न्याहरी : एक वाङ्मयीन अवलोकन !

Submitted by Charudutt Ramti... on 20 June, 2019 - 10:36

सकाळी उठल्या उठल्या - “नवऱ्याला आणि पोरांना आज नाष्ट्याला काय खाऊ घालायचं ? ” सोशिक भारतीय महिलांच्या असंख्य अश्या गंभीर सामाजिक समस्यांपैकी ही अजून एक. ह्या प्रश्नाच्या उहा'पोह्या'साठी ( सॉरी उहा'पोहा'साठी ) केंद्र शासनाने एखादा महिला आयोग जरी स्थापन केला तरी ते अयोग्य ठरणार नाही. मागील इतकी वर्ष असंख्य स्त्रीवादी चळवळी झाल्या. पण ‘हा प्रश्न’ कधीच का चर्चेला घेतला गेला नाही? हे मला पडलेलं एक कोडं आहे.

झोपण्यापूर्वी भ्रमणध्वनीवर गजर लावून सुद्धा सकाळी उठायला रोजचाच उशीर! त्यामुळे सकाळची निष्कारण लगबग. उठायला कितीही उशीर झाला तरीही पूर्वीच्या काळी काही पुरुष मंडळींना जसं सकाळी सकाळी उपदाढा आणि गालाच्या अंतर्पोकळीत 'तंबाखू'ची चिमूट ठासून भरल्याशिवाय प्रसन्न वाटतंच नसे, तसेच मलाही आदल्या रात्री साडेअकरा वाजता भ्रमणध्वनी ऑफलाईन करूनसुद्धा (‘ऑफलाईन’ला योग्य मराठी शब्द उपलब्ध आहे का? हे पारंपरिक ‘गौगोलि’क पद्ध तिनं ऑनलाईन सर्च करून पाहिलं पण नाही मिळाला. इतकी वर्षे उलटून गेली तरीही सावरकरांनंतर परत दुसरं कुणीही पुढे न आल्यामुळे भाषाशुद्धीचे व्रत बहुदा मलाच हाती लागणार असं दिसतंय.) असो तर आदल्या, रात्री साडेअकरा वाजता भ्रमणध्वनी ऑफलाईन करूनसुद्धा सकाळी उठायला आणि तात्पर्यानं ऑफिस ला निघायला कितीही उशीर झाला तरीही चालेल पण, रात्रभर नक्की कोणकोणते व्हॉट्सअप मेसेजेस अंथरुणात येऊन पडलेले आहेत ते पाहिल्याशिवाय अलीकडं सकाळी छान आणि प्रसन्न वाटतच नाही. पूर्वी आमच्या वेळी व्हॉट्सअप नव्हतं तेंव्हा आम्ही उगाचंच सकाळी फिरायला जाऊन नाईलाजास्तव कुठं बागेतील गुलाबाच्या पानांवर अलगदपणे पहाटे उतरलेलं दवच पहा , कुठं पक्ष्यांची किलबिलच ऐक , कुठं धुक्यात फिरायला जाऊन सूर्योदयच पहा, असले काहीतरी निरर्थक उद्योग करत दुधाची तहान ताकावर भागवत असू. काय करणार? आत्ता सारख्या सोयीसुविधा उपलब्ध चं नव्हत्या पूर्वी. हल्ली ते एक बरं झालंय. रोज सकाळी न चुकता साडेपाच सहाला प्रत्येक ग्रुप वर कुणीना कुणीतरी प्राजक्त , मोगरी किंवा सदाफुलीचा शिडकाव करून जातं. पण माझ्या भ्रमण ध्वनीतील पुरेश्या स्मरण-जागे (memory-space) अभावी मी एक एक करत असले सगळे प्रसन्न पण बिचारे अल्पायुशी “सुप्र'भाssत” वाले मेसेजेस सकाळी सकाळी ‘डिलीट’ करत असतानाच…

“अsहोss फोडणीचा भाssत चालेल का नाश्त्याला ?” - सदाफुलीनं सुरु झालेली आमची सुप्र“भात” फोडणीच्या “भाता”वर येऊन अडकली.

वर वर पाहिलं तर साधं 'प्रश्नार्थक वाक्य’. पण प्रत्यक्षात मात्र ह्या प्रश्नार्थक वाक्याच्या कोंदणात दडवून ‘गृह’मंत्रालयानं काढलेला हा एक सरकारी अध्यादेश असतो. परंतु हे समजायला लग्नानंतर बरेच पावसाळे जावे लागतात.

फो-ड-णी-चा-भा-त ! हा आजच्या प्रात:कालीन उपलब्ध नाश्त्याच्या मेनूकार्डावरचा एकमेव पदार्थ. ह्या फोडणीच्या भाताची अक्षरश: एकाधिकारशाही (मोनोपॉली) झाली होती आमच्या कडे कित्येक वर्षं न्याहारीला.

“ काही ऑप्शन आहे का ? ” - माझा 'नाईलाज' आणि 'होकार' दोन्हीही शक्य तितक्या त्रोटक शब्दात एकाच वाक्यातून यशस्वीरित्या व्यक्त. बायकोवर सकाळी सकाळी कुरघोडी करण्यासाठी जरी मी कितीही शब्द चातुर्य दाखवलं असलं तरी, वास्तविक मला स्वतःला फोडणीचा भात प्रचंड आवडतो. अस्सल मराठमोळ्या माणसाच्या घरात प्रभाती नाश्त्याच्या मुहुर्ता वेळी फोडणीच्या भाताला तितकंच अनन्यसाधारण महत्व आहे जितकं अफगाणी किंवा अरबी पठाणांच्या लग्नात बिर्याणीला. काल रात्रीच्या जेवणात न संपलेल्या , किंवा बहुदा गृहकृत्यदक्ष सौ. ने अंमळ हिशेबीपणानं “उरलाच तर उरू दे सकाळी! फोडणीचा भात होईल नाश्त्याला” असं मनातल्या मनात म्हणत रात्री ‘सपाट-वाटी’ ऐवजी ‘फुल वाटीचा’ लावलेला आणि रात्री सगळ्यांना पुरू(वू)न उर(व)लेला हा पांढरा भात ! आधुनिक सेक्युलर भारतात बासमती, दिल्लीराईस, सुरती कोलम, घनसांळ, तुकडा , दुबार, वगैरे भाताच्या अठरापगड जाती असल्या तरी या भाताचे खरे धर्म दोनच ! एक 'मऊ' आणि दुसरा 'मोकळा' म्हणजेच फडफडीत !. ‘पांढरा भात’ , ‘काळा भात’ वगैरे असे वंशभेद करणे आता एकविसाव्या शतकात तितकेसे योग्य नव्हे. साखर भात, पुलाव वगैरे उंची पदार्थाना कार्याच्या पंगतीत कितीही मान मिळाला तरी नाश्त्याच्या मेन्यू मध्ये त्यांचे स्थान शून्य. कारण पांढऱ्या भाताचा साधी फोडणी दिला की होतो तसा त्यांचा अजिबात जीर्णोद्धार होऊ शकत नाही. पहिल्यांदा पानात वाढले की दुसऱ्या वेळच्या जेवणात वाढताना त्यांच्या लेखी शिळे पणाचा अपमान अपरिहार्य.

कुकरच्या आतील कुंद आणि दमट वातावरणातून बाहेरच्या आल्हाददायक आसमंतात येण्यासाठीचा सुटकेचा प्रयत्न यशस्वी झाल्या नंतर, युद्ध जिंकल्यावर विजयी योद्धे शंख फुंकून कसे आनंद व्यक्त करतात, तश्या कुकरच्या वाजणाऱ्या तीन खणखणीत आनंदी शिट्या. तीन चार शिट्ट्या मारून त्यावर शिजलेल्या आंबेमोहोर तांदळाचं रात्री एक न एक फुललेलं शीत . सकाळी स्वयंपाक घरात कवडश्यांच्या रूपात डोकावण्याऱ्या सूर्याच्या कोवळ्या उन्हामध्ये लकाकणारी जर्मन ची कढई. त्या कढईत , व्यवस्थित बारीक बारीक चिरून गोडं तेलावर (डीप फ्राय की काय म्हणतात तश्या) परतलेल्या कांद्याच्या सानिध्यात जेंव्हा ह्या आंबेमोहोर तांदळाची विजयी शितं येतात तेंव्हा आमच्या छोट्याशाच मुदपाक खान्यात सृजन पावलेल्या स्वर्गीय गंधाचा एकंनेक रेणू , बाल्कनी पासून ते सोप्या पर्यंत आणि माजघरा पासून ते देवघरा पर्यंत जलदगती ने प्रवास करत चौफेर घरादारात अगदी भरून उरतो. मी इकडे पार्क-अवेन्यू , गोदरेज किंवा तत्सम कोणत्यातरी शेविंग क्रीमच्या ‘कलोन’ फ्रॅग्रन्स शी दोन हात करत असतानाच, अचानकपणे माझ्या अवतीभवती तो कांदे घालून परतलेल्या फोडणीचा लाडिक सुवास रुंजी घालू लागतो तेंव्हा कशी सकाळ खरी मनापासून प्रसन्न वाटू लागते, आमच्या घरातली.

सकाळच्या नाश्त्यावर आमच्या घरी फोडणीचा भात जितका अधिकार सांगतो तितकाच अधिकार फोडणीची पोळी सुद्धा सांगते. फोडणीची पोळी म्हणजे old wine in new bottle च्या चालीवर आमच्या घरगुती तिरकस भाषेत 'शिळ्या पोळीचा ताजा चिवडा'. फोडणीचा भात किंवा फोडणीची पोळी हा केवळ एक नाश्त्याचा (क:)पदार्थ नसून ती आपली एक आद्य - खाद्य 'संस्कृती' आहे. “ज्या गृहिणी सप्ताहातून किमान एक वेळेस घरात फोडणीची पोळी किंवा फोडणीचा भात करत नाहीत त्या घरात सुख-शांती-सौख्य-समाधान-आयुरारोग्य पुत्रपौत्र प्राप्ती लाभ होत नाही आणि धन धान्य टिकत नाही” अश्या स्वरूपाचं एक संस्कृत सुभाषित अथवा श्लोक कुठंतरी शंकर पार्वतीच्या पुराणातील एका अध्यायात मला खूप पूर्वी वाचल्याचं आठवतंय. ह्याचा अर्थ तिकडं एवढ्या दूर हिमालयात एवढ्या सिनिक आणि सेरेन ठिकाणी (फ्लॅट घेऊन) सुद्धा शंकराला जर त्याची सुविद्य पत्नी अ’पर्णा’ (पार्वती) आठवड्यातून किमान एकदा फोडणीची पोळी किंवा भात न्याहारीस करून घालत असे, असे दाखले जर चक्क पुराणात मिळत असतील तर इकडे कर्वे रोड आणि सेनापती बापट रोड वरच्या वन किंवा टू बीएचके फ्लॅट चे पत्ते अभिमानानं सांगणारे आम्ही पुणेकर किस झाड की ‘पत्ती’ ?

अश्या ह्या खमंग फोडणीच्या भाताचा किंवा फोडणीच्या पोळीचा परिमळ सुखे उपभोगत असतानाच नेमकं बरोब्बर शेजारी-पाजारी कुणीतरी लावलेलं भीमसेनचं 'कानडा राजा' किंवा अजित कडकडेंच्या आवाजातला पूर्वी अभिषेकी बुवांनी चाल दिलेला एखादा द्रुत चालीचा अभंग दुरून कानी ऐकू येतो ! फोडणीच्या भातापासून सुरु झालेली आणि भीमसेनच्या अभंगापाशी येऊन थबकलेली ही अशी आमची शुभ्र सकाळ. पण ह्या सारखी प्रसन्न सकाळ अवघ्या त्रैलोक्यात दुसरीकडे कुठं असूच शकत नाही हे अवघ्या विश्वातील शाश्वत सत्य ! पूर्वी फिलिप्स किंवा मर्फी च्या रेडिओवर ऐकू यायचे हे भल्या पहाटे अभंगांचे स्वर, तर आजकाल ऍमेझॉन वर घेतलेल्या ‘बोस’ किंवा ‘सोनी’ च्या एमपीथ्री प्लेयर वर, फरक इतुकाच , बाकी, मी गेली अनेक वर्ष सकाळी न्याहारीस खात असलेल्या ह्या फोडणीच्या भाताचे ‘पूर्णब्रह्म’ प्रभाती कानी पडणाऱ्या ह्या सुरांच्या नादब्रम्हा इतकेच मंगलमय !

ही अशी 'शिळ्या'पासून 'ताजे' पदार्थ करून ते 'न्याहारी' म्हणून ओरपायची ही मराठमोळी संस्कृती अगदी बाराव्या तेराव्या शतकातली नसली संतवाङ्मया एवढी तरी तशी बरीच जुनी असावी. ह्या मराठमोळ्या 'नाष्टय'संस्कृतीचा अभिमान उरी बाळगतच दिवसाची शकुन सुरुवात करायची सवय होती, गेली कित्येक वर्षं. पण गेल्या सहा आठ महिन्यांपासून शेजारी दुर्दैवानं एक दाक्षिणात्य कुटुंब राहायला आलं भाडेतत्वावर आणि मग मात्र त्यांच्या संस्कृतीचा आणि त्यांच्या प्रात:कालीन न्याहारीच्या एकंदर सवयी पाहून हेवा वाटल्याशिवाय रहावलं नाही. सकाळी सकाळी नाश्त्याला डोसे, इडली, अप्पे, इडीयप्पम आणि अयप्पम ही अशीं सर्व मराठी भाषेतील स्वर आणि (व्याकरणातली) व्यंजनं वापरून नावं पाडलेली स्वादीष्ट आणी सात्विक ‘व्यंजनं’ (पाककलेतील), आमचं शेजार बनून राहायला आली आणि माझा मराठी पणाचा वृथा अभिमान अक्षरश: गळून पडला. विळीवर खवणलेल्या ओल्या नारळाची पुदिना आणि कोथिंबीर एकत्रित पणे वाटून केलेली , ‘यंदाच लग्न करून सासरी गेलेल्या आणि आषाढात प्रथमच माहेरी येणाऱ्या लेकीने हिरवी गार साडी नेसावी’ तशी हिरवा गार पदर ल्यालेली चवदार चटणी पानात एकीकडे. आणि लावणी सादर करण्यासाठी पायात पैंजण बांधून तरुणी उभी असावी तशी टंच निमुळता बांधा लाभलेली शेवग्याची शेंग ( काय ही भलतीच आचारट उपमा सुचली आहे सकाळी सकाळी , पण इलाज नाही, लोककलेचा आपला वारसा आपणच जपला पाहिजे, प्रत्येक वेळेस प्रस्थापितांच्या उच्चभ्रू कलेलाच उजवे स्थान देणं जमणार नाही! ). वरवर दिसायला जरी स्थूल आणि बेढब असला तरी मुलखाची अनोखी चव लाभलेला लाल भोपळा! हे कमी की काय म्हणून सणासुदीला किंवा शुभकार्याला लहान मुले नवीन कपडे घालून उगाचंच लग्न घरात किंवा मंगल कार्यालयात ह्या खोलीतून त्या खोलीत सैरावैरा पळत गोंधळ घालत असतात तसेच उगाचंच इकडून तिकडे बागडणारी कडिपत्याची पानं आणि खोबऱ्याचे तुकडे. अश्या जणू हिरव्या-कंच ताज्यातवान्या भाज्यांचं संमेलन भरावं तश्या सगळ्या विविध प्रकृतीच्या भाज्यांना एका मंचावर आणून बनवलेला वाटीत वाफाळणारा सांबार पानात हिरव्यागार चटणी च्या शेजारीच दुसरीकडे.

अश्या गरम गरम वाटीत बुचकळून सकाळी सकाळी इडल्या आणि डोश्यांच चे भले मोठे घास घेत आक्खी थाळी फस्त करून आंध्रा बॅंकेच्या मार्केटयार्ड शाखेत व्यवस्थापक म्हणून कामाला जाणाऱ्या आमच्या शेजारच्या मद्रासी ‘बालमुद्री गणपथी अय्यर’ चा माझ्यासारख्या मराठी माणसाला केवळ हेवाच वाटू शकतो. त्यांच्या घरातील तामिळ गृहिणी सकाळ सकाळी भल्या पहाटे उठून न्हावून, प्रेमानं कपाळी सुवासिनींच कुंकू किंवा गंध लावून वर कॉटन सिल्क च्या काठापदराच्या भरजरी साड्या नेसून ओलेत्या केसांवर पांढरा शुभ्र टॉवेल गुंडाळून किंवा स्वतःचा भरगच्च मोकळा केशसंभार सांभाळत दक्षिणेतील मीनाक्षी शेषाद्री वगैरे अभिनेत्री कश्या केसात माळत तश्या शेवंती किंवा मोगऱ्याचा गजरा केसात माळून, त्यांच्या स्वयंपाक घरात ओट्यावर कृतकृत्य भावनेनं , शांत तलावात खडा भिरकावल्यावर उमटतात तशी वलयं उकळत्या सांबारात हळुवार पणे उमटवत पळी हलवत उभ्या आहेत – “अंथरुणात घोरत पडलेला त्यांचा नवरा उठण्याची वाट पाहत” - असं दृश्य मला उगाचंच नजरे समोर दिसू लागतं शेजारी ‘बालमुद्री गणपथी अय्यर’ नावाची पाटी दारावर पहिली की. नंतर कधीतरी मग त्या (माझ्या कल्पनेतील) सांबराला मस्त उकळी फुटते. सकाळी सकाळी तलावात कमलदल फुलावित, ( फक्त त्यांच्या मृणालांना दोन ऐवजी चार दलं असती ती ज्या लोभस आकाराची दिसली असती ) तश्याच लोभसवाण्या आकाराच्या इडली पात्रातून गरम गरम शुभ्र इडल्या केळीच्या पानात त्या सुवासिनी त्यांच्या (ढेरपोट्या) नवऱ्याला वाढत आहेत तेही अगदी ‘स्लो मोशन मध्ये’ असंही पुढं चित्रं येतं माझ्या नजरे समोर? पण हे दृश्य पाहिलं की ( कितीही काल्पनिक असलं तरीही ) माझ्या मनात त्या मद्रासी सुसंकृत कुटुंबाप्रति मत्सर आणि माझ्या संस्कृती विषयी न्यूनगंडाची भावना उत्पन्न होतेच, मी माझ्या मनास आवर घालण्याचा प्रयत्न केला तरीही !

" मराठी माणसाचा जन्म सोडून दुसरा कोणता हवाय का रे तुला पुढच्या जन्मी ? आहे तुझ्या पदरी, पुरेसं पुण्य ! " असं जर चित्रगुप्तानं मला कधी चुकून विचारलंच माझं पृथ्वीवरचं सद्य युगातील अवतार कार्य आटोपल्यावर तर , नक्की तामिळ माणसाचा जन्म मागेन मी! निव्वळ ह्या सकाळच्या अमृता हुनी (आंबट )गोड अश्या सांबार आणि रस्सम युक्त इडली प्रधान संस्कृती आणि त्यांच्या त्या सात्विक ब्राह्मणी नाश्त्यासाठी. परकीय तामिळ संस्कृतीचा असा मराठी संस्कृतीपुढे कारण नसताना उगीचंच जयजयकार केल्याबद्दल, आणि पर्यायानं मराठी संस्कृतीचा अपमान केल्या बद्दल माझ्यावर मराठी संस्कृती रक्षकांचा रोष ओढवला तरी चालेल मला. आम्ही पुण्यातील मराठी माणसांनी नुसतंच 'अमृततुल्य' नाव असलेलं पण प्रत्यक्षात आटवून आटवून काढा झालेलं चहा नावाचं रसायन तरी का म्हणून उगाचंच असं आजन्मं चवीनं प्यायचं ? आम्हाला कधी असं संभार आणि रस्सम आणि रात्र भर डीकॉक्षन केलेली फिल्टर कॉफी मिळणार सकाळी उठल्या उठल्या त्या गणपथी ऐय्यर सारखी ?

अगदी नाहीच मिळाला एखाद्या ऐय्यर किंवा अय्यंगारच्या पोटी जन्म, चित्र गुप्ताच्या मेरिट लिस्ट मध्ये कटऑफ खूप वर असल्यास , तर किमान पक्षी इंदोर च्या मूळच्या मराठी पण आता हिंदी भाषिक झालेल्या होळकर कुटुंबातील कुणा जन्मदात्याच्या घरी मागेन. न्याहारीला सकाळी सकाळी पोहे आणि जिलेबी खाण्यासाठी. तेही नाही मिळालं मेरिट प्रमाणे तर मग मात्र चड्ढा , कोहली, कोच्चर किंवा चोप्रा वगैरे अशी सेलिब्रिटी आडनावं असलेल्या पंजाब्याच्या पोटी तरी नक्की घेईन. नाश्त्याला काय अप्रतिम पराठे करतात म्हणून सांगू हे सरहद्दीवरचे लोक? आपण मराठी माणसांनी ज्या चवदार बटाट्यांची अक्षरशः “ काय बटाटे भरलेत काय डोक्यात? असं संबोधून ह्या सुंदर पदार्थाची हेटाई केली, आणि प्राथमिक शालेय पाठयक्रमात तर बटाटा हे फक्त एक 'खोड' आहे असं इथल्या निरागस लहान मुलांना शिकवलं जातं, (चांगल्या गोष्टींची कदर न करण्याची आपली जुनीच वाईट ‘खोड’ ) आणि वर आपण पिष्ठमय पिष्ठमय अशी कुचेष्टा आणि निंदा करून आपल्या स्वयंपाकात ते वापरायचे कमी करत आलो आहोत त्या दिवेकर बाई आणि डॉक्टर दीक्षितांच्या च्या नादी लागून. तेच, तेच, खोड म्हणून वाढलेले बटाटे घेऊन ते चांगले धुवून ,शिजवून आणि ते सोलून ह्या पंजाब्यांनी 'आलू के प्राठे ' नावाचा सुंदर न्याहारीचा पदार्थ अवघ्या विश्वाला दिला. ह्या पंजाब्यांनी त्यांच्या 'आलू प्राठे' च्या गरम गरम खरपूस पृष्ठभागावर तंदूरच्या नर्म धगीने आणि उष्णतेनें वितळणाऱ्या सोनेरी रंगाच्या गुजराती अमूल बटर बरोबर केलेल्या 'पार्टनरशिप’मुळं तोच ‘पराठा’ पंजाबातल्याच काय उत्तर हिंदुस्तानातील सरसकट सगळ्या पंचतारांकित हॉटेलातल्या कॉम्प्लिमेंटरी बुफे ब्रेकफास्ट मेनू मध्ये गेली कित्त्येक वर्षे राजेशाही थाटात विराजमान दिसतो. पण मी असं विधान केलं की कुणी तरी टीकाकार मला म्हणतील “का ? आपणही करतोच वडे बटाट्याचे तितकेच रुचकर!” हो करतो ना आपण वडे सुंदर! पण ‘आसिफा बेकरीतल्या किणन्व पावांमध्ये कोंबून ते रस्त्याकडेला उभ्या उभ्या खाण्यापलीकडे आपली मराठी माणसाची काही मजल नाही गेली ! एवढा सुंदर पदार्थ असूनही मराठी माणसाच्या ह्या 'कुचकामी पणन कौशल्यामुळे ' ( लॅक ऑफ मार्केटिंग स्किल्स ) ग्लोबल क्विझिन च्या यादी मध्ये आपला मराठमोळा बटाटेवडा मात्र बिचारा बिचारा उपेक्षितच राहिला. नशीब आपल्या मराठी माणसाचं दुसरं काय ? ( बाय द वे , कधी पंजाब मध्ये फिरायला बिरायला गेलात वाघा बॉर्डर च्या साईडला वगैरे आणि थंडीत सकाळी सकाळी नाश्त्याला तुमच्या पुढ्यात वाढलेल्या गरमागरम पराठ्या च्या डिश मध्ये कमीतकमी अडीचशे ग्राम चांगलं मुरलेलं (जमा हुआ) थंडगार दही नसेल हा तर तुम्ही ' त्या निर्दही आलू पराठा वाढणाऱ्या' सरदारजी विरुद्ध चंडीगड च्या हायकोर्टात चांगला नुकसान भरपाईचा दावा ठोकू शकता. असा निर्णय एका जनहित याचिकेवर नुकताच सर्वोच्च न्यायालयानं दिल्याचं एका वर्तमानपत्रात वाचनात आलंय , ( पण वृत्तपत्र वाल्यांनी दिलेल्या बातम्यांचं खरं खोटं काही सांगता येत नाही , त्यामुळं आपल्या खात्रीच्या व्हॉट्सअपवर व्हायरल होऊन फिरल्याशिवाय ह्या बातमीविशयीची विश्वासार्हता ठरवणे कठीण आहे. )

अलीकडे अलीकडे मात्र नाश्त्याच्या बाबतीत अत्यंत सुजलाम सुफलाम असलेल्या आपल्या भूमीमध्ये, घरोघरी घुसून केलॉग्स, नेस्ले, नॉर, आयटीसी असल्या बऱ्याच देशी/विदेशी एफएमसीजी वाल्या कावेबाज ब्रँड्स नी यादवी पसरवण्याचे घालण्याचे बरेच छुपे प्रयत्न करून पाहिले. उदाहरणार्थ ब्रेकफास्ट विथ ओट्स अँड मिल्क किंवा कॉर्नफ्लेक्स विथ हनी वगैरे, अगदीच फॅड म्हणून डाएट साठी ठीकेय पण आमच्या सकाळच्या तळीव शेंगदाणे आणि बारीक शेव पसरून वाढलेल्या कांदेपोह्यांपुढे किंवा चांगली मूठभर मुगाची डाळ पेरून केलेल्या वाफाळणाऱ्या उप्पीटा पुढे ह्या विदेशी कंपन्यांची डाळ काही शेवट पर्यंत शिजली नाही. इन्स्टंट नूडल वाल्यांनी तर अक्षरश: कहर केला होता. मात्र नेस्ले वाल्यानी मध्ये उद्भवलेल्या मॅगी नूडल्स च्या वादंगाविषयी पुढं काय केलं ह्या विषयी मात्र नंतर खवैय्यांना ताकास तूर लागू दिला नाही. ते काहीही असो पण संध्याकाळी साडेचार पाच वाजता वगैरे ठीकय , पण ह्या मॅगी फिगी च्या नूडल्स नि माझा सकाळचा नाश्ता अजिबात होऊ शकत नाही, सकाळच्या नाश्त्यासाठी उप्पीट पोह्या ऐवजी इन्स्टंट नूडल्स करूयात काय? असं असं जर का कुणी मला विचारलं तर ते “पहाटेच्या भजनाला जर अनुप जलोटा येऊ शकत नसतील तर त्यांच्या ऐवजी “यो यो हनीसिंग” येऊ शकतात का ते विचारा? असं विचारल्या सारखं आहे.

मी स्वतः नाश्त्याच्या बाबतीत अजिबात म्हणजे अजिबात चोखंदळ नाही, नशीबवान मात्र खूप आहे. रात्रीच्या न संपलेल्या भाकरीचा बारीक बारीक चुरा करून तो निरसं किंवा अधमुऱ्या दह्यात अथवा ताकात कालवून त्यावर वाळवलेल्या भरल्या मिरचीची फोडणी देऊन आणि गरज पडल्यास त्यावर चमच्याने चरचरीत आंब्याच्या लोणच्याच्या एक किंवा दोन फोडी रचून साग्रसंगीत पद्धतीनं बनवलेला आणि स्वतःलाच स्वतः हुन नैवेद्य वाढल्या सारखं वाढून घेत सकाळच्या थंडगार फारशीवर बस्कर न घेताच पद्मासन घालून वर्तमान पत्र वाचत केलेला मनसोक्त अध्यात्मिक नाश्ता असो किंवा बायको माहेरी गेलेली असते तेंव्हा रुटीन विस्कळीत झाल्यामुळं ऑफिस ला उशीर होतोय म्हणून फ्रीझ मधल्या दोन अंड्याची पिवळी धम्मक बलकं ( साहेबाच्या भाषेत योक! योक! ) आणि त्या जर्द पिवळ्या योकशी लगट करणारा तो पारदर्शी प्रवाही चंचल एग व्हाईट, उभयत: निर्लेप च्या गरम गरम तव्यावर परतून एकीकडे सेमी फ्राईड करत, त्याचवेळी दुसरीकडे टोस्टर मध्ये हॅश ब्राऊन होईस्तोपर्यंत रोस्ट केलेल्या एग्ज सॅन्डविचचा अधिभौतिक सुखाच्या मागे धावण्यापूर्वी डायनींग टेबल वर गडबडीत केलेला रंगबेरंगी चवदार इंग्लिश फ्रेंच किंवा स्पॅनिश संस्कृतीचा ब्रेकफास्ट असो! मला दोन्हीही तितकेच प्रिय. असलं काहीच फॅन्सी नसलं ब्रेकफास्ट ला तर चक्क तामल्यातलं नुकतंच कढवलेलं आणि तांबूस बेरी आलेलं तूप चमच्यानं मुक्त हस्ते उधळण करत, उजव्या हाताच्या अंगठा आणि तर्जनी च्या चिमटीत ( अंमळ जास्तच खारट चव लागे पर्यंत ) सचैलपणे मीठ घेऊन ते गॅस वरच्या तव्यावरून नुकत्याच खाली ओट्यावर आलेल्या गरम पोळीवर पसरायचं. आणि मग ती पोळी नीटसपणे ( सुरळीची वडी करताना लाटून पोळपाटावर कश्या अलगद पणे मुडपतात गोलाकार पद्धतीनं ) काळजीपूर्वक रित्या मुडपून त्या तूप आणि मीठ फासलेल्या गरम पोळीचा आस्वाद घेणे, म्हणजेच सकाळी सकाळी ब्रम्हानंदी टाळी लागणे. कारण त्या पोळीच्या पहिल्या घासालाच माझे डोळे समाधानानं आपसूक मिटले जातात, एक दोन नाही गेले कित्येक वर्षं ! पोळी खपली गव्हाची असल्यास तुमच्या सारखे नशीबवान तुम्हीच. हल्ली पोळीच्या ह्या वैशिष्ट्य पूर्ण अश्या भौमितीय आकाराला 'फ्रँकी'वगैरे बरीच कॉन्टेम्पररी नावं दिली आहेत ह्या फुडीज लोकांनी, ते काहीही असलं तरी { बेरी वालं तूप + मीठ + खपली गव्हाची पोळी } ह्या आमच्या ‘बेर’जेच्या नाश्त्याला जगात अजूनतरी दुसरीकडे कुठे पंचतारांकित हॉटेलात सुद्धा कितीही पैसे मोजायची तयारी असली तरीही, पर्याय उपलब्ध नाही.

खरं म्हणजे हा विषय एका लेखात संपण्यासारखा नाही. ह्या विषयाच्या अनुषंगानेच , भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील एक ओळखीचे अभ्यासू संशोधक वृत्तीचे गृहस्थ आहेत त्यांच्याशी असेच एकदा सहज चर्चा करत असताना परवा मी, 'प्रागैतिहासिक महाराष्ट्राच्या शिवकालीन आणि पेशवेकालीन इतिहासातील न्याहारीचे पदार्थ” ह्या विषयाशी निगडित काही संदर्भ ग्रंथांच्या उप्लब्धते विषयी विचारणा केली. त्यांनी असे कोणतेच संदर्भ त्यांच्या वाचनात आल्याचे आढळले नसून अजूनतरी हा विषय 'unexplored' च आहे असं सांगितलं. माझा हा विषय घेऊन 'प्रबंध'लिहिण्याचा मानस आहे असं मी त्यांना सांगतातच त्यांनीही भलतेच औत्सुक्य दाखवले. माझ्या विनंतीस मान देऊन त्यांनी मला ह्या विषयावर संशोधनास शक्य तितकी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. आत्ताच व्हॉट्सऍपवर एक मिनिटांपूर्वीच त्यांचा मेसेज आलाय. “ येत्या रविवारी सकाळी प्रभात रोडवर साडे आठला भेटू नाश्त्याला दत्तात्रय नाश्ता केंद्रात! तिथेच वडा सॅम्पल किंवा आणि मिसळपाव खात खात खात ह्या विषया वर सखोल चर्चा करू ! " - अश्या आशयाचा

चला, म्हणजे निदान ह्या रविवारी तरी नाश्त्याला फोडणीच्या भाताची आणि फोडणीच्या पोळीची मोनोपॉली मोडली !

चारुदत्त रामतीर्थकर.
२० जून २०१९ , पुणे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप म्हणजे खूपच स्वादिष्ट आणि न्यारी झालीये तुमची ही न्याहारी. खरंच फारच छान लिहिलंय तुम्ही. आता रोज भात करताना तुम्ही लिहिलेले बारकावे नक्की मनात येणार. प्रबंध नक्की लिहा हं. वाटल्यास मदत करतील इथली मंडळी (स्मित) बाकी सपाट वाटी नि भरून वाटी वगैरे लिहिता म्हणजे अगदी काठावरचे नाही तुम्ही.

भारी, फोडणीची पोळी माझाही आवडता नाष्टा
भरपूर तूप, गूळ घालून केलेला पोळीचा लाडू पण
कांदे, बटाटे, मटार पोहे आणि आईच्या हातचे दडपे पोहे तर जगात भारी
उपिट, शिरा आणि आंब्याच्या सिजनात आंब्याचा शिरा आहाहा
थालीपीठ, टोमॅटो किंवा अंडा आम्लेट, मेथी, पालक, आलू पराठा
इडली

वाह अगदी चटपटीत झालाय लेख.
फोडणीच्या भात किंवा पोळीसाठी रात्रीच जास्त केले जाते. लहानपणापासून खातोय पण कंटाळा असा नाहीच.
आशुचॅंप तुमच्याशी असहमत. माझ्या आईच्या हातचे पोहेच जगात भारी आहेत. Happy Happy
शिळ्या भाकरीचे किंवा उरलेला भात, भाजी, वरण व त्यात काही पीठे टाकून केलेले थालीपीठ भाजणीपेक्षा छान लागते.
दहीबुत्तीही आवडते वरून फोडणी देऊन. पण दुधात भात कालऊन रात्री विरजण लावायचे व सकाळी तडका द्यायचा. भारी प्रकरण!

शाली Happy Happy

बोलवाच एकदा खायला

दही पोहे एरवी रात्री मस्त लागतात पण भरली मिर्ची तळून सोबत आली की सकाळ झकास होते
भाकरी चा काला पण सोबत मिरचीचे लोणचे असले की कधी संपतो कळत नाही

एकदम खुसखुशीत लेख!
खरपूस चवीचं, लोणकढं साजूक तूप, मिठाची जरा जास्तीची कणी आणि तव्यवरचा फुलका हे एक अफलातून गणित आहे. माझा आणि बाळाचा ऑलमोस्ट रोज खाल्या जाणारा नाश्ता आहे हा.
कामाच्या निरनिराळ्या वेळा असल्यानी आमच्याकडे शक्यतो ताजे फुलकेच डायरेक्ट मिळतात नाश्त्यात.
पूर्ण शिजायच्या जराशीच अलिकडली भाजी आणि गरम फुलके ही जबरदस्त जमतात.

मला लेख वाचूनच प्रचंड भूक लागलीये.

दुपारी जेवायला मिळाल नाही तरी चालेल, पण माझी न्याहारी साग्रसंगीत असते. भलेही तास दीड तास चालू दे गोंधळ.
सकाळी कमीत कमी दोन वेगवेगळ्या कलरच्या फळांचे काप, पातळ विनासाखरेचा ज्यूस हे असतातच. पण नाश्त्याला नेहमी काहीतरी ताजेच करते.
पोहे + शेव + सांबार\मिसळ कट\शेंगदाणा चटणी ऑल टाईम फेवरेट. मटार पोहे, इंदोरी पोहे बिग नो. गलगलती बटाटा भाजी (हे वेगळंच प्रकरण आहे) आणि मोजून पाच पुऱ्या हेसुद्धा आवडतं.
इडली नाही आवडत, पण आप्पे आणि मेदूवडा आवडतो. खमणही असतात कधीकधी (ढोकळा नाही.) भोपळ्याच थालीपीठ (किंचित जळलेलं असलं) तर स्वर्गसुखच.
कधी वेळ नसेलच तर भुर्जी आणि पोळी.
हाफ फ्राय आम्लेट, ओट्स, वगैरे पदार्थ घराबाहेरच ठेवते.

अरे वा: ! लेख आवडल्याच्या प्रतिक्रिये बद्दल सर्वांचे आभार.

आणि इथे खूप छान नाश्त्याचे पदार्थ वाढून ठेवलेत की ! तों. पा.सु. की ओ !

अगदी सुगरणी लेख आहे हो ! Happy संवादातुन चमचमीत पणा जानवतोय. हो, फोडणीचा भात / पोळी असतेच एकदा आठवड्यातुन. पण फोडणीचा भात जर तव्यावर केला ना तर काय खमंग चव लागते, अहाहा!