वय वर्ष दहा!

Submitted by आर के जी on 9 August, 2019 - 10:51

आम्ही तिघं – मी, माझा नवरा आणि माझा दहा वर्षाचा मुलगा – आम्ही अजून जवळच्या ठिकाणी २ व्हिलर वरूनच जातो. आम्ही दोघं काही बारीक नाही आहोत. पण फार जाडही नाही आहोत. मुलगा मात्र बारीक आहे. गाडीवर आमच्या दोघांमध्ये त्याचं थोडं सँडविच होतं. पण अजून तरी आम्ही तसंच manage करतो आणि पाच सहा किलोमीटर साठी २ व्हिलरच वापरतो. तर…

त्या दिवशी आम्ही आईकडून घरी परत येत होतो. आमची गाडी एका सिग्नल पाशी थांबली. आजूबाजूला बऱ्याच गाड्या येऊन थांबल्या होत्या. आमच्या पुढे एका गाडीवर एक छोटासा गोंडस हात आईच्या खांद्यावरून खाली लोंबकाळत होता. हातात काळ्या मण्यांची बिंदली घातली होती. पिवळ्या झबल्याची ढगळी बाही बिंदलीपर्यंत पोचत होती. मला अशा छोट्या बाळांकडे पाहत बसायला फार आवडतं. अतिशय निर्धास्तपणे त्या बाळाने आईच्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं. त्या झोपलेल्या चेहऱ्यावरचे भाव कोणाचंही मन मोहून टाकावेत असे होते. त्याच्या आईनी त्याला कडेवर घेतलं होतं आणि आईच्या दोन हातांच्या विळख्यावर सगळं सोपवून ते बाळ अगदी हात पाय फैलावून शांतपणे विसावलं होतं. ‘ते बघ ना समोर ते लहान बाळ कसं झोपलंय. काय मस्त आयुष्य आहे ना. बिनधास्त आईवर सगळं सोपवून कधीही झोपायला तयार.’, मी नवऱ्याला म्हणलं. ‘हो ना. पाच सहा वर्षाचं झालं की हे लाड बंद होतील आपोआप’, नवरोबांनी उत्तर दिलं.

आमच्या अशा गप्पांमध्ये आमच्या मुलाला काहीही इंटरेस्ट नसतो. त्याची आपली ‘आजीकडून एवढ्या लवकर का निघालो, अजून अर्ध्या तासानी निघायला हवं होतं.’ अशी भुणभुण चालली होती. ‘अरे पण उद्या शाळा सकाळची आहे ना? आता ९:३० वाजत आलेत. वेळेवर झोपायला नको का.’ हे माझं उत्तर काही त्याला ऐकून घ्यायचं नव्हतं. उगीच वाद वाढेल, त्यापेक्षा आपण आपलं शांत बसावं असं ठरवून मी त्याच्याकडे जरा दुर्लक्ष केलं. १० मिनिटं झाली असतील. तेवढ्यात गाडी एकदम एका बाजूला कलली. मी प्रतिक्षिप्त क्रियेनुसार मुलगा पडू नये म्हणून लगेच हात त्याच्या भोवती धरले. तेव्हा कळलं की आमचे हे साहेब अजून मोठे झालेच नाहीयेत. बाबाच्या पाठीवर डोकं टेकवून हा मुलगा बिनधास्त झोपला होता. दोन्ही हात दोन्ही बाजूंनी खाली लोंबकाळत होते. आणि चेहऱ्यावर अगदी निरागस भाव! काय मस्त आयुष्य आहे ना? बाबाची पाठ आणि आईचे हात आहेतच सांभाळायला. त्याच्या जोरावर हा आपला कधीही झोपायला तयार!

Group content visibility: 
Use group defaults

छान. लहान मुले इतकी निरागस असतात की बस्स.
मुलं दुर गेली तरी आईवडीलांचे अदृश्य हात हजर असतात सावरायला. मला असा अनुभव आलेला आहे.

आई ती आईच Happy

बाद वे - एकदम लहान बाळ जेंव्हा असे two wheeler वर मागे धरलेले दिसते ,प्रचंड भीती वाटते मला.