माझा शाळेचा तो रस्ता

Submitted by द्वैत on 5 July, 2019 - 09:26

माझा शाळेचा तो रस्ता

भल्या पहाटे त्या रस्त्याने
एक दुधाची गाडी जाई
घोडा सायकल ढकलत ढकलत
पेपरवाला गठ्ठे नेई

वळणावरच्या जुन्या मंदिरी
रोज दिसे तो वृद्ध पुजारी
अन बाजूच्या फुटपाथावर
निजलेले ते चार भिकारी

पुढे जरा मग जाता लागे
बंद उभा गिरणीचा भोंगा
ज्याच्या अगदी समोर होता
घोड्याविन गंजलेला टांगा

तिथून पुढे मग वाटेत येई
एक छोटेसे अजब दुकान
आम्हा मुलांना तिथे सापडे
जे जे लागे ते सामान

शाळेपाशी येता येता
उभी असे एक हातगाडी
चिंचा, बोरे, आवळे, पेरू
देई बडीशेप ची काडी

घरापलिकडे अपुली दुनिया
ह्या वाटेने झाली सुरू
उनाड किस्से धमाल गमती
हृदयामध्ये बंद करू

सात समुद्रापार उडालो
वर्षे गेली बघता बघता
तरी अजून ही स्मरणी आहे
माझा शाळेचा तो रस्ता
माझा शाळेचा तो रस्ता

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह