या बोर्डावर वाट चुकूनही जात नाही. आमच्यासारखे लोक पिंटरेस्टवर स्वतःची समजूत घालायला किंवा दुसऱ्याला थेट बोलता येत नाही म्हणून पॅसिव्ह अग्रेसिव्ह सुविचार शोधायला जातात. कुणी आपल्याबद्दल गॉसिप करते आहे असे कळले की व्हॅट्सऍपच्या स्टेटसवर किंवा फेसबुकवर (जिथे बोलणारी व्यक्ती नक्की बघेल अशा ठिकाणी), "डोन्ट वरी अबाऊट दोज टॉकिंग बेहाइंड युअर बॅक. दे आर बेहाइंड फॉर ए रिझन", असा धबदब्याच्या चित्रावर टाकलेला सुविचार टाकायचा. मग सारखं कुणी कुणी स्टेट्स पाहिलंय ते चेक करायचं."त्या" व्यक्तीने पाहिलं की दुर्मिळ विजयाची चाहूल लागते.

तर "हसल" म्हणजे सारखं काहीतरी करत राहायचं. अविरत, न थकता, न थांबता. आणि पिंटरेस्टीय समुदायाच्या मते असं सारखं हसलत राहिलं की काही वर्षांनी मागे वळून पाहता आपण कुठून कुठे आलो आणि किती यशस्वी झालो असं वाटतं. एमटीव्हीने हसल नावाचा कार्यक्रम चालू केला आहे. त्यात हिंदीमध्ये "हसल"  अशी पाटी सेटवर लावलेली असते. माझ्या नवऱ्याने एकदा अतिशय निरागसपणे, "ये देखो एमटीव्ही ने कुछ मराठी चालू किया हैं. हसलं करके", अशी हाक मारली. आपण अशा माणसाशी लग्न केलंय ज्याला एमटीव्ही "हसलं" असा कार्यक्रम चालू करेल असं वाटतं, हे पाहून मला आणखीनच खिन्न वाटलं. पण तेही जाऊदे. सतत काहीतरी करत राहिल्याने बाकीच्यांना काय वाटतं माहित नाही पण मला आठवड्याच्या शेवटी मेल्यासारखं वाटतं. त्यात आपल्या एकूण ओळखींमध्ये "आई" ही ओळख आली की भवसागरात गटांगळ्या खाल्ल्याचे अनुभवच जास्त येऊ लागतात.

शाळेत गाण्याच्या स्पर्धेचा पहिला राउंड सक्तीचा असतो. इथेच खरंतर हार मानायला हवी आणि आपल्या पाल्याला खोटी आजारपणाची चिट्ठी देऊन त्या दिवशी घरी बसवावे. हा सगळ्यात सोपा, सुटसुटीत आणि सगळ्या भागधारकांना (मी, माझं लग्न, मुलगा, त्याची शिक्षिका आणि वर्गमित्र) सुसह्य असा मार्ग आहे. पण नाही. आपण जसे आयुष्यभर पराभवाशी लढत आलो तसेच आपल्या जेनेटिक मटेरियलनी लढावे हा अट्टाहास. मग मुलाला किंचाळू नकोस, टीचर बहिऱ्या होतील अशा सूचनेने गाणं शिकवण्याची सुरुवात होते. पण त्याला मात्र त्याचे गाणे सर्वोत्तम आहे असा दणदणीत आत्मविश्वास असतो. अर्थात, काही सुरेल बाल लता मंगेशकरना पुढील फेरीत प्रवेश मिळतो आणि माझा मुलगा, "टीचरनी मला तीन वेळा थांबवलं हळू आवाजात म्हण म्हणून. त्यामुळे मी पुढचं गाणं विसरलो. आणि हे सगळं मुद्दाम केलं जात आहे", असं म्हणत रुसून घरी येतो. या सगळ्यात त्याला शाळेत न पाठवणे हाच योग्य मार्ग असतो. पण मग, "पराभवाला तोंड द्यायला मुलं कधी शिकणार?"

काही लोक सुरुवातीपासूनच यशस्वी होण्यासाठी बनलेले असतात. त्यांना फार अभ्यास न करता मार्क मिळतात, कॅम्पसमध्ये पहिली नोकरी मिळते, आणि नोकरीवाल्यांवर उपकार केल्यासारखे ते नोकरी करत करत जीआरई देतात. तेवढ्यातच त्यांना जीवनसाथी मिळतो. म्हणजे अगदी बरोबर तेवढ्याच टाइमलाईनमध्ये. मग ते दोघे अमेरिकेला जातात. तिथेदेखील त्यांना प्रत्येक सुट्टीत ऍपल, गूगल, मायक्रोसॉफ्ट वगैरेमध्ये काम मिळते. मग टू बॉडी प्रॉब्लम वगैरे काहीही न होता त्यांना नोकऱ्या मिळतात आणि स्टुडन्ट ते प्रोफेशनल व्हिसाच्या मधल्या सुट्टीत ते लग्न करतात. या अशा लोकांनीच पुढे आपला वंश वगैरे वाढवावा. कारण त्यांना अशा अधिकाधिक वाढणाऱ्या जबाबदाऱ्या झेलुनही हसतमुख यशस्वी राहायची सवय असते.

आमच्या इथे म्हणजे सोमवारी सकाळी तीनही युनिफॉर्म वॉशिंग मशीन मध्ये आहेत असे लक्षात येते. आणि मूल पाणावलेल्या डोळ्यांनी त्या गोलगोल फिरणाऱ्या कपड्यांकडे मशीनच्या खिडकीतून बघू लागते. मग अशा वेळी शाळा बुडवावी की त्याला वेगळ्या कपड्यात पाठवावे यावर उभयतांचे वाद होतात. यात शाळा बुडवायला आई उत्सुक असते. पण मूल पिवळा शर्ट घालून शाळेला जाते. संध्याकाळी "माझा वाढदिवस आहे का?" या प्रश्नाला मी "हो" म्हंटलं म्हणून माझ्यासाठी सगळ्यांनी गाणं म्हंटलं, असे सांगून आपण त्याला वर्गात वाटायला चॉकलेट का दिले नाहीत म्हणून खडसावते. तर काही दिवसांनी शाळेत येल्लो डे असतो. शाळेतील आयांच्या व्हॅट्सऍप ग्रुपवर खूप चिवचिवाट आहे म्हणून आपण तो ग्रुप सायलेंट केलेला असतो. आणि येल्लो डेला आपले मूल कडक इस्त्रीचा युनिफॉर्म घालून शाळेत जाते. आणि परत येऊन आपल्या विसराळूपणासाठी खडसावते. अशावेळी आपण खूप अपयशी आहोत असे वाटल्याशिवाय राहत नाही.

"हॅविंग इट ऑल" असं काहीतरी म्हंटलं जातं. तो वाक्प्रचार ऐकला की मला नेहमी एखाद्या चकचकीत कन्व्हेयर बेल्टवरून अलगद पुढे सरकणारी एखादी नाजूक बॅलेरिना डोळ्यासमोर येते. तशा टवटवीत प्रतिमा आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात. बुधवारी ऑफिसच्या लोकांबरोबर जेवायला जाणारी, शुक्रवारी नवऱ्याबरोबर "मूव्ही डेट" असा सेल्फी टाकणारी, रविवारी झूमध्ये मुलांबरोबर फोटो टाकणारी अशी एखादी तरी सुपरवूमन आपल्या आयुष्यात असतेच. न राहवून, "हिला कसं जमतं हे सगळं?" अशी असूयायुक्त उत्सुकता मनात येते. पण त्या चकचकीत कन्व्हेयर बेल्टवर न पडता टिकून राहताना तिलाही असंच वाटत असेल का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती वेळा सेम पिंच झाले म्हणून सांगू! कारणं वेगळी असतील पण feeling is mutual.

माझ्या एका ओळखीच्या बाईचं status high on life आहे! सतत social outreach program मध्ये busy, गणेशोत्सवात busy. संध्याकाळी क्लब house च्या पायऱ्यांवर बहुलीसारखी सजून हसत-खेळत busy. नाचाची आवड आणि अजून काय काय.
मी एखाद दिवशी काहीतरी वेगळं केलं तर त्याचा परिणाम माझ्या दुसऱ्या दिवशीच्या कामावर होतो.

Btw, मस्त लिहील आहे आणि ह्या अन्याया ला वाचा फोडल्याबद्दल अभिनंदन!

सई मस्त लिहिलंय!
आपण अशा माणसाशी लग्न केलंय ज्याला एमटीव्ही "हसलं" असा कार्यक्रम चालू करेल असं वाटतं, हे पाहून मला आणखीनच खिन्न वाटलं. >>>>> जाम हसले.

मस्त लिहिलंय सई!!

पराभूत वाटत राहणे हे ओव्हर एक्स्पोजर चे फलित आहे असं वाटतं मला..म्हणजे कुणी कुठे मस्त ट्रिप मारून आलं कीच फेसबुक वर टाकतं. आज माझ्या नवर्‍याशी भांडण झालं हे कोण कशाला फेसबुक वर टाकेल!! मग फेसबुक किंवा तत्सम सोशल मेडियावर सतत चांगलंच बघून साला आपलंच लाईफ गंडलंय असं वाटायला लागतं! वर तू लिहिलं आहेस तश्या आपल्या दॄष्टीने 'यशस्वी' लोकांच्या स्वतः च्या आकांक्षा भलत्याच काही असू शकतात आणि त्यामुळे त्यांनाही सतत पराभूत वाटू शकतं! त्यामुळे पराभूत वाटत राहणे हा सध्या सार्वजनिक प्रश्न झाला आहे. त्याला वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद.

लेखात मनापासून बोलल्यासारखा "मनीचे आर्त" वाटावे असा भाव ऊतरला आहे.

तर "हसल" म्हणजे सारखं काहीतरी करत राहायचं. अविरत, न थकता, न थांबता. >> ईथे थोडासा बदल सुचवतो कारण हसल निरूद्देश नसते.
जे हवे ते मिळवण्यासाठी करावयाची धडपड म्हणजे हसल. ज्यात अविरत कष्ट, स्मार्ट वर्क, जुगाड ते फ्रॉड अशा अनेक गोष्टी येऊ शकतात. 'काही करून मला हे जमवायचेच/मिळवायचेच आहे' ही मानसिकता. आणि त्यामागे आहे लवकर पराभव न मानण्याची थोडक्यात विजिगिषु वृत्ती.

'हॅविंग ईट ऑल' जमवणे एवढं सोपं असतं तर त्या "ऑल" गोष्टी कमॉडिटी झाल्या असत्या का Proud ( तुम्ही हे ज्यावरून म्हणता आहात तो सोशल प्रेझेन्स ही दिखाऊ गोष्ट झाली, अर्थात तेही जमवणे सोपे नसतेच ... असो तो मुद्दा नाही). तर असे सगळे जमवू पाहणारी व्यक्ती तिच्याकडून सगळ्यांसारख्याच सुटणार्‍या गोष्टींच्या निराशेच्या/पराभूत मानसिकतेच्या गर्तेत स्वतःला ठेवत नाही. ऊलट सगळे जमवू पाहणार्‍या व्य्क्तीला जास्त पराभव पचवावे लागतात कारण सगळ्या फ्रंट वर जिंकणे कोणालाही शक्य नसते (बेझोसलाही नाही जमले Proud ).
तुम्हाला अशा लोकांचे पराभव दिसत नाहीत कारण 'हॅविंग ईट ऑल' साठी धडपडणार्‍या लोकांची मानसिकता सांगतो
I don't care if it hurts, I want to have control
I want a perfect body, I want a perfect soul.

Keep hustling Happy

>>>त्यामुळे पराभूत वाटत राहणे हा सध्या सार्वजनिक प्रश्न झाला आहे. त्याला वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद.
हे वाचून मलाही बरं वाटलं Wink

@हाब
येस. अर्थ तोच अभिप्रेत आहे पण कदाचित उतरला नाहीये.
Having it all बद्दल सहमत. लेखातून सॉर्ट ऑफ अशा have it all ची दुसरी बाजू दाखवायचा प्रयत्न आहे. Many of us percieve others as winners while they may be looking at us the same way. असं काहीसं.

देवाशप्पथ खरं सांगेन खोटं बोलणार नाही. हसल चे पहिले २ पॅरेग्रफ वाचताना हसल हा मराठी शब्द मला माहित नसेल अशी शक्यता मनात डोकावली पण नंतर खात्री पटली की ते ३ लेटर अ‍ॅक्रिनिम असणार कशाचं तरी. एम टीव्हीवर हसल ह्या कार्यक्रमाच्या उल्लेखाला ट्यूब पेटली की हे इंग्लिश हसल असणार.
तुझ्या नवर्‍यापेक्षा जरा कमी निरागस निघाल्याचं हायसं वाटलं.

बाकी लेख मस्तच झालाय नेहेमीप्रमाणे.

हसल म्हणजे 10,000 तासांची थीयरी. कुठलेही प्राविण्य मिळवायला अथक परिश्रम घ्यावे लागतात. लोकांना दिसतं ते फक्त मेडल. हे माहिती असल्याने मला स्वतःला अस काही वाटत नाही. आपले प्रयत्न कमी पडतात येवढेच. U get what u deserve, always, excepting accidents . यावर माझा पूर्ण विश्वास आहे. Happy

छान विचार प्रवर्तक लेख.

छान लिहिलंय. फक्त त्याला hustle का म्हटलंय कळलं नाही. सध्याच्या context मध्ये Hustle किंवा hustle economy , gig economy, side hustle हे करियरशी - त्यातही creative/offbeat /startup career शी जास्त संबंधीत आहे जसं की तुम्ही चांगला डान्स करत असाल तर स्वतःचे डान्स क्लासेस काढाल वगैरे.

बाकी सोशल मीडियातून येणारं प्रेशर, पेरेटिंगचे हाय स्टँडर्ड ,युनिफॉर्म एकाच वेळी मशीनमध्ये, कन्व्हेयर बेल्टमधली बाई वगैरे परफेक्ट लिहिलंय.

मस्त लिहिलंय. मजा पण येतेय आणि विचारात पण पडतोय.... कधी लिहिता येणार मला असं??? या विचाराने खिन्न व्हावसं वाटावं इतकं उत्तम झालंय Proud
हसल आधी मला हिंदी वाटलं. हसल झालं वगैरे. तुझ्या नवर्‍याला मराठी वाटल्याने तुला खिन्नता आल्यावर हे हिंदीच असेल असं नक्की झालं मनात. इंग्रजी आहे हे फारच उशिरा समजलं. Biggrin
स्विमिंगला जायची लहर आली की गेल्यावेळचे ओले कपडे एकतर ढिगार्‍यात किंवा वॉशर मध्ये ही वेळ कायम असते. आणि मुलांना अरे पाण्यात जायचंय तर ड्राय कपडे कशाला हवेत? असं शिक्षण दिल्याने आताशा ती काही बोलतही नाहीत. Proud

हसल म्हणजे 10,000 तासांची थीयरी. कुठलेही प्राविण्य मिळवायला अथक परिश्रम घ्यावे लागतात>> 10k theory is skill oriented while hustle is result oriented.

मस्तच!
मला गिल्ट देण्यात, विशेषतः लेकीच्या खाण्यापिण्याची काळजी नाही, तिचं सर्वांगीण संगोपन माझ्याकडून होत नाही इत्यादी... अप्रत्यक्षपणे मला सांगण्यात जवळच्या लोकांचा मोठा वाटा आहे. असोच. पण लेक अगदी मातृभक्त आहे. खेटरं खाईन तीपण आईचीच असला प्रकार आहे!

व्वा, मस्त लिहिलंय Happy
Pinterest आवडतं मला, इंटरेस्टिंग आहे खूप!

हाब : skill असल्या शिवाय result नाही. Except accidents. Happy . And skills get developed if u give time. एक grit नावाचं छान पुस्तक आहे यावर . वाचा आवर्जून . मी, मी का राहिलो, सचिन, नंदन का झालो नाही किंवा गेला बाजार एक midcमधे factory का टाकू शकलो नाही याचे उत्तर मला तरी मिळालं. No regrets.

लेखन मस्तच! लेखातले बरेचसे संसारी अनुभव रिलेट झाले!
काही लोक सुरुवातीपासूनच यशस्वी होण्यासाठी बनलेले असतात. त्यांना फार अभ्यास न करता मार्क मिळतात, कॅम्पसमध्ये पहिली नोकरी मिळते, आणि नोकरीवाल्यांवर उपकार केल्यासारखे ते नोकरी करत करत जीआरई देतात.......>>> संपूर्ण परिच्छेद Happy अगदी अचूक निरिक्षण!
बाकी सध्याच्या काळात सगळ्या आघाड्यांवर एकाच वेळी जमेल तितके लढत / धडपडत रहाणे ही अपरिहार्यता आहे. यशस्वी असणे म्हणजे प्रत्येक भूमिकेमध्ये ‘सुपर’ असणे असेही आहे काहीसे. ते नेहमी शक्य नसल्यामुळे प्रसंगी पराभूत झाल्यासारखे वाटतेच. ‘यशस्वी’ लोक Time Management ( आणि कसले कसले इतर Management फंडे पण असतात म्हणे!) नावाची एक संज्ञा वापरतात Happy पण योजलेली कामे आणि वेळेची उपलब्धता यांचे गुणोत्तर नेहमीच जमत नाही. तेव्हा Do your best and do not regret if it does not work असे स्वत:ला समजवून निवांत राहायचे.

Pages