काळा वाघ

Submitted by बिपिनसांगळे on 4 July, 2019 - 13:58

काळा वाघ
------------------------------------------------------------------
क्रिकेट ची मॅच अगदी रंगात आली होती .
सिया अगदी मन लावून पाहत होती . विराटनं एक मस्त षट्कार मारला . ते पाहून सिया आनंदानं टाळ्या वाजवू लागली . टाळ्या वाजवतच ती ओरडली , " रिया "...
त्यावर अगदी एखाद्या दांडग्या कुत्र्याच्या आवाजात रिया ' भॉ .... ' करून भुंकली . तो आवाज ऐकून सिया दचकलीच . ही रिया ना .... वेडी ! मॅच आवडत नाही म्हणून असं भुंकायचं ?
तेवढ्यात तिच्या मानेला रियानं चाटलंसुद्धा . छे ! हे अति होतंय , सियाला वाटलं. तिनं मागं वळून पाहिलं आणि ती जोरात किंचाळली .
तिच्या मागे रिया नव्हती ; तर एक दांडगा , डेंजर, काळा कुत्रा होता . जणू वाघच ! रियानं दार उघडं टाकल्यामुळे थेट घरात शिरलेला .
तिच्या किंचाळण्यानं ,आई किचनमधून आणि रिया बाहेरून एकदमच पळत आल्या . आई तर घाबरून ओरडायला लागली. घरामध्ये हा असला कुत्रा म्हणजे... बापरे !
खरंतर रियाला प्राण्यांची आवड होती . पण हा असा अचानक अवतरल्यावर कोणीही घाबरणारच ना ? त्या तिघींची भीतीनं गाळण उडाली होती . पण तो कुत्रा मात्र अगदी शांत बसून होता .
हळूहळू रिया शांत झाली . तिनं त्याला जवळ बोलावलं . तोही अगदी शहाण्यासारखा तिच्याजवळ जाऊन , शेपूट हलवू लागला . आता , रिया आपला लाड करणार आहे हे त्यानं जणू ओळखलं होतं .
तोपर्यंत सियाही सावरली . तिनं आतून बिस्किटं आणली . ती त्या काळूरामनं आनंदानं , मिटक्या मारत खाल्ली .
त्या दोघींना काळूराम आवडला आणि काळूरामला त्या दोघी ! त्या तिघांची चांगलीच गट्टी जमली.
त्याचं असं झालं होतं -
त्यांचं घर एका मोठ्या बैठ्या घरांच्या कॉलनीत होतं. त्यात खूप गल्ल्या होत्या . तिथंच दोन - चार गल्ल्यांपलीकडे कालिंदी आजी राहायच्या , एकट्याच . हा कुत्रा त्यांचाच होता . आजींच्या मिस्टरांनी त्याचं नाव ' ब्लॅक टायगर ' ठेवलेलं होतं . त्यावरून आजी त्या कुत्र्याला ' काळा वाघ ' अशी हाक मारायच्या .
भर दुपारची वेळ होती . उन्हाच्या गरम झळा लागत होत्या . अंगाची काहिली होत होती . झाडाचं एकही पान हालत नव्हतं . तशातच आजी औषध आणायला निघाल्या . टायगर लगेचच त्यांच्या पाठोपाठ निघाला . आजी ओरडल्यावर तो थांबला खरा पण त्यांची पाठ वळताच पुन्हा दबकत त्यांच्यामागं चालू लागला.
आजी कोपऱ्यावरून वळल्या . समोरच महानगरपालिकेची कुत्र्यांना पकडणारी गाडी उभी होती . ती गाडी कुत्री लगेच ओळखतात . मग , ती पाहून ते पळून जातात आणि कुठेतरी लपून बसतात .
झालं , आजी पुढे गेल्या आणि ब्लॅक टायगर ..... ?
टायगर वाट फुटेल तिकडे पळत सुटला . त्या गाडीपासून लांब.... दुसया गल्लीत शिरला तर तिथली कुत्री त्याच्या मागे लागली. त्यामुळे टायगरची अवस्था आणखीनच बिकट झाली . एव्हाना पळून पळून तो दमला आणि त्याला तहानही लागली होती . आता त्याला आपल्या घराची , आजींची आठवण येऊ लागली . तिथं थांबणं त्याला नकोसं वाटू लागलं .
त्यातच संध्याकाळ झाली. तो इकडे - तिकडे भटकत असताना आता सियाच्या गल्लीतली कुत्री त्याच्या मागे लागली होती. अशा प्रकारे, त्यांची पासून कसाबसा बचाव करत तो सियाच्या घरात शिरला होता.
रियाला मुळात प्राण्यांची आवड होतीच पण सियाला मात्र, जर ते प्राणी ओके असतील तरच आवडायचे - मात्र हळूहळू ! त्या दोघी जुळ्या बहिणी असूनही त्यांचं एकमेकींशी अजिबात पटत नसे. एकीनं नवीन फॅशनप्रमाणे जर एक वेणी उजव्या बाजूला बांधली तर दुसरी ती डाव्या बाजूलाच बांधणार. अशा होत्या त्या दोघी !
पण आता, ब्लॅक टायगर सोबत मात्र दोघी एकत्र खेळू लागल्या.
ब्लॅक टायगर उर्फ काळा वाघ सोफ्यावर दोघींच्या मध्ये अगदी मजेत बसला होता. एकीकडे सिया त्याची पाठ खाजवत होती, तर दुसरीकडे रिया त्याचं डोकं थोपटत होती . त्याचे काळ्या मखमलीसारखे केस चमकत होते. अशा प्रकारे बराच वेळ गेला.
तितक्यात " टायगर ,टायगर ..." अशा हाका ऐकू आल्या आणि त्यानं कान टवकारले . तो उठून शेपूट हलवू लागला . आजी त्याला शोधात तेथे आल्या. त्यांना महानगरपालिकेच्या गाडीचं प्रकरण माहीतच नव्हतं .
टायगरनं लगेच भुंकून प्रतिसाद दिला आणि सोफ्यावरून उडी मारून तो बाहेर पळाला.
आजी भलत्याच रागीट होत्या. त्या बाहेरूनच ओरडल्या , " माझा टायगर पळवता का ? आँ ? तुम्हाला काय वाटलं , तो तुमच्याकडे राहील होय ? तुम्ही स्वतःच पाळा ना एखादा कुत्रा ....."
बापरे ! आजींची तोफ धडधडतच होती .
बिचाऱ्या सिया आणि रिया हिरमुसून शांत बसल्या . शिवाय त्यांना आईची बोलणी खावी लागली ती वेगळीच .
पण दुसऱ्या दिवशी तो काळा वाघोबा परत आला. त्याला सिया-रियानं केलेला लाड आवडला होता. तो जिथे राहायचा, तिथली मुलं त्याचा लाड करत नसत. आजींचा रागिट स्वभाव त्याला कारणीभूत होता.
थोड्याच वेळात आजी आल्या. त्या टायगरला आणि रिया - सियाला ओरडल्या . मग बिचारा टायगरही मन खाली घालून आजींच्या पाठोपाठ निघून गेला.
त्यानंतर आठवडाभर टायगर पुन्हा फिरकलाच नाही.
पण एके दिवशी अचानक तो जोरात पळत आला. रिया अंगणातल्या चाफ्याच्या झाडाखाली उभी होती. टायगर आला आणि त्यानं थेट रियाच्या अंगावरच उडी मारली. ती अतिशय घाबरली, तिला खूप राग आला. पण टायगर तिची जीन्स धरून ओढू लागला. तेवढ्यात सियाही तिथं आली. त्या दोघींच्या लक्षात आलं, त्याला काहीतरी सांगायचंय, कुठेतरी न्यायचंय.
त्या दोघी त्याच्या मागोमाग गेल्या. टायगरनं त्यांना आपल्या घरी नेलं.
तिथं पाहतात तो काय ! आजी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने बेशुद्ध झाल्या होत्या.
सिया - रिया धावतच आपल्या घरी गेल्या आणि आईला घेऊन आल्या. त्यानंतर आजींना दवाखान्यात नेलं. तेव्हा मात्र दोन दिवस तो काळा वाघोबा मुलींकडे मुक्काम ठोकून होता.
काही दिवसांनी आजी बऱ्या होऊन हॉस्पिटलमधून घरी आल्या.
आता , सिया आणि रिया आजींकडे जाऊन कधीही ब्लॅक टायगरशी खेळू शकत होत्या. कधी टायगर मुलींकडे एकटा यायचा तर कधी आजींसोबत.
आजींना आईच्या हातचं पन्हं खूप आवडत असे आणि टायगरला चॉकलेट केक खूप आवडायचा.
गम्मत म्हणजे आजींना मॅच पाहायला आवडते आणि विराटही. कधी-कधी बाबा, सिया आणि आजी आयपीएल पाहायला एकत्रच बसतात . त्यांचा आरडाओरडा चालू असताना रिया मात्र अंगणात काळ्या वाघोबाबरोबर मस्ती करत असते .
--------------------------------------------------------------------------
बिपीन सांगळे
bip499@hotmail.com

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान Happy
तुमच्या गोष्टी वाचताना क्षणभर का होईना पुन्हा लहान होता येतं मनानं..विचारांनी..स्मृतिनी !
अशी छान टाइम मशीन मायबोलीवर उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.

मस्तच..... Happy
सध्या बालकथा लिहिणारे फारच दुर्मीळ झालेत...

छान 
तुमच्या गोष्टी वाचताना क्षणभर का होईना पुन्हा लहान होता येतं मनानं..विचारांनी..स्मृतिनी !
अशी छान टाइम मशीन मायबोलीवर उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
+ 1

Mast Happy

रमणी आभार .
ही प्रतिक्रिया आवडली कि गोष्ट मुलीला सांगणार .
(तिचीही प्रतिक्रिया ऐकायला आवडेल मला )

मला असं वाटतच की मोठ्यांनी माझ्या गोष्टी वाचाव्यात
पण त्या मुलांपर्यंत 'पोचवाव्यात 'असं जास्त वाटतं .

तुम्ही अशी प्रतिक्रिया दिलीये त्यामुळे ती महत्त्वाची आहे

आणि एक विनंती - इतरही बालकथा आणि माझ्या बालकथा , माबो वरच्या, वाचाव्यात
आणि त्या वरही प्रतिसाद द्यावा