निर्वात

Submitted by रोहितकुलकर्णी on 24 June, 2019 - 12:21

निर्वात

अळवावरचे पाणी
जसे निसटून जाई
मुठीमध्ये रेती
जशी मावतच नाही
घुसमटून सर
जशी वळचणीला अडे
सडा प्राजक्ताचा
जसा ओघळून पडे

माझे आणि दुःखाचे हे
असे नातेगोते
जवळ...दूर...होता होता
घालमेल होते
सुख मात्र मित्र म्हणून
फसवून गेले
शत्रू बनून दुःख मात्र
मदतीस आले

उजेडाचा शौक भारी
महागात गेला
'उजेड' बनून अंधार मात्र
लख्ख झळकला
कळपामध्ये हरवलो
सोबत असून जरी
एकांताने 'एकट्याने'
साथ दिली खरी

होते नव्हते सोस सारे
धुळीला मिळाले
आयुष्यानेच शिकवला...
...धडा बरे झाले
फार काही मागत नाही
दगडाच्या देवा
निर्वाताच्या पोकळीत
मिळावा विसावा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कविता.
कविच्या वाट्याला दु:ख आले त्याला त्याचे कर्म, परिस्थिती जबाबदार असू शकेल. म्हणून देवाला दोष देणं ही दैववादी वृत्ती नाही का?