वडा !

Submitted by Asu on 12 June, 2019 - 22:37

वडा !

रात्र होती अंधारी
वर पावसाच्या सरी
स्थिती अशी खूप वाईट
स्टेशनात ना, रस्त्यात लाईट

थांबून थांबून थांबणार किती
रस्त्यावर वाटते खड्ड्यांची भीती
गाड्यांचा गोंधळ, बायकोची चिंता
छत्री उघडून सोडवला गुंता

एवढ्यात अंधारात म्हणाले कुणी
'एक्सक्यूज मी' आणि छत्रीत क्षणी
'जवळच रहाते, पोचवाल घरी ?'
मन मात्र बायकोची चिंता करी-
पोचली असेल का बायको सुखरुप घरी?

छोट्याशा छत्रीत वेलकम केले
माझे मात्र भरपूर वांधे झाले
स्पर्श जरी आवाजाचा हवाहवासा
विचार करतो टाळावा कसा

छत्रीत घेऊन तिला मी फसलो
अंग चोरून चोरून मी भिजलो
'तुम्ही थोडं आत या ना' ती बोलली
सोसाट्याच्या वार्‍यात छत्री हसली
'पुरुष असून तुम्ही किती लाजता'
ती म्हणाली, रात्री बारा वाजता

कसरत करत होतो चालता चालता
तशात धक्का लागला बोलता बोलता
'थांबा' म्हणाली, मी घाबरलो
'घर आले' म्हणाली, मी सावरलो
बाय-बाय टाटा केले मी तिला
चेहरा तिचा पदरात नाही दिसला
थोडा वेळ थांबून आवरले मला

बेल दाबून घरात प्रवेश केला
पुन्हा तोच आवाज घशातुन आला,
'केवढा उशीर!, किती ओला झाला?
पुरुष असून तुम्ही किती लाजला'

बायकोने चक्क मला डोळा घातला
ती होती कोरडी मी मात्र ओला
ओळखले मी माझा, वडा की हो झाला!

प्रा. अरूण सु. पाटील (असु)
(दि.12.06.2019)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults