परीची दुनिया

Submitted by nimita on 10 August, 2019 - 17:28

"अभिनंदन ताई, मुलगी झालीये .. बघा किती सुंदर आहे. घ्या कुशीत तिला..…."

लेबर रूममधली नर्स त्या नवजात मुलीच्या आईला सांगत होती. तिनी जेव्हा ते गोड,गुलाबी गुलाबी bundle of joy त्या आईच्या शेजारी तिच्या कुशीत ठेवलं तेव्हा त्या चिमुकल्या परीनी आपले डोळे किलकिले करून बघितलं .. सगळं अंधुक अंधुक दिसत होतं. अचानक इतका उजेड दिसल्यामुळे आपण नक्की कुठे आहोत हे तिला समजत नव्हतं. तेवढ्यात एक ओळखीचा आवाज ऐकू आला आणि परीनी पुन्हा आपले डोळे मिटून घेतले. जणूकाही त्या ओळखीच्या आवाजावर पूर्ण लक्ष केंद्रित करायचं होतं तिला. "ओळखलंस का मला ? मी तुझी आई आहे." पुन्हा एकदा तो आवाज ऐकू आला. "आई !!!" परी विचार करायला लागली," अरेच्या , रोज माझ्याशी गप्पा मारणारी, मला छान छान गाणी म्हणून दाखवणारी आई म्हणजे हीच का ? नक्कीच हीच असणार. कारण तिचा आवाज तर मी लगेच ओळखला. पण इतके दिवस नुसताच आवाज ऐकायला मिळत होता ना, आता तर मी तिला बघू पण शकते. आणि तिच्या शेजारी असं घुसून घुसून झोपायला पण किती छान वाटतंय." आपल्या आईच्या कुशीत शिरत परीनी पुन्हा डोळे किलकिले करून आईकडे पाहिलं.

किती छान वाटत होतं तिला आईच्या कुशीत - उबदार, निर्धास्त ! तेवढ्यात तिच्या आईनी परीच्या गालावरून हलकेच आपलं बोट फिरवलं. किती मऊ, मखमली स्पर्श होता तो. नकळत परीनी आईचं बोट आपल्या इवल्याशा मुठीत घट्ट पकडलं; जणू काही त्या स्पर्शाची पूर्ण ओळख करून घ्यायची होती तिला. तेवढ्यात कोणीतरी परीला उचलून घेतलं . आईपासून लांब जायची मुळीच इच्छा नव्हती तिची. तिनी रडून आपला निषेध नोंदवला ; पण तेवढ्यात आईचा आवाज तिच्या कानात गुणगुणला ,"बाबांकडे जायचं ना परीराणीला..." आईचा आवाज ऐकून परी शांत झाली..पुन्हा डोळे थोडे किलकिले करून बघायला लागली--"बाबा ? हो, आई बरोबर कधी कधी हे बाबा पण गप्पा मारायचे माझ्याशी ? त्यांचा आवाज पण खूप आवडतो मला." परी मनात म्हणाली. बाबांनी जेव्हा तिला आपल्या हातात उचलून घेतलं तेव्हा परीला कित्ती कित्ती छान वाटत होतं....अगदी सुरक्षित !

पण अचानक तिच्या अवतीभवती तिला बरेच आवाज ऐकू यायला लागले...'किती गोड आहे ही', 'अगदी तुझ्यासारखी दिसते', 'बाहुलीच आहे छोटीशी' …...सगळेच आवाज अनोळखी . परी पुन्हा आईचा आवाज शोधायला लागली. तेवढ्यात कोणीतरी म्हणाले," या अंगाठीनी थोडा मध चाटव बाळाला." आणि परीच्या लक्षात यायच्या आत तिच्या बाबांनी तिला काहीतरी गोड गोड खायला दिलं. "व्वा, किती छान चव होती.. अच्छा, याला मध म्हणतात का?" मिटक्या मारत मारत परी म्हणाली.

"मला पण घेऊ दे ना बाळाला," असं म्हणत कोणीतरी तिला बाबांच्या हातातून ओढून घ्यायला लागले. आता मात्र परीचा धीर संपला. तिला आईच्या कुशीत जायचं होतं पण सगळे जण जणू काही तिच्या बरोबर 'passing the parcel' खेळत होते. थोडंसं कंटाळून, थोडंसं वैतागून शेवटी तिनी आपलं हुकमी अस्त्र बाहेर काढलं. तिचं ते तार सप्तकातलं रडणं ऐकून तिच्या आईनी पुन्हा तिला आपल्या कुशीत घेतलं आणि परीनी सुटकेचा श्वास सोडत पुन्हा डोळे मिटून घेतले.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users