राजहंस एकटा...

Submitted by vishnumanik on 11 April, 2009 - 04:38

काल रात्री झोपच येत नव्हती. खिडकीतून डोकावत चंद्र माझ्या बिछान्यावर रेंगाळत होता. हळूच जाऊन खिडकित उभा राहिलो. लहानग्या बाळानं आईच्या कुशीत झोपी जावं तसच ते चांदणं जास्वन्दाच्या पानाआड पहुडलं होतं. आपल्या बाळाचा तो नाजुक पाळणा वार्‍याच्या दोरीने हलवत रात्र अंगाई गात होती. आणि खिडकीत उभा राहून अनिमिष नेत्रांनी मी हा खेळ पाहत होतो. एवढ्यात....

जागते रहोsss कुणीतरी अगदी जवळून ओरडलं अणि त्या पाठोपाठ एक तीव्र कर्णकर्कश्य शिटी आली. रात्रपाळीचा एक गुरखा समोरून जात होता. माझी समाधी भंगल्याचा राग मनात जन्म घेणार त्या अगोदरच विचार आला - एवढ्या सुंदर रात्री हा असा भुतासारखा फिरतोय, एकटा...

एकटा... या शब्दानं गेले कित्येक वर्षांपासून मला कोडयात टाकलंय. सातवी आठवीत असताना एक पुस्तक वाचलं होतं - "तो राजहंस एकटा". ते पुस्तक कुणाचं, त्याचा विषय, आशय काहीच लक्षात नाही पण ते पुस्तक लक्षात आहे ते त्याच्या नावमुळं - "तो राजहंस एकटा"! राजहंसाच्या अनेक कथा मी लहानपणापासून ऐकत आलोय पण नीरक्षिरविवेक लाभलेला एवढा दैवी पक्षी या शीर्षकात एकटाच का असावा? तेव्हापासून एकटा या शब्दानं माझा पिच्छा पुरवलाय आणि त्या चौकीदारानं आज पुन्हा जुन्याच प्रश्नांच मोहोळ मनात उठविलं...

एवढ्यात तो पुन्हा समोरून गेला. थंडीमुळे त्याची शिटी नुसतीच फुरफुरत होती. हिवाळ्यात तीही बिचारी त्याची साथ देत नाही. मला त्याच्या दुर्दैवाची कीव आली. झोपलेल्या माणसांना जागते रहो म्हणायचं करंटेपण त्याच्या कपाळी होतं. त्याचा तो पहाडी आवाज सावधातेची सूचना आहे की या एकटेपणात त्याने स्वतःलाच घातलेली साद? जणू तो स्वतःलाच ओरडून सांगतो आहे- जग झोपलं असलं तरी तुला जागायच आहे, जागं रहायचं आहे. त्याचा हा आवाज इतरांच्या कानापर्यंत पोचत असला तरी त्याच्या स्वतःच्या मनापर्यंत पोचत असेल का?

बाहेर अमर्याद आकाश पसरलय... प्राजक्ताचा सडा पडल्यासाराखी लुकलुकणार्‍या तार्‍यांची रास आकाशात पसरालीय... जणू रात्रीच्या अन्धारावर निगराणी ठेवण्यासाठी विधात्यानं नेमलेले पहारेकरीच!! पण त्यातला प्रत्येक जण वेगळा... एकटा...

नाही म्हणायला वसिष्ठासारखेही तारे आहेत, त्यांच्या सोबत अरुन्धती आहे. पण इतर सर्व मात्र एकटे...सगळ्यांसोबत असुनही नसलेले... त्यांचा तो एकटेपणा माणसालाही रुचला नसावा आणि त्यातूनच मग नक्षत्रांचा जन्म झाला. तार्‍यांचे समूह करण्याची कल्पना ज्याच्या कुणाच्या मनात आली त्यालाच स्वतःच्या एकटेपणाची जाणीव सर्वप्रथम झाली असावी. तारे अगोदरच होते पण नक्षत्रे आलीत ती माणसाला स्वतःच्या एकटेपणाची खात्री पटल्यावारच!!! आपला एकटेपणा त्यांच्याही नशिबी येऊ नये म्हणुन माणसानं नक्षत्रांची योजना केली आणि तेव्हापासून वर्षानुवर्षे तारे गुण्यागोविंदाने नान्दताहेत - एकत्र!!

राजहंसाच्या एकटेपणानं मला बुचकळ्यात टाकलं होतं, त्याला एकटेपणाचा शाप का मिळावा? पण आज कळतय तो एकटा आहे म्हणूनच "राजहंस" आहे! एकटेपणात आपण स्वतःशीच बोलायला लागतो. एकटेपणा स्वतःसोबत गप्पा मारण्याची संधि देतो. राजहंसाही असाच स्वतःसोबत बोलत असावा आणि एक दिवस तो स्वतःचाच मित्र झाला असेल.... त्यानं स्वतःला ओळखलं असेल अणि इतरांच्या सोबतीची त्याला कधी गरजच भासली नसावी...

आकाशाच रितेपण मनात भरल्याचं मी पुष्कळांकडून ऐकलय पण त्या पोकळीतले चंद्र, सूर्य, तारे त्यांना दिसलेच नसावेत... डबक्यातल्या त्या बदकांना स्वतःमधला राजहंस कधी कळलाच नसावा!!!

====================
http://alwaarjaswand.blogspot.com/

गुलमोहर: 

विष्णु माणिक,
छान लिहिलंय Happy
************
To get something you never had, you have to do something you never did.

छान लिहिलय...आवडल
=======================
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो शीळ वाजवतो.....

छान लिहिलय!

>>>>>>>पण आज कळतय तो एकटा आहे म्हणूनच "राजहंस" आहे! एकटेपणात आपण स्वतःशीच बोलायला लागतो. एकटेपणा स्वतःसोबत गप्पा मारण्याची संधि देतो. राजहंसाही असाच स्वतःसोबत बोलत असावा आणि एक दिवस तो स्वतःचाच मित्र झाला असेल.... त्यानं स्वतःला ओळखलं असेल अणि इतरांच्या सोबतीची त्याला कधी गरजच भासली नसावी>>>>>>> खासच!

विष्णु,
छान लिहिलयंस रे.. अजून लिहीत जा..

छान लिहिलं आहेस.

त्याचा तो पहाडी आवाज सावधातेची सूचना आहे की या एकटेपणात त्याने स्वतःलाच घातलेली साद? >>> छानच.
एकटेपणात आपण स्वतःशीच बोलायला लागतो. एकटेपणा स्वतःसोबत गप्पा मारण्याची संधि देतो. राजहंसाही असाच स्वतःसोबत बोलत असावा आणि एक दिवस तो स्वतःचाच मित्र झाला असेल.... >>> छान मांडलयस..
-----------------------------------------------------------------------------

ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......