स्वेटर

Submitted by jayshree deshku... on 24 July, 2019 - 13:05

स्वेटर
अर्जुन आजीच्या मागे लागला होता गोष्ट सांग म्हणून. रात्रीचे दहा वाजायला आले होते. झोप डोळ्यावर आली होती. पण हट्ट ना, आजीकडून गोष्ट ऐकून मगच झोपायचं! ८-९ वर्षाचा अर्जुन, पण स्मरणशक्ती खूपच चांगली. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचा आणि मुख्य म्हणजे वेळेला संदर्भ लावून बोलायचा. त्याच्या तल्लख बुद्धीचं आणि स्मरणशक्तीच घरात सगळ्यांना कौतुक वाटायचं. आता पोराला फार ताणायला नको असा ललिताबाईनी विचार केला, आणि गोष्ट सांगायला सुरुवात केली.
एक राजा असतो. त्याला दोन राजकन्या असतात राजा खुप शूर असतो. शेजारील राज्यावर चढाई करून त्याने ते राज्य सुद्धा जिंकलेले असते. राजा हळू हळू वयोवृध्द होत असतो. त्याच्या दोन्ही कन्या उपवर झालेल्या असतात. त्याला दोन्ही मुली आपल्याजवळ रहाव्यात असे वाटत असते. त्यामुळे राजा एक दिवस दवंडी पिटवतो. आणि मोठी राज्यसभा भरवतो आणि राज्यातल्या सगळ्या उपवर मुलांना दरबारात हजर रहायला सांगतो. एका हत्तीच्या सोंडेत हार दिले जातात तो ज्या दोन तरुणांना हार घालील, त्या तरुणांशी राजकन्या विवाह करतील असे जाहीर केले जाते. त्या राज्यात एक तरुण गरीब ब्राह्मण असतो. माधुकरी मागून पोट भरत असतो. तो पण उपवर असतो. तो पण दरबारात हजर राहतो. हत्ती पहिल्यांदा प्रधानपुत्राच्या गळ्यात हार घालतो. राजाला मोठा आनंद होत्तो. नंतर हत्ती त्या गरीब ब्राह्मणाच्या गळ्यात हार घालतो. राजा राजकन्यांना त्यांची पसंती विचारतो. तेव्हा थोरली प्रधानपुत्राला वरमाला घालते. तर धाकटी गरीब ब्राह्मणाला घालते. धाकटी विचार करते हा गरीब परिस्थितीतून वाढला आहे तेव्हा भविष्यात येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीशी चार हात करण्याची ह्याची कुवत असणार, तेव्हा आपण ह्यालाच वरावे. राजा दोन्ही कन्यांचे विवाह मोठ्या धुमधडाक्यात,शाही थाटात लावून देतो. प्रधानपुत्राला एक राज्य देतो आणि ब्राह्मण पुत्राला एक राज्य देतो. दोघेजण आपापले राज्य व्यवस्थित सांभाळत असतात. सुखाने राज्य करत असतात.राज्याचा विस्तार करत असतात. ब्राह्मण पुत्र गरीब परिस्थितीत वाढलेला असल्याने त्याला राजपहेराव, शाही थाटात राहणे रुचत नसते. आपल्या खजिन्यातल धन कमी झाले तर ह्याची सारखी त्याला धास्ती वाटत असते. रोज तो आपला खजिना पहात असे. आणि खजिन्यात वाढणारी संपत्ती पाहून शांतपणे झोपी जात असे. पण राजकन्या शाही थाटात वाढलेली असते त्यामुळे संपत्ती, वैभव असून सुद्धा ते उपभोगायच नाही हे तिला मानवत नसते. नशिबाने मिळालेल्या गोष्टीचा उपभोग घेण्याकडे तिचा कल असतो. तिची मोठी बहिण श्रीमंती थाटात आणि राजवैभवात नांदत असते. ती तिला तिच्या राहणीमानाबद्दल अधून मधून टोकत असते. पण ठीक आहे,आपल्या पती राजाला आवडत नाही तर आपण राजवैभवात नाही राहायचं असं ती स्वत:शी ठरवते. तरी अधून मधून त्यांच्यात बारीक सारीक खटके होत रहातात. पण एकंदर राज्यकारभार आणि संसार सुरळीत चालू असतो. राजाने आपल्या खजिन्यात त्याची जुनी माधुकरीची झोळी पण ठेवलेली असते. आपला भूतकाळ विसरण्याची त्याची तयारी नसते. तर उलट आपल्याला त्याचे भान हवे असे त्याला वाटत असते. तरच आपले पाय जमिनीवर राहतील असे त्याचे म्हणणे असते. राजा वृद्ध झाल्यानंतर त्याचा मुलगा राज्यावर बसतो. तो आपल्या वडिलांच्या भावनांचा मान ठेवण्यासाठी मनात नसतानाही राजाची माधुकरीची झोळी खजिन्यात सांभाळून ठेवतो. पुढे नातू मोठा होतो. आजोबांनी जमवलेली रत्ने, मोती, मौल्यवान हिरे पाहून त्यांच्या बद्दल आदर व्यक्त करतो. पण जेव्हा त्याचं त्या झोळीकडे लक्ष जात तेव्हा त्याला ती झोळी आपल्या खजिन्याला कमीपणा आणते असं वाटायला लागत म्हणून तो ती झोळी फेकून देतो. राजाला वाईट वाटत. तेव्हा नातू म्हणतो, “मला त्याचा काय उपयोग? मी राजवैभवात, राजवाड्यात राहिलो. तेव्हा अशा गोष्टीचा परिचय करून घेऊन मी काय करू? वारसा हक्काने आलेल्या संपत्तीत वाढ कशी होईल ते मी बघेन पण गरिबी किंवा त्याची आठवण घेऊन काय करू?” राजा मान डोलावतो.आणि शेवटी राजसंन्यास घेतो.गोष्ट ऐकून झाल्यावर अर्जुनने विचारलं, “ आजी राजसंन्यास म्हणजे काय ग?”
“अरे मी आणि आजोबा जसे साध्या नोकरी करत नाही, पण पूर्वी करत होतो तसे.” अर्जुनने मान डोलावली आणि डोळे मिटले.
तो रविवारचा दिवस होता. ललिताबाईना ऐश्वर्या म्हणजे अर्जुनची आई विचारत होती,
“आई तुम्ही माझ्याबरोबर येणार का सोनाराकडे? तुम्ही लग्नात दिलेले दागिने आता आउट डेटेड वाटतात, नव्या डिझाईनचे बघेन म्हणते.”
“हो येईन, अग बाजारात नवीन आलेल्या गोष्टी पहायला मला आवडते.” दोघी सासू-सूना सोनाराकडे जाऊन आल्या.ऐश्वर्याने पहिले दागिने मोडून नवीन दागिने आणले.
त्या रात्री ललिता बाईंचे पती त्यांना म्हणाले, “ काय ग तू चक्क ऐश्वर्या बरोबर सोनाराकडे गेलीस काय , तिला दागिने मोडू काय दिले, तू एवढे हौसेने बनवलेले दागिने तिने मोडले, पुन्हा नवीन करताना घडणावळीत कितीतरी पैसे वाया गेले ना!”
“ते खर आहे पण हौसेला मोल नाही म्हणतात ना! जाऊदे , ऐश्वर्याच दुखावलं जाणार मन त्या पैशाने थोडेच आनंदी होणार आहे? तिला नवी काहीतरी अंगावर मिरवण्यात आनंद वाटतो तर उपभोगू दे तिला ते. किती वर्ष आपल्याच मनाप्रमाणे वाग म्हणून आग्रह धरायचा? कुठल्याही गोष्टीची जबरदस्ती झाली की त्यातून दुरावा निर्माण होतो. त्यापेक्षा त्यांना त्यांच्या मनासारखं करू द्याव, प्रत्येक ठिकाणीच पैशाचा विचार गरजेचा नसतो. आणि आपण आपल्या मनासारखं रहाव.”
“तुला ते जमत बाई मला नाही जमवून घेता येत.” असं म्हणत आजोबांनी अंगावर दुलई ओढून घेतली. आधीच थंडीचे दिवस त्यात रात्रभर अवकाळी पाउस पडत राहिला. सकाळी थंडी वाढली होती. लेकाने हौसेने आणलेला उबदार स्वेटर आजोबांच्या अंगावर होताच पण तरीही अचानक त्यांना त्यांच्या जुन्या स्वेटरची आठवण झाली. त्यांना स्वत:ला नोकरी लागल्यावर त्यांनी स्वत:साठी केलेली पहिली खरेदी होती ती. स्वेटरला ३६-३७ वर्षे झाली होती. तो जीर्ण व्हायला लागला होता. दोनदा ललिताबाईंनी उसवलेले धागे गुंफून शिवले होते. त्यानंतर आजोबांनी ललिताबाईंच्या अनुपस्थितीत दोनदा कामवाल्या बाईकडून तो शिवून घेतला. त्या स्वेटर मध्ये त्यांचा इतका जीव गुंतलेला होता की त्याच जीर्णपण मानण्याची त्यांची मानसिक तयारीच नव्हती. तो माझ्या नातवंडा पर्यंत अजुनी २० वर्षे टिकेल असच ते म्हणत रहायचे. ललिताबाई पण वाद नकोत म्हणून त्या गोष्टीला दुजोरा देत राहायच्या. आजोबांकडे नवीन बरेच स्वेटर होते. म्हणून एक दिवस ललिताबाईंनी सेक्युरिटी गार्डला तो स्वेटर देऊन टाकला. त्या सकाळी आजोबांनी विचारलं, “अग माझा तो जुना स्वेटर कुठे आहे ग? मला शोधून दे. मला सापडत नाही.” तेव्हा ललिताबाई म्हणल्या, “अगो बाई तो होय? तो मी आपल्या सेक्युरिटी गार्डला दिला.” आधीपासूनच आजोबांना बायकोवर विनाकारण धुसफूस करायची सवय. मग तर त्यांना कोलीतच मिळाले. आजोबा ललिताबाईंवर भडकले, म्हणाले,
“कुणाच्या परवानगीने तू माझा स्वेटर त्याला दिलास? आत्ताच्या आत्ता परत घेऊन ये”
“अहो, असं काय करता? किती दिवस तो जीर्ण जुना स्वेटर वापरत रहाणार?”
“एक शब्द बोलू नकोस तुला काय करायचं आहे? ............” इत्यादी आजोबांचा स्वत:वरचा ताबा सुटला होता. नेहमीप्रमाणे ते वाटेल ते बोलत सुटले. आपण काय बोलत आहोत याची शुध्द गमावून बोलत राहिले. ललिताबाईंची मनातल्या मनात आज नाश्त्याला काय कराव? जेवणासाठी पतिराजांच्या आवडीच काय बनवावं ह्याची योजना चालू होती. कारण त्या दिवशी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. आजोबांचा सुटलेला तोल, त्यांच्या तोंडून वाटेल ते सुटले जाणारे शाब्दिक बाण यामुळे त्या क्षणा क्षणाला घायाळ होत गेल्या. त्यांचा मुड गेला. त्यांनी स्वत:शी विचार करायला सुरुवात केली. ‘किती दिवस किरकोळ किरकोळ गोष्टीवरून सुद्धा ह्या माणसाची बोलणी खायची? आपल्याला नातवंड झाली तरी? का म्हणून लोकलज्जेस्तव निर्लज्ज म्हणून संसार करत रहायचा? आता वयाची साठी उलटल्यानंतर तरी मनासारखे का म्हणून जगायचे नाही. सारखं आपल ह्यांच्या तोंडाला घाबरत घाबरत ह्यांची हांजी हांजी करत रहायची? घटस्पोट लग्नानंतरच्या ४-५ वर्षातच घ्यावा असा काही थोडाच नियम आहे? संसारासाठी, मुलासाठी, सासू-सासऱ्या साठी नातेवाई यांच्यासाठी पण भरपूर खस्ता खाऊन झाल्या. नोकरी ,संसार सांभाळताना परीक्षा देऊन ऑफिसर झाले.,स्वत:चे करिअर केले.तरी कौतुकाऐवजी मला डस्टबिन बनवलं ह्यांनी. मनात येईल तेव्हा शिव्यांचा कचरा त्यात टाकायचं बस्स! आणि खुश राहायचं. आता आयुष्याची शेवटची वर्षे पण सुखात घालवायचा हक्क मला नाही का? किती दिवस लोकांना, समाजाला घाबरून राहायचं? लोक आपण कसे जरी वागलो तरी चर्चा करतच रहाणार. कधी नव्हे ते नवऱ्याला घाबरून राहणाऱ्या ललिताबाईंच्या मनाने बंड पुकारलं. त्यांची सहन करण्याची ताकद आता संपली होती. त्यांनी सुटकेस काढली, निर्णय घेतला आपण वेगळ व्हायचं, दुसऱ्या flat वर रहायला जायचं. आयुष्याची शेवटची वर्षे स्वाभिमानाने जगायची. कपाटातल्या साड्या, ड्रेस काढायला ललिता बाईनी सुरुवात केली. ऐश्वर्या ललिताबाईंना आजोबांच्या आवडीच आज काय गोड करायचं हे विचारायला ललिताबाईंच्या बेडरूममध्ये गेली डोळे पुसत कपाटातले कपडे काढणाऱ्या सासूबाईंना पाहून तिने कारण विचारले. सगळे कळल्यावर ती उलट ललिताबाईंना म्हणाली, “ आई इतके दिवस आजोबांना सांभाळून घेत आला मग आताच हा निर्णय का?”
“इतके दिवसांपूर्वीची चूक निस्तरण्यासाठी.”
“अहो पण ह्या वयात नवऱ्याला एकटा सोडण आणि वेगळ राहण तुम्हाला शोभत का?”
“मग तू मला सांग ह्या उतार वयात एकमेकाला जपायचं, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा हे सोडून अपशब्द वापरून बायकोला घायाळ करण्यात ह्यांना कोणता पुरुषार्थ वाटतो? सात्विक पुरुषाचा अंहकार बायकोला सुख देण्याने मोठा होत असतो, दुखावण्याने नाही आणि तेही आज लग्नाचा वाढदिवस असताना?”
“आई जाऊदे,अर्जुनच बोलण आपण मनावर घेतो का? तसं समजा.”
“ठीक आहे. मग तू मला सांग ऐश्वर्या. माझा मुलगा जर तुला ह्या भाषेत बोलला तर तू काय कृती करशील? आणि अर्जुन सुद्धा असे वाईट शब्द वापरून बोलायला लागला तर आपण त्यालाही कठोर शब्दात समज देतोच ना? लहान आहे म्हणून थोडच सोडून देतो.”
ऐश्वर्या पटकन म्हणाली, “आई मी तुमच्या निर्णयाशी सहमत आहे.” तेवढ्यात ललिताबाईंचा मुलगा आला. म्हणाला, “आई तुझ हे काय नवीनच चालल आहे? जाऊदे स्वभावाला औषध नसत. बाबा मी तुम्हाला हवा तसा उबदार स्वेटर आणून देतो. मग तर झाल ना!”
आजोबा म्हणाले, “अरे पण ती माझी आठवण आहे.” सगळ्या गडबडीत अर्जुन कडे कुणाचच लक्ष नव्हत. सार मुकाट्याने पहात असणारा अर्जुन म्हणाला. “ आजोबा तुम्ही राजसंन्यास का घेत नाही?” तशाही अवस्थेत ललिताबाईंना हसू आले. आजोबा म्हणाले, “म्हणजे काय करू रे?” “ म्हणजे तुम्हाला ती राजाची गोष्ट माहित आहे ना! आजी सांगते ती. राजा जसा झोळीचा विचार सोडून देतो तसा तुम्ही स्वेटरचा विचार सोडून द्या.”
“ अरे पण तुझ्या आजीची समजूत कशी काढू?”
“मी जसा चुकल्यावर सॉरी म्हणतो तसं म्हणा, आजी लगेच तुम्हाला माफ करेल. हो की नाही आजी?” अर्जुनच्या सहज निष्पाप बोलण्यातून तो आयुष्याच खर तत्व बोलून गेला होता. वातावरणातला तणाव कमी झाला. आजोबांनी ललिताबाईंची माफी मागितली, ललिताबाईंची सुटकेस स्वत: उचलून माळ्यावर ठेवली. धुसफुसत का होईना ललिताबाई शांत झाल्या. आजोबांना पटले. आपल्या गरिबीचा भूतकाळ त्याच्या आठवणी आपल्यापुरत्या मर्यादित ठेवणे चांगले आणि आता जिथे आपलेच अतित्व नष्ट होऊ पहात आहे तिथे स्वेटरचा विचार कशाला हवा? स्वेटर पेक्षा आता ह्या वयात बायकोच्या आनंदाला, तिच्या मूडला जास्त संभाळल पाहिजे.

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय. खरंय, जुन्या गोष्टी ज्या आपल्याला प्रिय आहेत त्या दुसऱ्यांवर लादण्यात काहीही पॉईंट नसतो. अश्याच आशयाची छोटी गोष्ट सुधा मूर्ती यांच्या पुस्तकात वाचली होती.

वास्तववादी गोष्ट आहे हो. पण आमच्या कडले एक आजोबा, आज्जीलाच काय कुण्णाला म्हणून सॉरी म्हणत नाहीत. आता दुर्दैवाने मुले पण या हिटलरगिरीला कंटाळुन दुर्लक्ष करतात.
लिहीत रहा. छान लिहीली आहे.