नवी नवरी

Submitted by Asu on 30 July, 2019 - 01:35

*नवी नवरी*

नवी नवरी उंबरठ्यावर
माप ओलांडून घरात येते
बाहेरचे जग बाहेर ठेऊन
घर आपल्या कवेत घेते

बंध माहेरचे तुटत नाही
सासरचे पाश सुटत नाही
दोघांचा गोफ विणत असते
एवढे पण ते सोपे नसते

आनंद घराचे गाली हसती
दुःख तिच्या नयनी दिसती
हसणे रडणे तिचेच नसते
घराशी अद्वैत नाते असते

तुळस माहेरच्या घरची
सासरच्या अंगणी रुजते
माती पाणी बदलले तरी
वृंदावनी गोकुळ फुलते

सडा माहेरच्या प्राजक्ताचा
सासरी पाडायचा असतो
गंध माहेरच्या प्रेमाचा सदा
मनात जपून ठेवायचा असतो

प्रा.अरूण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults