रसरशीत आयुष्यातला टवटवीतपणा...!

Submitted by Charudutt Ramti... on 11 July, 2019 - 06:08

एप्रिल मे महिन्यात भाज्या अगदी ‘जून’ मिळतात, पण त्याच भाज्या ‘जून’ मध्ये मात्र कोवळ्या आणि रसरशीत. पावसाळा सुरु झाला की पहिल्या तोडीच्या हिरव्या रसरशीत भाज्या मंडईत येऊ लागतात. मग त्या भाज्या तुमच्या हातात पिशवी आणि खिश्यात सुट्टे पैसे असतील तर, अक्षरश: वयात आलेल्या मुलीनं तिच्या अवखळ आणि नखरेल वागण्यानं तुमचं लक्ष तिच्याकडे वेधून घ्यावं तश्याच ह्या वयात आलेल्या कोवळ्या भाज्याही तुमचं लक्ष त्यांच्याकडे वेधून घेतात.

ती भलीमोठी अडीच तीन फुट व्यास असलेली बुरुड गल्लीत वेताचं चौकडी चौकडीचं विणकाम केलेली दुरडी. त्यात भिजलेलं गोणपाटाचं पोतं ( की पोत्याचं गोणपाट? ). शेजारी चितळे किंवा गोकुळ दुधाची चप्प पिशवी. त्या पिशवीत ठेवलेल्या दहा-दहा, वीस-वीस रुपयांच्या चलनी नोटा. त्याही भिजून आणि दोन्ही बाजूस माती लागून अगदी भाजीशी तद्रूप झालेल्या. असा सगळा तो प्रपंच. आणि त्या सगळ्या प्रपंचाचा वारकरी म्हणजे एक पांढरा अंगरखा आणि पायजमा अथवा धोतर नेसलेला डोईवर मुंडासं किंवा साधी गांधी टोपी परिधान केलेला कष्टाळू शेतकरी. किंवा मग कपाळी एक बंद्या रुपया एवढं भलंमोठं कुंकू आणि अंगावर गर्द हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसलेली आणि मनगटात भरगच्च हिरवा चुडा ल्यालेली सावळ्या रंगाची पण नुकत्याच मळ्यातून तोडून आणलेल्या आणि त्यावर थंडगार पाणी शिंपडलेल्या भाजीइतकीच तरतरीत अशी, दुरडी शेजारी मांडी घालून तराजूत भाजी मापणारी मध्यमवयीन माळीण. मी चित्रकलेत (आणि छायाचित्रकलेतही) खूप ‘ढ’ आहे म्हणून पण जरासुद्ध बरी असती माझी चित्रकला तर मी ह्या अश्या मंडईतल्या भाजी विकायला बसलेल्या शेतकऱ्यांची, माळ्यांची , कुणब्यांची आणि बागवानांची सुंदर छायाचित्रं , तैलचित्रं किंवा रेखाचित्रं काढून त्याचं एक प्रदर्शनच भरवलं असतं जहांगीर आर्टगॅलरीत.

भाजी , जून की निब्बर , देशी की संकरीत, पहिल्या तोडीची की दुबार , हे सर्व, तिच्याकडे पाहिल्या पाहिल्या सराईतासारखं ओळखता येणं हे एखाद्या ‘उंची ब्रिव्हरी मधल्या वाईन वा बियर टेस्ट करणाऱ्या टेस्टर पेक्षा किंवा उच्चभ्रू टी इस्टेट मधल्या चहाची पारख करून त्याचा भाव ठरवणाऱ्या 'टी टेस्टर' पेक्षा तसूभर ही कमी कौशल्याचं नाही. एखाद्या कलेला वारेमाप प्रसिद्धी आणि आब मिळतो आणि एखाद्या कलेला नाही मिळत. असं का? ते मला नक्की माहिती नाही. पण म्हणून ती कला छोटी नाही होत. तसंच मंडईतून वेचून वेचून निवडक भाजी आणणार्यांचं ही.

मेथी नेहमी गोल पानाची घ्यावी, वांगी छोटी छोटी हिरवी आणि काटेरी असल्यास उत्तम, कोणता अळू खाजरा आणि कोणता नाही, दोडक्याच्या शिरा अंगठ्याच्या नखाने दाबून तो किती कोवळा आहे आणि किती जून ते पडताळणे, पालकाच्या पानांच्या शिरांवरून पालक चवदार असेल की नाही? असे असंख्य निकष तोंडपाठ असतील तर भारतीय उपखंडातील भाजी मंडई नावाच्या विश्वकोशात ( एनसायक्लोपीडिया हर्बीवोरस इंडिजिनिया मध्ये ) तुमचं स्थान अढळ आहे. पण हे निकष समजणे इतकं सोपं नाही. त्यासाठी गाणाऱ्याला कसं आठव्या वर्षापासूनच गळा तयार व्हावा म्हणून एखाद्या मोठ्या जाणकार गवयाच्या पुढ्यात बसून तासंतास ते गवई सांगतील तसा रियाज करावा लागतो, तसंच तुम्हाला सुद्धा अगदी आठवर्षांचा असताना आईचं बोट पकडून ती नेमकी कोणती भाजी घेतीय आणि तिची परीक्षा काय हे जाणीवपूर्वक समजून घ्यावं लागतं.

भाज्यांचे घाऊक आणि किरकोळ भाव हा मात्र एक अतिगहन विषय आहे. मुबईतल्या दलात स्ट्रीट वर अचानक वधारणारे आणि धाडकन कोसळणारे शेयर्स चे भाव , आखातात दिवसागणिक बदलणारे कच्च्या तेलाचे भाव, अमेरिकी डॉलर च्या मानाने भारतीय रुपयाची जागतिक बाजारपेठेत झालेली घसरण आणि अर्थसंकल्पाची क्लिष्टता विशद करणारा लोकसत्तेतला किंवा मटा मधला अग्रलेख, हे सगळे तुम्हाला एकवेळ आत्मसाद होऊ शकेल. पण ‘मंडईतल्या भाज्यांचे भाव’ हा निदान मलातरी कधीच ‘न’ उलगडा झालेला विषय आहे. त्यातल्या त्यात पालेभाज्या हे ह्या शाक-अर्थशात्रातलं सगळ्यात क्लिष्ट आणि फसवं प्रकरण. तुम्ही करडईच्यापेंडी कडे अगदी आत्मविश्वासाने बोट दाखवून “तांदळी कशी हो दिली मावशी?” असं म्हणालात की तुमची विकेट पडलीच म्हणून समजा. त्यादिवशी मग करडई ची पेंडी तुम्ही तब्बल अडीच पट भावाने घरी घेऊन येणार. आणि घरी आल्यावर तुमची सौ. मग तुमच्या स्वाभिमानाच्या अळूचं अक्षरश: फदफद करणार. " अहो कशाला आणलीत ही एवढी अंबाडीची पेंडी , आता तुम्हीच निवडा! " आपण अज्ञाना पोटी नक्की कोणती भाजी आणलीय हे न समजून घेता वर्तमान पत्र खाली अंथरून पुढील पंचेचाळीस मिनिटं पाठ भरून येईस्तोपर्यंतती निवडणं, ह्याहून कठोर शिक्षेची तरतूद इंडियन पिनल कोड मध्ये घरगुती गुन्ह्यांसाठी अजूनतरी अस्तित्वात नाही.

टोमॅटो , दुध्या , ढेमसी , दोडकी , तोंडली आदी फोडभाज्या किंवा फळभाज्या त्या मानाने तश्या कळायला सुगम. पण तरीसुद्धा फाजील आत्मविश्वास घातकी ठरू शकतो कारण अश्या फळ भाज्या खरेदीवेळी 'वजनमापे' हा विषय हुलकावणी देणारा. तीन पावशेर म्हणजे नक्की किती, अर्धा छटाक म्हणजे काय, एका तागडीत ती खाली गेल्यावर एकीकडे पारड्यात छोटा बटाटा आणि दुसरी कडील पारड्यात एका प्लास्टिक च्या पिशवीत सुतळीने सरगाठ बांधून दोन छोटी छोटी दगडं पारड्यात टाकल्यावर सर्व गुरुत्वाकर्षणाचे नियम धाब्यावर बसवून नक्की कुठलं पारडं जड होणार? हे सर्व मला, माझी रास ‘धनु’ असून सुद्धा, आजतागायत अकल्पित आहे. त्या 'अंधा कानून' च्या मूर्तीने तोलावी तशी तराजूत तोललेली भाजी “दिडपावशेर ला जरा जास्त भरते तर असुदे, दहाला पावशेर द्या” असं म्हणत संध्याकाळी घरी येता येता आणलेली भाजी सूरी ने किंवा विळीने कट्यावर उभ्या उभ्या चिरून आणि पाचंच मिनिटात फोडणी देऊन अंदाजानेच बनवली तरी रात्री चौघांच्या जेवणा नंतर अजिबात शिल्लक न राहता बरोब्बर ती दीड दांडी मापलेली भाजी सगळ्यांना पंगतीत कशी काय पुरते ह्याचं - काळ, काम, वेग ( आणि वजनाचं ) अनाकलनीय गणित एखाद्या गृहकृत्यदक्ष गृहिणीला कसे काय समजते हे मला आजता गायत न उलगडलेलं अगम्य असं सांसारिक कोडं आहे.

किरकोळ भाज्या आणणे एकवेळ परवडले. पण घरात सांबार करायचं ठरलं तर मग मात्र तुमची विषाची परीक्षा. सांबराला लासलगावचे मोठे लाल नव्हे तर महाबळेश्वरी मुळ्याच्या आकाराचे छोटे छोटे पांढरे कांदे लागतात हा कॉमन सेन्स ज्याला नाही त्याने संभारासाठी लागणाऱ्या भाज्यांच्या खरेदीसाठी एकट्याने बाहेर पडण्याचं धाडस उभ्या आयुष्यात कधी करू नये. कधी काळी यदा कदाचित मी जर घटना दुरुस्ती च्या पार्लियामेंटरी कमिटी चा सदस्य झालोच तर, सांबार बनवण्यास लागणाऱ्या भाज्यांच्या यादीत लिहिलेल्या सगळ्या भाज्या चक्क दुसरी चक्कर न मारता एकाच फेरीत कुणी पुरुष घेऊन आल्यास त्याला ‘पद्मश्री’ आणि शाकंभरीच्या नवरात्राच्या नैवेद्याची मंडई सौभाग्यवतीच्या एकाही तक्रारी शिवाय आणणाऱ्यास ‘पदमभूषण’ किताब देण्याची तरतूद घटनेत असावी, अशी घटना दुरुस्ती मी सुचवेन.

एकंदरीतच मंडई आणणे , आणल्यावर ती भाजी निवडणे आणि पुढे ती फ्रीझ मध्ये एकेक करून सगळ्यात तळातील कप्प्यात रचून ठेवणे, हा आठवडी कार्यक्रम प्रापंचिक आयुष्य अगदी टवटवीत करणारा आहे. कधी काळी नरसोबाच्या वाडी ला देवदर्शना करीता गेल्यावर परत येता येता रस्त्याकडेला बसलेल्या भाजीवालीकडून कृष्णा काठची वांगी विकत घेतली नसतील, किंवा खास रविवारी सकाळी साडेसात पावणे आठला पुण्यात जाऊन मंडईतून किलो दोन किलो चढ्या भावानं ताजी तवानी मटार विकत आणली नसेल, किंवा ऑफिस मधून येता येता सहज दिसले म्हणून दोन पिवळे आणि एक कच्चा हिरवा पेरू रुमालात बांधून आणला नसेल तर जीवन व्यर्थ आहे. मला कधी कधी ग्रोफर्स किंवा बिग बास्केट वाल्यांची कीव येते. अरे भाजी आणि फळं ही काय ऑनलाईन घ्यायची चीज आहे? ऑनलाइनच मागवायचीय तर डायरेक्ट 'मशरुम मसाला किंवा पालक पनीर ' मागवा एकवेळ झोमॅटो किंवा स्वीगी वरून पण मंडई आणायची तर ती मंडईत जाऊनच. ऑनलाईन मंडई करणे म्हणजे विटी दांडूचा अस्सल ग्रामीण खेळ खेळायला एटीन होल्स च्या गोल्फकोर्स वर जाण्यासारखं आहे. ज्यांना मंडईत जाऊन तळपायांना माती लागलेली आणि पॅंटी चिखलाने माखलेल्या नाही आवडत त्यांनी फारफार तर मोर , बिग बाजार आणि स्टार बाजार मध्ये जाऊन मंडई आणि बाजार करावा पण भाजी ही ऑनलाईन घेण्याची नक्कीच चीजवस्तू नाही.

मी ही जातो कधी कधी वेळ नसला दूर मंडईत जाण्याइतका, आणि लहर आली की ‘मोर’ मध्ये नाही असं नाही. पण तरीसुद्धा मोर मधली फ्रीझ मध्ये निपचित पडलेली भुरकट रंगाची किवी , तांबूस लालसर गाली रुज लावलीतरी अंगी कृत्रिमता जाणवणारी स्ट्रॉबेरी आणि ललनेने स्वतः च्या ओठांवर लिपस्टिक घासत ओठ चकाकवावेत तशी वॅक्स लावून चकाकणारी ती स्टिकरवाली सफरचंद. मला कधीच ती मोर किंवा बिग बाजार वाली फळे आणि भाज्या त्यांच्याकडं बोलावून घेत नाहीत. त्याउलट दुपट्यात गुंडाळलेली तान्ही बाळं मोहक अश्या नजरेनं जशी आपल्याकडे हसून पाहतात आणि आपल्याला त्यांच्या निरागस हास्यातुन “मला उचलून घ्या” असं अबोलपणेच खुणावतात, तश्याच मोहक नजरेनं वेताच्या दुरडीत वांगी किंवा दोडकीच्या बाजूला पिंपळाच्या पानात स्वतःला गुंडाळून हळूच लपून बसलेली ती करवंद, मी मंडईत गेलो की माझ्या कडे पाहत ‘ मला उचलून घ्या' असं म्हणत त्यांच्या जवळ जाऊन त्यांना उचलण्यासाठी मला भाग पाडतात.

चारुदत्त रामतीर्थकर.
११ जुलै २०१९, पुणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय मस्त वर्णन केलंय भाजीखरेदीचं.
किरकोळ भाजीखरेदी मी नक्कीच करु शकते. हे आज मला तुमच्या या लेखावरुन कळालं. Lol

खूपच छान लेख आवडला आणि बऱ्याच गोष्टी रिलेट झाल्या .. विशेषतः रुमालात पेरू बांधून ला अगदी अगदी झालं !!
भाजी आणायला जायची इच्छा होतेय आताच हे वाचून >> हो ना खरंच ! रुक्ष कोड टंकत बसण्यापेक्षा हे किती भारी ..

मी तुमचा फॅन झालो आज.
लहानपणापासून जीवनाचा आनंद कसा घ्यावा याची काही वडिलोपार्जित जीवनपद्धतीची सूत्रे माझ्यापर्यंत पोहोचली त्यातलं हे एक मोठ सूत्र ... तुम्ही उत्तमपणे उलगडून ठेवलत !

सांबराला लासलगावचे मोठे लाल नव्हे तर महाबळेश्वरी मुळ्याच्या आकाराचे छोटे छोटे पांढरे कांदे लागतात हा कॉमन सेन्स ज्याला नाही त्याने संभारासाठी लागणाऱ्या भाज्यांच्या खरेदीसाठी एकट्याने बाहेर पडण्याचं धाडस उभ्या आयुष्यात कधी करू नये...... अगदी.

- मस्तच लेख.

रुक्ष कोड टंकत बसण्यापेक्षा हे किती भारी ..>>>> अगदी अगदी.. ह्या छान पावसाळी हवेत गरमागरम मक्याचे कणीस न खाता काचेच्या खोलीत स्वतःला कोंडून घेऊन 'कोड'गे पणा करावा लागतोय ह्यापेक्षा दुर्दैव ते काय?
आधीच तो खोट्टे चा धागा वाचून भूक चाळवलीय

लेखाला दिलेल्या पसंतीबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद !

>>> लहानपणापासून जीवनाचा आनंद कसा घ्यावा याची काही वडिलोपार्जित जीवनपद्धतीची सूत्रे माझ्यापर्यंत पोहोचली त्यातलं हे एक मोठ सूत्र ... ! <<<
अगदी छान.

पशुपत,
जीवनात आनंद छोट्या छोट्या गोष्टितंच दडून राहिलेला असतो, प्रौढत्व आलं तरी छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद वेचण्याची क्षमता कमी होऊ न देणे हेच सुखी जीवनाचं गमक.

पुन्हा एकदा सर्व वाचकांचे आणि अभिप्राय कर्त्यांचे मन:पूर्वक धन्यवाद.

छान लिहिलंय..

>>>>पण हे निकष समजणे इतकं सोपं नाही. त्यासाठी गाणाऱ्याला कसं आठव्या वर्षापासूनच गळा तयार व्हावा म्हणून एखाद्या मोठ्या जाणकार गवयाच्या पुढ्यात बसून तासंतास ते गवई सांगतील तसा रियाज करावा लागतो, तसंच तुम्हाला सुद्धा अगदी आठवर्षांचा असताना आईचं बोट पकडून ती नेमकी कोणती भाजी घेतीय आणि तिची परीक्षा काय हे जाणीवपूर्वक समजून घ्यावं लागतं.<<<

जरा हे निकष पण लिहा नं ज्यांना हे कळत नाहीत त्यांच्यासाठी प्रतिसादात..

>>> जरा हे निकष पण लिहा नं ज्यांना हे कळत नाहीत त्यांच्यासाठी प्रतिसादात.. <<<

निरु >>> नेहमी गोल पानाची घ्यावी, वांगी छोटी छोटी हिरवी आणि काटेरी असल्यास उत्तम <<< दोन तीन लिहिलेत मला माहिती असलेले , सगळे मला तरी कुठे माहितीयेत. इथे बरेच जाणकार असतील, त्यांनीच सांगितल्यास बरं !

त्याउलट दुपट्यात गुंडाळलेली तान्ही बाळं मोहक अश्या नजरेनं जशी आपल्याकडे हसून पाहतात आणि आपल्याला त्यांच्या निरागस हास्यातुन “मला उचलून घ्या” असं अबोलपणेच खुणावतात, तश्याच मोहक नजरेनं वेताच्या दुरडीत वांगी किंवा दोडकीच्या बाजूला पिंपळाच्या पानात स्वतःला गुंडाळून हळूच लपून बसलेली ती करवंद, मी मंडईत गेलो की माझ्या कडे पाहत ‘ मला उचलून घ्या' असं म्हणत त्यांच्या जवळ जाऊन त्यांना उचलण्यासाठी मला भाग पाडतात.
मनाला भावलं. अगदी खर आहे, मोर अथवा बिग बजार मधिल भाज्या कितीही गारव्यात रहात असल्या तरी त्यांना झाडाखाली टोपलित ओल्या कापडाखाली वाराच्या झुळकेत पहूडलेल्या भाज्यांच्या ईतका टवटवित पणा नाही.

मला लहानपणी पाहिलेल्या सांगलीच्या बाजाराची आठवण झाली .या बाजारातून सांगली संस्थानाचा हत्ती फेरी मारत असे. आणि मस्त केळी आणि ताज्या ताज्या भाज्या ,भाजीवाल्यांकडून वसूल करत असे अन गट्टम करत असे. खूप मस्त असे तो आठवड्याचा बाजार.

आमच्या कडे मेथीची भाजी लालकोराची म्हणजे पानांच्या कडा लालसर असल्या तरच घेणारे जूडीला हात लावतात. मेथीची शेंगदाणे,हिरवी मिरची चे वाटण घालून केलेली भाजी सोबत गरम पापुडा असलेली बाजरीची भाकर. काय सांगावं जणू अमृतच. शेपूची भाजी केली तर घरभर मस्त वास दरवळतो. पुर्वी संकरीत टमाटे येण्यापूर्वी मदनफल्ली नावाची जात टमाट्याची होती. टमाटे तोडून निवडून लहान टोपलीत जिला शिबले म्हणायचे तीत गोलाकार रचून वर मोठी फळे लावायची, व्यवस्थित बांधून तालुक्याला न्यायची. दोन पाच रूपये टोपलीचे मिळाले तर खूप आनंद व्हायचा. घरी दुधीचा वेल असला तर खाऊन खाऊन कंटाळा यायचा. तिच गत वांगी, गिलकी यांची असायची. आठवडा बाजार अर्धा दिवस शाळा असायची. केळी व भेळ हा खाऊ ठरलेला. सीझन प्रमाणे आंबा,पेरू, कलिंगड वगैरे.
आता फ्रिजमध्ये कितीही भाज्या असल्या तरी पुर्वीसारखी चव लागत नाही. सगळं संकरीत.