माझ्या भारत देशा

Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 16 August, 2019 - 05:05

तुझी आठवण येतेच रे....
तुझ्या अंगाखांद्यावर खेळत मोठी झाले. तुझ्या मातीत कित्येकदा धडपडले असेन. फुटलेल्या गुढघ्यांनी आणि रडून लाल झालेल्या डोळ्यांनीही तरी परत तुझ्याच कुशीत खेळायची धाव घेतली होती.
शाळेत गेल्यावर शिकलेली आणि पहिली पाठ झालेली गोष्ट. प्रतिज्ञा.
“भारत” माझा देश आहे.
त्यातलं ते सर्वात प्रथम येणारं तुझं नाव.
भारत.
ते अजूनही तसच येतं तोंडात.
या सुट्टीत ईंडियाला जाणार? ला उत्तर आपसूक येतं, हो भारतात जाणार आहोत.
मी आज इथे तुझ्यापासून हजारो मैल दूर.
का? मग तुझ्याजवळच राहू शकत होते कि वगैरे प्रश्न वेगळेच आहेत.
पण आजचं सत्य हे आहे कि मी तुझ्यापासून लांब आहे.
त्यामुळंच तुझी आठवण येते रे...

आठवण येते तुझ्या मातीची. जिला मी माझी म्हणू शकते तिची.
तुझ्या पावसाची. तुझ्या बदलणाऱ्या ऋतूंची. त्यात केलेल्या मजेची आणि त्याच्या सुंदर अनुभवांची.
आठवतो तुझा निसर्ग. भरभरून देणारा.

तुझ्या उदरातून उगवून येणाऱ्या त्या अन्नाची. तुझ्याजवळ असताना जेवल्यावर तृप्तीचा ढेकर येतो, तसं पोट जगात कुठेच भरत नाही रे.
तिथे रस्त्यावरच्या गाडीवर खाल्लेला लसणाच्या चटणीने घमघमणारा वडापाव, त्याच्यासोबतचा तो गोडमिट्ट चहा आठवला कि इथलं वेगन आणि ग्लूटेन फ्री सगळं झूट आहे असं वाटायला लागतं.
तिथल्या पुरणपोळीबरोबर मारलेला आमटीचा भुरका आठवतो. गोल टमटमीत भाकरीबरोबर खाल्लेल्या मेथीच्या भाजीची चव घशात तशीच जाणवत राहते.
आठवतात आंब्याच्या रसाने माखलेले हात आणि कपड्यांवर पडलेले करवंदांचे डाग..

आठवतात तुझे वारे, सह्याद्रीच्या कातळातून घुमणारे,
तुझ्या नद्या ज्यांनी आम्हाला पोसलं
तुझे पर्वत ज्यांची उंची पाहून मोठं म्हणजे काय ते शिकलो.
तुझ्या परंपरा, ज्यांनी माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे हे ना बोलताच सांगितलं...
आठवतात दिवाळीतल्या पणत्यांच्या ओळी,
फटाक्यांचे आवाज,
एकाच ताटाभोवती बसलेली भावंडांची पंगत,
आठवतात तुझ्या मातीत रुजलेल्या गोष्टी ज्या आईच्या मुखातून ऐकल्या आणि जगण्याचाच एक भाग बनून गेल्या.

आठवतात मंदिरांच्या देवळातल्या घंटा
धुपाचा वास
आणि तिखट लागणारा, ठसका काढणारा पण नंतर खडीसाखरेचा गोडवा देणारा सुंठवडा
आठवतो शेजाऱ्यांनी दिलेला शीर खुर्मा आणि त्यांच्या घरी आईने पोहोचता केलेला लाडवांचा डबा
तुझी आठवण येतेच रे
सरता सरत नाही ती..
हळवं होऊन मन दूर उडत जातं, तुझ्याकडे...तुझ्या कुशीत...

माझ्या भारत देशा...
मी कायमची तुझ्याकडे कधी परतेन माहित नाही रे पण तोपर्यन्त मी माझ्यापुरता “भारत” माझ्या मनात जिवंत ठेवेन..

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय.
ए वतन, वतन मेरे, आबाद रहे तु
मै जहा रहु जहामे याद रहे तु

छान उतरवल्यात भावना !
या सुट्टीत ईंडियाला जाणार? ला उत्तर आपसूक येतं, हो भारतात जाणार आहोत.>>+९९९९