परीची दुनिया (भाग ५)

Submitted by nimita on 2 September, 2019 - 10:12

शोनूचे आई बाबा शोनूला घेऊन त्यांच्या घरी गेले. पण जायच्या आधी शोनूच्या बाबांनी शोनू आणि परीचे त्यांच्या दोघांच्या आयांबरोबर खूप फोटो काढले. निघता निघता शोनूची आई म्हणाली, "नक्की यायचं हं बारशाला.. मी फोन करीन." "आत्ताचे फोटो पण फॉरवर्ड कर हं नक्की," परीच्या आईनी परत एकदा आठवण करून दिली.

शोनू गेल्यावर परीला एकदम एकटं एकटं वाटायला लागलं.ती आईला हाक मारणार इतक्यात आईच आली पाळण्याजवळ आणि परीला उचलून कुशीत घेत म्हणाली," एकदम रिकामी झाली ना खोली? पण नो प्रॉब्लेम... उद्या आपण पण जाणार आपल्या घरी. मग तर माझ्या परीराणीची मज्जाच आहे.. खूप खूप खेळणी आणून ठेवलीयेत बाबांनी घरी. आपण सगळे मिळून खूप मजा करू या हं !" आईचं बोलणं ऐकता ऐकता परीबाई झोपून गेल्या...ते मगाचचं फोटो सेशन जरा जास्तच hectic झालं होतं तिच्यासाठी!

कुठल्यातरी आवाजानी परीची झोप चाळवली. तिनी आपल्या इवल्याश्या मुठींनी आपले कान झाकून घ्यायचा प्रयत्न केला. पण तो आवाज हळूहळू जास्तच जवळून ऐकू यायला लागला. 'हे कोण बोलतंय ? आईचा आवाज नाहीये हा !पण आईसारखाच प्रेमळ वाटतोय.कोण बोलतंय ?' परी आवाज ओळखण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी न राहावून तिनी डोळे मिचमिचे करून बघितलं... अरेच्या, ती तर पाळण्यात नव्हतीच. कोणीतरी तिला आपल्या मांडीवर घेऊन बसलं होतं. एरवी आईशिवाय कोणाच्याही मांडीवर झोपायला परीला अजिबात नाही आवडायचं...कारण लहान बाळांना कसं उचलून घ्यायचं, कसं कुशीत धरायचं हे कोणालाच नीट जमायचं नाही. पण या बाईंच्या मांडीवर लोळत पडायला खूप छान वाटत होतं, त्यामुळे परी अजूनच स्थिरावली. तिच्या हनुवटीला चिमटीत पकडत त्या बाई म्हणाल्या,"काय गं छकुले, ओलखलंश का मला? मी आजी आहे तुझी," ....."अच्छा, ही आजी आहे होय! आई म्हणतच होती की आता आजी येणार आणि परीचे खूप लाड करणार म्हणून," आजीचा पदर आपल्या मुठीत घट्ट पकडत परी तोंडभरून हसली. तिला तसं हसताना बघून आजी अजूनच सुखावली,"अगं, बघ बघ....कशी हसतीये ते! डँबिस कुठली !! ओलखलंश वाततं आजीला ?" असं म्हणत आजीनी परीच्या चेहेऱ्यावरून आपला प्रेमळ हात फिरवला. 'किती मऊमऊ आहे आजीचा हात ...अगदी आई सारखा!' परीच्या मनात आलं. आता परीच्या फेव्हरिट लोकांमधे आई, बाबा आणि शोनू बरोबरच आजीचं पण नाव जोडलं गेलं.

परी आता अगदी लक्ष देऊन आजीच्या गप्पा ऐकत होती. "पण ही आजी माझ्याशी बोलताना असं बोबडं बोबडं का बोलतीये ? मगाशी आईशी तर नीटच बोलत होती!" परीला आजीचं हे असं वागणं काही समजलं नाही. पण तिला काही फरक नव्हता पडला. तिला आजी खूप आवडली होती आणि तिच्याबरोबर अशा गप्पा मारायला, हसायला खूप मज्जा येत होती.

एकीकडे परीला खेळवता खेळवता आजी आईला कित्ती प्रश्न विचारत होती. - "शेक शेगडी साठी कोणी मिळाली का?आणि परीच्या बारशाचं काय ठरवलंयत ?" हे आणि असेच अजून काही...आजीच्या तोंडून 'बारसं' हा शब्द ऐकला आणि परीला एकदम शोनूची आठवण आली. 'अरेच्या, माझं पण बारसं ? ओह, म्हणजे सगळ्याच बाळांचं असतं वाटतं बारसं ....शोनूला सांगायला पाहिजे. पण आता कधी भेटणार आम्ही ?" तेवढ्यात परीला अजूनही काहीतरी आठवलं..शोनू म्हणाला होता -"तुला पण देतील 'टुचुक' !" अरे बापरे, म्हणजे हे 'टुचुक' पण सगळ्याच बाळांना देतात वाटतं. पण जर त्याच्यामुळे इतकं दुखतं आणि रडू रडू होतं, तरी का देतात? शोनूच्या आईनी त्या काकूंना सांगायला पाहिजे होतं की शोनूला नका देऊ टुचुक; दुखेल त्याला." परीच्या मनात पूर्ण गोंधळ उडाला होता. काय करावं, कोणाला विचारावं - काहीच सुचेना. तेव्हा तिनी आपलं रामबाण अस्त्र काढलं...एक जोरदार 'टँsss...' चा सूर लावला. अचानक तिला असं रडताना बघून आजी पण गडबडली.. तिला तिच्या आईच्या कुशीत ठेवत म्हणाली," घे बाई, भूक लागली असेल आता तिला."

आईच्या कुशीत गेल्यावर परीला एकदम सुरक्षित वाटायला लागलं. आता तिला त्या दुखवणाऱ्या 'टुचुक' ची पण भीती नव्हती वाटत !!!!

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users