तुझा वरदहस्त

Submitted by चकाकी on 21 August, 2019 - 20:38

संकटांपासून तू मला वाचवावंस अशी माझी प्रार्थना नाही,
त्यांना सामोरं जाताना मी निर्भय राहू शकेन, एव्हढं दान देशील का ?

मी दुःखात असताना तुझ्या सांत्वनासाठी झुरणार नाही कदाचित,
त्या दुःखावर मला जय मिळवता यावा, एव्हढं दान देशील का ?

जेव्हा मला कुणाचाच आधार राहणार नाही तेव्हा,
माझं बळ मोडून पडू नये, एव्हढं दान देशील का ?

खोट्या आशांच्या जाळ्यातून तू मला सावरावंस, अशी माझी विनंती नाही,
माझं मन खंबीर राहावं, एव्हढं दान देशील का ?

माझी मागणी अशी नाही, की तू माझा तारणकर्ता व्हावंस
स्वत:ला तारून नेण्याचं सामर्थ्य माझ्यात यावं, एव्हढं दान देशील का ?

माझं ओझं तू पेलावंस अशी मी कशी अपेक्षा करू?
ते ओझं वाहायची शक्ती मला मिळावी, एव्हढं दान देशील का ?

सुखाच्या दिवसांत मला नम्रपणे तुझ्याशी ओळख ठेवू दे,
आणि दुःखाच्या अंधाऱ्या रात्री जेव्हा जग माझ्याकडे पाठ फिरवेल तेव्हा,
तुझ्या दयाळू अस्तित्वाविषयी माझ्या मनात शंका उमटू नको दे...

एव्हढं दान देशील का ?

(रवीन्द्रानाथ टागोर यांच्या Grasp of Your Hand या कवितेवर आधारित)

Group content visibility: 
Use group defaults