इरसाल म्हातारा आणि खोडसाळ म्हातारी

Submitted by jayshree deshku... on 22 June, 2019 - 14:04

इरसाल म्हातारा आणि खोडसाळ म्हातारी

“ अग ए ऐकलस का?” शशांकरावांनी स्वयंपाकघरात कामात असणाऱ्या बायकोला हाक मारली. टॉवेलला हात पुसत सायलीताईनी बाहेर डोकावलं, तसं गालात हसत शशांकराव म्हणाले,
“नाही म्हणजे आजकाल तुला जरा कमी ऐकू येत ना?”
“नाही म्हणजे आताशी कमीच ऐकायला पाहिजे ना? कारण लग्न झाल्यापासून सर्वांचं ऐकतच आले.”
“तू वेडीच होतीस लग्न झाल तेव्हा, म्हणून ऐकून घ्यायचीस.” शशांकराव म्हणाले.
“हो पण आता शहाणी झाले ना मग का ऐकून घेऊ?”
“नाही म्हणजे मीच तुला शहाण बनवलं, पण आता अतीच शहाणी झाली आहेस. लग्न झाल तेव्हा तोंडातून एक शब्द बाहेर पडत नव्हता. आता नुसत्या लाह्या फुटत असतात.”
“माझ्या विनम्र स्वभावाचा सगळ्यांनी नको इतका फायदा घेतला, म्हणूनच तर तोंड उघडाव लागलं ना!”
“विनम्र कसली? नंबर एक उध्दट झाली आहेस.”
“ विनम्र कुठे राहायचं आणि कुठे नाही याचं भान आहे म्हणल मला.”
“हल्ली तोंड फार सुटत चालल आहे. किती बोलशील? खापराच असत तर फुटून गेलं असत.”
““हो मग तुम्ही टाळ्या पिटल्या असत्या ना? बोलायला शब्द नसतील तर उगाच कोट्या करू नका. ऐकून नाही घेणार.”
“एक शब्द खाली पडू देऊ नकोस. माहित झालय म्हातारा आपल्यावर अवलंबून आहे.मुल दूर आहेत. त्याचा पुरेपूर फायदा घेतीस.”
“तुम्ही म्हातारे तशी मी पण आहेच की म्हातारी! जाऊ दे तुम्हाला नाही उद्योग. तिथं gas वर रस्सा उकळतो आहे. मीठ मसाला घालायचा आहे. मुद्द्याचं काय ते बोला.”
“ बोलतीस पण माझ्या आवडीच सगळ करतीस. म्हणून तर प्रेम करतो तुझ्यावर.”
“ हं! कळल काय ते,स्वार्थी प्रेम नुसत! सगळ मनाप्रमाणे होत म्हणून प्रेमाच्या गोष्टी सुचतात! पुढे बोला.”
“नाही म्हणल, परवा शरयुला केळवणी साठी बोलावल आहेस, तेव्हा मेनू काय ठरवला आहेस?”
“का? तुम्ही काही बनवणार आहात का लाडक्या बहिणीसाठी?”
“किती खवचट बोलतेस ग, माझ्याशी सरळ बोलायचं नाही असं तू ठरवलं आहेस का?” सायलीताई रस्सा ढवळत ढवळत गालात हसल्या आणि मोठ्यांदा बोलल्या, “ मग काय रिकामी पान त्यांच्यापुढे सारणार आहे का? बनवेन चार पदार्थ, माझ्यावर एवढा विश्वास नाही का?”
“साध विचारलं तर त्यात एवढा फणकारा कशाला हवा?”
“ अरे वा! तुम्ही एवढे साधे कधीपासून झाला? इरसाल आहात नंबर एकचे, तुमची वाकडी वळण मला ठाऊक नाहीत का? मी बापडी बोलेन वाकडी पण तुमच्यासारखं तिरकस वागण मला अजिबात जमत नाही, अगदी ठरवून सुद्धा ”
“ अग बर जाऊदे सांग ना काय बनवणार ते केळवणीसाठी?
“ ते माझ सिक्रेट आहे, त्याच दिवशी कळेल तुम्हाला.” शशांकराव मनात म्हणत होते, ‘बोलते,पण झेपत नाही हल्ली तरी उगीच ताण घेत बसते. सगळ घरी करण्याचा अट्टहास करत बसते आणि तेही सगळ शिस्तीत, साग्रसंगीत करण्याचा अट्टहास असतो.सगळ आटोपलं की संध्याकाळी हिचा उतरलेला, थकलेला चेहरा पाहवत नाही.सिक्रेट म्हणत सगळ हळूच बोलून टाकेल. आणि मी बरोबर काढून घेईन. तसा पक्केपणा मुरलेला नाही अंगात.’ पण बर वाटत हिला डिवचायला, ही चिडली की मजा येते. वेळ जातो चांगला.
तसचं सायलीताई सुद्धा मनात म्हणत होत्या, ‘दिला ह्यांच्या लोकांनी त्रास, जाऊ दे पण किती वर्ष भूतकाळ उगाळत रहायचा.कितीही उगाळल तरी कोळसा काळाच! म्हणून करते बापडी ह्यांच्या आवडीच सार! पण वेळच्या वेळी बोललच पाहिजे म्हणजे माझ्या घरकामाची किंमत राहील ह्यांना, न बोलता गप्प बसल की नवराच काय, सार जगच टाळूवरच लोणी खायला कमी करत नाही. उचलले ह्यांच्या बहिणीसाठी कष्ट थोडे म्हणून कुठ बिघडलं? नाही तरी ह्या वयात हवं काय मला. ह्यांच्या चेहऱ्यावरच खुशीच हसू! न्यायचं काय आहे बरोबर? सारच तर इथे ठेवून जायचं आहे.
कुणी दोन शब्द प्रेमाचे बोलले की लगेच पाघळून जाती ही. काय हव ते काढून द्यायला तयार होती, तिथे कष्टाचे काय? राबत राहती सगळ्या गोतावळ्यासाठी, मित्र-मैत्रिणींसाठी ! फायदा उचलून लोक दूर गेले की मग हिरमुसून जाती. माझ्यासमोर दाखवत नसली तरी मला ते समजतच. शशांकराव त्यांच्याही नकळत सायलीताई बाबतच्या विचारात गुंतले होते. आणि आपली पोरटी पण, मुलगा आणि मुलगी त्यांना हव ते हिच्या कडून उकळण्यात माहीर आहेत. सागरला घरासाठी पटकन २५ लाख काढून दिले. आणि सारा तर काय तिच्या गळ्यातच पडते. ममा मला अमुक एक समारंभाला जायचं आहे, तुझा अमुक एक दागिना घालते ग आणि तुझी अमुक एक साडी पण नेसते. अस म्हणत असताना तो दागिना मग तिचाच होतो. कर्णांच औदार्य शेवटी त्याच्या जीवावरच बेतल ना? थोड हातच राखायला नको का? तशी पक्की झाली आहे आता पण माझ्याच बाबतीत ना! मला बरोबर ठेंगा दाखवते.
रस्सा बाजूला ठेवत सायलीताईनी खीर करायला घेतली. बदामाचे काप केले, जायफळ किसायला घेतले. सार करता करता त्याचं विचारचक्र चालूच होत. ह्यांना वाटत मी म्हणजे कर्णाचा अवतार! पण माझी भरपूर पेन्शन माझ्यासाठी आहे ना. त्याला कुठे मी हात लावते? ती तर माझ्यासाठीच असते ना! नेले साराने दागिने तर कुठे बिघडलं? नाहीतरी लॉकरचीच धन ना! त्या पेक्षा ती हौसेने घालून मिरवताना तिच्या चेहऱ्यावरच हसू पाहण जास्त मोलाच नाही का? सागरने आणि त्याच्या बायकोने आपल्याजवळ राहून धुसफुसत संसार करायचा. ना आपल्याला सुख ना त्यांना सुख.मी म्हणते त्यापेक्षा जवळच वेगळ बिऱ्हाड थाटून त्यांना सुखाने राहू दे ना! आपलं राहत घर थोडच त्यांना आत्ता मी देणार आहे? त्यासाठी दिले २५ लाख म्हणून कुठे बिघडलं? प्रत्येक ठिकाणी थोडाच असा हिशेब करायचा असतो? नात्याच्या गरजेला महत्त्व दिल्यानेच तर जिव्हाळा वाढत जातो. ही मोजता न येणारी मोठी ठेव आहे. आपलं वय हे असं उतरणीला लागल आहे, तेव्हा मुल काय, नाती काय तीच जवळ करायला नको का? आणि मी थोडच कमरेच सोडून देत आहे. आठ दिवस फुगून बसले होते नुसते. चारच दिवस झाले बोलायला लागले आहेत. तरी मुलांपेक्षा ह्यांच्या मताचा आधी विचार करत असते . शेवटी आपणच तर दोघ आहोत ना एकमेकांना हे कळून सुध्दा वाद घालत बसतात. पण मी पण नाही ऐकत आता. निरुत्तर करते ह्यांना पण शेवटी ह्यांच्या मनाप्रमाणेच करते. आणि तेच तर फावत ना ह्या पुरुषांना !
शशांकरावांच ओट्यावरच काढून ठेवलेल्या शेवयांकडे लक्ष गेलं आणि ते म्हणाले, “अरे वा, आज खीर वाटत? परवा पुन्हा खीरच नको करुस,”
“ परवा ना आम्रखंड, गुलाबजाम,साखरभात करावा. मोतीचूर, करंज्या आणि सुरळी वडी तयार आणावी.म्हणजे आपली पंचपक्वान होतील. तुम्ही जरा बेतानेच ताव मारा म्हणल. सोसत नाही आता आपल्याला.”
“झाल! शेवटी सांगितलस ना मला! तुझ सिक्रेट वगैरे काही नसत. काही मनात रहात नाही तुझ्या. चंद्रावरच्या माणसाला देखील तुझ्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्ट ओळखायला येतील.” सायलीताई सावरून घेत लगेच बोलल्या,
“राहू दे राहू दे , चंद्रावरच्या माणसाला कळेल हो! पण तुम्ही वेड पांघरून पेडगावला जाता त्याच काय?”
“म्हणजे काय म्हणायचं आहे तुला?”
“ तेच तर ना! माझ्या मनात काय असत ते कळून सुध्दा दुर्लक्ष करायचं आणि वर म्हणायचं , सांगायचं नाही का ,काय हव ते! मला कसं कळणार? आता साध आत्ताच उदाहरण घ्या. मी सकाळ पासून राबतीय, सगळा स्वयपाक झाला, तेव्हा पान पाणी घेण्यासाठी तरी मदत करावी, पण नाही करणार. परवा संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला म्हणत होते, तुम्ही बाहेर फुलपुडा आणायला गेला तेही भेळेच्या दुकानावरून पण आणावी असं वाटलं नाही ना तुम्हाला?”
“अग तुझ पोट बिघडायला नको म्हणून आणली नाही.” सायलीताई उसळल्या,आणि म्हणल्या, “माझ नाही तुमच बिघडलं होत म्हणून आणली नसणार. आणि बरोबर माझ्यासाठी खर्च करायचा म्हणल की, तुम्हाला हिशेब सुचतात, तेही एक कारण आहेच की!”
“ तू ना म्हणजे हल्ली ....असं म्हणत शशांकराव डायनिंग टेबलाजवळच्या खुर्चीवर टेकले. तोच खुर्ची मोडून पडली आणि त्याबरोबर शशांकराव पडणार पण तेवढ्यात त्यानी डायनिंग टेबलाचा आधार घेतला. सायलीताई फिदीफिदी हसायला लागल्या. हसता हसता बोलल्या ,
“तरी सांगत होते,खुर्च्या खिळखिळ्या झाल्या आहेत, सुताराला बोलवा, पण नाही! मी म्हणेन त्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या वाटतच नाहीत, लागल नाही ना कुठे?”
“मला लागो नाहीतर न लागो, तू आधी मनसोक्त हसून घे. कारण माझी फजिती पाहायलाच तुला आवडते.बनियन उलटा घातला गेला की हसायचं, डोक्यावरचे पांढरे केस वाढले म्हणून हसायचं, टाळूला टक्कल दिसतय म्हणून हसायचं, मध्ये एकदा साराचा मुलगा मला आजोबा आणि तुला काकू म्हणाला तेव्हाही भरपूर हसून घेतलस.”
“हसले, पण त्याला सांगितल ना मी अरे मला पण आजी म्हणायचं. हो मी मान्य करते आता आपण आजीच्या भूमिकेत शिरलो आहोत म्हणून. पण तुम्ही करत नाही. मग हसले तर काय बिघडलं?”
“थांब तुझ्या आईला फोन करून सांगतो, माल खराब आहे, वापस घ्या.”
“माझ्या वडिलांनी अगोदरच सांगितल होत, no worranty no gauranty . एकदा विकलेला माल कुठल्याही सबबीवर परत घेतला जाणार नाही बरका आजोबा! ”
“मी पाहिलं, तुला ना माझी खिल्ली उडवायला आवडते. पूर्वी अशी नव्हतीस ”
“काय करणार? ढवळ्या शेजारी बांधला पोवळा ......असं आहे तर सगळ.”
सायलीताईनी शरयूच्या केळवणाची जय्यत तयारी ऑफिस सांभाळून करून ठेवली. रांगोळ्या, चांदीची ताट, वाट्या पंचपक्वानाचा बेत सारा सरंजामी थाट पाहून मंडळी खुश झाली. शशांकराव पण खुश झाले. त्यांनी काही न बोलता बाहेरची सगळी काम केली. त्यामुळे सायलीताईना थोडा आराम मिळाला.
साराचा अमेरिकेहून फोन होता. तिला नवीन जॉब मिळाला होता. तिला आई-बाबांच्या मदतीची अपेक्षा होती. कोणीतरी तिथे जाव आणि तिच्या मुलाला सांभाळाव. तशी ती त्याला डेकेअरची सवय लावणारच होती पण तोपर्यंत काही दिवस आई- बाबांजवळ तो मजेत राहील असं तिला वाटत होत. शशांकराव म्हणाले,
“ बाईसाहेब तुमची लाडकी लेक अमेरिकेत बोलवतीय, ऑफिस मधून सुटका होणार का तुमची?”
“अवघड आहे, आता लगेच आठ दिवसात NOC पण मिळणार नाही. तुम्ही सेवानिवृत्त झाल्यावर मी पण VRS घेते म्हणल होत पण तुम्हीच म्हणाला, एकच तर वर्ष राहील आहे कशाला घेतेस VRS. पण बघा आता काय करायचं? अं ... असं केल तर?”
“काय केल तर? तुझी काही तरी भन्नाट आईडिया असणार. मला माहित आहे, मला जा म्हणणार .”
तोंडावर दोन्ही हात ठेवून हसू दाबत सायलीताई म्हणाल्या, “ सॉलिड हं, बरोबर ओळखलं, मी म्हणते खरच काय हरकत आहे? त्या गुंड्याशी कसं जमवून घ्यायचं हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त जमत. डन ठरलं तर तुम्हीच जायचं.”
“ए बये उगीच माझ्यावर नसती जबाबदारी टाकू नकोस. काही तरीच काय ? मला नाही जमायचं. तो अवघा दोन वर्षाचा आहे. त्याची शी-शू, जेवणा-खाण्याच्या वेळा संभाळण अवघड आहे सगळ.”
“ स्वत:च्या मुलांचं कधी कराव लागलं नाही ना! आता नातवाच तरी करा.”
“कबूल करतो बाई, तुझ्या शिवाय मी नाही कोणत्या गोष्टी करू शकत.”
“ अहो पण तिची वेळ निभावून न्यायला हवी. तिला सासू असती तर हा प्रश्न आलाच नसता.
साराचे आणि जावईबापूंचे वरचेवर फोन येत होते. बऱ्याच चर्चा झाल्या. सायलीताईना अशक्य होत त्यामुळे सरतेशेवटी नाईलाजास्तव जावईबापूंचे वडील आणि शशांकराव यांची आठ दिवसानंतरची तिकिटे साराने पाठवून दिली.
सायलीताई आठवणीने एक एक गोष्टी ब्यागेत भरत होत्या. गरम कपडे, घरचे कपडे, बाहेर जायचे कपडे. सारासाठी आणि जावईबापुंसाठी खाऊ, नातवासाठी कपडे, खेळणी. एक ना अनेक गोष्टी. पुन्हा ब्यागांच वजन बघण. सायलीताईची धांदल शशांकराव बघत होते. त्यांना त्यांच्या नकळत गहिवरून आलं. खरच आपल्या साऱ्या सवयी लक्षात घेऊन किती निगुतीने आपली बायको ब्याग भरत आहे.
“ त्तिथे थंडी खूप असते, शाल, स्वेटर जवळ बाळगण्याचा कंटाळा करत जाऊ नका, मुख्य म्हणजे वेळच्या वेळी पानात पडेल ते खाऊन घेत जा. साराला गडबडीत सगळ्याचं व्यवस्थित करण जमेलच असं नाही. तर तिला सांगून तिच्याकडून करवून घ्या. चिडू नका तिच्यावर.”
“ अग हो ग बाई किती सूचना देशील. नेहमी तर मला लागल, मी पडलो की तुला आनंद होतो. आता रहा सुखात दोन महिने एकटीच. माझ पार्सल लेकीकडे गेल्यावर माझी कटकट नाही. आणि हो भितींना सुनवत रहा ”
“ तुमचं चुकतय, तुमच काय कोणाचच दु:ख पाहून मला कधी आनंद होत नाही. मी हसते ती तुमच्या फजितीला, दु:खाला नाही. तुमच्या शिवाय मला तरी करमणार आहे का? आता आपल्या संसाराचा मुरंबा झालाय, रोजच्या जेवणात चवीला असल्याशिवाय अन्न गोड लागत नाही. मुल त्यांच्या संसारात रमली. शेवटी आपण दोघच तर एकमेकांना आहोत.
सायलीताईनी मुंबई एअर पोर्टवर शशांकरावांना पोहचत केल. मागे वळून न पाहता त्या कारमध्ये बसल्या. आपले आश्रू शशांकरावाना दिसणार नाहीत याची काळजी घेत. आणि शशांकराव जड पावलांनी सेक्युरीटीकडे वळले.

जयश्री देशकुलकर्णी

Group content visibility: 
Use group defaults

खुप खुप छान लिहिलय

नकळत स्वत :ची तुलना शशांकरावांशी केली.
म्हातारपणी मी कदाचीत असाच असेल Wink

अनिश्का, सानी, शाली, नीरु, मन्या, वावे,आसा, अक्की, बिपीन, प्राचीन मंजू सर्वांचे मनापासून धन्यवाद.
यापुढेही तुमच्या प्रतिसादाची अशीच अपेक्षा.

इरसाल आणि खोडसाळ म्हातारा, म्हातारी खरच खूप गोड आहेत. अगदी असच असत अशा लोकांचं.
वास्तवदर्शी...

ठिकठिक.
> काय आहे बरोबर? सारच तर इथे ठेवून जायचं आहे.
कुणी दोन शब्द प्रेमाचे बोलले की लगेच पाघळून जाती. > वेगळा परिच्छेद आणि " हवे या दोन वाक्यात.

सो क्वीट पण डेकेअर च्या कॉस्ट इतके यु एस डी मुलीला पाठवून दिले असते तर स्वतः जायची वेळ आली नसती आजोबां वर. इथे अडीचची मुले नर्सरी त जातात तसे तिथे असेल ना काहीतरी सोय. किंवा कोणी लीगल इमिग्रंट नॅनी वगैरे सोपे पडेल. आजोबांचा हेल्थ इन्सुअरन्स करावे लागेल.

स्वीट कपल दो. जिवलगा मधल्या माई आबांसारखे वाट्ते.