एका फुलपाखराचा जन्म

Submitted by Dr Raju Kasambe on 30 July, 2019 - 06:55

एका फुलपाखराचा जन्म

‘बाबा, फुलपाखरू निघत आहे! पटकन चला!’

माझी पाच वर्षाची मुलगी प्रांजली व दोन वर्षांचा मुलगा वेदांत अतिउत्साहाने धावत येऊन मला सांगायला लागले. माझ्या घरी आणखी एका फुलपाखराचा जन्म होत होता. कोषातून फुलपाखरू बाहेर येण्यास केवळ काही सेकंद लागतात आणि अनेक वेळा प्रयत्न करूनही ही घटना मला कॅमेराबद्ध करता आली नव्हती. कोषातून बाहेर आल्यावर फुलपाखरू एखाद्या फांदीला किंवा कोशालाच उलटे लटकते आणि एक रंगीत मांसाची पुंगळी वाटणारे फुलपाखरू हळूहळू आपल्या पंखांची पुंगळी सोडून ते पूर्ण उघडते, एखाद्या मलमली रुमालाची घडी उघडावी तसेच.

गुरुत्वाकर्षणामुळे पंख खाली लटकून राहतात आणि थोड्याच वेळात कोरडी हवा आणि सकाळच्या कोवळ्या उन्हामुळे पंख वळून जातात व कडक बनतात. मग हळूच ते पंखांना जोर लावून बघते. पंख कडक झाल्याची खात्री होताच हे पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू आपल्या आयुष्यातील पहिले वहिले उड्डाण भरते आणि सर्वप्रथम दिसणाऱ्या फुलावर बसून आपले मधुरसाचे पहिले भोजन चाखते.

मलाही या घटनेचे महत्व माहित असल्याने क्षणाचाही विलंब न करता मी कॅमेरा घेऊन आमच्या बगिच्यात ठेवलेल्या बटरफ्लाय बॉक्स कडे धावलो. फुलपाखराचा जन्म होऊन गेला होता आणि ते कोषाला उलटे लटकले होते. या बॉक्सवर सूर्यप्रकाश पडत नसल्यामुळे आणि जन्माला आलेले फुलपाखरू बंदिस्त ठेवायचे नसल्याने, फुलपाखराने ज्या काडीवर कोष बनवला होता ती काडी एका झाडावर उन्हात लटकवून ठेवली. फुलपाखराचे पंख वाळेपर्यंत मी फोटो काढून घेतले. आज प्रथमच आमच्या घरी टॉनी कोस्टर फुलपाखराने जन्म घेतला होता. त्याने खूपदा पातळ विष्ठा उत्सर्जित करून आपले शरीर हलके केले आणि आंनदाने पंख फडफडवीत आमचा निरोप घेतला. प्रांजली आणि वेदांतचा आनंद आपण स्वतःच जणू उडतोय कि काय असा होता.

अमरावती जिल्ह्यातील पोहऱ्याच्या जंगलातील आणि मेळघाटातील फुलपाखरांचा अभ्यास करायचे ठरवल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील फुलपाखरांचे सुरवंट (कॅटरपिलर) पकडून आणायचे; त्यांची निगराणी करायची, संगोपन करायचे आणि फुलपाखरू जन्मले की सोडून द्यायचे जणू मला वेडच लागले होते. मी घरी नसलो तर माझी पत्नी नवजात फुलपाखराला सोडून द्यायची!

तसे फुलपाखराला जन्म घेण्याआधी तीन अवस्थांमधून जावे लागते. मादीचे नराशी मिलन झाल्यावर मादी अंडी घालते. त्यामधून सुरवंट (फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात) बाहेर पडतो. हा सर्वप्रथम स्वतःच्या अंड्याचे कवच खाऊन आपल्या खादाड जीवनाची सुरुवात करतो. दिवसरात्र त्याचा खाण्याचा उद्योग चालू असतो. पूर्ण वाढ झाली कि तो एखाद्या सुरक्षित ठिकाणी , जसे की गर्द पानांमध्ये , फांदीच्या खालच्या बाजूला जाऊन लटकतो. येथे त्याचा खादाडपणा संपून त्याचे कोशामध्ये (प्युपा) रूपांतर होते. काही दिवसांनी हा कोष फोडून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू जन्माला येते.

फुलपाखरांच्या पायाला काट्यांसारखे पण अगदी सूक्ष अवयव असतात. अंडी घालण्यापूर्वी मादी प्रत्येक झाडाची चव या अवयवाने घेते. तिच्या सुरवंटाला ज्या झाडाची पाने, फुले आवडतात त्याच झाडावर ती अंडी घालते. अंड्याचे कवच चिकट असल्याने ती झाडाला चिकटून राहतात. अंड्यातून सुरवंट जन्मतो. त्याच्या खादाडपणामुळे त्याची भराभर वाढ होते.

वाढलेले शरीर आणि त्वचा मात्र जुनीच ! त्यामुळे त्वचेवर ताण पडतो. सुरवंट या त्वचेचा त्याग करून त्यातून बाहेर पडतो! ही जुनी त्वचा तो खाऊन टाकतो व पुन्हा पानांचा फडशा पाडण्यास सुरवात करतो. अशा प्रकारे सुरवंट पाच वेळा कात टाकतात. सुरवंटांना कान आणि डोळे नसल्याने ते बघू किंवा ऐकू शकत नाहीत.

काही सुरवंटांमध्ये डोळ्यासारखे नेत्रक असतात. त्यामधून सुरवंटांना प्रकाशाचे ज्ञान होते असा शोध लागला आहे. एवढेच नव्हे तर सुरवंटांना वनस्पतीची वा झाडाची अंतर्गत कंपनेसुद्धा जाणवतात असे आढळले आहे. काही फुलपाखरांचे सुरवंट स्वतः भोवती सूक्ष्म जाडीच्या धाग्याने जाळे विणतात तर काही स्वतःला पानाच्या गुंडाळीत लपवून घेतात. कॉमन बॅडेड ऑल जातीच्या फुलपाखराचा सुरवंट स्वतःला करंजाच्या पानांमध्ये लपवून घेतो व नंतर कोशामध्ये रूपांतरित होतो.

फुलपाखरांचे संगोपन
आपण आपल्या घरीच फुलपाखरांच्या सुरवंटांचे संगोपन करू शकतो. हा एक आंनंददायक व रोमहर्षक छंद आहे. त्यासाठी जिवंत फुलपाखरे पकडून आणायची मात्र अजिबात आवश्यकता नाही. आपल्या परिसरात आढळणाऱ्या कण्हेर, उंबर , रुई , मंदार, करंज (कडू बदाम), विलायती चिंच, कोरांटी, बहावा (अमलताश), अशोक, कढीपत्ता, लिंबू आदी अनेक वनस्पतींवर सुरवंट गुजराण करतात. खरं म्हणजे, प्रत्येक सुरवंटाच्या आवडत्या खाद्य वनस्पती या ठरलेल्या असतात. झाडाखाली सुरवंटाच्या हिरवट काळपट विष्ठा दिसल्या की झाडावर सुरवंट आहे असे निश्चित समजते. बरेचदा नवख्या व्यक्तीला तो सहजासहजी सापडत नाही. शत्रूंपासून (पक्षी, मुंग्या, इ.) सुरवंटाचे सरंक्षण व्हावे म्हणून सुरवंट अगदी हुबेहूब पानासारखे किंवा देठासारखे दिसतात. सुरवंटाची निगराणी करण्यासाठी अर्धपारदर्शक डबे (बॉक्स) वापरावेत. एका डब्यात एकाच जातीचे सुरवंट ठेवावेत. सुरवंट ज्या झाडावर / वनस्पतीवर सापडला त्याच वनस्पतीची कोवळी लुसलुशीत पाने त्याला खायला घालावीत. एखादा सुरवंट दूरच्या जंगलातून मिळवला असेल तर त्यासोबतच त्या वनस्पतीची भरपूर पानेसुद्धा सोबत आणावीत. त्यावर पाणी शिंपडून ती एका प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून शीतपेटीत (फ्रीझ) मध्ये ठेवावी आणि गरजेनुसार सुरवंटाला खायला द्यावीत.

दररोज अथवा दर दोन दिवसाला डब्यातील लेंड्या (विष्ठा) लागून टाकाव्या व डबा धुऊन घ्यावा व कोरड्या कापडाने पुसून स्वच्छ व कोरडा करावा. डब्यात एखादी काडी / फांदी आडवी बसवून ठेवावी. पाच वेळा कात टाकल्यानंतर सुरवंटाचे कोशात रूपांतर होते. सुरवंटाची वाढ पूर्ण झाली की ते कोशावस्थेत जाण्याकरिता योग्य जागा शोधते. ही फांदी मग त्याला नैसर्गिक वाटून तिथेच त्याचा कोष तयार होतो. अन्यथा ते डब्याच्या झाकणाला खालच्या बाजूला कोष बनविते. पण अशा कोषातून निघालेल्या फुलपाखराला पकडायला आधार मिळाला नाही तर ते खाली पडून त्याचे पंख विकृत होऊ शकतात. कोश बनविल्यानंतर डबा स्वच्छ व कोरडा करून घ्यावा व नंतर खायला पाने घालू नयेत.

कोशाचे मुंग्यांपासून संरक्षण करावे आणि त्याला डिवचू नये. वातावरण योग्य असेल तर त्या कोशाचे फुलपाखरात रूपांतर होते. आपल्या श्रमाचे हे सुंदर फलित बघून कुणाला आनंद होणार नाही? लगेच त्या फुलपाखराला खुल्या निसर्गात सोडून द्यावे. कारण आपण जरी त्याची निगराणी वा निपज केली असली तरी त्याचे आयुष्य डबा नव्हे! फुलांवर मुक्तपणे बागडणे, उन्हात पंख शेकणे, फुलातील मधुरस प्राशन करणे असे त्याचे स्वछंदी जीवन असते!

डॉ. राजू कसंबे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण आपल्या घरीच फुलपाखरांच्या सुरवंटांचे संगोपन करू शकतो. >>> कशासाठी बरे, त्यांचे नैसर्गिक अधिवास संपुष्टात आलेत किंवा धोक्यात आलेत असं काही आहे का? असा प्रश्न पडला.

फुलपाखराला पकडायला आधार मिळाला नाही तर ते खाली पडून त्याचे पंख विकृत होऊ शकतात. हे आणि
कोशाचे मुंग्यांपासून संरक्षण करावे आणि त्याला डिवचू नये. वातावरण योग्य असेल तर त्या कोशाचे फुलपाखरात रूपांतर होते.

हे वाचल्यावर मला तरी आपला हा लेख 'सुरवंटांचे संगोपन' करायची कितीही सद्भावना असली तरी, लोकांना फुलपाखरांच्या जीवाशी खेळायला उद्युक्त करवणारा वाटला.

सॉरी पण हा प्रतिसाद दिल्याशिवाय राहवले नाही.

प्रतिसाद आणि कौतुकाबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद ! माझ्या प्रत्येक वाक्यासोबत सर्वांनी सहमत होणे जरुरी नाही. आणि मी परमेश्वर सुद्धा नाही. सामान्य माणूस आहे. जे शिकलो, पटलं ते लिहितो.

छान लेख!
मात्र तो संगोपनाचा मुद्दा आहेत त्याबाबत माझे मत वेगळे आहे.
जर का एखादी प्रजाती निसर्गात मदतीशिवाय व्यवस्थित वाढत असेल तर मुद्दाम हस्तक्षेप करु नये या मताची मी आहे. आपल्या आनंदासाठी फुलपाखरु संगोपन हे मला पटत नाही. जंगलातून सुरवंट आणि त्याच्यासाठी तिथली पाने तोडून आणणे तर अजिबातच पटत नाही. अधिवास संपुष्टात येत आहे, मानवी हस्तक्षेपाची गरज आहे जसे की मोनार्क फुलपाखरु तर गोष्ट वेगळी. अशावेळी देखील आपल्या बागेत आधी योग्य ती झाडे लावून अधिवास तयार करावा. आपला सहभाग हा फुलपाखराने अंडी घातल्यावर त्यांचे संरक्षण करणे, सुरवंटांसाठी योग्य अशा वनस्पती बागेत उपलब्ध असणे , भक्षकांपासून संरक्षण व्हावे म्हणून शक्यतो बागेतच नेटची व्यवस्था आणि ते शक्यच नसेल तर घरात व्यवस्था आणि योग्य वेळी फुलपाखरु बाहेर सोडणे आणि नोंद करणे. छोट्या बाल्कनीत, गच्चीत दाराबाहेर मोठ्या कुंडीत फुलपाखरांना उपयोगी वनस्पती लावूनही आपण काही प्रमाणात हातभार लावू शकतो.
मी मोनार्क फुलपाखरु संवर्धनात सहभागी आहे. घरी संवर्धन हा शेवटचा उपाय केला जातो मात्र नैसर्गिक अधिवासाचे क्षेत्र वाढावे यासाठी प्रयत्न करणे हे त्या जोडीला सातत्याने सुरु आहे.

मला वाटतं हा 'छंद' किंवा 'आवड' यात मोडणारा प्रकार असावा. आवड म्हणून फुलझाडं लावणं, एखादा प्राणी पाळणं अशासारखं असणार हे. संवर्धनासाठी नाही.

आवड म्हणून फुलझाडं लावणं आणि एखादा प्राणी पाळणं ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत.

फुलपाखरांना विशिष्ट झाडांची आवश्यकता आसते. ती लावली तर त्यांची संख्या वाढते. म्हणून संवर्धंनाचा भाग आहेत. (जंगलांचा आपणच विनाश करतोय).

कुत्रा मांजर पाळणे ह्या गोष्टी संवर्धनासाठी नाही. त्या भूतदया आणि आणि आपल्या स्वार्थासाठी असाव्यात. असे माझे मत आहे.

डॉ. साहेब.. नेहमीप्रमाणेच अभ्यासपुर्ण लेख... पण एक तक्रार आहे तुमच्या लिखाणाबाबत. इतकी सुंदर माहिती सांगता पण फोटो टाकण्याबाबत इतकी कंजुषी का बरं करता ? Sad