'शल्या' !!

Submitted by कवठीचाफा on 10 December, 2007 - 12:03

पिकनिक लिहून संपली पण पक्या आणि पिंट्या मनातुन जाईनात, पक्या आणखी खोलवर मनात शिरुन बसला. शेवटी जसे सुचत जाईल तसे लिहित गेलो. खरं तर पक्या हे संपुर्ण काल्पनिक पात्र नाही, पण पुर्णार्थाने खरेही नाही त्यातुन ह्या कथेत बाकी बर्‍याच जणांनी हजेरी लावलीये ( माझ्या सकट ) त्यामुळे................. ! शल्या नक्की कथा आहे की व्यक्तीचित्र मलाही सांगता येणार नाही जर कुणाला याचा शोध लागलाच तर मलाही समजुन घ्यायला आवडेल.

रविवार..........., आरामाचा दिवस, झक्कपैकी उशिरा उठून आवरा आवरी करुन गरमा गरम कॉफ़ीच्या मगा बरोबर समोरच्या ईयान फ़्लेमिंगचा समाचार घेत होतो तेंव्हा अंगावरुन भिरभिरत येउन टेबलावर पडलेलं सिगारेटचे पाकिट निट उचलुन बाजुला ठेवत मी न वळताच म्हणालो
" ये शल्या, तुझीच वाट बघत होतो पण गधड्या ही सिगारेटचे पाकीट फ़ेकुन मारायची सवय आधी सोड यार. सगळ्यांनाच नाही रे आवडत."
" सगळ्यांच सोड मित्रा तुला राग येतो का?" रोखठोक सवाल.
" मी करतो रे सहन आता तु असं पाकिट फ़ेकुन मारल नाहीस तर मलाच चुकल्यासारख वाटेल" खरं तेच बोललो.
" मग मार ना गोळी दुनियेला"." तु तयार झालायस का? निघायच ना?" हे तो मित्राच्या वडीलांना हॉस्पिटल मधे भेटायला जाण्याबद्दल बोलत होता.
" अर्थात मी रेडी आहे पण हे हातात इतकी भरगच्च भरलेली बॅग ? काय घेउन चाललायस?"
" पुस्तकं आहेत रे, म्हातार्‍याला टाईमपास होईल " हे असलं तोच बोलु जाणे.
" पण कुठली? " न जाणो हा काही भलतं सलतं नेउन द्यायचा ही भिती.
" हे बघ,!" हातातले ' शांती अस्त्र" चे बाड नाचवत म्हणाला. "आता निघायचे काय घेशील?" चुपचाप घरातुन बाहेर पडण्याखेरीज दुसरा मार्ग नव्हता.

यथावकाश आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो, विचारपुस केली आणि पुन्हा घरीही आलो पण हा शल्या आज मनातुन पुसल्या जाईना का कुणास ठाउक?

शैलेश आणि माझी ओळख झालीच धडाकेबाज सालाबाद प्रमाणे लेक्चरला दांडी मारुन कॅंटीनमधे एक कप चहा बरोबर आर्धातास गप्पा असा फ़क्कड बेत जमवला होता आमच्या टवाळ कंपुने. गप्पा रंगत चालल्या होत्या तेवढ्यात शेजारची रिकामी खुर्ची गर्रर्रर्रकन उलटी फ़िरली आणि तीच्या पाठीवर एक मुंडके दिसायला लागले.
"मी जर तुम्हाला जॉईन झालो तर तुमची हरकत नाही ना?" ऐकताना थोडेसे उध्दट वाटले पण एकंदर व्यक्तीमत्व पहाताना आमचे टोळके त्याचा अंदाज घेत होते. माझ्या मनाला त्याचा तो बेधडकपणा आवडला. आमच्या टवाळ कंपुला शोभेलसाच होता की तो.
सर्व साधारण शरीरयष्टी आणि भरगच्च उंची जबरी कॉम्बिनेशन होते ते. मानेपर्यंत रेंगाळाणारे सिल्की केस भांग पाडून घ्यायला तयार नसावेत अस्ताव्यस्त कपाळावर बागडत होते आणि कंटाळवाण्या वेगात फ़िरणार्‍या पंख्याबरोबर आणखीनच लहरत होते.
" नो प्रॉब्लेम, घर आपलेच आहे" कुणी तरी दात विचकटत म्हणालं.
छानसे हसत त्याने हातातला चहाचा कप टेबलावर ठेवला आणि खिशातुन पाकीट काढुन गोल्डफ़्लेक शिलगावली.
" हे असलं काही चालत नाही हं ईथे, भट कोकलेल." माहीतीत भर !
यावर काहीही न बोलता धुराचे कारंजे वर छताकडे सोडत तो हसला. कॉलेजचा नियम मोडतच आमच्यात जमा झाला. रितसर ओळख वगैरे झाल्यावर त्या खुर्चीवर तरंगणार्‍या डोक्याच्या मालकाचे नाव शैलेश आहे असे कळले. आणि यथावकाश त्याचा शल्याही झालाच.
एकंदरच शल्या हे असले पात्र होते की त्याने जरा नेट लावला असता तर आपल्या वागण्याने क्लासरुमच्या कॅंटीनच्या भिंतींनाही हसायला भाग पाडले असते. एकतर सारखे नवे नवे शब्दप्रयोग चालु शब्दप्रयोग म्हणजे अक्षरशः शब्दांवर प्रयोग. म्हणजे जो शब्द जिथे वापरायला हवा नेमका तिथेच न वापरता बाकी सगळीकडे वापरणे. उदाहरण घ्यायचेच तर 'खमंग'.
" आयला आज त्या टेमकॉलॉजीने कसला खमंग कंटाळा आणला यार". " अरे, ते एफ़ वायचं मोडकं ( त्याच आडनाव मोडक, पण त्याचा उच्चार हा क ला अनुनासिक करुन म्हणणार) निलीशी पंगा करत होतं रे, असला खमंग तासडला ना त्याला उभ्या आयुष्यात पुन्हा असली खमंगगिरी करणार नाही." हे असल काहीतरी.
ह्याच्या सहवासाने आख्या ग्रुपला नव्या नव्या विचित्र सवयी लागायला लागल्या. मधेच एक फ़ॅड निघालं 'का'? कुणिही काहीही विचारलं तरी प्रश्न, का? कुणी काही बोललं की 'का'?
आगदी "आज हवा किती छान पडली आहे नाही" असं जरी कुणी म्हणाल. तरी प्रश्न आलाच समजा " का"? बरं हे असले शब्द एकदा तोंडात बसले की लवकर जागा खाली करत नाहीत. समजा तुम्ही जरी म्हणालात " अरे नको रे ते सारखं कावळ्यासारख का का करत जाउस". तर पुन्हा आहेच...............
असाच दुसरा प्रकार आला तो म्हणजे मी 'आता काय म्हणुन?' वाचायला, ऐकायला कीती सरळ वाटत नाही का ? पण यालाच एखाद्याला उत्तर देताना सुरुवातीला वापरुन बघा दहा मिनीटात राडा होण्याची खात्री.
शल्याला जोरदार साथीदार मिळाला तो निशांत उर्फ़ सानु. आता सानु नाव पडायला कारण तेंव्हा नुकत्याच हीट झालेल्या 'आशिकी'चा गायक कुमार सानु, तो कसा? तर निशांत कायम त्याच्यासारखा आवाज काढायच्या नादात चिरका आवाज काढून गाणी म्हणायचा. हे ही प्रकरण महाईरसाल एका दिवशी कॅटीनमधे लेक्चर बुडवुन बसलेला बघितल्यावरुन त्याला एका प्रोफ़ेसरांनी झापला. दुसर्‍या दिवशी हा त्यांच्या लेक्चरला सगळ्यात आधी हजर, त्या प्रोफ़ेसरांना हात टेबलावर आडवे पसरुन ठेवायची सवय,शर्ट कायम कोपरापर्यंत दुमडलेला, पण आज त्यांच काहीतरी बिनसलं पाच मिनीटातच हाताची चाळवाचाळव, मग अस्वस्थ होणे वगैरे झाल्यावर त्यांनी सरळ बाहेरचा रस्ता धरला.
" त्यांच्या टेबलावर मी खाजकुयली टाकली होती" सानुने गौप्यस्फ़ोट केला. कर्णोपकर्णी ही सुवार्ता त्या प्रोफ़ेसरांपर्यंत गेलीच. यावर सानुचे साधे सरळ स्पष्टिकरण " मग तेंव्हाच का नाही बोललात," त्यांची बोलती बंद .
शल्या आणि सानु या जोडीचा मुक्तसंचार सगळ्या कॉलेजमधे होता आगदी स्पोर्टस पासुन ते गॅदरींग पर्यंत. कॉलेज गॅदरिंगला तर ओरीजनल वाटाव म्हणुन या बहाद्दरांनी आख्ख्या स्टेजवर पाला-पाचोळा पसरवला आणि मध्यभागी कॅंप फ़ायर केली होती. आधी सिलेक्शन वगैरे प्रकार नसल्यामुळे ते काय करताहेत हे कुणालाच माहीत नव्हते पण जंव्हा प्रत्यक्षात चाललेले नाटक पाहीले तेंव्हा बर्‍याच स्वयंसेवकांनी देव पाण्यात घातले होते.

शल्या प्रत्यक्षात जरी इरसाल होता तरी त्याचा 'कॉलेज मधिल प्रेक्षणिय स्थळे' या बाकी दोस्तमंडळींच्या जिव्हाळ्याच्या विषयात बिलकुल ईंटरेस्ट नव्हता. कारण खुप उशिरा कळले आणि ते ही फ़क्त आम्हालाच. या विषयावरुन आम्ही त्याला फ़ारच जास्त छेडत असु. पण खरे कारण कळल्यावर माझेही तोंड बंद झाले. त्या मागचे खरे कारण होते 'गंधाली'.
गंधाली ही शल्याची लहानपणापासुनची मैत्रिण, तिचे वडिल सांगली बॅंकेत मॅनेजर होते. दोघे लहानपणापासुन एकत्र खेळले वाढले, पण अचानक तिच्या वडिलांची बदली झाली आणि ते सगळ्या कुटुंबासहीत निघुन गेले त्यानंतर तिची आणि त्याची पत्रापत्री चालू होती. काही काळाने ती ही बंद झाली. शल्या तिला विसरला नाही, तिची आठवण कायम त्याच्या मनाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात सतत जागी असायची.

'रोझ डे 'चा तो दिवस कुणिच विसरण कदाचित शक्य नाही. जोरदार धिंगाणा चालु होता, एकतर्फ़ी प्रेमविरांना हातात रेड रोझ घेउन त्याच्या 'छावी' (त्यावेळचा प्रचलित शब्द) कडे ढकलणे हा एक 'भला' उद्योग चालु होता. या भानगडित आम्ही शल्याला विसरुन गेलो होतो, पण सहजासहजी विसरता येईल असा माणुसच नाही ना तो ! झालं, शोधाशोध सुरु. शेवटी शल्याचा शोध लागला. एका कोपर्‍यातल्या पारावर हातातल्या गुलाबाच्या पाकळ्या तोडत बसला होता. लांबुन पहाणार्‍याला नक्की असे वाटले असते की तो 'शी लव्हज मी, शी लव्हज मी नॉट' असले काही करत असेल पण प्रत्यक्षात तसे नव्हते. मी जेंव्हा त्याच्या खांद्यावर हात ठेउन मागे वळवले तेंव्हा त्याच्या डोळ्यांच्या कोपर्‍यातले पाणि माझ्या नजरेतुन सुटले नाही. क्षणभरच तो थबकला असेल पण दुसर्‍या क्षणि त्याच्यातला शल्या जागा झाला. हातातल्या पाकळ्या तोंडात टाकुन म्हणाला. " आयला आजच्या दिवसातला एकतरी गुलाब सत्कारणी लाउ दे की यार"."तुला माहीताय गुलाबाच्या पाकळ्या थंड असतात. शरीराला चांगल्या बरं का".
"हो का ? मग हे डोळे का बरं पाणावले?" आवाजात शक्य तो मिष्कीलपणा आणत मी म्हणालो.
" ती या बयेची कृपा" ओठातल्या सिगारेटकडे लक्ष वेधत म्हणाला. बोलण्यात हा कधी हार जाणार नाही हे मला चांगलेच माहीत, त्यामुळे पुढची चर्चा बंद करुन आम्ही परत गृपला जॉईन झालो. पण मनात एक नक्की केले की या सुटीत शल्याच्या नकळत त्याच्या गंधालीचा शोध लावायचाच.

एक हा गंधाली विषय सोडला तर बाकी कुठल्याही विषयावर मी तरी शल्याला गंभिर होताना पाहिलेले नाही. एक दिवस हा कॉलेजात आला उशीरा आणि आला तोच लंगडत.
"आयला, शल्या? काय रे कशात तंगडं अडकवलस?" सरळ प्रश्न विचारायचे नाहीत असा जणु अलिखीत नियमच होता.
" कुछ नही यार, रात्री झोपलो होतो तर एका उंदराला वाटल झोपलेला शल्या चविला बरा लागतो का ते चव घेउन बघावं". आणि सरळ उत्तर देईल तर शल्या कसला.
" आयला! मग?"
" काही नाही मी ओरडत उठलो आणि बिचारा उंदिर निराश होवुन निघुन गेला". शल्या उवाच.
" अबे, सरळ बोल ना उंदिर चावला म्हणुन" कुणितरी अर्थ उशिरा लागल्याने कळवळला.
"च्या मारी शल्या, फ़ार उंदिर आहेत का रे घरात?" मुक्ताफ़ळे चालु झाली
" एक उंदिर ठेउ नको घरात." कुणितरी समस्येवर जालिम उपाय सुचवत होता.
" तु किनई एक मांजर पाळ" आमच्या गृप मधला एक मंजुळ आवाज किणकिणला.
मग उंदरांच्या संकटाला तोंड देण्याकरीता शल्याने काय काय उपाय करावेत यावर बराच काळ वादंग माजले.
" माझं ऐक तु आपला एक साप पाळ". हे सणसणित वाक्य वापरणारा निशांत खेरिज कुणी असुच शकला नसता.
मग चर्चा उंदरावरुन सापाकडे वळली. थोडक्यात नवे काहीतरी खुळ आता बोकाळणार होते.
" बे, गॅंग अरे कॅंप आहे सर्पमित्रांचा हुतात्मा हॉलमधे " ही ताजी बातमी कुणा अचरटाने पुरवली. एका अर्थी माझ्या फ़ायद्याचेच होते. कारण मलाही बरेच दिवस 'साप' हा विषय त्रास देत होताच, माहीती हविच होती आणि संधी समोर मी लगेच तयार, पण कुणी साथीदार मिळेना! जो तो कारणे काढायला लागला.
" चल बे, मी येतोय तुझ्या बरोबर" शल्या ऐन वेळी मदतीला धावला, जसा नेहमीच धावत राहीला.
सर्पमित्रांच्या त्या तिन दिवसांच्या शिबिरात आम्ही रोज जात होतो. जो पर्यंत थियरी अर्थात समस्त सर्प जाती बद्दल माहीती चालू होती तो पर्यंत शल्या ठिकठाक होता. पण जशी प्रॅक्टीकल्स चालु झाली म्हणजे साप प्रत्यक्षात पकडणे शिकवायला सुरुवात झाली तेंव्हा शल्या माझ्या मागे उभा होता, जरावेळाने मागे पाहीले तर हा बहाद्दर हातात काठी घेउन तयारीत दिसला, आणि जेंव्हा मी पहिल्यांदा साप हातात पकडला तेंव्हा अभिप्रायाच्या अपेक्षेने शल्याकडे पाहीले तर हा हातातली काठी तलवारीसारखी फ़िरवत होता. हातातल्या सापाला सुरक्षीत प्रशिक्षकाच्या ताब्यात देउन जिव भांड्यात धप्पदिशी पाडुन घेतल्यावर शल्याचा समाचार घ्यायला वळलो.
" का रे ? कसली तलवारबाजी चालु होती तुझी? "
" काही नाही रे, जर तुझ्या हातातुन जर साप सुटला असता तर त्याचे माझ्याशी भांडण नको व्हायला याची खबरदारी घेत होतो." " साला नाहितर तुझी खुन्नस माझ्यावर निघायची ". आपल्या भित्रेपणावर शल्याचे पांघरुण. पण जे असेल ते असो माझ्या बरोबर शेवटपर्यंत राहीला. आणि असाच तो प्रत्येकाच्या साथीला धावत राहीला.
मित्राच्या घरातल्या व्यक्तींची काळजी घरातलाच एक बनुन घेण्याची शल्याची सवय, मग भले मित्राच्या आई वडीलांना उद्देशुन बोलत असताना त्यांचा उल्लेख म्हातारा म्हातारी असा का करत असेना ! आताही मित्राच्या वडलांना गेले तिन दिवस आम्ही भेटायला जातोय. मणक्याचा आजार आहे, पाय वर आकाशाकडे ताणुन त्यांना वजनं लटकावण्याचा अफ़लातुन उपचार चालु आहे. गेल्या प्रत्येक दिवशी त्यांना भेटायला आमच्यातले बरेच जण येउन गेले पण त्यांना स्वःतच्या हाताने काही खायचं असेल तर जमत नाही हे शोधुन काढून त्यांना आपल्या हाताने भरवणारा शल्या पहिलाच.
असाच एकदा निलीच्या काकांचे आकाली 'तिकीट कटले' हे उद्गार अर्थातच शल्याच्या मुखकमलातले, तेंव्हा तिथे मध्यरात्री गावाकडे जाण्याची वेळ आली, त्या मंडळींना हा असा प्रसंग पहिलाच त्यामुळे सगळ्यांचाच धिर सुटला पण त्याही वेळेस भल्या पहाटे भाड्याची सुमो ठरवुन सरळ त्यांच्या दारात उभी करण्याचे भान फ़क्त शल्यालाच राहीले.

शल्या तसा तोंडाने सढळ, पण वागण्यात वयापेक्षाही जास्त मॅच्युअर्ड. त्याच्या आयुष्य म्हणजे एकदम पारदर्शकच आरपार नजर जावी असे, हातचे राखलेले काही नाही फ़क्त एक कप्पा सोडून 'गंधाली' ह्या त्याच्या कोनाड्यावर कायम पडदा असतो, आता असायचा म्हणता येईल. कारण आम्ही जो विडा उचलला होता 'या सुटीत शल्याच्या गंधालीला शोधुन काढायचेच'. तो पुर्ण करण्यासाठी आम्ही शक्य तितकी धडपड केली. जुन्या रेकॉर्ड नुसार त्यांची बदली कुठे झाली होती आणि आता ती मंडळी कुठे असु शकतील यासाठी आख्खा गृप आकाशपाताळ एक करत होता, आणि अखेर शोध लागला पण तो नसता लागला तर बरं झालं असत अस वाटायला लागल नंतर, कारण ....... कारण शल्याची गंधाली चार वर्षापुर्वीच ब्लडकॅंसरने गेली होती. माझे तरी वैयक्तीक मत असे आहे की कदाचीत हे सगळे शल्याला आधीच माहीत असावे नाहीतर इतकी चुप्पी त्याने कधीच साधली नसती, त्यामुळे सर्वानुमते असे ठरले की या शोधाचा पत्ता शल्याला लागु द्यायचा नाही. आपले सगळे प्रॉब्लेम शल्याशी मनमोकळेपणे मांडणारे आम्ही पहील्यांदाच एक गोष्ट त्याच्यापासुन लपवत होतो. कदाचीत शल्यालाही या बद्दल आधी माहीती मिळाली असेलही पण त्याच्या हदयातला तो भाग आजुनही अंधारात आहे.

कॉलेज संपुन आता जमाना झाला. पण आजुनही आमच्या कंपुतली बरीच मंडळी एकमेकांच्या संपर्कात आहोत. अधेमधे एखादा मोकळा दिवस बघुन सगळे टोळभैरव आणि भैरव्या एकत्र येतच असतो. सध्या शल्याची प्रचलित स्टाईल म्हणजे चालु मराठी शब्दाला अर्थोअर्थी समान ईंग्रजी शब्द वापरणे. हे असले शब्द तो कुठून शोधुन काढतो ते देव जाणे! कारपार्कींगला कारस्थान म्हणणे आपल्याला कधी सुचेल का? पण त्याला सुचते.
काळ सरकत राहीलाय मैत्रीणींची लग्ने झालीत. मित्र लग्नाच्या बेडीत अडकलेत, पण शल्या आजुनही एकटाच आहे. त्याच्या डोक्यावरचे ते सिल्की केस आता जागा सोडुन मागे हटायला लागलेत, एकेकाळी स्टाईल म्हणुन दिवसाला दोन-चार सिगारेट्ची जागा आता दोन पाकिटंनी घेतलेय पण आजुनही स्वभाव मात्र तोच !
तसाच एकटा शल्या कदाचीत आपल्या गंधालीच्या शोधात असलेला?

गुलमोहर: 

शल्या वाचल रे.
मला वाटत तुला ह्याहुन अजुन जास्त सांगायच होत पण नाही लिहु शकलास.
असो असे मित्र मंडळ जमवणे असणे ही खुप भाग्याची गोष्ट आहे. Happy

चाफ्या, छान लिहिलं आहेस. शल्याचं व्यक्तिचित्र डोळ्यासमोर अगदी नेटकं उभं रहातं. Happy

चाफा सहि जमलय्..पिकनिक पेकक्षा जास्तच आवडल..

शल्या चे व्यक्तीमत्व छान आहे
एकदम बिनदास्त आहे !!!! पण मित्राना साम्भाळणार....

लिहायच बरच होत रे पण आणखी लिहिता आले नाही. शल्याचि मनस्थिति जाणवलि !

thanks कशाबद्दल ? माहिती शेअर करायलाच हवी ना ?

चला म्हणजे प्रगती आहे म्हणायची लिखाणात Happy
असो पण शल्या लिहायला मलाही पिकनिक पेक्षा जास्त छान वाटले हे ही खर.

म्हणजे... माहीती वाढ्वल्या बद्दल धन्यवाद !!!!!!!!!!!!

'शल्या' जमलाच, चाफ्फा! अगदी जमलाच.
पूर्ण खरा की काल्पनिक- पण हा प्राणी डोळ्यासमोर उभा रहातो.... हेच महत्वाचं.

पुर्ण अनुमोदन!!!
नुसता जमलाच नाही... खुप भावला सुध्धा!

खुप छान लिहीले आहे.
मनाला भिडणारे आहे एकदम.

व्वा चाफा, मस्त रे!!!
छान आहे शल्या.

सहि जमलय अगदि शैल्याचं चित्रण!! मला तर खुप भावलं!

खूप आवडल हे व्यक्तिचित्रण आणि खूप नाजूक आठवणिहि जाग्या केल्यास तू !
तस माझ नावहि शैलेश असल्यामुळे अजूनच मजा आलि वाचताना. मस्तच !

कथा अप्रतिम लिहिलि आहेस. असे जुने मित्र मैत्रिणि मिळण म्हणजे दैवयोग. कथा आवडलि

व्यक्तिचित्रण आणि त्यातील प्रसंग खूपच छान उतरलेत.
ह्यातील शैलेशचे "शल्या" हे नामकरण खूपच वास्तववादी झालेय. त्यात एक श्लेष दडलाय.
शल्या हे शैलेशचे लाडीक नाव जसे होऊ शकते तसेच ज्याच्या मनी कसले तरी 'शल्य' आहे म्हणून त्या अर्थाने तो 'शल्या' ठरतो.
झकास! नामकरणही नेमके आहे.

'शल्या' हा साक्षात आहे अस मला तरी वाटत आहे. प्रमोददेवांना अनुमोदन, तु एकंदरित इरसाल कसा हा प्रश्न आता पडायला नको नाहि का ? आता पुढचा नंबर कुणाचा पिंट्या का ?
हा शल्या सध्या कुठे असतो रे ?

शल्या सही आहे एकदम अगदी व्य्क्तीचित्र डोळ्यासमोर उभे राहते ...!

चाफ्फा,
एकदम आवडले व्यक्तीचित्रण, खुप भावले. मुख्य म्हणजे हे वाचतांना शल्या डोळ्यासमोर उभा रहातो.
चाफ्फ्या तु म्हणजे एकदम भन्नाट सुटलायस लिखाणात विनोदी, भयकथा आणि आता हे व्यक्तीचित्रण.
तुझी पिकनिक पण मस्त होती, तेव्हा अभिप्राय द्यायचा राहीला म्हणुन आत्ता देतेय. Happy
असाच बहरत रहा.

धन्यवाद रुनी, ! पण मला बर्‍याच जणांकडुन दिवाळी अंकासाठी भयकथा लिहावी अशी सुचना मिळाली होती पण भट्टी जमली नाही ती कथा सफशेल फसली ( म्हणुन मग ती त्याच महीन्याच्या गुलमोहोरवर टाकली Happy ) आणि पिकनिक मलाही खुप आवडली होती पण..............

चाफ्या छान जमल.
पण खरच शल्याला हे कळायला हव होत,
कारण हा त्याच्या जिवनाचा आणी करीअर चा प्रश्न आहे.
आता पुढे शल्याच काय होणार. किवा झाल असेलहि.
पण नक्किच त्याच कहितरि चान्गल होणार.
शुभेच्छा.

आयला राव ! अख्खी दुनियादारी आठवली बघा....

पण खरंच लय घाण ट्रॅजीडीज असतात जगात...
"नशीब" वगैरे सगळं खोटं असेलही पण अशा गोष्टींना काय उत्तर मग?

बाकी, "शल्या" सारखे लोक औरच..

शुभेच्छा!

Pages