गुप्तधन

Submitted by अँड. हरिदास on 1 July, 2019 - 03:26

दुपारी 12 ची वेळ..सखा आपल्या दुचाकीवरुन शहराच्या रस्त्याने जातोय..एक गाव सरलं, आता घाट उतरला की आठ किलोमीटर वर शहर..
'पटकन काम करायचं आणि लवकर परत यायचं.' सखाने मनाशी निश्चय केला.
घाट उतरला आणि एका मोठ्या आंब्याच्या झाडाची सावली पाहून सखाने आपली मोटरसायकल उभी केली..सवयीनुसार डिक्कीतील पाण्याची बॉटल काढून दोन घोट पाणी पिले आणि लघुशंका करण्यासाठी तो रस्त्याच्या कडेला थोडा खाली उतरला..
कडक उन्हाच्या पाऱ्यात समोरचं काळ भोर शेत चमकत असल्याचा त्याला भास झाला..
आपल्याच्या नादात रमलेल्या सखाला शेतात काहीतरी पिवळं पिवळं चमकताना दिसलं.
काय असावं?, याचा विचार करत सहजपणे त्याची पाऊले तिकडे वळली.. जवळ जाऊन बघतो ते सखाच्या हृदयाचे ठोके वाढायला लागले..नांगरलेल्या जमिनीतून एक सोन्याची गिनीं उघडी पडली होती. प्रसंगवधान राखत सखाने मनाला आवर घातला..कुणी आलं तर हातचा खजिना जायचा..!
सखा खाली बसला आजूबाजूला पाहत हाताने माती उकरू लागला, तश्या चार पाच गिन्या त्याच्या हाती लागल्या..तितक्यात दूरवर एक गाडी येतांना दिसत असल्याने त्याने घाई केली डोक्याला बांधलेला रुमाल खाली अंथरला त्यात गिन्या टाकल्या अन त्याचं गाठोडं बांधून काही घडलंच नाही, आशा अविर्भावात तो आपल्या गाडीजवळ आला. गाठोडं डिक्कीत टाकलं आणि किक मारुन गाडी सुरू केली..समोरून आलेला गाडीवान त्याच्या अगदी जवळ आला होता..
सखाच्या चेहऱ्याला चटका लागल्याचा भास झाला..चेहरा अजूनच गरम होऊ लागला..अन नकळतपणे सखाचे डोळे उघडले..!

आंब्याच्या सावलीत झोपलेल्या सखाच्या तोंडावर ऊन आल्याने त्याची वामकुक्षी भंगली होती..अन त्याचं सोन्याचं स्वप्नही संपलं होतं.
पण, सखा अजून स्वप्नातून बाहेर आला नव्हता..
सोनं सापडल्याचा नुसत्या स्वप्नाने त्याचं चित्त हर्षोउल्हासित झालं.
अंगाखालचं अंथरूण सावलीत ओढून घेत सखा त्यावर उताणा पडला..अन, आता त्याचं जागेपणी स्वप्नं रंजन सुरू झालं !

"काय स्वप्न होतं राव..खरं असतं तर जिंदगी बदलली असती.."
'एक गिनीं जवळपास अर्धी किलोची.. आपण किती घेतल्या चार का पाच..?'
त्याला नेमका आकडा आठवला नाही..
"जाऊ द्या, पण तीन चार किलो नक्की होतं.. तीन चार किलो म्हणजे..!"
सखाने हिशोब लावला...
"एका कोटीच्या घरात..सगळे प्रश्न सुटले असते..नुसते प्रश्न सुटले नसते तर सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या असत्या..पण ते स्वप्नात.'
सखाचं मन अस्वस्थ झालं
नुसता विचार करुन काय फायदा..?
सखा उठून बसला...काहीतरी मोठं गमावल्याचं दुःखं त्याच्या मनात उत्पन्न झालं.
"जाऊ द्या..जे मिळालंचं नाही त्याचा काय विचार करायचा..!'म्हणून त्याने मनातलं दुःखं पुसून टाकण्याचा प्रयत्न केला.
पण, त्याचं मन अजून आक्रोश करू लागल.
मनातले दुःखाचे विचार दुसरीकडे वळविण्यासाठी सखा विचार करू लागला.
" नेमकं असं स्वप्नं आपल्याला का पडावं.. यामागे काही संकेत तर नाही..?”
गावच्या पारावर ऐकलेल्या रिकामटेकड्या लोकांच्या गप्पा त्याला आठवू लागल्या
“ज्याच्या नशिबात गुप्तधनाचा लाभ आहे, त्याला ते धन संकेत देते.. कधी स्वप्नात दिसते, तर कधी रस्त्याने जाताना छन छन आवाज ऐकू येतो. एकाने आपल्या पाहुण्याचा अनुभव सांगितला होता.. त्याच्या पाहुण्यांला स्वप्नात गारगोटी दिसायची.. एका वर्षी शेताची नांगरणी करताना त्याच्या पाहुण्याला एका ठिकाणी भली मोठी गारगोटी लागली.. त्याने म्हणे, एका जाणकार माणसाला हा विषय सांगितला.. त्यांनी ठोकताळे बांधून काहीतरी विधी केला आणि ती गारगोटी काढली तर त्याखाली सोन्याने भरलेला हंडा होता..त्या गुप्तधनावर झाकण म्हणून गारगोटी चा वापर करण्यात आला होता.”
अशा एक ना अनेक कहाण्या सखाला आठवू लागल्या.
ज्यावेळी कहाण्या ऐकल्या त्यावेळी त्याला त्या नुसत्या गप्पा वाटल्या होत्या.. पण, आज त्याचं अख्यायिकांनी त्याची मनस्थिती द्विधा बनवली होती.
सखाचं एक मन म्हणत होतं की, “स्वप्न हे फक्त स्वप्न असतं.. सत्याचा आणि त्याचा काही संबंध नसतो.“मनी वसे ते चित्ती दिसे, असं म्हणतात..माणसाच्या मनात ज्या सुप्त इच्छा आकांक्षा लपलेल्या असतात त्या नकळतपणे कधीकधी स्वप्नाच्या रुपात दिसतात. त्यामुळे त्याला फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पण, त्याचं दुसरं मन त्याला प्रतिवाद करत होत..
“आपल्या मनात तर असा विचार कधीच नव्हता. महिनाभरापूर्वी गुप्तधनावर आपण गप्पा मारल्या होत्या.. “आपल्यालाही असं धन भेटलं पाहिजे”, त्यावेळी मनात विचार आला होता.. पण आता त्याला महिना होऊन गेला.. नेमकं आज आणि दुपारीच असं स्वप्न का पडावं..?

मनात विचारांचं काहूर उठलं असतांना त्याच्या डोक्यात विचार आला..
“आत्ताच शहराच्या रस्त्याने जाऊन बघितलं तर..!”
डोक्याची कल्पना मनाला पसंत पडली.. अन त्यावर तात्काळ कृती झाली. सखाची गाडी शहराच्या रस्त्यावर धावू लागली....

सखाच्या गावापासून शहराचं अंतर फक्त 30 किलोमीटर. सखा शांतपणे शांतपणे आपली गाडी चालवत असला तरी मनात विचारांचं वादळ उठलं होतं.
“हा निववळ फालतुपणा आहे..असं कुठं होतं का..? ”
सखाचा विवेक त्याची थट्टा करत होता. पण, दुसरीकडे त्याच्या लालची मनाला सोन्याच्या गिन्या दिसत होत्या.
विचार करता करता घाट लागला. आता घाट सरला की आंब्याचं झाड लागेल आणि सगळं काही स्पष्ट होईल..!
घाट सरला.. एक किलोमीटर..दोन किलोमीटर अंतर गेलं पण आंब्याचं झाड काही लागलं नाही.
सखा विचारात पडला.
'झाड तर इथंच असायला हवं होतं.'
'गेलं कुठं?'
सखाला कशाचाचं बोध होईना..
त्याने संपुर्ण रस्तावर दोन चकरा मारल्या..पण, स्वप्नातली जागा काही दिसली नाही. शेवटी निराश होऊन सखा घरी परतला. पण, त्याच्या डोक्यातून सोन्याच्या गिन्या गेल्या नव्हत्या.
"हा काय प्रकार आहे, याचा एकदाचा सोक्षमोक्ष लावायचाचं"
सखाने निश्चिय पक्का केला.
पण कसा?
प्रश्न अजून अनुत्तरित होता.
इतक्यात त्याला आपल्या एका जुन्या मित्राची आठवण झाली.
'प्रभाकर'
प्रभाकर सखाचा लहानपणीचा मित्र होता..दोघांनी बराच काळ सोबत घालवला. विट्टू दांडू पासून ते बॅट बॉल पर्यंतचे सगळे खेळ त्यांनी सोबत खेळले. पण जसा प्रभाकरला बाई आणि बाटलीचा नाद लागला तशी प्रभाकर आणि सखा ची मैत्री कमी कमी होऊ लागली. पुढे वशीकरण विद्या शिकण्यासाठी प्रभाकर एका मंत्रिकांच्या नादी लागला..या नादात त्याला एकदा तुरुंगवारीही करावी लागली. त्यामुळे सगळेच त्याच्याशी फटकून वागत असत. सखाचेही त्याच्याशी आता जेवढया पुरते तेव्हढे संबंध होते. मात्र, तरीही सखाला प्रभाकरच्या सगळ्या उचापती माहीत होत्या.. गुन्हेगारी विश्वातील संपर्कापासून ते रहस्यमय दुनियेतील बाबा आणि मंत्रिकांशी असलेली त्याची जवळीक सखाला ठाऊक होती. त्यामुळे आपल्या प्रश्नांचं उत्तर प्रभाकरच्या माध्यमातून मिळू शकेल, याचा त्याला विश्वास वाटत होता.

सखा रात्री आठ वाजेच्या सुमारास प्रभाच्या घरी पोहचला. प्रभाकर नुकताच घरी पोहचला होता. सखाने त्याला बाहेर हॉटेल मध्ये चालण्याची गळ घातली. दारू पिण्यासाठी प्रभा अगदी कुठेही येण्यास तयार असे. त्यामुळे सखाचं आमंत्रण त्याने आनंदाने स्वीकारले.
गावाच्या थोडं दूर असलेल्या हायवेवरील एका बारमध्ये दोघे जाऊन बसले.
एक बाटली पोटात पूर्ण रिचवल्यानंतर प्रभाने सखाला विचारले.
“आता सांग, काय काम आहे तुझं?”

“माझं काम? तुला कसं कळलं की माझं तुझ्याकडे काम आहे..”

सखाने उलट प्रश्न केला

“मित्रा, तुला मी चांगलं ओळखतो..पण, ते जाऊ दे, सांग काय काम आहे ते. उगाच संकोच करु नको."

दोन मिनिटं सखाने डोळे बंद करुन घेतले..शब्दांची जुळवाजुळव केली आणि स्वप्न पडल्यापासूनचा सगळा वृत्तांत प्रभाकरला सांगितला.
सखाची कहाणी एकूण प्रभाचे डोळे चमकले..पण, त्याने फारशी उत्सुकता न दाखविता अतिशय विचारी मुद्रा करुन सखाकडे नुसते बघितले.
सखा त्याच्या बोलण्याची वाट बघत होता..पण, प्रभा आपण गंभीर विचारत गढून गेल्याचा आव आणत होता.
अखेर पाच मिनिटांच्या मोठ्या पॉज नंतर प्रभाला वाचा फुटली.

“मला खात्री आहे की हा प्रकार नक्कीच वेगळा आहे. तुला जे वाटतंय ते संकेताचं प्रकरण सुद्धा खरं आहे..तुझ्या नशिबात निश्चितच गुप्तधनांचा योग आहे..अर्थात, त्याचा लाभ तुला घेता येतो की नाही, हे आता तुझ्यावर अवलंबून आहे"

“म्हणजे कसं..?”

आता हे बघ, तुला स्वप्न पडलं.. त्यात सोन्याच्या गिन्या दिसल्या. पण अजून तुझा त्यावर पूर्ण विश्वास बसला नाही. तुझ्या मनात अजूनही शंका कुशंका आहेत...!

प्रभाने वाक्य अर्धवट ठेवत पुन्हा एक पॉज घेतला

"अरे शंका नाही, पण अशा गोष्टीवर सहसा विश्वास बसत नाही ना, म्हणून थोडी घालमेल होतेय"

सखाने आपल्या मनाची अवस्था सांगितली.

प्रभाकर आशा गोष्टीत चांगलाच मुरलेला होता. स्वतः ला बुद्धिवादी म्हणवणाऱ्या सखासारख्याना बाटलीत कसं उतरवायचं, हे त्याला माहित होतं. अडाणी माणसांशी त्याच्या भाषेत बोललं की त्याचा विश्वास बसतो. अगदी तसंचं, शिकलेल्या माणसाला दोन बुद्धीवादाच्या गोष्टी सांगितल्या..त्याच्या मनाला लालूच दाखविली की तोही गळाला लागतो. याचा त्याला अनुभव असल्याने प्रभाने आपला हुकमी एक्का बाहेर काढला.

“ कसं आहे सखा..तू आहेस सो कोल्ड बुद्धिवादी माणूस. तुमच्यासारख्या माणसांचा एक प्रॉब्लेम आहे. अर्धवट ज्ञानाच्या भरवशावर तुम्ही लोक आपली मानसिकता बनवतात. जी गोष्ट तुमच्या तथाकथित बुद्धीला पटत नाही, ती अस्तित्वात चं नाही, असा तुमचा समज असतो. एकाद्या गोष्टीकडे चिकित्सक वृत्ती ने बघायला तुम्ही लोक तयारचं होत नाही.
पण, या जगात आशा अनेक गोष्टींचं अस्तित्व आहे की ज्या गोष्टी तुमच्या तर्काला मान्य नसतात. त्याचा अनुभव कित्येकांनी घेतला आहे. अर्थात, काही खोटरड्या बुवा आणि तंत्रिकांमुळे हा सगळा बनाव असल्याचा तुमचा समज झाला आहे. काहीअंशी त्यात तथ्यही आहे. पण, सगळ्याचं गोष्टी काही खोटरड्या नसतात. आता।तुझं स्वप्नंचं बघ. कुठल्या तरी अनामिक कारणाने त्या गुप्तधनांची तुझ्यावर कृपा झाली आहे. सबंध काय याचं विश्लेषण मला करता येणार नाही. पण एक फार मोठं घबाड तुझ्या हाती लागलं आहे. अन, तू आपला तर्क घेऊन बसला आहेस.”

प्रभाकरचा हा एक्का सखावर प्रभावीपणे चालला.
“माझा तुझ्यावर पूर्ण भरवसा आहे..मला कोणत्याही परिस्थितीत ते धन मिळवायचे आहे. काहीही करावं लागलं तरी मी माघार घेणार नाही.काय करायचं ते सांग”

सखाने प्रभाला शब्द दिला

“बघ..नाहीतर पुन्हा मागे फिरशील..आणि हो एक गोष्ट लक्षात ठेव काही मिळविण्यासाठी काही गमवाव लागत असतं.. माझ्या मते तुला स्वप्नांत दिसलं ते नुसतं ट्रेलर होतं. त्याठिकाणी किमान तीस चाळीस किलो माल असला पाहिजे.”

तीस चाळीस किलो ऐकताच सखाचा चेहरा भलताच खुलला. तीस किलो सोनं.. अर्ध अर्ध केलं तरी चार साडे चार कोटी.

“काय करावं लागेल..?

सखाने अधीरतेने विचारलं

“माझा एक मांत्रिक मित्र आहे..त्याला याचा संपुर्ण विधी माहीत आहे..तोच आपल्याला पुढील मार्गदर्शन करेल”

सखा सोनं मिळविण्यासाठी इतका अधीर झाला होता की रात्रीच ते दोघेही प्रभाच्या मांत्रिक मित्राला भेटायला गेले.
**क्रमशः**

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी आहे. पुढचं लवकर लिहा.
>>मनःपूर्वक धन्यवाद.. पहिलाच प्रयत्न आहे..आपल्या प्रतिक्रिया प्रेरणादायी आहेत. आभार