परीची दुनिया (भाग ३)

Submitted by nimita on 18 August, 2019 - 03:07

पोटोबा तुडुंब भरल्यावर साहजिकच परी पुन्हा झोपेच्या अधीन झाली. त्यानंतर चे दोन तीन दिवस तिचं हेच रुटीन झालं होतं...भूक लागली की टँsss...दुपटं ओलं झालं की टँsss.... कधी अचानक आईची आठवण आली की टँsss.... शोनू नी म्हटल्याप्रमाणे 'खरंच आई आल्यावर सगळं काही ठीक होऊन जातं' हे आता परीला पटलं होतं.

अधून मधून तिच्या पाळण्याच्या आजूबाजूला गर्दी व्हायची...'अय्या, किती गोड !','अगदी तुझ्यासारखे डोळे आहेत','जावळ किती छान आहे गं'...अशी वाक्य परीला ऐकू यायची. मधूनच कोणीतरी तिला उचलून घ्यायचे, उगीचच 'जोsss जोsss करत तिला हलवत बसायचे. परीला अज्जिबात नाही आवडायचं ते! तिला वाटायचं - त्यांना सांगावं..' मला फक्त माझ्या आई बाबांच्या कुशीत जायला आवडतं..' पण आपलं बोलणं फक्त आईला कळतं' हे आता परीच्या लक्षात आलं होतं.

एकदा तर एक काकू सारखी आईला सांगत होती -" अगं, असं नको करू, तसं नको करू ,बाळाला त्रास होईल, नीट लक्ष दे..." परीला खूप राग आला त्या काकूंचा ! तिला वाटलं त्यांना सांगावं-" माझ्या आईला सगळं माहिती आहे. फक्त तिलाच कळतं मला काय पाहिजे ते." पण तिचं बोलणं त्यांना कुठून कळणार !काय करावं काहीच सुचत नव्हतं परीला. तेवढ्यात त्या काकूंनी आईच्या मांडीवरून परीला उचलून घेतलं.. परीला मुळीच नव्हतं जायचं त्यांच्याकडे. आईच्या मांडीवर किती छान वाटत होतं. "काय बरं करावं?" परी विचारात पडली. एकदम तिला काहीतरी सुचलं आणि पुढच्या मिनिटाला त्या काकू ओरडल्या," अगं बाई, माझी इतकी चांगली साडी ओली केली की गं हिनी ....घे बाई हिला आणि दुपटं बदल हिचं."

परत आईच्या कुशीत जायला मिळालं म्हणून परी जाम खुश झाली. आणि आता तर तिला एक रामबाण उपायही सापडला होता...उगीच त्रास देणाऱ्या लोकांची गंमत करायचा!

दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारच्या पाळण्यातला शोनू परीला म्हणाला," आज मी माझ्या घरी जाणारेय. थोड्या वेळानी माझे बाबा येणार आणि मग आम्ही सगळे घरी जाणार." परीनी त्याला विचारलं," घरी म्हणजे नक्की कुठे?" "ते मला पण नाही माहित," शोनूनी कबुली दिली."पण जाऊ दे ना ....आई बाबा असतील ना बरोबर ! मग काय प्रॉब्लेम ? आई म्हणत होती की आता आम्ही सगळे एकत्र राहणार- आमच्या घरी..आणि खूप मज्जा करणार."

शोनूचं म्हणणं परीलाही पटलं असावं...कारण सकाळी जेव्हा तिचे बाबा आले होते तेव्हा ते आईला असंच काहीतरी म्हणत होते. नक्की काय म्हणाले ते ऐकू नाही आलं - अगदी आईच्या जवळ जाऊन हळूहळू बोलत होते..पण थोडं थोडं ऐकलं होतं परीनी..."घरी करमत नाहीये...लवकर या दोघी घरी " असंच काहीतरी होतं ! पण बाबांचं बोलणं ऐकून आई कित्ती गोड हसली होती...म्हणजे नक्कीच घरी गेल्यावर मज्जा येणार - एवढं परीला समजलं होतं.

शोनू अजून पण काहीतरी सांगत होता, पण परीला कधी झोप लागली कळलंच नाही. अचानक कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला आणि परी दचकून जागी झाली. पाहते तर शोनू त्याच्या आईच्या कुशीत रडत होता. "अरेच्या, आईजवळ आहेस तरी का रडतोयस?" परीनी त्याला विचारलं. एकीकडे त्याची आई त्याला शांत करायचा प्रयत्न करत होती पण तरीही रडत रडत शोनू म्हणाला," मगाशी एक काकू आली होती आणि तिनी मला जोरात टुच्चूक केलं.अजून दुखतंय तिथे. हे बघ.." आपल्या उजव्या हातानी डाव्या खांद्याकडे बोट दाखवत शोनू म्हणाला. 'आता हे टुच्चूक काय असतं? आणि त्यामुळे इतकं दुखतं का? अरे बापरे ,' परी विचारात पडली. तेवढ्यात एक काकू तिच्या आईजवळ येऊन म्हणाली," उद्या तुम्ही घरी जाणार ना ? पण त्याआधी बेबीला बीसीजी द्यायचं आहे, बरं का?"त्या काकूंकडे बघत शोनू म्हणाला," हीच होती ती...हिनीच टुच्चूक
केलं होतं."

शोनूला इतकं रडताना बघून परीला पण त्या काकूंची आणि त्यांच्या टुच्चूक ची भीती वाटायला लागली आणि तिनी पण आपला टँsss चा सूर लावला.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह पुढच्या भागात परीला टुचुक आहे तर. थोडं सावकाश द्यायला सांगा हं काकूला, परीराणीला न् दुखावता.
पुभाप्र.