One at a time

Submitted by nimita on 1 August, 2019 - 08:48

लहानपणी कधी जर जेवताना शेवटचा दही भात संपत नसला किंवा जर तो खायचा कंटाळा आला तर मी लगेच आईकडे मदतीसाठी धाव घेत असे. कारण आमच्या घरी - पानात वाढलेलं सगळं खाल्लंच पाहिजे- हा नियम होता आणि आम्ही सगळे अगदी काटेकोरपणे तो पाळायचो.अशा वेळी आई ताटातच त्याचे छोटे छोटे घास करून ठेवायची आणि म्हणायची,"अगं बघ, जास्त नाही उरला भात ! एका वेळी फक्त एका घासाकडे लक्ष दे आणि तेवढाच संपव. तो संपला की मग पुढचा घास खा, मग बघ कसा पटकन संपतो सगळा भात!!" मग प्रत्येक घास खाताना 'हा घास बाबांचा, हा घास आजीचा, हा घास आईचा...असं एकीकडे म्हणत म्हणत सगळ्यात शेवटच्या घासाला 'आणि हा घास माझा ' म्हणत तो सगळा भात संपून जायचा.

त्यावेळी पानात काही न टाकल्याचा आनंद व्हायचा आणि त्याबद्दल आईकडून शाबासकी मिळाल्याचं समाधानही असायचं. त्या वयात माझ्यासाठी या सगळ्या अनुभवाचं सार एवढंच होतं. पण माझ्याही नकळत माझ्या आईनी मला आयुष्य जगण्याचा , आयुष्यात येणाऱ्या अडचणी आणि संकटांना तोंड देण्याचा एक खात्रीशीर आणि तरीही अगदी सहज सोपा असा उपाय शिकवला होता.

समोर संकटांचा डोंगर दिसत असला तरी गडबडून, घाबरून न जाता त्या डोंगर रांगांना पार करून जायचं असेल तर 'एका वेळी एक घास' या नियमाला अनुसरून फक्त समोर दिसणाऱ्या छोट्याशा टेकडीवर लक्ष केंद्रित करायचं. एकदा का ती टेकडी सर केली की मग पुढची टेकडी !!

Crisis management चं इतकं महत्वाचं तत्वज्ञान किती सोप्या , घरगुती भाषेत तिनी आम्हां मुलांना समजावून सांगितलं होतं. आणि तेही कुठलीही मॅनेजमेंट ची पुस्तकं न वाचता !

माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात असे कितीतरी संकटांचे डोंगर आले माझ्यासमोर .... कधी माझ्या मानसिक शक्तीची परीक्षा बघणारे तर कधी माझ्या शारिरीक शक्तीला आव्हान करणारे !

मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना अचानक आमच्या आईचं आम्हांला सोडून कायमचं निघून जाणं ... आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यात एक खूप मोठी, कधीही न भरणारी पोकळी निर्माण करून गेलं..या धक्क्यातून जरा सावरले आणि लक्षात आलं की सगळ्यांच्या अपेक्षित नजरा आता आपल्यावर टिकून आहेत. आजीचं आजारपण , बाबांचा अजूनच अबोल आणि अंतर्मुख होत चाललेला स्वभाव, स्वतःच्या भावनिक विश्वात काहीसा हरवलेला लहान भाऊ ...लग्न करून सासरी गेलेल्या माझ्या दोघी बहिणींना - 'आपण इतक्या लांबून काहीच मदत करू शकत नाही'- याची उगीचच वाटणारी खंत, त्यामुळे त्यांच्या जीवाची होणारी तगमग ... हे सगळं मला दिसत होतं. आणि या सगळ्यांच्या जोडीला माझं कॉलेज,सरोद, NCC ट्रेनिंग ....हे आणि असं अजूनही बरंच काही !

पण मनाला नकळत लागलेल्या 'एका वेळी एक घास' या सवयीमुळे मी मनातून ठरवलं की 'रोज सकाळी उठल्यावर फक्त त्या दिवसाच्या आव्हानांचा विचार करायचा आणि त्यातून मार्ग काढायचा.' ....नवा दिवस- नवी आव्हानं ! बघता बघता दिवसाचे महिने आणि महिन्यांची वर्षं झाली ! पण भावना आणि कर्तव्याच्या' या दुहेरी चक्रव्यूहातून मी अगदी हिमतीने मार्ग काढू शकले.

पुढे लग्नानंतर देशभरात हिंडताना, नवनवीन जागी बिऱ्हाड थाटताना काही वेळा अडथळे आले, कधी बिकट परिस्थितीला सामोरं जावं लागलं. भावनिक, कौटुंबिक, शारीरिक अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर लढले. या सगळ्यांतून मार्ग काढताना मदतनीस ठरली ती आप्तजनांची साथ आणि आईची 'एका वेळी एक ' ही शिकवण !

माझ्या कॅन्सर विरुद्धच्या लढाईत तर आईचा हा मंत्र म्हणजे जणू माझी पाठराखीण च होता. सुरुवातीला जेव्हा माझ्या सर्जननी मला ट्रीटमेंट ची रूपरेषा सांगितली तेव्हा काही क्षण माझं मन हल्लक झालं. कमीतकमी तीन केमोथेरपी सायकल्स त्यानंतर सर्जरी आणि मग पुन्हा जशी गरज भासेल तशा आणि तितक्या केमोथेरपी ....म्हणजे साधारण सहा - सात महिन्यांची ट्रीटमेंट ! ट्रीटमेंट चा कालावधी ऐकला आणि मनावर एक अनामिक दडपण आलं. अर्ध्या वर्षाचा कालावधी आजारपणात जाणार.... पण लगेच आईचे ते दहीभाताचे घास आठवले. 'एका वेळी फक्त एकाच घासाकडे लक्ष दे'- मी माझ्या मनाला गोंजारत म्हणाले. आणि एकदम हलकं वाटायला लागलं, कारण आता मला फक्त पहिल्या केमो सायकलचाच विचार करायचा होता. ती पार पडली की मग पुढचा विचार ..सुरुवातीला वाटलं तेवढंही अवघड नव्हतं हे प्रकरण !

पण तरीही त्या सहा सात महिन्यात एक दोनदा मन पुन्हा दोलायमान झालं ! त्यावेळी माझ्या आईचं काम माझ्या नवऱ्यानी केलं. किती सहजपणे म्हणाला..'Cross the bridge when it comes." त्याच्याही नकळत माझ्या वाभऱ्या मनाला त्यानी धीर दिला.

कधी कधी विचार करते तेव्हा आपल्या या मनाची खूपच गंमत वाटते. बऱ्याच वेळा आपण आपल्या समोरच्या अवघड परिस्थितीला धीरानी सामोरे न जाता त्याबद्दल उगीचच नको नको ते विचार करत बसतो; तिच्यातले संभाव्य धोके आणि अडचणी स्वतःच ठरवतो आणि तिला आहे त्यापेक्षाही अवघड, अशक्य बनवतो. थोडक्यात काय तर आपण पराचा कावळा करतो. आणि या सगळ्या प्रक्रियेत आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण सामील करून घेतो.

पण हा सगळा द्राविडी प्राणायाम करण्याऐवजी जर थोडा शांत आणि थोडा तटस्थपणे विचार केला तर सुरुवातीला अवघड वाटणारी परिस्थिती अगदी सहजपणे हाताळता येते. आणि बऱ्याच वेळा तर आपण काही करायच्या आधीच परस्पर मार्ग निघतो आणि सगळा गुंता सुटतो- अगदी 'सुंठीवाचून खोकला गेला' म्हटल्यासारखं !

माझ्या आईनी मला दिलेला 'एका वेळी एक घास' हा वसा माझ्याही नकळत मी माझ्या मुलींना देत आले. हळूहळू त्यांनाही लागलीये सवय..

परवा (म्हणजे काही दिवसांपूर्वी) होस्टेल मधे राहणारी माझी मुलगी मला फोनवर बोलताना सांगत होती," आई, सध्या मी खूप बिझी आहे गं ! सबमिशन, कॉलेज फेस्ट, परीक्षेचा अभ्यास सगळंच एकत्र आलंय ...पण not to worry. करीन मी मॅनेज...one at a time !"

तिचं बोलणं ऐकलं आणि लहानपणी मला घास बनवून देणारी माझी आई डोळ्यांसमोर आली....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'वन अ‍ॅट अ टाईम' - हा अष्टाक्षरी मंत्र खूप मोलाचा आहे, जपायचा नव्हे तर आचरणात आणायचा आहे.

Solid. This is real management lesson from home to handle any stress / workload.
I don't know if they teach it in any b-school.
This also helps to give your 100% for each.

मोलाचं सांगितलंय तुम्ही.
आमचे एक सर पोरांचा काही कटु अनुभव आला की म्हणत, "चालायचंच" त्याची आठवण झाली.

निमिता, तुझे लेख आवडतातच, पण हे अतिशय आवडलेलं लिखाण. खूप सुंदर लिहिलं आहेस. Truly inspiring एका छोट्याशा मंत्रातून आयुष्य सोपं करून टाकलंस : thumbs up :

सर्वांना मनापासून धन्यवाद . माझ्या ब्लॉग वरचा हा ७६ वा लेख. असंच प्रेम आणि प्रोत्साहन देत रहा. मन मोकळं करायला बळ मिळतं.:) _/\_

खूप छान! तुम्ही एक अत्यंत sorted व्यक्ती आहात असं जाणवतं तुमच्या लिखाणातून.+१
तुमचं लेखन नेहेमीच आवडतं. पण हे जरा जास्त मनाला भिडलयं.

अप्रोच आवडलं.

मल्टीटास्किंग वाले वन अ‍ॅट अ टाईम मान्य करत नाहीत.
नवीन Submitted by प्रकाश घाटपांडे on 2 August, 2019 - 08:28 <<< हे ही मनात आले होते.

कधी कधी, You are running short of time, मल्टी टास्किंग करावं लागतं, अश्या वेळेस मल्टी टास्किंग मध्येच वन अ‍ॅट अ टाईम करावं.

उदा :-
एक काम हाती घेतलेले आहे ते करत रहायचे, मनात दुसर्‍या महत्वाचे कामाचे रुप रेषा आखायचे.

मल्टिटास्किंग करायला लागतं तेव्हा आपण करतोच, पण ते जर झेपेनासं व्हायला लागलं तर सगळंच कोलमडून पडायला लागतं. एकही काम धड होत नाही. तेव्हा हे 'वन अ‍ॅट अ टाईम', प्राधान्यक्रम ठरवून एकेका कामाकडे, एकेका प्रश्नाकडे लक्ष देणं उपयोगी पडत असणार.

खूप छान! तुम्ही एक अत्यंत sorted व्यक्ती आहात असं जाणवतं तुमच्या लिखाणातून,हे अगदी पटलं! माझी आई सुद्धा कॅन्सर survivor, तुमचा मंत्र तिने हि आमच्या पर्यंत असाच पोचवला आहे. खूप Inspiring आहे तुमचं लिखाण. keep writing, keep inspiring!

सर्वांना धन्यवाद .
वावे.. बरोबर आहे तुमचं म्हणणं. जेव्हा multitasking करायची वेळ येते(आणि स्त्रियांच्या बाबतीत तर ही वेळ वारंवार येते), तेव्हा prioritize करायची गरज पडते.

मल्टीटास्किंगच्या वेळेस 'वन अ‍ॅट अ टाईम' मधे एक स्टेप अ‍ॅड करायची असते.
आणि मग 'वन अ‍ॅट अ टाईम' होते

वन 'स्टेप' अ‍ॅट अ टाईम.

अशक्य भारी जमलाय हा लेख! खूप आवडला.

खरंतर हा मॅनेजमेंट लेसन सर्वाना माहीत असतो पण ज्या पद्धतीने तुम्ही मांडलाय व समजावलाय त्यासाठी हॅट्स ऑफ. Very sorted and succinct.

हर्पेन यांची कमेंट पण आवडली.

Thanks a lot for this article. It is very necessary to go step by step. Thank you again.

अशक्य भारी जमलाय हा लेख! खूप आवडला.
खरंतर हा मॅनेजमेंट लेसन सर्वाना माहीत असतो पण ज्या पद्धतीने तुम्ही मांडलाय व समजावलाय त्यासाठी हॅट्स ऑफ. Very sorted and succinct. >>>> + १००००.
कळत नकळत मी बर्याचदा स्ट्रेसमध्ये हे करत आलेय . कधी ईतका विचार केला नव्हता .
पण मी नक्कीच sorted नाहीये हे जाणवलं . Happy
खूप Inspiring आहे तुमचं लिखाण >>> + १००००.

Pages