शाळेतला पाऊस VS कॉलेजातला पाऊस

Submitted by तुषार विष्णू खांबल on 19 June, 2019 - 05:52

शाळेतला पाऊस VS कॉलेजातला पाऊस
शब्दांकन: तुषार खांबल

शाळेमधला पाऊस, म्हणाला कॉलेजातल्या पावसाला
सांग किती मुले असतात, सोबत तुझ्या ह्या दिवसाला

हिरमुसला कॉलेजचा पाऊस, खिन्न मनाने म्हणाला
शाळेमधली बंधने कॉलेजात नसतात, म्हणून तीच मुले कॉलेज बाहेर दिसतात

शाळेतला पाऊस म्हणजे एक छत्री तीन मित्र
कॉलेजातला पाऊस म्हणजे भिजलेले प्रेम, प्रणय चित्र

शाळेतला पाऊस म्हणजे साचलेलं डबके अन कागदाची होडी
कॉलेजातला पाऊस म्हणजे वाहते पाणी अन प्रेमाची जोडी

शाळेतला पाऊस म्हणजे उड्या मारत भिजवत जाणं
कॉलेजातला पाऊस म्हणजे कट्टयावर बसून भिजलेल्या तिला पाहणं

शाळेतला पाऊस म्हणजे दादाची सायकल आणि पाण्यातला सूर
कॉलेजातला पाऊस म्हणजे मित्राची बाईक आणि सिगरेटचा धूर

शाळेतला पाऊस म्हणजे पैसा खोटा
कॉलेजातला पाऊस येथे आनंदा नाही तोटा

ऐकताच सारे कथन शाळेतला पाऊस गहिवरला
कॉलेजातल्या मातीसंगे तो आसमंतात दरवळला......

Group content visibility: 
Public - accessible to all site users