काय कौतुक करायचं

Submitted by ट्यागो on 14 July, 2019 - 12:09

पावसाचं काय कौतुक करायचं

तो आला की तू येतेसच

त्याच्याचसारखी धडपडत धडधडत

रिप रीप टिपत रडत कोसळत झोडत

टीपेचा सूर वाढत वाढत

सुन्न भिन्न बधीर

कातळ फोडत

तुला पर्वा नसते

किती काय कसं कधी

भिजतं बुजतं मरतं का रुजतं

तुझी घोडेस्वारी तल्लीन होऊन पहावी अशी

एककल्ली तुझ्या धुंदीत

चिंता फिकीर झाट झुट

नखं नजर कोपर ढोपर तीक्ष्ण

बाहेर काळोखलयं ते ढगांनी की तुझ्या ओल्या काळ्या केसांनी

कळत नाही

केस श्वास वाळा सुवास घाम पाऊस

मऊ ओल कापूस जागा कापूर मन

रिते मोकळे तुटल्या काजा

पोटात पाय जन्माचे प्रश्न प्रश्न प्रश्न

भिजायचे क्षण जपायबिपायची भानगड ठेऊ नये

पाऊस येवो न येवो

ऊन थंडी घाम धुकं ऑक्टोबर एप्रिल वसंत वैशाख श्रावण आषाढी

श्वास ओल ओठ पाठ स्तन

सगळं पाठांतर करुन घेऊन

नेहमी पाऊसच येतो

कुरण चरायला घोडे जातात आणि गोल टोपी घालून पिंगा घालत येतेस तू

तुझं काय कौतुक करायचं

मयूरेश चव्हाण, मुंबई
१३/०७/२०१९. २२.५९.

Group content visibility: 
Public - accessible to all site users