द डेथ ट्रॅप भाग १

Submitted by स्वाती पोतनीस on 24 July, 2019 - 07:09

स्वाती पोतनीस
द डेथ ट्रॅप
भाग १
रात्रीचे साधारण बारा वाजले होते. पाऊस अजूनही कोसळतच होता. रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. कुणी शहाणा माणूस आत्ता कुठल्याही कामासाठी बाहेर पडला नसता. पण पल्लवीला आत्ता बाहेर पडणे गरजेचे होते. तिचे काम रात्रीच्या वेळेसच करणे गरजेचे होते. तिला तळोजाला नवतेज ऍग्रोच्या गोदामात पोहोचण्याची घाई झाली होती. समोरच्या काचेवर आदळणाऱ्या पावसामुळे तिला रस्ता नीट दिसत नव्हता. त्यात रस्त्यावर जागोजागी पाणी साठलेले होते. गाडी जपून चालवावी लागत होती. जवळजवळ तासभर ती गाडी चालवत असावी. लांब तिला नवतेज ऍग्रोचे गोदाम दिसले. तसे तिने गाडी बाजुला थांबवली आणि ती खाली उतरली. लांबपर्यंत मोकळे मैदान होते. मध्ये तुरळक झाडे होती. मधल्या भागात कुठलेही गोदाम किंवा कारखाना नव्हता. नवतेज ऍग्रोच्या पुढे काही अंतरावर दुसरे गोदाम होते. त्यामुळे रात्रीच्या या वेळेस तिला पहाणारे कोणीही नव्हते. खाली उतरल्यावर तिने रेनकोटचे दोन्ही खिसे चाचपले. एका खिशात तिने तिखटाची पुडी ठेवली होती तर दुसऱ्या खिशात छोटा चाकू होता. आपले संरक्षण करायला तेवढे पुरेसे नाही हे तिला माहित होते. परंतु हा धोका तिला पत्करणे भाग होते. एका मोठ्या कामगिरीवर ती निघाली होती.
पल्लवी नवतेज ऍग्रोमध्ये विक्री व्यवस्थापक म्हणून गेले वर्षभर काम करत होती. एकदा एका ग्राहकाच्या मागणीप्रमाणे सामान न पोहोचल्याने तो ग्राहक - ‘शेतकरी सहकारी भांडार’ नाराज झाला होता. हे कंपनीला परवडणारे नव्हते. तेव्हा तिने स्वतः यात लक्ष घालायचे ठरविले. तेव्हापासून ती दरवेळेस गोदामात जाऊन त्यांच्या मागणीप्रमाणे माल पाठविला जात आहेना हे जातीने बघत असे. कंपनीचे मालक नवतेज मल्लीक यांनाही तिच्या या कामाचे कौतुक वाटत असे. ती स्वतः माल बाजुला काढून देत असे व बाकीच्या गोष्टींची पूर्तता झाल्यावर कामगारांकडून तो माल टेम्पोत भरून घेत असे. गोदामातल्या लोकांनाही हे आता माहित झाल्यामुळे पल्लवीने बोलावल्याशिवाय कोणीही तिच्या मदतीस जात नसे.
अशाच वेळेस एकदा तिने एक खोके उघडले असता त्यात अपेक्षेप्रमाणे पेस्टीसाईडचे टीन दिसले नाहीत. त्या खोक्याचे वजनही फार नव्हते. वरती टाकलेले काही कागदाचे कपटे तिने बाजुला करून पाहीले. परंतु त्याखालीही टीन नव्हते. असे वाटत होते की खोक्यात फक्त कागदाचे कपटेच आहेत. तेव्हा तिने आत हात घालून चाचपले असता तिच्या हाताला काही पुड्या लागल्या. तिने एक पुडी बाहेर काढून बघितली. त्या पुडीत पांढऱ्या पिवळसर रंगाची पावडर होती. तिने ती पुडी आत टाकली आणि खोके बंद करून ठेऊन दिले. ती संभ्रमात पडली. खते किंवा औषधांच्या इतक्या छोट्या पुड्या तिने कधी बघितल्या नव्हत्या. साधारण पन्नास ग्रॅम, शंभर ग्रॅमच्या तरी पुड्या असत. तिला नवल वाटले. त्यानंतर जेव्हा जेव्हा ती गोदामात गेली तेव्हा तेव्हा तिने तसे खोके दिसते आहे का हे पहाण्याचा प्रयत्न केला. परंतु तिला तसे कधी आढळले नाही. कारण बाहेरून ते खोके इतर खोक्यांसारखेच होते. त्यावर नावही एका औषधाचेच होते. ते खोके वेगळे ओळखता येण्यासारखी कोणतीही खुण तिला दिसली नव्हती. तिला उगीचच संशय आला, ‘ते हेरोईन वगैरेसारखे ड्रग तर नसेल.’ पण असा विचार करणे किती हास्यास्पद आहे असे वाटून तिने तो विचार मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला. कोण तिथे ड्रग्ज आणणार होते? त्यांची कंपनी नावाजलेली होती. तिथे असे काही व्यवहार होण्याची शक्यताही नव्हती.
पल्लवीने तो विचार मनातून पूर्णपणे काढून टाकला आणि एक घटना घडली. सोमवारी पल्लवी एस एस बीचा माल पाठविण्यासाठी गोदामात गेली असताना सामान घेऊन एक ट्रक आला. गोदामातील सर्व कामगार तो माल उतरवून घेण्यात गुंतले. तिने एस एस भांडारच्या मागणीप्रमाणे माल काढून ठेवला होता. परंतु त्यांना लागणारी काही शेतीची अवजारे तिला मिळाली नव्हती. ट्रकमधील सर्व माल उतरविल्याशिवाय कोणीही तिच्या मदतीला येणार नव्हते. ती बाजुला बसून त्यांचे काम चाललेले बघत होती. काही कामगार ट्रकमधून माल खाली उतरवत होते. तर काही लगेच तो माल गोदामात वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवत होते. गोदामाचे व्यवस्थापक चंदेल ट्रकपाशी उभे राहून कामावर देखरेख करत होते.
पल्लवी तिच्या नकळत कामगार माल कशा पद्धतीने लावून ठेवत आहेत हे पहात होती. खोक्यांवर औषधांची नावे तर होतीच परंतु किती संख्येने खोकी आली आहेत हे कळावे म्हणून त्यावर A1, A2 असे मोठ्या अक्षरात खोक्यावर उजव्या बाजुला खालील कोपऱ्यात लिहिलेले होते. कामगार हे काम कुणाच्याही देखरेखीशिवाय करत होते. असे असतानाच दोन कामगार आत काही खोकी घेऊन आले त्यावर उजव्या बाजुला खालील कोपऱ्यात D1, D2 अशी अक्षरे तर होतीच. शिवाय डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात D1, D2 उलटे लिहिलेले होते. त्या कामगारांनी ती खोकी मध्येच ठेऊन दिली आणि बाकी खोकी आणायला बाहेर गेले. पल्लवीने D6 नंबरचे खोके उचलून पहिले. त्यावर एका पेस्टीसाइडचे नाव लिहीलेले होते. संख्या १० असेही लिहिलेले होते. खोके वजनाने अतिशय हलके होते. बाजुला एका मांडणीत सुतळीची बंडले व ४-५ दाभणे पडलेली होती. पल्लवीने एक दाभण उचलून खोक्याच्या तळाच्या बाजूने आत खुपसले. ते सहजी आरपार गेले. जर आत औषधाचे टीन असते तर दाभण एवढया आत खुपसले गेले नसते. तिने पटकन ते खोके जागेवर ठेऊन दिले आणि ती बाजुला जाऊन उभी राहिली. नंतर तेच कामगार तशीच अक्षरे लिहिलेली अजुन काही खोकी आत घेऊन आले. त्यांच्या पाठोपाठ व्यवस्थापक चंदेल आत आले. आणि त्या कामगारांना गोदामाच्या आतल्या बाजुला घेऊन गेले. तिच्या लक्षात आले ते मल्लिकच्या केबिनच्या दिशेने गेले. अशी D10 पर्यंतची एकूण दहा खोकी कामगारांनी आत नेली. पल्लवी लक्ष ठेऊन होती. D6 नंबरचे खोके उचलताना त्यातून किंचित पांढरट रंगाची भुकटी बाहेर पडली. पल्लवीने दाभण खुपसल्यामुळे आतील पिशवीला भोक पडलेले होते. त्यातूनच ती भुकटी बाहेर पडली असणार. पल्लवीची उत्सुकता चाळवली गेली. काय असेल त्या खोक्यांमध्ये? आपल्याला आलेली शंका खरी तर नसेल? असे विचार मनात येताच आपण याबद्दल माहिती काढायचीच हे तिने मनाशी पक्के ठरविले. ट्रकमधील माल उतरवून झाल्यावर पल्लवी चंदेलशी बोलायला गेली,
“चंदेल सर, शेतकरी सहकारी भांडारला काही अवजारे हवी आहेत. ती गोदामात कुठेच दिसत नाही आहेत.”
“ हो मॅडम, आज पंजाबहून माल येणार होता न. त्यामुळे गोदामात जागा करायची होती. सर्व अवजारे वरच्या त्या खोलीत नेऊन ठेवली आहेत.”
“मग कामगारांना ती आणायला सांगा.”
“मॅडम, कामगारांनी ती अवजारे वरती कशी पण टाकलीयत. आत्ता ती काढणे अवघड आहे.”
“अहो पण वर का नेऊन ठेवली? इथेच कुठेतरी कोपऱ्यात ठेवायची होती.”
“अरे मॅडम, ती वरची खोली अवजारे ठेवण्यासाठीच केलेली आहे. बघा इथे किती माल अस्ताव्यस्त पडलाय. इथे ठेवली असती आणि हरवली असती तर? ”
“अहो पण त्या पार्टीचा माल कसा पाठवणार?”
“मॅडम, तुम्ही त्या पार्टीला रिक्वेष्ट करा. आपण उद्या माल पाठवू. पक्का.”
“नाही, नाही. ते ऐकणार नाहीत. आजच पाठवायला लागेल.”
“ठीक है. अभी माल निकालता हुं. ए चला रे. शिवराम दोन तीन लोकांना घेऊन वरती चल. ए तुम्ही तो माल नीट लावून ठेवा.”
चंदेल आणि काही कामगार वरती गेले. तर काही जण खोकी नावे बघून नीट रचून ठेवायला लागले. ही संधी साधून पल्लवी शेतकरी भांडारचे डिलिव्हरी चलन घेऊन चंदेलच्या केबिनमध्ये गेली. त्याच्या टेबलवर ट्रकमधून आलेल्या मालाचे डिलिव्हरी चलन पडलेले होते. तिने भराभर त्यांचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घेतले. आणि चलन टेबलवर होते त्या जागी ठेऊन दिले. तिने एकदा बाहेर डोकावून पहिले. कामगार त्यांच्या कामात गुंग झालेले होते. तिने पटकन D6 नम्बरचे खोके उचलले. खिशातले दाभण काढून खालच्या बाजुला जिथे भोक पडले होते तिथेच तिने दाभण दोन तीनदा खुपसून ते भोक मोठे केले. त्यातून भुकटी बाहेर पडली. कागदाचा तुकडा मिळतो का हे ती आजूबाजूला पाहू लागली. शेवटी तिने केराच्या टोपलीतला एक कागद उचलून त्यात ती भुकटी भरून घेतली. आपल्या रुमालाने टेबल पुसून स्वच्छ केले. ते खोके मध्ये ठेऊन त्यावर बाकीची खोकी ठेवली आणि ती केबिनमधून बाहेर पडली.
दहा मिनिटांत चंदेल खाली आला तेव्हा ती एका स्टूलवर बसलेली होती. चंदेल म्हणाला, “मॅडम तुम्ही सांगितलेला सगळा माल काढून आणलाय. तुम्ही चेक करून घ्या.”
“चंदेल सर तुम्ही खूप मोठे काम केलेत. आभारी आहे. प्लीज या चलनवर सही करा.” आपल्या हातातील शेतकरी भांडारचे चलन त्याच्यापुढे ठेऊन त्यावर चंदेलची सही घेतली आणि ती गोदामातून बाहेर पडली.
क्रमशः

Group content visibility: 
Use group defaults