रांगोळी

Submitted by सुपरमॉम on 8 April, 2009 - 22:46

दिवाळीचा दिवस. माझं देवघर अगदी छान सजलेलं. देवासमोर बसून नवरा साग्रसंगीत पूजा करतोय. त्याच्या मागे छोट्याछोट्या आसनांवर मुलं बसली आहेत...किंवा शांत बसून रहायचा प्रयत्न करताहेत. मुलीचं लक्ष तिच्या चमचमत्या घागर्‍याकडे अन हातातल्या हैद्राबादी बांगड्यांकडे आहे तर मुलगा त्याच्या चुडीदार कुर्त्यावरची... म्हणजे त्याच्या भाषेत 'शाहरूख खान ड्रेसवरची' नक्षी निरखून बघतोय. नाकातली नथ नि अंगावरची पैठणी सावरत माझीही लगबग सुरू आहे.
पूजा आटोपली तशी नवर्‍यानं प्रसादाचं ताट आणायची खूण केली. मी स्वैपाकघराकडे वळणार तोच एवढा वेळ महत्प्रयासानं दाबून धरलेला प्रश्न मुलानं विचारलाच,
'इज इट फ़ूड टाईम?'

'नैवेद्य म्हण रे बाळा... फ़ूड काय?' माझं हलकेच उत्तर.
'बट इट इज फ़ूड... राईट?'

(एरवी झिंज्या उपटल्या तरी अशा वेळी भावाच्या मदतीला धावल्या नाहीत तर त्या बहिणाबाई कसल्या?')
मी काहीतरी उत्तर देणार तोच नवर्‍यानं आरतीची घंटा जोरजोरात वाजवायला सुरुवात केलेली. त्याचा अर्थ 'बोलणं पुरे आता. प्रसाद आणा लवकर...' हा आहे हे कळायला मला वेळ लागत नाही.
घाईघाईनं मी वाढलेलं ताट नेऊन देवासमोर ठेवते.

पूजा, जेवणं उरकतात तसा मुलं त्यांच्या खोलीत पत्त्यांचा डाव मांडतात. गोडधोड जेवून 'दमलेला' नवरा टी व्ही समोर बसल्या बसल्या पेंगायला लागलेला असतो. मागचं आवरून, डिशवॉशर लावून मी रिमोट हातात घेते खरी, पण मनात थैमान घालणारे, आजकाल रोजच छळणारे प्रश्न काही शांत व्हायला तयार नसतात.

या उन्हाळ्यात भारतात जायचा बेत आम्ही दोघांनीही आखला आहे. तीन वर्षं झालीत भारतवारी होऊन. केव्हाही फ़ोन केला की 'कधी येताय..' हा प्रश्न ऐकावा लागणार हे ठरलेलंच. पण या वेळी जायची माझी इच्छा जरी नेहमीइतकीच प्रबळ असली तरी अनेक पण आणि परंतुची किनार त्या इच्छेला हैराण करून सोडतेय.
या तीन वर्षात भारतातल्या आमच्या कुटुंबात अनेक बदल झालेत. ते वेळोवेळी आम्हाला कळतही गेलेत. पण एक मोठा बदल आमच्या इथल्या कुटुंबात झालाय... तो म्हणजे माझी दोन्ही मुलं मराठी बोलणं जवळपास विसरली आहेत. खरंतर असं का व्हावं हे आम्हा दोघांनाही कळत नाही. घरात आम्ही त्यांच्याशी मराठीच बोलतो... आपापसात आम्ही दोघं चुकूनही इंग्लिश बोलत नाही. पण हा बदल हळूहळू पण निश्चितपणे होत गेलाय हे मात्र खरं. तसं आमचं बोलणं त्या दोघांनाही पूर्णंपणे कळतं. फ़क्त बोलायला ते तयार नसतात.
या गोष्टीचं मला अनिवार म्हणजे अनिवारच दु:ख होतं. नवर्‍याशी बोलून काही उपयोगच नसतो. कुठलीही गोष्ट 'सिरीयसली' घ्यायचीच नाही हे त्याचं ब्रीदवाक्य. ते तो अगदी कटाक्षाने पाळतो. कितीही गंभीर गोष्ट असली तरी ती विनोदात घेण्याचा त्याचा स्वभाव लग्नाच्या बारा वर्षांनतरही त्याने टिकवून ठेवलाय. बहुतेक वेळा मला ते बरंही वाटतं. पण कधीकधी मी त्यानं वैतागतेदेखिल. अगदी माझ्या बाळंतपणाच्या वेळीही मला ऑक्सिजन लावलेला, डॉक्टर्स प्रचंड काळजीत अन मी अगदी डोळ्यात पाणी आणून त्याला सांगतेय,
'माझं काही बरंवाईट झालं ना तर....'
'अजिबात काळजी करू नकोस तू. मी माझी मुळीच आबाळ होऊ देणार नाही. ताबडतोब दुसरं लग्न करीन....'
त्या तशा क्षणीसुद्धा मला इतकं हसू लोटलं की बस्स...
कधी रागावून मी म्हणतेही, 'अहो, कधीतरी गंभीरपणे विचार करत जा ना....'
तर यावर...
'झालं... घरात एक तू कायम तोंड लटकावून बसणार... मीही तेच करू? म्हणजे संपलंच.'
तर अशा स्वभावामुळे नवरा ही गोष्ट हसण्यावारी उडवणार हे मला माहीतच असतं.

तीन वर्षांपूर्वी आम्ही इथे आलो तेव्हा मी नुकतीच भारतात वर्षंभर राहून आले होते. त्यामुळे जेमतेम 'यस नो' सोडलं तर मुलांना इंग्रजीचा गंधही नव्हता. घरात बोलली जाणारी मराठी, शाळेतल्या टीचरची हिंदी अन शेजारच्या मैत्रिणीची गुजराती अशी अनेकाविध भाषांची कॉकटेल ते तेव्हा बोलत असत. पहिल्यांदा त्यांना जेव्हा न्यूयॉर्कच्या शाळेत घातलं तेव्हा शाळेत टीचरशी कसं बोलतील, काही लागलं सवरलेलं कसं सांगतील या काळजीनं मी तेव्हा अगदी हैराण झाले होते. मनातले ते विचार मी त्यांच्या टीचरजवळ बोलूनही दाखवले.

'डोंट वरी डियर... वी हॅव लॉट ऑफ़ पेशन्स..'
म्हातार्‍या शिक्षिकेनं तोंड भरून आश्वासन दिलं तरी माझी बेचैनी कमी होत नव्हती. त्यातच एक दिवस सुकन्येनं 'आई, हा टीचरशी मराठीत बोलत असतो ' अशी गुप्त बातमी पुरवली त्यामुळे मायबोलीचा झेंडा न्यूयॉर्कच्या शाळेत रोवला गेल्याचा सुप्त आनंद झाला तरी त्या मराठी विरुद्ध अमेरिकन इंग्रजी अशा शब्दसंग्रामाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहिल्यानं अधिकच असहाय वाटायला लागलं. शेजारी राहणारा नवर्‍याचा मद्रदेशीय मित्र मुंबईकर असल्याने अस्खलित मराठी बोलत असे. त्याच्याशीही दोघांची चांगलीच गट्टी जमली होती. तिथेही इंग्रजीचा प्रश्नच नव्हता. अगदी शाळेतून आल्यावर जिन्यातूनच 'आई,आज पोहे केलेस की सांजा...' असं ओरडतच दोघं घरी येत असत. त्यामुळे न्यूयॉर्कर झालो तरी 'मायमराठी'च जोरात होती. तेव्हा एकदोन भारतीय कुटुंबांमधली मुलं फ़ाडफ़ाड इंग्रजी बोलताना बघून आपल्याही मुलांना असं कधी बोलता येईल असं वाटत असे. पण त्यात मुलांना शाळेत बोलता यावं, बरोबरीच्या मुलांशी संवाद साधता यावा ही एकमेव इच्छा होती तेव्हा.

पण कुठलंही मागणं विचार करून मागावं म्हणतात ते काय खोटं आहे? बघता बघता तीन चार महिने उलटले नि इंग्रजीत जाणवण्याइतकी प्रगती होऊ लागली. आई बाबांचे मॉम नि डॅड केव्हा झाले ते आम्हालाच कळलं नाही तर त्या चिमुरड्यांना काय कळणार होतं? घरात नवीन खेळणं आणल्यावर अन 'आवडलं का' विचारल्यावर 'इट्स कूल डॅड...' असं उत्तर जेव्हा पहिल्यांदा आलं तेव्हा मराठीच्या र्‍हासाची जाणीव झाली. पण हा बदल इतका भराभर घडत गेला की हळूहळू मराठी फ़क्त आम्हा दोघांच्याच संभाषणात उरली. त्यातून मुलगा एखादेवेळी मराठी बोललाच, तर इतकं तुटकं मोडकं नि अगाध बोलत असे की तो ज्ञानेश्वरांच्या काळात जन्मला नाही याबद्दल देवाचे आभार मानण्यापलिकडे आमच्या हातात काहीच रहात नसे. मुलगी तशी बर्‍यापैकी मराठी
बोलणारी पण मुळातच अतिशय लाजाळू, त्यामुळे तसंही तिचं बोलणं तोळामासा.(आता मात्र ही परिस्थिती उरली नाहीय हो...) तेव्हा तिच्याही बाबतीत सारा आनंदीआनंदच होता.

भाषेच्या बाबतीतला हा बदल पाहून मला बरं वाटत नसे. इंग्लिश यावी हे ठीक आहे, पण म्हणून मराठी पूर्ण विसरावी हे का म्हणून? हे म्हणजे एखाद्या साध्यासुध्या आईला पार विसरून,एखाद्या टिपटॉप, मॉडर्न मावशीच्या मागे धावत जाण्यासारखं झालं. अन असाच विचार केला तर भारतात आपण सारे लहानपणापासून कमीतकमी तीन भाषा बोलतोच ना. अपली मातृभाषा, राष्ट्रभाषा नि इंग्लिशही येतेच. मग इथेही निदान इंग्रजी न मराठी, दोन्ही बोलायला हरकत काय आहे?

मग नीट विचार केल्यावर वाटायला लागलं, आपणच चुकतोय की काय...सकाळी साडेसात ते दुपारी अडीच पर्यंत शाळा, घरी आल्यावर टी व्ही चे कार्यक्रम बघणं, नि उद्या पुन्हा शाळा आहे म्हणून लवकर झोपणं, या सार्‍यात मराठी अशी कानावर पडतेच किती? बरं, मित्रमैत्रिणी सगळी अमेरिकन, चिनी, स्पॅनिश,अशा प्रकारातली. जे देसी आहेत त्यात मराठमोळे फ़ारच कमी. सगळा तेलगू, पंजाबी, गुजराती असा क्राऊड. साहजिकच ती मुलं पण आपापसात इंग्रजीच बोलणार.

मनाला असं कितीही समजावलं, तरी थोडी बोच ही जाणवतच होती. आपण इथे कायम राहणार की नाही हे जरी नक्की नसलं, तरी जर उद्या इथेच स्थायिक झालो, तर आपली मुलं किती सुरेख अनुभूतींना मुकतील याची.
पु.लंचं लिखाण वाचायचं नाही, 'मोगरा फ़ुलला' ऐकून बहरायचं नाही, शांता शेळकेंच्या कविता ऐकून डोलायचं नाही...यातलं काही म्हणता काहीच नाही... हे कसलं मराठमोळेपण?
नाही म्हणायला माझ्या लहान बहिणीच्या लग्नात मी लेकीचा नऊवारी कल्पना साडी नेसवून, कपाळावर इवलीशी चंद्रकोर नि हनुवटीवर काजळाचं गोंदण लावून हौसेनं काढलेला फ़ोटो अल्बममधे आहे. तिच्या बाकी सार्‍या पाश्चात्य परिधानांमधल्या फ़ोटोत त्या फ़ोटोची सर कशालाच नाही असं मला राहून राहून वाटत राहतं.

ढगांचा गडगडाट कानावर येतो तशी मी दचकून भानावर येते. पावसाचे टप्पोरे थेंब तडतडायला लागलेले असतात. मुलगा नि मुलगी दोघंही त्या आवाजाने घाबरून माझ्याजवळ येतात.
'चला, चार वाजले रे. काय खायचंय दुधाबरोबर आज?'
'आय वांट दॅट राउंड थिंग...'
'आय वांट दोज येलो व्हील्स...'
'अनारसा नि चकली...' मला हसूच येतं. दोघांना हलकेच थोपटून मी स्वैपाकघराकडे वळते. दूध गरम करताकरताच अचानक एक आठवण माझ्या मनात गिरक्या घ्यायला लागते.

माझ्या माहेरी नि सासरी ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांवर सार्‍यांचा खूप विश्वास. महाराजांच्याच कोणातरी भक्ताकडून ऐकलेली ही गोष्ट.
एकदा एका प्रवचनानंतर(हे प्रवचन महाराजांचं होतं की त्यांच्या कोणा भक्तांचं ते आठवत नाहीय.) एका श्रोत्यानं विचारलं होतं की 'आपण इतकं सुरेख सगळं सांगता. पण वरून हौदात नळ सोडावा नि खाली तो हौद गळका असल्याने सगळं वाहून जावं तसं काहीसं आमच्या मनाचं होतं...तेव्हा...'
यावर प्रवचन करणार्‍यांनी फ़ार मार्मिक उत्तर दिलं होतं. ते म्हणाले,
'ते सगळं खरं, पण शेवटी ओल तर राहतेच ना...'

भरून आलेल्या पावसानंतर आभाळ स्वच्छ झालं की जसं होतं तसं क्षणात माझ्या मनाचं झालं. आम्ही जरी परदेशात स्थायिक झालो, मुलं इथेच घडली, वाढली, तरी हे संस्कारांची ओल कधी वाळायचीच नाही. आईवडिलांकडून आलेला हा वारसा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ते मनात जिवंत ठेवतीलच. बाहेर जरी कितीही इंग्रजाळलेलं वातावरण असलं, तरी घरात तेवणारी ही मायबोलीची ज्योत त्यांच्या मनाचा एखादा छोटासाच का होईना, कोपरा उजळल्याशिवाय राहायची नाहीच.

म्हणूनच की काय, वडील पूजेला बसले की हळूच दोघंही येऊन बसतात. 'आई, आय ऑल्सो लाइक इट...' म्हणत बाबांसारखंच उभं गंध माझा लेक हौसेनं लावून घेतो. 'आई, पुढच्या वेळी इंडिया ट्रिपला जाऊ तेव्हा मला नेहासारखं हिरवं परकरपोलकं घेशील का?' असं लेक आर्जवानं विचारते. हॅलोवीनच्या सणानंतर दिवाळीच्या तयारीत दोघंही हौसेनं भाग घेतात. माझ्यासारखंच दिवाळीच्या दिवशी भल्यापहाटे आंघोळी झाल्यावर गरमागरम चकल्या नि सायीचं दही दोघं आवडीने खातात. अशा एक ना दोन, अनेक गोष्टी. वार्‍याच्या हळुवार झुळकीसारख्या मनाला प्रफ़ुल्लित करणार्‍या. फ़ार काय, या दिवाळीला नेहमीचं डव नि करेस साबण बाजूला ठेवून मी मोती साबण वेष्टणातून काढला तसा त्याचा वास खोलवर छातीत भरून घेत लेक म्हणाला...'धिस सोप इज सो नाइस..'
दोघांनीही सांगूनच टाकलं... 'आता रोज हाच साबण हवा आम्हाला...'

अशा वरवर लहान वाटणार्‍या पण मनाला आभाळाएवढं मोठं करणार्‍या गोष्टींनी सुखावून जाऊन मी बाहेरच्या काचेच्या दाराशी येते. सकाळी उठून मी हौसेनं काढलेली फ़ुलांची रांगोळी पावसात किंचित विस्कटली आहे... नवरा टक लावून त्या रांगोळीकडे बघत होता.. अन एकदम म्हणाला, 'पावसानं सगळे रंग एकत्र झालेत तरी किती सुरेख दिसतेय ग रांगोळी. मला वाटलं होतं पाण्यानं पार बिघडली असेल, पण उलट त्या पाकळ्या नि सारे रंग एकातएक मिसळून आणखीच खुललेत बघ. नि मूळ डिझाईन कायमच आहे...'

मी हलकेच हसते.
आयुष्याचं असंच तर आहे. मनापासून,सारं कौशल्य पणाला लावून रेखायची असते रांगोळी. मग ती नीट येईल की नाही, सुरेख दिसेल की नाही ही चिंता न करता. म्हणजे मग पाऊस, वारा कसल्याही मार्‍यात मूळ कलाकृती टिकूनच राहणार असते.... एकमेकात मिसळलेल्या रंगांची खुलावट आणखीनच वाढवत.

माझ्या गूढ हसण्याकडे नवरा आश्चर्यानं पहात असतानाच मी खायचं घेऊन मुलांच्या खोलीत जाते. दोघांबरोबर मिकी माऊसचा सिनेमा बघायला....

समाप्त.

गुलमोहर: 

आवडलं ग Happy
सगळ आपोआप होत जातं आपण आपल्याला काय वाटतय ते करत जायचं त्याचा परिणाम होत असतोच मुलांवर.

जुन्या माबोवर होतं का गं?
आवडलं हे सांगायची काय गरज!? Happy

वाह! सुंदर !
अगदी तुमच मन वाचल्या सारखं वाटतय.
Happy

**************************
काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत

काय मस्त लिहीलयस ग! डोळे भरुन आले वाचताना

-------------------------------------------------------------------------------
मुंबई गटग वृत्तांत इथे वाचा http://www.maayboli.com/node/7035

http://www.youtube.com/watch?v=6_OfAvkxaTI कृपया ही अ‍ॅड बघा.

Donate Eye - Bring Light to Blind

खुप॑ दिवसांनी पुन्हा वाचलं.. शेवटी पुन्हा पाणावले डोळे.
---------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

खुप॑ दिवसांनी पुन्हा वाचलं.. शेवटी पुन्हा पाणावले डोळे.
---------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

अगदी,सहज सुंदर मनाला भिडल

आज अचानक... Happy
तिथे किती थोडक्यात सांगितल तुम्ही हे सगळं!! पण हे ही आवडलं हे सांगणे न लगे!

ओल>> सहीच!
मोती साबण>> अगदी अगदी. त्याशिवाय दिवाळी पूर्ण होतच नाही.
कथा मस्त आहे. आवडली.

मस्त एकदम आवड्लं.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

छान आहे... खुप आवडलं...

विष्णु.... एक जास्वंद!
*******************************************
माणसांच्या मध्यरात्रि हिंडणारा सूर्य मी... माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा...

मस्त लिहील आहे.. Happy हल्ली भारतात तरी हो कुठं मुलं मराठी बोलताहेत ? फक्त महाराष्ट्रात निदान कानावर तरी पडते..

सुमॉ, रांगोळी खुप छान आहे.

खूप खूप धन्यवाद लोक्स.
हो, जुन्या मायबोलीवर लिहिलं होतं हे ललित.

--------------------------------------------
फूलोंसे कांटे अच्छे होते है,
जो दामन थाम लेते है.
दोस्त से दुश्मन अच्छे होते है
जो जलकर नाम लेते है.

छान लिहिलंय.
ana_meera शी सहमत. आज भारतातली सुद्धा मुलं मराठी कमीच बोलतात.

- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/

छान लिहिलंय सुमॉ... आवडलं Happy

बहुतांशी अनिवासी भारतीयांची व्यथा व्यवस्थित शब्दबद्ध केलीत. बोलभाषेपेक्षा संस्कारांची भाषा रुजणं जास्त महत्वाचं ह्याला १०० टक्के अनुमोदन.

छानच!! खूप आवडले. अगदी मनातल कुणीतरी बोलल्यासारख वाटले. ....अजून २/३ वर्शानी मलाही ह्यातूनच जावे लागेल..तेव्हा ही ओल नक्क्कीच आठवेल...
फुलराणी

किती सहज सुन्दर लिहिलय, आवडले!

सुमॉ........ बोलता बोलता सहज काळजाला हात घालतेस.....!!

डोळ्यात एकदम पाणीच आलं गं......!! खूप छान उतरल्या आहेत भावना..... अगदी प्रत्येक परदेशात राहणार्‍या आई-वडीलांच्या भावना आहेत.

मला पण खूप वाईट वाटायचं आधी की माझ्या मुलांना पु.ल., व.पु, गदीमा हे कधी कळणारच नाहीत. पण आजकाल आम्ही रोज झोपताना त्याच्या कॅसेट्स लावतो....त्यामुळे आता थोडी थोडी ओळख व्हायला लागलीये मुलांना Happy

~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/

आवडलं.
ही व्यथा परदेशात राहणार्‍यांचीच नाही तर महाराष्ट्राबाहेर राहणार्‍यांची पण आहे. साधारण याच आशयाचा एक लेख मी काही दिवसांपूर्वी लिहीला होता :
'पु. ल. आणि आजकालची मुलं' (http://www.maayboli.com/node/520)

~~~
कट्टे की लली, ना पुणे की, ना मुंबई की Sad

Pages