स्माईल प्लीज - स्पाॅइलरसकट

Submitted by मेधावि on 22 July, 2019 - 11:30

आज "स्माईल प्लीज" हा सिनेमा पाहीला.
आ व डला.

मुक्ता बर्वे, सतिश आळेकर, प्रसाद ओक, ललित प्रभाकर ह्यांनी प्रमुख पात्रं साकारली आहेत. इतका सुंदर आणि मन हेलावून टाकणारा सिनेमा अनेक अनेक दिवसांनी बघितला. मुक्ता बर्वे, अगदी आपल्या आसपासच लहानाची मोठी झालेली ही मुलगी काय प्रचंड ताकदीची कलाकार आहे. लौकिक अर्थानं ती सुंदर, देखणी, कमनीय वगैरे वगैरे हिराॅइन क्वालिफिकेशनची मुळीच नाही पण एकदा का ती भूमिकेत शिरली, की त्या सगळ्यांची गरजच नाही उरत मुळी. प्रेक्षकांशी अशी काही कनेक्ट होते ना ती, की मग पुढचे तीन तास, ती जे जे काही करते, जे जे काही दिसते, जे जे काही असते.... त्यात अभिनय बिभिनय काय पण नसतं. जे काही असतं ते जणू आपल्याचबरोबर घडत असतं. तिच्यासकट तीन तासांसाठी आपलाही परकाया प्रवेश होतो आणि मग ते आयुष्य आपणही तिच्याचबरोबर जगतो.

तिच्याचइतकं पाॅवरफुल काम अप्पांचंसुद्धा म्हणजे सतिश आळेकरांचंही झालंय. त्या दोन अडीच तासांत त्यांच्याबरोबर इतकं जवळचं नातं तयार होतं की चित्रपट संपताना त्यांनाही एक कडकडून मिठी मारावीशी वाटते.

एका प्रखर बुद्धिमान, कर्तबगार, धडाडीच्या, यशाची अनेक शिखरं सर करत वेगानं पुढे निघालेल्या स्त्रीच्या, (मुक्ताच्या) आयुष्यात आलेला एक प्रचंड मोठ्ठा पाॅज, लहान वयात डिटेक्ट झालेला आजार....डिमेन्शिआ...इथून पुढे ती वेगानं ह्या जगाची, नातेवाईकांची आणि स्वतःचीही ओळख विसरत जाणार ह्याची तिला झालेली जाणीव. तिची, तिच्या कुटुंबाची मनःस्थिती, होत जाणारी होरपळ, पण त्याचवेळी, त्याच धगीतून जाताना लखलखीत होत जाणारं एक एक नातं, त्यांतलं हळवेपण, जगाशी तुटत जाणारे धागे, विरत जाणारं "मी" पण, अनोळखी होत जाणारी नजर पण ह्या सर्वांना पुरुन उरणारी, पेशीपेशीत भिनलेली एखादी आवड, एखादा ध्यास ह्याची ही गोष्ट. अनोळखी नजरेलाही ओळख देणारं, सहवेदनेतून जुळणारं, फुलणारं एखादं मैत्र. गोष्ट जशी सहज सुरु होते तशीच सहज संपते. कसलाही अट्टहास नसतो. नाटकात येतात तसे इथं "सिनेमा" संपताना सगळे कलाकार परत एकदा मूळ रुपात पडद्यावर येतात आणि मग मात्र हायसं वाटतं. पडलेलं"वाईट स्वप्न" हे स्वप्नच होतं हे समजल्यावर होतो तसा आनंदही होतो.

सिनेमा संपतो पण विचार सुरु होतात.
डिमेन्शियावर आजतरी इलाज नाही. आजवर गृहीत धरलेलं आयुष्य, नाती, कित्येक साध्या, सोप्या, सहज मिळालेल्या गोष्टी किती बेशकिमती आहेत ह्याचा साक्षात्कार होतो. जगण्यातली हतबलता, अनिश्चितता, असहाय्यता, क्षणभंगूरता ह्यांच्या विचारानं मन तळापासून ढवळून निघतं. जगण्यासाठी कधी कधी नुसता "थिंक पाॅझीटीव्ह" च्या मंत्र पुरेसा नसतो. ह्या सर्व विकलतेचा निचरा होण्यासाठी, विश्वाचं आर्त थोडंस्सं तरी जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी, ह्या सर्व हतबलतेला जगण्याचा एक भाग मानून, परत एकदा पुढल्या दिवसापासूनच्या लढाईला सामोरं जाण्यासाठी, एकटंच, शांत अंधारात, मिटल्या डोळ्यातून घळघळ वहाणा-या अश्रूंना वाट देऊन मन शांत होण्यासाठी एखादी तरी रात्र द्यावीच लागते.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही या शनिवारी पाहिला स्माईल प्लिज. खुपच आवडला. सगळ्यांचे काम मस्त झाले आहे. चक्क प्रसाद ओक सुद्धा आवडला मला. मुक्ता बर्वे ने तर तिचे आजारानंतर बदलणे खुपच परिणामकारक रितीने दाखवले आहे. ती फक्त तिच्या डोळ्यांनीसुद्धा खुप काय बोलून जाते. ललित प्रभाकर त्याच्या सहज वावराने सगळ्यांवरचा आणि प्रेक्षकांवरचाही ताण हलका करतो. त्याचे आणि मुक्ताचे प्रसंग खास झालेले आहेत.

एका महत्त्वाच्या समस्येबद्दलचा चांगला चित्रपट. नक्की बघावा असा !!

बुक माय शोवर बघितलं तर जास्त ठिकाणी नाही आहे. पेपरमध्ये वेळ दिलेली नाही की मला कळली नाही (नक्षत्र, दादर). कशी कळेल वेळ.

बघितला आज. आवडला पण मध्यंतरानंतर थोडा लांब वाटला. दोन तीन वेळा रडू आलं. घरच्या लोकांची सत्वपरीक्षा अटळ. ज्याच्यावर हा प्रसंग येतो तो तर कणाकणाने मरतोच पण घरच्यांची काय अवस्था होत असेल हे वाटून मन विषण्ण झालं. धडधाकट लोकांमध्ये एवढे वाद होतात तर अशा आजारी माणसाला समजून घेताना काय होत असेल त्याची चुणूक एका प्रसंगातून दिसली ती म्हणजे ती मुलीला सारखी शाळेबद्दल विचारते. हसूही आलं आणि रडूही. ललित किती चांगला दाखवलाय. अदिती गोवित्रीकरचा आवाज कधी ऐकलाच नाही आजपर्यंत. तिचे फक्तं छान छान फोटोच बघितले. ती ज्योति पण किती गोड आहे. शेवटी मुक्ता त्याला ओळखत नाही तेव्हा त्याला धक्का बसतो आणि जाताना मागे वळून बघते तेव्हा त्याने ते सत्य पचवलेले असते असे मला वाटले. मुक्ताचा कपडे पट छान आहे आणि ती दिसलीपण छान. रुद्रममध्ये मुक्ताच्या आईला म्हणजे वंदना गुप्तेला असाच आजार झालेला असतो त्याची आठवण झाली.

आज पहिला,
"एक उगाच" चित्रपट आहे.

सगळ्यांची कामे चांगली झाली आहेत, देखणा आहे, निर्मिती मूल्ये चांगली आहेत पण एकत्रित सुसंबद्ध परिणाम द्यायला कमी पडतो.

मुक्ता बद्दल वर जे म्हंटले आहे त्याला पूर्ण सहमत.
मात्र ती अशा भूमिकेत टाइप कास्ट व्हायला लागली आहे. व्यवहारी, कर्तबगार, हुशार, भावनेपेक्षा डोक्याने विचार करणारी, व्यवस्थित, थोडीशी फटकळ, खडूस असे पात्र असले की त्यात मुक्ताच असेल हे नक्की असते, एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिका , पुणे मुंबई पुणे, स्माईल प्लिज, डबल सीट या सगळ्यात सेम साचा होता, वर आई वेगळी मुलगी हे अडिशनल क्वालिफिकेशन.
तर ते एक असो

सगळ्यात खटकणारी व्यक्ती रेखा तिच्या नवऱ्याची , शिशिर- प्रसाद ओक. लेखकाने ती मेजर गंडवली आहे.
बायकोने करिअर करू नये या मुद्द्यावर कटकट होऊन डिव्होर्स झालेल्या कपल च्या मनाने त्यांचे संबंध फारच सुरळीत दाखवले आहेत. आई वेळ देत नाही असे मुलीच्या मनात ठसवणारा माणूस, तू आई कडे जा म्हणून मुलीचे मन वळवतो ते जुळत नाही. नंतरही त्याचे ललित वर चिडणे/ सासऱ्यांशी चिडून बोलणे वगैरे उगाच ताण वाढवायला योजिल्या सारखे वाटते. खरा तर त्याचा एक्स बायकोच्या घरच्यांशी काही संबंध नाही.
डॉक्टर बरोबर सेशन्स चालू असताना हा बाप्या बाजूच्या खुर्चीत बसून डिप्रेशन आल्या सारखा कपाळाला हात लावून बसतो यातून त्यांना नक्की काय सुचवायचे आहे ते कळले नाही.

डॉक्टर- अदिती गोवित्रीकर, शब्दांचे आघात मेजर खटकतात.
इतकी घराच्यासारखी डॉक्टर, जवळच्या मैत्रिणीला डिमेनशिया आहे कळल्यावर 4 दिवस रिपोर्ट घेऊन बसून रहाते, हे पटत नाही, वर आशा आजारची बातमी जवळचे नातेवाईकांना एकत्र बोलावून न सांगता एकट्या पेशनट ला सांगणे, आणि तूच घरी सांग असे सूचित करणे विचित्र वाटते.

लिहून थकलो, थोड्या वेळाने इतर व्यक्तिरेखांबद्दल लिहितो.

सिम्बा, हो. काही गोष्टी खटकल्या पण हल्ली 100% फ्लाॅ-लेस कथानकं कुठं असतात म्हणून गोड मानून घेतल्या.
आदिती गो. ला माफ केलं. तिच्याकडून तसंही किती अपेक्षा ठेवणार?
प्रसाद ओकचं कॅरॅक्टर मला पटलं. आधी कटकट झाली मग दोघं ठरवून वेगळे झाले पण आता कडवटपणा जाऊन मैत्री आहे पण लग्न नको रे बाबा अशी काही उदाहरणे पहाण्यात आहेत म्हणून पटलं.

उद्या येऊ घातलेल्या दुःखाचा विचार करून आजचा क्षण नासऊ नका, हा आत्ताचा क्षण रसरशीतपणे जगा, ही चित्रपटाची मुख्य थीम , म्हणजे विराज तरी हे म्हणतो

पण आजारपणाविषयी कळल्यावर कोलमडून गेलेली डिप्रेस झालेली मुक्ता कुठेच दिसत नाही, त्याच्या संवादाच्या एक वाक्यात येते की तिची जीवन आसक्ती संपली होती, एक दीड वाजे पर्यंत बिछान्यातून ती उठत नसे ती आता सकाळी उठून बागेत काम करते .
पण ही अवस्था आपल्याला कधीच दिसत नाही , त्यामुळे तिचे शेवटी आजाराचा स्वीकार करून काम करणे तेव्हडे भिडत नाही. ते फार वरवरचे वाटत राहते.

ते एक दीड वाजेपर्यंत उठत नाही ते दिसलं नाही हे खरे आहे. उलट ती खूप तडफदार आणि अती आत्मविश्वास असलेली दाखवली आहे. आजाराचा स्वीकार करायच्या आधीच ती खूप काही विसरायला लागलेली असते. तिचा मेंदू तिच्या ताब्यात रहात नाही आणि त्यामुळे आजाराचा स्वीकार ही भानगडच रहात नाही असे मला वाटले. ती एक दोनदा ललीतला ऐकवते की मी तुझे प्रोजेक्ट नाही ते मला जाम आवडले. प्रसाद ओक घरचाच दाखवला आहे, अप्पा त्याला मध्ये कामाच्या ठिकाणी जाऊन भेटतात नपाबद्दल बोलायला. त्याला बहुतेक ललित बद्दल असूया वाटत असते की हा बाहेरचा असून एवढा जवळचा कधी झाला. मुलगीही आईच्या जवळ जात असते त्याचाही त्याला त्रास होत असावा.

सिंबा यांच्या शी सहमत. खूप विस्कळीत आहे कथासूत्र. आणि मुख्य म्हणजे अप्पांचा प्रशस्त बंगला, खानदानी वावर हे पाहून उगीचच अती श्रीमंतांचं दुखणं अशी कल्पना होते. ज्याची काही गरज नव्हती. आणि ललीत तर अगदी यंग मुलगा दाखविला आहे ना.....मग प्रसाद ओक ला त्यचा मत्सर वाटायचे काय कारण? तो तर नपा पेक्षा थोडा मोठा दादा टाईप्स असतो.
आणि मुख्य म्हणजे आजाराच्या ह्या स्टेज ला इतके एक्झिबिशन वगैरे भरवून भाषण वगैरे देणे अशक्य वाटते. इतकी सुरळीत सपोर्ट सिस्टीम नसतेच प्रत्यक्षात. त्या ज्योतीनेच शंभर दांड्या मारल्या असत्या...आणि विराज नेही नोकरीला प्राधान्य दिलं असतं!