परीची दुनिया (भाग२)

Submitted by nimita on 14 August, 2019 - 09:11

परीनी जेव्हा पुन्हा डोळे उघडून बघितलं तेव्हा ती तिच्या आईच्या कुशीत नव्हती. तिनी चाचपून आजूबाजूला पाहिलं.... सगळं शांत शांत होतं ; मगाचची गडबड, गोंधळ ऐकू येत नव्हता. 'पण आई कुठे गेली ? आणि सगळीकडे असं जाळीजाळी सारखं काय आहे ? नीट दिसत पण नाहीये काहीं पलीकडचं.' पाळण्यावरच्या मच्छरदाणीतून बाहेर बघण्याचा प्रयत्न करत परी म्हणाली. आपल्याभोवती घट्ट गुंडाळलेल्या दुपट्यातून हातपाय बाहेर काढायचा प्रयत्न करत परी एकीकडे आईला शोधत होती.

"तुला नाही जमणार हात बाहेर काढायला," परीच्या शेजारून आवाज आला; तिनी मान वळवून बघितलं तर शेजारच्या पाळण्यातून तिच्याच सारखं एक गोंडस बाळ बोलत होतं. तिनी थोडं लक्ष देऊन बघितलं तर ते पण तिच्यासारखंच दुपट्यात गुंडाळलेलं ! तिनी त्याला विचारलं," तू कोण आहेस? आणि आपण हे कुठे आलोय. माझी आई कुठे गेली?"

हळूच हसत ते शेजारचं बाळ म्हणालं,"मी कोण ते मला नाही माहित, पण माझी आई मला 'शोनू बेटा' म्हणते. तुझी आई काय म्हणते तुला?" आईचं नाव ऐकताच परी खुदकन हसली आणि म्हणाली," परीराणी.... माझे आई बाबा दोघंही मला परीराणी म्हणतात."

तिचं बोलणं ऐकून शोनू थोडा हिरमुसला.."तुझे बाबा पण आहेत तुझ्या जवळ? माझी तर फक्त आईच आहे...पण लवकरच येणारेत माझे बाबा. काल मला झोपवताना आई सांगत होती की बाबा दुसऱ्या गावाला गेलेत म्हणून. तिनी तर मला काल त्यांचा फोटो पण दाखवला..मी म्हणे माझ्या बाबांसारखा दिसतो !"

बोलता बोलता एकीकडे शोनूचीही दुपट्यातून बाहेर पडायची धडपड चालूच होती ; तेवढ्यात कोणीतरी त्याचं दुपटं पुन्हा नीट केलं आणि हळूहळू पाळणा हलवायला सुरुवात केली. शोनू परीकडे बघत म्हणाला," ही बघ माझी आई !" त्याच्या आईला बघून परीला आपल्या आईची आठवण आली. तिनी डोक्यावरच्या टोपड्याच्या झालरीतून बघायचा प्रयत्न केला पण आई कुठेच दिसेना. आता परीला हळूहळू पोटात काहीतरी वेगळंच जाणवत होतं. तिनी तसं शोनूला सांगितलं तेव्हा तो हसून म्हणाला," अगं, तुला भूक लागलीये." "भूक लागलीये म्हणजे? आणि तुला कसं माहित की याला भूक म्हणतात?" परीनी तिच्या शंका विचारायला सुरुवात केली. " काल मला पण असंच काहीतरी होत होतं. मग मी रडून आईला हाक मारली. तिनी मला उचलून कुशीत घेतलं आणि म्हणाली," भूक लागली का माझ्या शोनूला ?"

"हं, म्हणजे आईला सगळं माहित असतं तर!" परीला नवीनच साक्षात्कार झाला होता. तिच्या म्हणण्याला दुजोरा देत शोनू म्हणाला," हो ! जर तुला काहीही प्रॉब्लेम झाला ना...म्हणजे जर तुला भूक लागली किंवा तुझं दुपटं ओलं झालं किंवा जर तुला झोपायचं असलं....काहीही असेल तरी आईला बोलवायचं. आई येते आणि सगळं एकदम ठीक होऊन जातं."

शोनूच्या सांगण्यानुसार परीनी तार सप्तकात सूर लावून आईला हाक मारली. पुढच्या क्षणाला तिची आई पाळण्याशेजारी आली आणि तिला उचलून घेत म्हणाली," भूक लागली वाटतं माझ्या परीला !" परीनी हसून शोनू कडे बघितलं आणि ती आईच्या कुशीत शिरली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Akku 320, हाहाहा Happy किती गोड प्रतिक्रिया ....पण काळजी करू नका...वाचा बिनधास्त...उलट तुमचा डायबेटीस बरा होईल पूर्णपणे. Happy