उदास राणीची कथा - चिनी लोककथेचा स्वैर अनुवाद

Submitted by रमणी on 31 August, 2019 - 12:02

सगळ्या गोष्टींत असतो तसा याही गोष्टीत एक अगदी तेजस्वी राजपुत्र होता. सगळ्या गोष्टींप्रमाणे त्याच्याकडे जगाच्या पाठीवरची सगळी सुखं हात जोडून उभी होती, अवगुण म्हणून नावाला नव्हता. आं? काय म्हणालात? हो बरोब्बर. एक सुगंधी दुःख हवंच की उराशी. होतं. त्याला मनपसंत राजकन्या मिळाली नव्हती जी त्याच्या हृदयकमलावर नेहमी विराजमान राहील, जी त्याची पट्टराणी बनून त्याच्या ऐश्वर्यसंपन्न प्रसादाची शोभा वाढवेल, जिच्याभोवती तो नेहमीच रुंजी घालू शकेल आणि आपल्या अंतरीच्या अपार प्रेमाला व्यक्त करू शकेल.

शेवटी राजाच व्हायचा तो. किती दिवस असं दुःख उरी बाळगेल? एक दिवस तो निघालाच, आपल्या पट्टरणीच्या शोधमोहिमेवर. सगळा फौजफाटा, जामानिमा, ताकदवान घोडे अश्या आपल्या शक्तीच्या नी ऐश्वर्याच्या साक्ष देणाऱ्या सगळ्या गोष्टी समवेत घेऊन तो आपलं सुगंधी शल्य मिटवायला निघाला.

तो कित्येक महिने सगळ्या राज्यांतून, देशांतून, स्वर्गामधून, पाताळमधून फिरत राहिला. कित्येक सुंदरींनी त्याच्यावर मोहित होऊन त्याला भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला, कित्येक रुपगर्वितांना तो भेटला. पण छे! त्यांत त्याची मनमोहिनी नव्हतीच कुठेही.

आपली सखी, जोडीदारीण कुठे नाहीच की काय अश्या शंकेने व्याकुळ, निराशेने ग्रस्त असा तो एका अंधाऱ्या सायंकाळी नदीच्या विशाल पात्रासमोर उदास पीओनीच्या झुडुपाकडे बघत होता. तोच, एक युवती धीरगंभीर पावले टाकत जवळच्याच स्तब्ध चिनार वृक्षाआडून नदीच्या दिशेने गेली. एका नावड्याला तिने हस्तविक्षेपाने बोलाविले. त्याच्याशी काहीतरी बोलली आणि नावड्याने होकार भरल्यासारखं केलं. ती गजगामीनी नावेत बसली आणि नावाडी नाव वल्हवून पैलतीरावर घेऊन जाऊ लागला.

इकडे उदास राजकुमाराच्या वठत चाललेल्या मनावर चैत्रपालवी फुटली. हीच! हो हीच ती माझ्या हृदयकमळाची विलसिनी. हिलाच तर शोधतोय, इतकं अनुपम सौंदर्य, त्याला गूढ गंभीरतेचं अस्तर...हीच माझ्या मनातली मूर्ती.

त्याने शिपायांना पुकारलं, चटकन आपली नौका काढून दहा नाविकांना ती जलद वल्हविण्याची आज्ञा दिली. आणि त्या पद्माक्षीचे पैलतीरावर आगमन होण्यापूर्वी तिच्या स्वागतासाठी ऐटीत उभा राहिला. ती पोहोचल्यावर तिला स्वहस्ते आधार देत उतरवून घेतले. मग आपल्या हृदयीची चैत्रपालवी तिला समजावी म्हणून म्हणाला," मी चीन देशाचा शक्तिशाली राजपुत्र, देशोदेशी माझी पट्टराणी बनण्यायोग्य सुंदरी शोधत हिंडतो आहे. तुला पाहूनच माझ्या मनाने ग्वाही दिली, की ती तूच आहेस. जर तुला इकडे बांधून घालणारा काही पाश नसेल, तर हे रूपवती, माझ्यासवे माझ्या महाली येशील का? माझी होशील का?"

ती युवती किंचित, भांबावली, क्षणभर थबकली आणि उत्तरली," तर, मी कोण आहे, माझे नाव काय हे सगळे न जाणताच तुला माझ्याशी लग्न करायचे आहे?"

"हे रुपगर्विते, मी तुझ्यावर पुरता भाळलो आहे, तुझ्या अनुपम सौंदर्याने संमोहित झालो आहे. मी तुलाच शोधत होतो ह्याची ग्वाही मला माझ्या अंतर्मनाने दिली आहे. मला आता तुझा होकार हवा. मी तुला जगातली सर्व सुखे अर्पिन. माझ्या तुजवरील प्रेमारुपी सूर्याचा कधी अस्त होणार नाही. केवळ तुझ्याच प्रेमपाशात स्वतःला बांधून घेण्याचे हे मी वचन देत आहे. एकदा नव्हे, त्रिवार!"

आता मात्र त्या युवतीने एक उसासा टाकला आणि डोळे खाली झुकवून मान डोलावली. ह्या मुद्रेत तिचा होकार समजुन आल्याने त्या संधीकाली राजपुत्राचा आनंद त्या नदीकाठी दुथडी भरून वहात होता.

परतीच्या लांबच लांब प्रवासात तो त्याच्या वाङदत्त वधुशी बरंच काही बोलत होता, त्याच्या स्वप्नांविषयी, त्याच्या आदर्श राज्यपद्धतीविषयी, त्याच्या राजघराण्याविषयी बरीच माहिती सांगत होता. तीही सगळं ऐकत होती. तिने स्वतःविषयी केवळ एवढेच सांगितले की, ती खूप दुरून आली आहे अन तिने फार मोठा प्रवास केला आहे. कुठून ती आली अन कश्यासाठी तिने प्रवास केला हे मात्र तिने सांगितले नाही आणिक राजपुत्रानेही विचारले नाही. एवढे मात्र त्याला जाणवले की ती अंतरातून दुःखी आहे आणि चुकूनही हसत नाही. तिच्या फिकट स्मितातही असतं, तिचं दुःख... टोचणारं. पण राजपुत्राला वाटले, ह्या लांबच लांब प्रवासांना ती कंटाळली असेल, एकदा का माझ्या सुखासीन प्रासादी पोहोचली की नक्की खुशालेल.

शेवटी तो अनंत भासणारा प्रवास एकदाचा संपला आणि ते दोघे त्याच्या राज्यात पोहोचले. त्याचे लग्न थाटात लागले. तो राजपुत्राचा राजा झाला आणि ती, त्याची पट्टराणी. सगळे प्रजाजन, आप्तेष्ट तिच्या सौंदर्याची, गुणांची तारीफ करताना थकेनात. पण ती कधीच हसू शकली नाही. तिला हसविण्याकरता राजाने कित्येक भाट, विदूषक, नाटके, जादुगार आणवले. पण नव्हेच.

एके दिवशी त्याला एक युक्ती सुचली. आपल्या दरबाऱ्यास तो म्हणाला," आज दुपारी मी जेवणानंतर राणीसाहेबांसामावेत असेन. तेव्हा तू धावत ये अन मला बाहेर शत्रूने हल्ला केल्याची बतावणी सांग. मी असे सोंग घेतो की राणीसाहेब हसल्याच पाहिजेत."

दुपारी जेवणानंतर राजा राणीच्या महाली त्याच्या सागवानी, वेलबुट्टीची नक्षी चितारलेल्या पलंगावर रेशमी अभ्रे घातलेल्या लोडाला टेकून समोर चित्र रंगवीत होता. राणी पाठमोरी बसून तिचे काळेभोर केस विंचरत होती. इतक्यात तो दरबारी धावत आला. विस्कटलेले केस, भाल्यात अडकून फटल्यागत दिसणारी वस्त्रं आणि धपापणारा उर. ओरडून तो म्हणाला," महाराज, अहो घात झाला. दारावर शत्रूने हल्ला केला. आपल्या शिपायांना मारून त्यांचे सैनिक इथंच येताहेत."

"काय?" राजा ताडकन उडी मारत उठला, त्याचा पाय लागून समोरचे जलरंग कलंडले, पलंगपोसंवर रंगांचे ओघळ उमटले. राणीने दचकून मान वळवून त्याच्याकडे पाहिले मात्र, आणि त्याचा भीतीग्रस्त अवतार बघून ती खोखो हसत सुटली. इतकी की हे हसू दाबण्यासाठी तिनं दोन्ही हाताआड तिचे ओठ आणि गाल लपवले. तरीही, तिला तसे पाहून राजाला बरे वाटले. दरबाऱ्याच्या दिशेने गळ्यातला कंठा फेकत तो खुशीत म्हणाला," मी म्हणालो नव्हतो, ह्या बतवणीने ती हसणार!"

मग त्याने तिला हसवण्यासाठी आपण ही बतावणी केल्याचे सांगितले.

दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा राणी आपली उदासच. असेच अजून काही महिने राणी न हसता गेले.

पुन्हा एके दिवशी दुपारी जेवणानंतर राजा राणीच्या महाली त्याच्या सागवानी वेलबुट्टीची नक्षी चितारलेल्या पलंगावर रेशमी अभ्रे घातलेल्या लोडाला टेकून समोर चित्र रंगवीत होता. राणी पाठमोरी बसून तिचे काळेभोर केस विंचरत होती. इतक्यात तोच दरबारी धावत आला. विस्कटलेले केस, भाल्यात अडकून फटल्यागत दिसणारी वस्त्रं आणि धपापणारा उर. ओरडून तो म्हणाला," महाराज, अहो घात झाला. दारावर शत्रूने हल्ला केला. आपल्या शिपायांना मारून त्यांचे सैनिक इथंच येताहेत."

पण ह्या खेपेला मात्र राजाने उडी मारली नाही, तो म्हणाला, "मित्रा, राणीसाहेबांना खुश ठेवण्याची तुझी कळकळ मी समजतो, पण तीच बतावणी दोनदा चालणार नाही रे!"
राजा इतके म्हणतो आहे तोच, दहा बारा शत्रूचे सैनिक खरोखरच आले आणि त्यांनी राजाला ठार केले.

त्यांच्या मागोमाग आता जेता झालेला चीन देशाचा नवा राजा महालात प्रवेश करता झाला. त्या भयकंपित तनुलतेकडे त्याने पाहिले मात्र, आणि तो उद्गारला, "हे रुपगर्विते, मी तुझ्यावर पुरता भाळलो आहे, तुझ्या अनुपम सौंदर्याने संमोहित झालो आहे. मी तुलाच शोधत होतो ह्याची ग्वाही मला माझ्या अंतर्मनाने दिली आहे. मला आता तुझा होकार हवा. मी तुला जगातली सर्व सुखे अर्पिन. माझ्या तुजवरील प्रेमारुपी सूर्याचा कधी अस्त होणार नाही. केवळ तुझ्याच प्रेमपाशात स्वतःला बांधून घेण्याचे हे मी वचन देत आहे. एकदा नव्हे, त्रिवार!"

आणि मग... त्याने तिला त्याची पट्टराणी जाहीर केले

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

रमणी ताई आपणच सारांश , तात्पर्य सांगावं. मला तर राशोमान सारखी कथा वाटली. पण खरंच अर्धवट वाटतेय. अनुवादताना काही भाग गळाला असावा असे वाटते.

मी कोणताही भाग वगळला नाहीय.
मला उमगलेला अर्थ असा आहे: तिने तिचे मत कधीही कुणालाही सांगितले नाही, ती पाण्यातल्या पानागत प्रवाहात वाहतेय. विजेत्यांची पट्टराणी बनून.

ती म्हणजे पृथ्वी किंवा राज्याचं रूपक असावं, आणि त्याची मालकी क्षणाची असूनही आयुष्यभराची समजून आक्रमानांना घाबरणार्या राजचे तिला हसू येते.

दुःख किंवा शल्य सुगंधी कसं काय असू शकतं याचा विचार करतेय Lol

> तिने तिचे मत कधीही कुणालाही सांगितले नाही, ती पाण्यातल्या पानागत प्रवाहात वाहतेय. विजेत्यांची पट्टराणी बनून.
ती म्हणजे पृथ्वी किंवा राज्याचं रूपक असावं, आणि त्याची मालकी क्षणाची असूनही आयुष्यभराची समजून आक्रमानांना घाबरणार्या राजचे तिला हसू येते. >
रोचक! जमीन आणि स्त्रीवर पुरुषाची मालकी चालू होणे - ही सिव्हिलायझेशन(?) ची सुरवात असावी. तिचे मत, संमती कोणीही विचारत नाही, एकाकडून दुसऱ्याकडे मूकपणे ट्रान्सफर होत रहायचं, पण मुळातून कोणाचही नसायचं!

मंदोदरी अशीच रावणानंतर दुसऱ्याची राणी झाली होती का? मला नीट आठवत नाही. पण असे वाचल्यासारखे आठवतंय.
<<माझ्या तुजवरील प्रेमारुपी सूर्याचा कधी अस्त होणार नाही. केवळ तुझ्याच प्रेमपाशात स्वतःला बांधून घेण्याचे हे मी वचन देत आहे. एकदा नव्हे, त्रिवार!">>
इथं पहिल्या राजकुमाराने तिच्यावर कोणतीही बळजबरी केली नव्हती. ती नकार देऊ शकत होती.
पहिल्या वेळेस राजानं घाबरल्याचा बनाव केवळ तिला हसवण्यासाठीच केला होता. दुसऱ्या वेळी त्याने प्रामाणिकपणे सांगितले की तोच तोच बनाव करून राणीला हसू येणार नाही. इथं दुर्दैवाने तो शत्रूच्या हाती सापडून प्रतिकाराची संधी न मिळाल्याने खलास झाला. तो घाबरलेला नव्हताच मुळी. सो ही कथा नीट कुणाला कळलीच नाही असे वाटते.

अँमी,
असतात की सुगंधी दु:खं.
#एक जखम सुगंधी Happy

अमर99, तो सगळ्या सैन्यासहित आला होता आणि तिने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केलाही नव्हता... तो तिच्या मुकपणाला स्वीकृती समजला आहे. त्याने केवळ तिचा होकार मागितला आहे. दोन्ही राजांनी एकाच शब्दात तिला propose केलं आहे आणि
दोहो राजानी तिला नकाराधिकार दिल्यासारखे दर्शविले आहे पण तिच्या हाती खरंच तसा अधिकार दोन्ही खेपेस नाही असं मला वाटलं.

असो. मी केवळ कथा अनुवादित करून पोहोचवण्याचा प्रयत्न केला मला समजला तसा. कोणताही भाग वगळला नाही. मला मिळाली ती लोककथा अशी होती. उर्वरित अर्थ कथाकरप्रमाणेच
अज्ञात आहे आता. Biggrin

मग दुसऱ्या वेळेला हसली का ती. हसायला हवे होते. कारण जो तिला सदैव सुखात ठेवण्याचं वचन देत होता तोच प्राणाला मुकला. Happy

छान आहे कथा , आवड ला.

प्रथम शेवट कळला नाही, पण रमणी यांनी तपशिल दिल्यावर समजले !

रमणी _/\_

तिने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केलाही नव्हता... तो तिच्या मुकपणाला स्वीकृती समजला आहे
>>>
The woman bowed her head, and said Yes, my king, in that case I shall be very happy to accept your offer of marriage.

म्हणूनच स्वैर असं लिहिलं आहे. कारण तिने हो म्हणण्यापूरवी, >>The poor woman was taken somewhat aback, You wish to marry me, she asked, when I am a complete stranger to you?>>...असंही म्हंटलं गेलं आहे.
पुन्हा ती इंग्लिश कथा देखील मूळ चिनी कथेचा अनुवाद आहे.
आणिजर ती आनंदाने हो म्हणाली असती, तर ती उदास का आहे याचा योग्य अर्थ मला लागत नाहीय.
Chrups किंवा अमर आपण सुचवू शकाल का अर्थ?

ते स्वर्गीय सौंदर्य तिला शापासारखं वाटलं असेल. भुतकाळात तिच्या अस्मानी सौंदर्यामुळे खूप काही सोसावं लागले असावे. तिचे आई-वडील/ नवरा/ प्रियकर/ मुले याची कदाचित तिला किंमत द्यावी लागली असावी. म्हणून ती फार लांब देशांतर करून भुतकाळ विसरण्यासाठी दूरवर प्रवास करत आली असावी. राजानं मागणी घातली तेव्हा ती आश्चर्य चकित होऊन म्हणाली असेल, " मी कोण, कुठली हे न जाणताच तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं आहे?" नंतर तिने परिस्थिती बरोबर समझोता करून लग्नाला संमती दिली असावी. पण भुतकाळ आठवून उदास रहात असावी. तिचा अगोदरचा प्रियकर/नवरा असाच संकट आल्यावर घाबरून पळाला असावा व हा राजाही जो सम्राट म्हणवतो तो सुध्दा भित्रा आहे हे पाहून तिला हसू आलं असेल. किंवा दरबाऱ्याची अवस्था ( ध्यान) पाहूनही हसली असावी. लांडगा आला रे आला सारखं घडून खरेच शत्रू आला व राजाचा बळी गेला. दुसऱ्या राजानं तिला कोणतीही किंमत न देता केवळ भोगवस्तू म्हणून नेले असावे व अनमोल रत्न मालकीचं करावं तसं राणी बनवलं आहे.
पद्मावती सारखं तिच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्याची वासना अनावर झाल्यामुळेच कदाचित शत्रू राजानं हल्ला करून राजाला मारून सौंदर्यवती राणीला प्राप्त केले असावे.
पद्मावतीची गोष्ट वेगळी आहे. पण अॅंगल तोच वाटतो मला. हेमावैम.

मला वाटते ती शापित आहे. ती जेंव्हा हसते तिचा नवरा काही दिवसांनी मरतो. तिला राजा आवडलेला असतो त्यामुळे ती हसणे टाळत असते.
शेवटी हसते पण नंतर परत दुःखी होते कि आता हा पण मरणार आणि त्याचे कारण तिचे हास्य आहे.

रमणी तुमचा अनुवाद चांगला आहे पण ओरिजिनल कथा अत्यंत फालतू आहे , ना शेंडा ना बुडखा. काही बोध नाही , अर्धवट वाटते.

च्रप्स तुमचा मुद्दा खरोखर पटण्यासारखा आहे. मुळ चिनी कथेत व्यवस्थित पटण्यासारखे कारण असेल पण इंग्रजीत भाषांतर करणारालाच नीट जमलं नसावं. सौंदर्यवती हिला शाप असावा जास्त आनंदी झाली की दु:ख वाट्याला येत असावे. दुधाने तोंड पोळल्यामुळे ती ताक फुंकून पित असेल कदाचित.

शापित असणे हा देखील एक कोन असू शकतो कथेकडे पाहण्याचा.
पण मला ती कथा वाचल्यानंतर जो कोन दिसला त्यानुसार मी अनुवाद केला आहे.

आता डोक्याला भुंगा लागला.इंटरनेटवर कोणा अभ्यासकाने या शेवटाचा अन्वयार्थ लावला नाही का अजून?
हा पण अर्थ निघेल
राणी सायकोपाथ आहे.तिला मुद्दामहून हसवू पाहणाऱ्याचे ती नंतर सैन्य पाठवून प्राण घेते.आणि नंतर पुन्हा तश्या माणसाच्या शोधात निघते.राणी डिप्रेशन मध्ये नसेल तेव्हा तिच्या पहिल्या नवऱ्याने तिला नडलं असेल आणि त्याच्या रागात ती निसटून हे पुढचे खून करत असेल.

माझ्या मते कथेचा खालील प्रमाणे अर्थ घ्यावा
जर राज्याची राणी खुश असेल तरच ते राज्य निरंतर चालेल त्याचप्रमाणे घरात जर गृहिणी खुश असेल तर संसार सुखात चालेल

> जर राज्याची राणी खुश असेल तरच ते राज्य निरंतर चालेल त्याचप्रमाणे घरात जर गृहिणी खुश असेल तर संसार सुखात चालेल > किंवा उलटा अर्थ करता येईल- जोपर्यंत राजा एकटाच होता तेव्हा तो दुःखी असला तरी सुगंधी होता आणि राज्य-प्रजा आनंदात होते. ही पांढऱ्या पायाची, सतत दुःखी राहणारी बाई आली आणि सगळं वाटोळ झालं.

Ami - lol

Pages