स्पेलिंग बी!

Submitted by मोहना on 11 June, 2019 - 20:37

स्पेलिंग बी! शाळकरी मुलांच्या शब्दसंग्रहाची कसोटी म्हणजे ही राष्टीय पातळीवरची स्पर्धा. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच गुरुवारी, २८ मेला ८ जणांना विजेते घोषित करण्यात आलं. इतकंच नाही तर पारितोषिकाचे ५०,००० हजार डॉलर्स विभागून न देता प्रत्येकाला दिले जातील. तीन दिवस चालू असलेल्या या स्पर्धेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्चस्व होतं ते अमेरिकन भारतीय मुलांचं. सातत्याने १२ वर्ष या स्पर्धेचं विजेतेपद अमेरिकन भारतीय मुलांकडे आहे. यावेळी विजेतपदावर ६ अमेरिकन भारतीय मुलांनी आपल्या नावाची मोहोर उठवली. आमच्या शार्लटमधील गीता दातार यांचा नातू सोहम सुखटणकर हा या ८ विजेत्यांपैकी एक आहे ही मराठी शार्लटकरांच्यादृष्टीने अभिमानस्पद गोष्ट!

मुलांचा शब्दसंग्रह वाढावा या हेतूने नऊ वर्तमानपत्रांनी एकत्रितपणे सुरु केलेल्या या स्पर्धेचं हे ९२ वं वर्ष. अमेरिकतील सर्व राज्यांमधील विद्यार्थी यात भाग घेतात. त्यातही भारतीय मुलांचा सहभाग आणि जिंकणं उल्लेखनीय आहे. किमान वयाची अट नसलेल्या या स्पर्धेत आठवीनंतर भाग घेता येत नाही. दरवर्षीप्रमाणे, याही वर्षी आठ महिन्यांपूर्वी ११ मिलियन शाळकरी मुलं स्पेलिंग बी स्पर्धेचा अंतिम टप्पा गाठण्याचं स्वप्न उराशी बाळगत स्पर्धेत उतरली. ११ मिलियन मुलांमधली ५६५ मुलं अखेरच्या टप्प्यातील पहिल्या फेरीत पोचली. त्यानंतरच्या २० फेर्‍यांमधून शेवटी उरलेले स्पर्धक होते ३०. स्पर्धकांचा विजेतेपदाकडे प्रवास चालू असताना परिक्षकांच्या थैलीतले (डिक्शनरी) शब्द हळूहळू कमी व्हायला लागले. अखेर संपलेही. एका स्पर्धेकाने उत्सुकतेपोटी परिक्षकांना किती वाजले असंही विचारलं इतका वेळ ही स्पर्धा चालू होती. स्पर्धकांना स्पेलिंग सांगायला जेव्हा शब्दच उरले नाहीत, तेव्हा या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच ८ जणांना विजेते घोषित करण्याशिवायही पर्याय उरला नाही.

स्पर्धा म्हटली की मेहनत, जिद्द, चिकाटी आली त्याबरोबर पालकांचा सहभाग आणि तसंच मतमतांतरंदेखील. एक मतप्रवाह असा आहे की मुलांच्या डोक्यावर शाळेतल्या विषयांचं इतकं ओझं असतं, त्यात अजून त्यांना शब्दांच्या ओझ्याखाली गाडण्यात अर्थ नाही; यामुळे मुलांना बालपण मुक्तपणे अनुभवता येत नाही. या स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा दृष्टीकोन मात्र वेगळा आहे. त्यांना वाटतं कर्तुत्ववान होण्याकरता लहानपणीच मेहनत, जिद्द, चिकाटीचं बीज रुजणं भाग आहे जे अशा स्पर्धांनीच रुजतं. लहानपण हा मोठं होण्याचा पाया आहे तो भक्कम व्हायला हवा असेल तर बालपणाची व्याख्या खेळणं आणि मजा इतकीच नसावी. याचा विचारधारेचा मागोवा घेणारे आणि या स्पर्धावर आधारित आतापर्यंत दोन चित्रपटही प्रसिद्ध झाले आहेत- ‘स्पेलबाऊंड’ आणि ‘अकिला ॲड द बी.’

स्पेलबाऊंड! २००२ सालचा ॲकॅडमी ॲ‍वॉर्ड नामांकन प्राप्त माहितीपट. बारा ते चौदा वयोगट असलेल्या, आठ स्पर्धक मुलांच्या दैनंदिन जीवनाचं चित्र या माहितीपटात आहे. यात आहेत पाच मुली, तीन मुलगे. त्यांचं दैनंदिन जीवन, स्पर्धेसाठी केली जाणारी तयारी, पालकांचा सहभाग, शाळांकडून मिळणारं उत्तेजन, भावंडांची मदत, गावातील लोकांना या मुलांबद्दल वाटणारा अभिमान अशा कितीतरी बाजू या माहितीपटातून पुढे येतात. मुलांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीत वैविध्य असल्याने हा माहितीपट रंगतदार होतो. उपांत्य फेरीतील तीव्र स्पर्धेचं दर्शनही यातून घडतं. आठही मुलं आधीच्या वर्षी बाद होऊन पुन्हा या वर्षी स्पर्धेत भाग घेतलेली आणि या वेळेस विजेतेपद मिळवायचं, असा ध्यास धरलेली. प्राथमिक फेरीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत या मुलांना कॅमेऱ्यात बंदिस्त केलं आहे. भारतीय कुटुंबातील सुखवस्तू घरातील दोन मुलं यात आहेत. नूपुर लाला आणि नील कडाकिया.

नीलचे वडील त्याची या स्पर्धेसाठी तयारी करून घेत आहेत. वडिलांनी आतापर्यंतच्या स्पर्धेतील सगळे शब्द एकत्र तर केले आहेतच पण कोणत्या शब्दामुळे मुलं हरली आहेत त्या शब्दांचाही त्यांनी अभ्यास केला आहे. नीलला संगणकाचा मुबलक वापर, चार चार शिकवण्या अशा साऱ्या सुविधा आहेत. शिवाय पूर्वी या स्पर्धेत भाग घेतलेल्या बहिणीचा अनुभव आणि मार्गदर्शनही आहे. इतकंच नाही तर प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळेस नीलला यश मिळावं म्हणून नीलच्या बाबांनी हजार माणसांना भारतात प्रार्थना करण्यासाठी पैसे दिले आहेत. नीलच्या वडिलांना त्याला विजेतेपद मिळेल किंवा नाही यापेक्षा एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन त्यासाठी केलेले प्रयत्न महत्त्वपूर्ण वाटतात.

नूपुर लाला. अंतिम फेरीत पोचण्यासाठी प्राथमिक फेरीतच नूपुरला तिच्याच शाळेतल्या तीन हुशार मुलांबरोबर सामना करावा लागला. ती मुलं म्हणतात, ’आम्हाला खरं तर नूपुरला हरवायचं होतं, पण तिला सगळी स्पेलिंग येत होती’ एजंला आरनेवर एका साध्यासुध्या फार वर्षांपूर्वी बेकायदेशीररीत्या या देशात आलेल्या मेक्सिकन कामगाराची मुलगी. फारसं इंग्लिश बोलू न शकणाऱ्या आई -वडिलांच्या या मुलीची, एंजलाची धडपड फार कौतुकास्पद वाटते. एप्रिल डेजिडीओचे बाबाही छोटंस दुकान चालवितात. ही स्पर्धा एप्रिलने जिंकली तर आर्थिक विवंचना थोडीफार कमी होईल अशा आशेवर जिद्दीने त्यांची तयारी चालू आहे. इतर मुलांची कौटुंबिक स्थिती उत्तम आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात या माहितीपटाने डोकावता आल्याने, मुलांची मेहनत पाहता आल्याने उपान्त्य आणि अंतिम फेरी आपली उत्कंठा वाढवतेे. कुणीच बाद होऊ नये असं वाटत राहतं, पण एकेकजण स्पर्धेतून गळायला लागतो तेव्हा इथे पोचेपर्यंत रोजचे सहा सात तास त्यांनी इतर गोष्टी बाजूला ठेवून केलेली शब्द, स्पेलिंग यासाठी घेतलेली मेहनत आठवते. तहानभूक विसरुन मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी केलेल्या तयारीचं फळ त्यांच्या पदरी पडत नाही हे पाहून अंतिम फेरीपर्यंत मजल मारता न आलेल्या या मुलांबद्दल वाईट वाटतं. विशेषत: वयाच्या अटीमुळे ज्या मुलांना पुन्हा पुढच्या वर्षी भाग घेता येणार नाही त्यांच्याबद्दल. अंतिम फेरीत या आठ मुलांमधले चारचजण पोचतात. त्यात नील कडाकिया आणि नूपुर लालाचा समावेश आहे. माहितीपट संपतो तो १९९९ च्या स्पर्धेच्या विजेतेपदाच्या चषकाने. शेवटच्या शब्दाचं स्पेलिंग सांगतानाच नूपुरच्या चेहऱ्यावर विजेतेपदाचं स्मित दिसतं आणि लगेचच तिच्या नावाची घोषणा होते. नूपुर दोन्ही हात उंचावत खुशीने उडी मारते. हातातला चषक आनंदाने उंचावते. आपणही नकळत बसल्याजागी तिचा विजय टाळ्या वाजवून साजरा करतो; इतका हा माहितीपट गुंगवून टाकणारा आहे.

‘अकीला ॲड द बी’ हा २००६ साली प्रसिद्ध झालेला याच विषयावरचा दुसरा चित्रपट. कृष्णवर्णीय अकीला, लॉस एंजिलिसच्या सहसा कुणी फिरकतही नाही अशा भागात वाढणारी अकरा वर्षांची मुलगी. चित्रपटाच्या सुरुवातीलाच तिची ओळख करून देताना ती म्हणते, ’आमच्यासारखी मुलं कुठेही गेली तरी आम्हाला पटकन कुणी सामावून घेत नाही.’ ती हे बोलत असतानाच त्या भागातील अस्वच्छता, रस्त्यावरून फिरणारी टारगट मुलं अशी दृश्य पाहता पाहता आपण अकिलाच्या शाळेत पोहोचतो. नंतरच्या दृश्यात वर्गात शिक्षिका मुलांना तपासलेले पेपर देते. अकिलाच्या हातात तिची गुणपत्रिका देताना शिक्षिका विचारते.
‘किती अभ्यास केला होतास?’ मुलं जोरजोरात हसायला लागतात. मागे मुली चिडवत, हसत खिदळत नाचत असतात.
‘नव्हता केला.’ पोटात गोळा आलेली अकीला घाबरत उत्तर देते. आणि हातातल्या कागदावर हळूच आपले गुण पाहते. पैकीच्या पैकी! परीक्षा असते स्पेलिंगची. शिक्षिका तिला आंतर शालेय स्पेलिंग बी स्पर्धेचा अर्ज भरायला सांगते. अकीलाला या स्पर्धेबद्दल माहिती तर नसतेच पण त्यात रसही नसतो. शिक्षिका आणि मुख्याध्यापकांनी भरीला घातल्यावर नाईलाजाने ती तयार होते. अभ्यासात रस आणि गती नसलेलीच बरीचशी मुलं असल्याने शाळेत स्पर्धा जिंकणं अकीलाला फारच सोपं असतं.

शाळेच्या स्पर्धेच्या वेळी हजर असलेले प्रोफेसर लारा तिचे मार्गदर्शक व्हायची तयारी दाखवितात. आत्मविश्वास नसलेली तरीही बेफिकीर असलेली अकीला त्यांच्या घरी उशिरा पोचते. जिला वेळ पाळणं जमत नाही अशा मुलांसाठी मी माझा वेळ फुकट घालवू इच्छित नाही. वेळ पाळणं आणि दृष्टीकोन बदलणं जमत असेल तरच ते तिला मार्गदर्शन करू इच्छितात हे प्रोफेसर लारा स्पष्ट करतात. अकीलाला कशाचीच खात्री नसते. आधीच बरोबरच्या मुलांनी ‘घासू’ म्हणत तिला बाजूला टाकायला सुरुवात केलेली आणि घरात गोळीबारात वडिलांच्या झालेल्या मृत्यूच्या दु:खातून वर न आलेली आई. अखेर शाळेखातर तिने या स्पर्धेत भाग घेतला. तिने या स्पर्धेत भाग घेतला तर शाळेचं नाव होईल या भरवशावर शाळा तिला अभ्यासाच्या बाबतीत बऱ्याच सवलती देते. अकीलाची इतर विषयात प्रगती बेताचीच, पण वडिलांच्या आठवणीने व्याकुळ झाल्यावर स्पेलिंग पाठ करणं हा तिने शोधून काढलेला पर्याय तिला या स्पर्धेची दारं उघडून देतो. शाळा, आंतर शालेय, उपान्त्यपूर्व आणि अंतिम फेरी या सर्वातून आधी गोऱ्या मुलांबरोबर वावरताना घाबरलेली, अडखळणारी अकीला हळुहळू या वातावरणाला सरावते आणि कसं विजेतेपद मिळवते त्याचा प्रवास लक्षणीय आहे.

अकीलाची गोष्ट काल्पनिक असली, तरी चित्रपटाची कथा आणि सर्वाचा अभिनय श्रेष्ठ आहे. आपल्याला गुंतवून टाकणारा हा चित्रपट आहे. गंमत म्हणजे, या चित्रपटाची पटकथा व दिग्दर्शक आणि निर्माता जवळ जवळ दहा वर्षांपूर्वीच तयार असूनही प्रायोजक मिळत नव्हते, ते थेट ‘स्पेलबाऊंड’ हा माहितीपट ॲ‍कॅडमीॲ‍वॉर्डसाठी नामांकित होईपर्यंत.

‘स्पेलबाऊंड’मुळे ही स्पर्धा अधिक प्रसिद्धीझोतात आली आणि यावर्षी ८ विजेत्यांमुळे रंगली, प्रसारमाध्यमात उमटलेल्या पडसादांमुळे, चर्चेमुळे पुन्हा कुणाच्यातरी घरात, मनात स्वप्नांची रुजूवात लागली असणार. पुढच्या वर्षीची स्पेलिंग बी होण्याची रुजूवात!

पूर्वप्रसिद्धी - लोकमत 'सखी' पुरवणी.

SpellBee.JPG

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पैसे देऊन प्रार्थना हे चित्रपटात नाही तर महितीपटात आहे सो ते खरंच आहे. टिपिकल इंडियन मानसिकता.

स्पेलिंग बी मध्ये नॉन इंडियन मुलांना आरक्षण दिले पाहिजे. कारण त्यांना फार कमी representation मिळते आहे.

स्पेलिंग बी हा प्रकार जेव्हा सुरु झाला तो काळ बघता तेव्हासाठी योग्य होता. बहूतेक घरातून बायबल हे एकमेव पुस्तक उपलब्ध असे. शब्द संग्रह वाढवणे, शब्दाचे योग्य स्पेलिंग, त्याचा उगम, भाषेत केला जाणारा उपयोग वगैरे आत्मसात करणे हे आव्हानच असे. या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ही स्पेलिंग बी सुरु झाली. आत्ताचा काळ बघता मला तरी स्पेलिंग बी काळसुसंगत वाटत नाही. शब्द संपदा वाढवण्यासाठी, अवांतर वाचनासाठी, त्यातून स्वतःचा असा विचार करण्यासाठी बरेच काही उपलब्ध आहे. केजी पासून फोनिक्स शिकणार्‍या या मुलांना सामान्यतः स्पेलिंग पाठही करावी लागत नाहीत. समानार्थी, विरुद्धार्थी शब्द शिकताना त्या त्या शब्दाची खास छटा जाणणे, त्याचे मूळ लक्षात घेणे, लेखनात त्याचा योग्य वापर करुन आपले विचार अधिक चांगल्या पद्धतीने मांडणे वगैरे होत असतेच. मेहनत, जिद्द, चिकाटीचे बीज लहानपणी रुजवण्याचा विचार योग्य असला तरीही शिकवण्या वगैरे लावून स्पेलिंग बी साठी प्रयत्न करणे वगैरे प्रकार मला स्वतःला झेपत नाहीत. भाषेची मजा घेत शिकणे त्यात नाही. माझ्या सुदैवाने लेकालाही वोकॅबुलरी आणि स्पेलिंगच्या प्रीटेस्टला बुधवारी ए+ मिळवणे आणि शुक्रवारी इतर टेस्ट देतात तेव्हा गोष्टीचे पुस्तक वाचणे हा पॅटर्न प्रिय होता. मात्र दरवर्षी इतक्या मोठ्या संख्येने मुलं भाग घेतात, अटीतटीने प्रयत्न करतात , जिंकायचे स्वप्न बघत कठीण होत जाणार्‍या फेर्‍यांमधून पुढे जात रहातात, बाद झाल्यावर अधिक तयारी करुन पुढल्या वर्षी पुन्हा भाग घेतात त्या अर्थी मुलांना आणि त्यांच्या पालकांना आजही ही स्पर्धा हवीशी वाटते हेही मान्यच!
मी स्पेलबाउंड बघितलेला नाही मात्र अकिला आणि बी एक चित्रपट म्हणून मला आवडला होता.

च्रप्स, मलाही हेच वाटायचं. पण आजूबाजूला पाहते त्यावरुन असं वाटतं की शाळेतली एक स्पर्धा म्हणून मुलं भाग घेतात त्यात पुढे पुढे जायला लागले की मुलांना किल्ला सर करायचाच असतो. त्यामुळे पालकही त्यात उतरतात.
आता ते प्रार्थना वगैरे... काय म्हणायचं मलाही कळत नाही. पण ते माहितीपटात आहे त्याअर्थी करत असणार लोक.
स्वाती२ अगदी पटतंय तुम्ही म्हणताय ते. पण तेच ज्याअर्थी ही स्पर्धा अजूनही जोषात चालू आहे त्याअर्थी ती महत्वाची आहे असं वाटणारे आहेतच. स्पेलबाऊंड पाहा नक्की.

<< मोस्टली सगळी चष्मा लावलेली पोरे दिसतायत,आमच्या भाषेत स्कॉलर वाले लोक >>
------- लहान असतांना खुपदा वाटायचे आपल्याला पण चष्मा लागावा.... Sad

Pages