पाऊस

Submitted by उज्ज्वला अन्नछत्रे on 18 July, 2019 - 06:44

#कविता

गडाडगड् करुनी ढग येती
कडाडकड् बिजली चमके
दणाणदण् पाऊस कोसळे
विश्वाचे डमरू करुनी त्या
तालावरती थयथय चाले
रुद्र शिवाचे तांडव हे!

धबधबा कपारीतुन पडते
डोंगरातुनी खळखळते
नदिच्या लाटांतुन झुळझुळते
धारांतुन मल्हारा गाते
विश्वाच्या गाभारी घुमते
सांब शिवाचे गायन हे!

कधि पानांतुन टपटपती
गवतावरुनी रुणझुणती
जलाशयाच्या वरा नादती
पदन्यास थेंबांचे सुंदर
विश्वलयीवर कसे चालले
नटेश्वराचे नर्तन हे!

विषप्राशने होत निळा
परोपकारास्तव उरला
तसाच हा घननीळ बरसतो
पाऊस घनगंभीर पडे
विश्वाला व्यापुन उरले
ध्यानस्थ शिवाचे दर्शन हे!
- उज्ज्वला अन्नछत्रे

Group content visibility: 
Use group defaults

हे पाऊसरूपी सांब सदशिवा आमच्यावर प्रसन्न हो. तुझं आगमन आमच्या प्रदेशात होवो हीच प्रार्थना.
छान आहे कविता.

छान आहे कविता.खुप आवडली.
श्यामची आई पुस्तकातली 'सांब सदाशिव पाऊस दे' ही रात्र आठवली.
पु.क.शु! Happy

धन्यवाद दीप्ति
तुमची पोस्ट वाचल्यावर मलाही श्यामची आई आठवली!