खंत देवदूतांची

Submitted by Asu on 15 June, 2019 - 05:47

मार्च २०१७ मध्ये महाराष्ट्रातील निरनिराळ्या शहरात अत्यवस्थ रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर जीवघेणा हल्ला चढवून हॉस्पिटलची तोडफोड करण्याच्या लागोपाठ तीन घटना घडल्या. अशा हल्ल्यांचा निषेध म्हणून आणि डॉक्टरांना संरक्षण मिळावे या मागणीसाठी दि.२२.०३.२०१७ पासून महाराष्ट्रातील डॉक्टरांनी संप पुकारला होता. त्यावेळी, सर्व डॉक्टरांच्या मनातील खंत व्यक्त करण्यासाठी मी केलेली ही कविता.
प.बंगाल मधील डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सध्या सगळ्या देशात उद्भवलेल्या उद्रेकाला आजही तितकीच लागू पडते.

खंत देवदूतांची

नाही माऊली सर्वत्र
काळजी घेण्या अहोरात्र,
म्हणून निर्मिले देवाने
जगी डॉक्टरांचे पात्र

देव नाही, दानव नाही
संत नाही, महंत नाही
जनतेची सेवा करण्या
देवदूत म्हणून पाही

देहाचे या कलाकार
नाही आम्ही जादुगार,
जनतेच्या पाठिंब्यावर
यमदूतालाही हरवणार

उडदामाजी काळे गोरे
इतरत्रही नसते कारे !
वेचूनिया काळे सारे
गोऱ्यांनातरी जीवन द्यारे !

जीवन देणे, नव्हेची घेणे
डॉक्टरांचे जीवन गाणे,
खंत मनीची तुम्हा सांगणे
चूकभूल देणे घेणे

मागणे आमुचे फार नाही
या देहाची सुरक्षा पाही,
नरदेहाची सेवा करण्या
पाठीवरती हात देई

- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
      (23.03.2017)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults