Keep a place for everything...

Submitted by nimita on 14 July, 2019 - 22:07

काही वर्षांपूर्वी एका पुस्तकात एक वाक्य वाचलं होतं..

" Keep a place for everything and keep everything in place."

खूपच आवडलं मला ते ; अगदी मनोमन पटलं म्हणा ना ! ' घरातल्या प्रत्येक वस्तूसाठी एक नियोजित जागा हवी आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ती वस्तू त्या जागेवर हवी '!! माझ्या 'आवराआवरी' च्या संकल्पनेत अगदी चपखल बसणारी विचारधारा आहे ही !

माझं आणि या आवराआवरीचं नातं म्हणजे अगदी 'जनम जनम का साथ है तुम्हारा हमारा ' असंच काहीसं आहे. आमच्या कॉलेज च्या ग्रुप मधले माझे मित्र मैत्रिणी तर माझ्या या नीटनेटकेपणाला थोडे घाबरूनच असायचे. माझी एक मैत्रीण तर नेहेमी मला चिडवायची..."प्रिया चा 'आवराआवरी' मोड ऑन झाला की कोणी तिच्या समोर नका जाऊ बरं का !सारखं मधे मधे केलंत तर तुम्हांलाही उचलून खुंटीवर लटकवून ठेवेल."

शाळा कॉलेजमधे असताना माझ्या या 'आवराआवरी'च्या कक्षा तशा सीमितच होत्या- म्हणजे कपाटातले फक्त माझे कप्पे आवरायची परवानगी असायची. बाकीचे माझ्या बहीण भावांचे कप्पे माझ्यासाठी out of bounds असायचे. पण माझ्या आईला माझ्या या छंदाची कल्पना होती. जर एक दोन दिवस काहीच 'आवरायला' मिळालं नाही तर मला withdrawal symptoms येतात हे तिला माहीत होतं. त्यामुळे ती अधूनमधून मला तिचं कपड्यांचं कपाट उघडून द्यायची आणि अगदी DDLJ मधे जसा अमरीश पुरी काजोल ला म्हणतो ... 'जा सिमरन जा ...जी ले अपनी ज़िंदगी ।' ...तशाच आविर्भावात म्हणायची," कर काय करायचं ते!'

मग काय; 'पु ल.देशपांडें'च्या म्हैस मधला झंप्या बगुनाना ना म्हणतो तशीच काहीशी ... पुढच्या एक दीड तासाची निश्चिंती ! पण माझं काम फत्ते झाल्यावर जेव्हा आई येऊन पाहणी करायची तेव्हा तिच्या चेहेऱ्यावर दिसणारं कौतुक मला अजूनही लक्षात आहे.

कॉलेजमधे असताना मी दर रविवारी सगळे कपडे धुवून, नीट इस्त्री करून कप्प्यात लावून ठेवायची. वाटायचं -'चला, आता आठवडाभर काळजी नाही. इतरांना पडतो तसा 'कॉलेजला जाताना कुठले कपडे घालू ?' हा प्रश्न नाही पडणार'..

पण सोमवारी सकाळी जेव्हा मी कपाट उघडून बघायची तेव्हा सगळे व्यवस्थित घड्या केलेले कपडे बघून मनात पहिला प्रश्न यायचा तो हाच- 'कॉलेजला जाताना यातले कुठले कपडे घालू?' Problem of plenty की काय म्हणतात ना ते हेच असावं बहुतेक.

वाढत्या वयाबरोबर माझं हे 'आवरण्याचं' व्यसन हळूहळू वाढतच गेलं. आधी फक्त माझे स्वतःचे कपडे, वह्या पुस्तकं यातच मी समाधानी होते, पण पुढे त्यात स्वैपाकघरातली भांडीकुंडी, फ्रीज, टीव्ही युनिट वगैरे वगैरे add होत गेले. पण तरीही घरात अशा बऱ्याच जागा आणि वस्तू होत्या ज्या माझ्यासाठी banned होत्या. त्यातली एक म्हणजे माझ्या बाबांचं पेंटिंग चं सामान.. बाबा खूप छान पेंटिंग्ज करायचे ; पुण्याच्या भाषेत सांगायचं तर खरंच 'अप्रतिम, लै भारी' एकदम क sss ड sss क !!! रोज संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर ते एकीकडे चहा पीत चित्र काढायचे. त्यांनी काढलेली, पेंट केलेली चित्रं बघून खरंच खूप आनंद व्हायचा .. पण या नवनिर्मिती मधे जो पसारा व्हायचा तो बघून माझे हात शिवशिवायला लागायचे. ऑइल पेंट्सच्या ट्यूब्स, सतराशे साठ ब्रशेस, H, B, HB अशा नानाविध पेन्सिल्स ...ही यादी न संपणारी असायची. साहजिकच या सगळ्याचा पसारा पण खूप दिसायचा. पण त्यातली एकही वस्तू उचलायचीच काय पण नुसती सरकवायची पण परवानगी नव्हती मला ."तू इकडे कशाला हात नको लावू. मी सगळं नीट खुणेनी ठेवलेलं असतं. तू आवरून ठेवलंस की मला सापडत नाही." हे बाबांचं विधान मला नेहेमीच गोंधळात टाकायचं. 'There is a order in the chaos' ही संकल्पना त्यांच्यामुळेच रूढ झाली असावी. त्यांच्या रागावण्याला घाबरून मी नेहेमी त्या पसाऱ्याकडे दुर्लक्ष करायची पण त्यांनी 'खुणेनी' ठेवलेल्या त्या वस्तू मला मात्र येताजाता सारख्या खुणावायच्या.

अजून एक निर्बंधित क्षेत्र म्हणजे माझ्या भावाचं स्टडी टेबल आणि त्याची कॉट.....त्याचे कपडे आणि बाकीच्या वस्तू यांच्या नशिबात कपाटात राहण्याचे सन्मानाचे दिवस कधी आलेच नाही. ते सगळे बिचारे निर्वासितांसारखे कधी कॉटवर तर कधी स्टडी टेबल वर पडलेले असायचे. म्हणजे बघा- रात्री झोपायच्या वेळी कॉटवरची सगळी गाठोडी स्टडी टेबल वर जायची आणि अभ्यास करायची वेळ झाली की तिथून सगळी वरात परत कॉटवर ! त्यानी कपड्यांच्या बाबतीत 'धुवून आलेले' आणि 'धुवायला टाकायचे' अशा प्रकारचा भेदभाव कधीच केला नाही. 'घडी ही शेवटी विस्कटण्यासाठीच असते ' हे जीवनाचं सत्य त्याला लहान वयातच समजलं असावं ; त्यामुळे कपड्यांना इस्त्री करणं तर दूरच पण साध्या घड्या वगैरे घालायच्या भानगडीतही तो कधी पडला नाही...हळूहळू मी पण त्या बाबतीत 'इग्नोरास्त्र' चा वापर करायला शिकले.

आमच्या शाळेत इंग्लिश विषय शिकवायला सहस्रबुद्धे बाई होत्या- (हो, मी मराठी मीडियम मधे होते त्यामुळे आम्ही शिक्षिकाना 'बाई' च म्हणायचो.) मी आठवीत असतानाची गोष्ट आहे ही.. एकदा त्या आम्हांला स्वच्छता आणि टापटीप यांचं महत्व सांगत होत्या. (तेव्हाचा शिक्षकवर्ग अभ्यासाव्यतिरिक्तही बरंच काही शिकवत असे!) त्यांचं तेव्हाचं एक वाक्य माझ्या अजूनही लक्षात आहे. त्या म्हणाल्या होत्या," जर कधी रात्री लाईट्स गेले तरी त्या अंधारात सुद्धा मला घरातली मेणबत्ती आणि काड्यापेटी अजिबात चाचपडत शोधावी नाही लागत . कारण माझ्या घरात कुठली वस्तू कुठे आहे ते मला लक्षात असतं." त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या मनात त्यांच्याबद्दल असलेल्या श्रद्धेला अचानक भक्तीची पण जोड मिळाली. मला जणू काही माझं ध्येय गवसलं होतं.

आणि माझ्या लग्नानंतर तर या ध्येयाची पूर्ती करायचे अनेक मौके मिळाले. दर दोन वर्षांनी (कधी कधी तर वर्षभरात सुद्धा) नवीन जागी नवऱ्याची पोस्टिंग व्हायची. त्यामुळे आधीच्या जागेचा गाशा गुंडाळून नवीन जागी पुन्हा नव्यानी बस्तान बसवणं, सगळं सामान व्यवस्थित पॅक आणि अनपॅक करणं जणू काही अगदी रुटीन झालं होतं माझ्यासाठी. पहिल्या एक दोन अनुभवांनंतरच मी सहस्रबुद्धे बाईंच्या लेव्हल ला जाऊन पोचले. प्रत्येक बॉक्स मधे ठेवलेल्या सामानाची नुसती लिस्ट बघून त्या बॉक्समधे कोणती वस्तू नक्की कुठे ठेवली आहे हे मी बरोब्बर सांगू शकत होते...अगदी बॉक्स आणि माझे डोळे दोन्ही बंद असताना सुद्धा !

पण या ठिकाणी मला एक जाहीर कबुली द्यायची आहे ...माझी ही वस्तू अचूक शोधण्याची शक्ती - कशी कोण जाणे - पण पर्समधून घराची किल्ली शोधताना मात्र अचानक लुप्त होते. म्हणजे जेव्हा मी किल्ली पर्समधे ठेवते तेव्हा अगदी खुणेनी जागा हेरून ठेवलेली असते. पण जेव्हा तीच किल्ली बाहेर काढायची वेळ येते तेव्हा दोन तीन वेळा सगळी पर्स धुंडाळून सुद्धा दृष्टीला पडत नाही. आणि खास करून जेव्हा माझा नवरा शेजारी उभा असतो तेव्हा तर हमखास ती किल्ली Mr India बनून पर्समधेच कुठेतरी अंतर्धान पावलेली असते. मग नवऱ्याच्या कपाळावरच्या आठ्या आणि त्याचं ते कुत्सितपणे हसत " जरा जास्तच जपून ठेवलीयेस वाटतं" असा टोमणा मारणं - आणि त्याचा आवाज ऐकून लगेच त्या किल्लीनी प्रकट होणं ...हा निव्वळ योगायोग म्हणावा की नवरा आणि किल्ली यांनी माझ्याविरुद्ध केलेली साज़िश !! असो !!!

तसं पाहता, हा योग्य जागी योग्य वस्तू ठेवण्याचा नियम हा वस्तुं इतकाच वास्तु ला पण लागू पडतो असं वास्तुशास्त्राचा अभ्यास असणारे सांगतात. म्हणजे, स्वैपाकघर कुठे असावं, घराचं मुख्य दार कोणत्या दिशेला हवं..इतकंच काय पण अगदी पाण्याचा साठा कुठे करावा वगैरे सारख्या असंख्य गोष्टी वास्तुशास्त्रात नमूद केल्या आहेत. आणि जाणकारांच्या मते जेव्हा एखाद्या वास्तुमधे सगळं काही निर्धारित जागेवर असतं तेव्हा ती वास्तु पण खुश होऊन 'तथास्तु' म्हणते.

हे झालं वस्तू आणि वास्तु बद्दल! पण मला वाटतं की हे 'keep a place for everything' चं तत्वज्ञान आपल्या आयुष्यात अजूनही काही ठिकाणी अंमलात आणणं आवश्यक आहे.

त्यात माझ्या दृष्टीनी सगळ्यात महत्त्वाची आहेत नाती..माणूस जन्माला येण्याआधी पासूनच कितीतरी नात्यांमध्ये बांधला गेलेला असतो. ही जन्मजात नाती अनिवार्य असतात. पण तो जसाजसा मोठा होत जातो तशीतशी अजून बरीच नाती जोडत जातो.... जोपर्यंत प्रत्येक नातं ,त्या नात्याचं माणसाच्या मनातलं स्थान आणि त्या नात्याकडून असणाऱ्या त्याच्या अपेक्षा यांच्या जागा ठरलेल्या असतात तोपर्यंत ही नवीजुनी नाती त्याचं आयुष्य समृद्ध करतात. पण जेव्हा यात गल्लत होते - नात्याचं स्थान आणि पर्यायानी त्याच्या बद्दलच्या अपेक्षा बदलतात- तेव्हा हीच नाती अवजड, बोजड वाटायला लागतात. या संदर्भात मृत्युदंड सिनेमातला माधुरी दीक्षित आणि आयुब खान या दोघांवर चित्रित केलेला एक प्रसंग माझ्या अगदी लक्षात राहिला आहे...मुख्यत्वे करून त्यातल्या संवादांमुळे.....

जेव्हा ती पत्नी तिच्या पतीच्या इच्छेविरुद्ध स्वतःच्या मनाप्रमाणे वागायचं ठरवते तेव्हा तो तिला म्हणतो," अपना औकात में रहिये। हमरा मरद बनने का कोशिस मत किजीए।" त्यावर त्याची पत्नी ऐकवते," औकात को ताकत का तराजू में तौलने का कोशिस मत किजीए। आप हमरा पती हैं, परमेसर बनने की भूल मत किजीए।"

खरं म्हणजे या एका प्रसंगावर एक वेगळा लेख लिहिला येईल, इतकं काही दडलंय त्या दोघांच्या वाक्यांत! पती पत्नीच्या मनातलं एकमेकांचं स्थान, त्या नात्याकडून त्यांच्या अपेक्षा ,त्या दोघांची याबद्दलची विचारसरणी आणि मनोधारणा...हे आणि असंच अजून बरंच काही ! लिहीन पुढे कधीतरी ...सध्या हाती घेतलेल्या मुद्द्यांवर लक्ष देते; नाहीतर लेखातल्या मुद्द्यांची जागा चुकायची !

नात्यांबरोबर जोडलेले असतात अनुभव आणि त्या अनुभवांच्या आठवणी...काही कडू पण बऱ्याचशा गोड अशा आठवणी.आयुष्य जगताना पदोपदी या आठवणी आपल्या मनात डोकावत असतात; किती ताकद असते नाही या आठवणींमधे - या कधी उदासलेल्या मनाला उभारी देतात तर कधी एखाद्या आनंदाच्या प्रसंगात विरजण घालायचं काम करतात.या आठवणी मनात साठवून ठेवताना जर वेळीच योग्य कप्प्यांमधे नीट साठवून, रचून ठेवल्या तर ..... कडू आठवणींची जागा मनातल्या अगदी खालच्या, तळातल्या कप्प्यात ...दिवा घेऊन शोधल्या तरी सापडणार नाहीत अशा ठिकाणी !

आणि गोड, हव्याहव्याशा वाटणाऱ्या आठवणी दर्शनीय कप्प्यांमधे- अगदी सहज, न शोधताही सापडतील अशा !

आणि एकदा का या अनुभवांना, या आठवणींना त्यांची योग्य जागा दाखवली की मग आपोआपच आपल्या मनातले विचार, भावना , इतरांबद्दलची आपली मतं - सगळं सगळं कसं त्यांच्या त्यांच्या योग्य जागी जाऊन बसेल . कारण या अनुभवांच्या पायावरच आपली इतरांबद्दलची मतं, भावना यांचे मजले बांधतो आपण.

जेव्हा आपल्याला ही आवराआवरी जमेल तेव्हा किती सोप्पं होईल ना या आयुष्याला सुखात, आनंदात ठेवणं !मग आपण अगदी ठामपणे म्हणू शकू..

I have a place for everything and I have managed to keep everything in place !!!

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर लिहिलंय. आठवणींचा पसारा आवरुन ठेवायची कल्पना आवडली.पण तसं मला स्वतःला या आयुष्यात जमेल असं काही वाटत नाही.कारण मला आठवणींना प्रॅक्टीकली कधी बघताच येत नाही. Happy
पु.ले.शु!

छान लिहिले आहे.
रात्री झोपायच्या वेळी कॉटवरची सगळी गाठोडी स्टडी टेबल वर जायची आणि अभ्यास करायची वेळ झाली की तिथून सगळी वरात परत कॉटवर

माझी एक रूममेट अश्शी होती. पण ती याहूनही आळशी होती. खुर्चीवर ठेवलेले कपडे उचलायला नको म्हणून ती अभ्यासपण कॉटवर बसून करायची Wink

खूप सुंदर लेखन. जपानी कायझेन, सिक्स सिग्मा की काय ते त्याची आठवण आली. माझा धाकटा मुलगा सेम तुमच्या भावासारखा आहे. मीच अनेकदा त्याचे टेबल आवरतो. कपडे हॅंगरला अडकवतो. कधी कधी ही आवराआवरी करण्याची चांगली सवय ओसीडीत बदलू शकते.

लेख आवडला. मी तुमच्या भावासारखा. Happy

पण कुणाला अपेक्षांच्या कप्प्यात न ठेवणच बरं. Happy

छान लिहिलंय.
मी पण तुमच्या कॅटेगरीत. #आवाराआवरी

छान लिहिलंय.
मी पण तुमच्या कॅटेगरी मधली होते पण आता आळशी झालीये.

लेख आवडला.
Keep a place for everything and keep everything in place. हे माझंही आवडतं वाक्य. मी ही तसा आवराआवरी पक्षातला.
पण अधून मधून तुमच्या वडलांसारखाही असतो 'There is a order in the chaos'

छान लिहिला आहे लेख. आवडला.

जोपर्यंत आवराआवरी वेळ घालवणे किंवा स्वानंदासाठी असते तोपर्यंत छान, पण जेव्हा त्याची OCD होते तेव्हा स्वतः आणि त्याबरोबर घरातल्यांचा छळ होतो. Happy

जोपर्यंत आवराआवरी वेळ घालवणे किंवा स्वानंदासाठी असते तोपर्यंत छान, पण जेव्हा त्याची OCD होते तेव्हा स्वतः आणि त्याबरोबर घरातल्यांचा छळ होतो. > मीरा +१
माझ्या घरच्यांचा सुरु झालाय असा छळ. Lol