स्वप्न आणि सत्याची धूसर किनार

Submitted by चकाकी on 11 August, 2019 - 03:36

स्वप्न आणि सत्याची धूसर किनार , त्या समुद्रापलीकडच्या क्षितिजासारखी
कुठे निळं पाणी संपतं, आणि कुठे सुरु होतं ते अथांग आभाळ
निरखून पाहण्याचा प्रयत्न भलताच फसवा,
जितकं जास्त निरखून पाहावं, तितक्या जास्तच मिसळून जाणाऱ्या रेषा,
कंगोरे नाहीतच कुठेही - सारं काही एकसंध, सलग, अविभाज्य, नित्यसंबंधी !

स्वप्न आणि सत्याची धूसर किनार, त्या मायावी इंद्रधनुष्यासारखी,
प्रकट होतानाच नाहीसं होणारं दृश्य, रंग उजळतानाच हरवत जाणारं चित्र,
वाट पाहण्याचा प्रयत्न अधिकच हुरहूर लावणारा,
जितकी जास्त प्रतीक्षा, तितकी निराशा ठरलेली,
शाश्वती नाहीच कसलीही - व्यक्त-अव्यक्ताचा खेळ, क्षणभंगूर तरीही अपरिमित !

स्वप्न आणि सत्याची धूसर किनार , या विश्वाच्या अस्तित्वासारखी,
परमात्म्याची छबी उमटलेली , त्याच्याच तेजाच्या पार्श्वभूमीवर,
शोध घेण्याचा मार्ग हमखास चकवणारा, दुर्गम ,
जितकं दूरवर शोधावं, तितक्या स्पष्टपणे दिसणाऱ्या स्वतःच्याच सावल्या,
भ्रमाची मायाच सारी - पूर्णत्वाच्या कवेत शून्याची घनदाट अपरिहार्य खोली !

Group content visibility: 
Use group defaults