दुनिया

Submitted by अमर ९९ on 24 August, 2019 - 21:35

माझी आजी नेहमी अनेक म्हणी रोजच्या बोलण्यात सहजच बोलून जायची. " दुन्या ही दिल्या घेतल्या ची आहे " , "उसनं मांडं नी उसनं दांडं ", "दिलं तर गोड नाहीतर दोड" अश्या अनेक म्हणी आपोआप तिच्या बोलण्यात यायच्या. लहानपणी मला तिच्या बऱ्याच म्हणींचा अर्थ लागायचा नाही.
माझं बालपण खेड्यात गेले. कोणत्याही सुविधा त्या काळात नव्हत्या. तंगडतोड करतच तालुक्याच्या गावाला जाऊन दवाखाना, भाजीपाला बाजार, म्हटलंच तर सिनेमा बघणे या गोष्टी कराव्या लागायच्या. माझ्या प्राथमिक शाळेतील वर्गमित्र व मी सर्वच शेतकऱ्याची मुले होतो. काही शेतमजुरी करणारांची होती. सगळ्यांची घट्ट अशी मैत्री होती. शाळेत आणि शाळेबाहेर एकमेकांवाचून अजिबात करमायचे नाही. आमच्या बालपणी टिव्ही, मोबाईल नसल्यामुळे अनेक मैदानी खेळ, चल्लसपाणी सारखे बैठे खेळ व भरमसाठ गप्पा मारणे, पोहायला जाणे या गोष्टींत वेळ कसा जाई हे लक्षातही येत नसे. बोअर होणं काय हे माहित सुध्दा नव्हतं.
हळूहळू बालपण सरले, जो तो पोटापाण्याच्या उद्योगाला लागला. मी शहरात गेलो. नशिबाने चांगले शिक्षण घेतले व चांगली नोकरी मिळाली. शहरात स्थाईक झाल्याने अनेक आर्थिक संधी मिळाल्या. उत्तरोत्तर प्रगती होतच गेली. बऱ्यापैकी मालमत्ता, गाडी बंगला सर्व गोष्टी लाभल्या.
इकडे माझ्या बालमित्रांपैकी आम्ही चार पाच जणच असे बाहेर पडलो. बाकीचे खेड्यात राहिले. कुणी शेती, दूधधंदा , कुणी गवंडीकाम, कुणी अशीच पाच दहा हजार रुपये पगाराची नोकरी शेती करत करू लागले. प्रपंचाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना काहींनी चांगलं नियोजन करून प्रगती साधली. काहींची फरपट झाली तर दोन-चार व्यसनाधीन होऊन पार मागे पडले, लोकांच्या टिंगल टवाळीचे साधन बनले.
दिवस असेच जात राहिले. होता होता मी पण सेवानिवृत्त झालो. शहरात मुलं वगैरे सेटल झाले. पण मला मात्र गाव खुणावत होते. रिटायर झाल्यावर खऱ्याखुऱ्या आपल्या लोकांत रहायला मिळावं म्हणून गावाला रहायला आलो. शेतात छोटासा बंगला बांधला. हळूहळू बालमित्रांच्या भेटी चालू झाल्या. पण पुर्विचे बंध आता काही दिसेना. मला फार कोणी जवळ करत नव्हते. एक प्रकारचा अलिप्तपणा , तुटकपणा जाणवत होता. काही बालमित्र गरज असेल तरच माझ्याकडे येऊ लागले. दोघे तिघे उसने पैसे मागत. मी आनंदाने द्यायचो. एका जणानं पैसे परत केलेच नाही पण अजून पैसे मागत होता. शे पाचशे द्यायला काही वाटत नव्हते पण एके दिवशी इतके इतके पैसे उसने घेतलेस परत कधी देणार असे विचारले तर गडी बोलायचाच बंद झाला. हळूहळू माझ्या लक्षात आले की परिस्थितीचे चटके सोसल्यानं या लोकांना माझ्या श्रीमंत असण्याची मनात कुठेतरी असुया वाटते आहे, आपण प्रगती करू शकलो नाही हे मनात कुठेतरी शल्य त्यांच्या मनात असावं का असे विचार माझ्या मनात यायला लागले. काळ इतका बदलला की भौतिक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आलं. सायकल चालवणारा मोटार सायकल नाही म्हणून आतल्या आत झुरू लागला. सायकलवर मित्र समोरून आला की तो मान खाली घालून बाजूने जातो हा मला अपमान वाटायला लागला आहे.
आजकाल लोक माणूस नाही तर त्याच्या पासून होणाऱ्या फायद्याला मान देतात. मला आता आजीच्या बऱ्याच म्हणींचा अर्थ कळायला लागला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults