परीची दुनिया (भाग ४)

Submitted by nimita on 23 August, 2019 - 06:28

संध्याकाळी शोनूच्या पाळण्याभोवती एकदम खूप गडबड सुरू झाली. त्या गोंधळामुळे परीला जाग आली. तिनी शोनूकडे बघितलं ..तो पाळण्याच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांच्या बरोबर 'passing the parcel' खेळत होता.....म्हणजे तो 'parcel होता आणि इतर सगळे त्याच्याबरोबर खेळत होते- कधी आजोबांकडे, तर कधी काकूंकडे. मधूनच एक छोट्या दोस्ताची 'मला पण, मला पण' अशी भुणभुण ऐकू येत होती. बाकीच्यांना जरी खूप मजा येत असली तरी शोनू मात्र जाम वैतागला होता. त्याच्या चेहेऱ्यावर राग अगदी स्पष्ट दिसत होता. परीला वाटलं," या सगळ्या मोठ्या लोकांना कळत नाहीये का ? अहो, त्याला आवडत नाहीये तुमचं वागणं....किती घट्ट धरताय त्याला...आणि सारख्या पप्प्या कशाला घेताय ?" पण हे सगळं त्यांना कसं सांगणार ? शेवटी परी शोनूला म्हणाली," अरे, आईला हाक मार तुझ्या. आता तोच एक उपाय आहे." तिचं बोलणं ऐकून शोनू म्हणाला," नको गं, मी आईला बोलावलं तर सगळ्यांना वाटेल की मी रडतोय. मगाशी एक कोणीतरी काकू आईला म्हणत होती, --'फारच बाई रडतो हा ! सारखं त्याच्याकडे लक्ष देण्यात तुला मात्र विश्रांती नाही मिळत.'

मला कित्ती वाईट वाटलं गं ते ऐकून ! माझ्यामुळे आईला दमायला होतंय.... "

"हं," शोनूचं बोलणं ऐकून परी विचारात पडली.."तुझी आई पण तसंच म्हणाली का?"

"छे ..ती तर कित्ती लाड करते माझे," शोनूला नुसत्या आठवणींनीच हसू फुटलं." आईनी सांगितलं त्या कुचकट काकूंना की --'माझा शोनू खूप शहाणा आहे. मला अजिबात त्रास नाही देत.' मग एकदम गप्प बसल्या त्या काकू."

शोनूला हसताना बघून त्याच्या जवळ उभ्या असलेल्या एका ताईनी म्हटलं," ए, बघ... माझ्याकडे बघून हसला आत्ता ..म्हणजे आता त्याला माझ्याकडे यायचंय." आता पुन्हा passing the parcel सुरू झालं. परीकडे बघत शोनू म्हणाला,"असे नाही थांबणार हे ...आता यांचे कपडे ओले केल्याशिवाय गत्यंतर नाही!" त्याच्या या वाक्यावर तो आणि परी दोघंही अगदी तोंडाचं बोळकं पसरून हसले...पण त्या गर्दीतून मात्र --' ई.... पॉटी केली ह्यानी... घे बाई ह्याला...." वगैरे चित्कार ऐकू यायला लागले.

पुढच्या क्षणी शोनूला त्याच्या आईच्या कुशीत शिरताना बघितलं आणि परीनी पण सुटकेचा श्वास सोडला.

थोड्या वेळानंतर शोनूला भेटायला आलेले सगळे जण परत गेले. शोनूला परत पाळण्यात ठेवत त्याची आई म्हणाली,"आता जरा गाई गाई कर हं बाळा .. थोड्या वेळानी बाबा येणार आणि मग आपण घरी जायचं !!आईचं म्हणणं अगदी शब्दशः घेत शोनू दुपट्यात गुरफटून झोपून गेला.

एकीकडे परीच्या आईशी गप्पा मारत मारत शोनूची आई आपलं सामान आवरत होती. आपल्या हाताची मूठ चोखत परी त्यांचं दोघींचं बोलणं ऐकत होती. त्यांची दोघींची पण चांगली मैत्री झाली होती मागच्या दोन तीन दिवसांत. थोड्या वेळानी शोनूचे बाबा आले. शोनूला पाळण्यातून उचलून घेत म्हणाले,"चला , आता घरी जायचं. सगळे वाट बघतायत तुझी..." शोनू नी डोळे उघडून बघितलं. 'कोण आहेत हे? चेहेरा ओळखीचा वाटतोय,' त्याच्या मनात आलं...तेवढ्यात आठवलं त्याला.' अरे, हे तर माझे बाबा आहेत. आईनी ह्यांचाच फोटो दाखवला होता मला.' बाबांकडे बघत शोनू तोंड भरून हसला. परीकडे वळून बघत म्हणाला," हे बघ माझे पण बाबा आले."

"हो, आणि आता तुम्ही सगळे तुझ्या घरी जाणार," ओठ वाकडे करत परी कुरकुरली. शोनूला एकदम काहीतरी लक्षात आलं. तो म्हणाला, "आपण आता परत कधी भेटणार गं?" त्यावर खुदकन हसत परी म्हणाली," मी येणार आहे माझ्या आई बरोबर तुझ्या बारशाला.....आणि तू माझ्या !! मगाशीच ठरलंय तसं त्या दोघींचं.ए, पण बारसं म्हणजे काय असतं रे ?" आता शोनू पण विचारात पडला.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users