माझ्या मराठी मातीत

Submitted by सा. on 1 July, 2019 - 08:45

माझ्या मराठी मातीत
पडे छाया आभाळाची
दरी-खोर्‍यांतून जाती
संथ पावले काळाची

माझ्या मराठी मातीत
येते गाज सागराची
गंध वाहे मोहराचा
हवा खारी आगराची

माझ्या मराठी मातीत
वाहे शांतरस साचा
समाधिस्थ आहे तीत
कुणी पोर संन्याशाचा

माझ्या मराठी मातीत
रंग दूर्वांनाही लाल
रक्त सांडलेले इथे
पावनखिंडीत काल

माझ्या मराठी मातीला
नाद टाळ-मृदंगाचा
देई विश्वाला अवघ्या
वर पसायदानाचा

माझ्या मराठी मातीत
ऐका स्वर जुने येती
देती निरोप प्रियेला
'जातो गं पानिपती!...'

माझ्या मराठी मातीत
थकून ओढिता जाते
'अरे संसार संसार'
एक ग्रामकन्या गाते

माझ्या मराठी मातीत
उभे रायरी-पन्हाळा
घेती टक्कर मेघांशी
आठवित शिवबाला

माझ्या मराठी मातीत
ऐशी गरिमा भक्तीची
देव भक्ता भेटी धावे
वीट सोडून पायीची

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळीच कविता सुंदर...

माझ्या मराठी मातीत
ऐशी गरिमा भक्तीची
देव भक्ता भेटी धावे
वीट सोडून पायीची >>> विशेष आवडले Happy

आवडली कविता.

जाताजाता -
गरिमा शब्द हिंदी वाटतोय; गरिमाचा अर्थ शान असा होतो ना, भक्ती सोबत ठीक वाटत नाही
'महती' शब्द वापरता येईल का? म्हणजे छंदात बसेल का?

From TransLiteral Foundation

गरिमा › word
ना. गांभीर्य , गुरुत्व , बारदस्तपणा ;
ना. थोरवी ,, महर्ता , महानता , महिमा ...