अहेववेळ

Submitted by रोहितकुलकर्णी on 12 June, 2019 - 06:02

अदृश्य धुक्याची वीण
उलगडते वीज क्षणात
तरंग उमटून जाती
वाऱ्याच्या प्रतिबिंबात

नभ अंधाराची कावड
घेऊन अंगणी आला
घटिकापात्राचा काठ
अलवार जळात बुडाला

श्वासांचे गात्र नव्याने
अडखळते बिजागरीशी
चाहूल खुणांची होते
जेव्हा उंबरठ्यापाशी

भासांचा गलका होतो
तू आवर सगळे खेळ
कविते बघ आली दारी
सृजनाची अहेववेळ

- रोहित कुलकर्णी १२.०६.१९

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

SUREKH!