स्पेलिंग बी!

Submitted by मोहना on 11 June, 2019 - 20:37

स्पेलिंग बी! शाळकरी मुलांच्या शब्दसंग्रहाची कसोटी म्हणजे ही राष्टीय पातळीवरची स्पर्धा. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच गुरुवारी, २८ मेला ८ जणांना विजेते घोषित करण्यात आलं. इतकंच नाही तर पारितोषिकाचे ५०,००० हजार डॉलर्स विभागून न देता प्रत्येकाला दिले जातील. तीन दिवस चालू असलेल्या या स्पर्धेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्चस्व होतं ते अमेरिकन भारतीय मुलांचं. सातत्याने १२ वर्ष या स्पर्धेचं विजेतेपद अमेरिकन भारतीय मुलांकडे आहे. यावेळी विजेतपदावर ६ अमेरिकन भारतीय मुलांनी आपल्या नावाची मोहोर उठवली. आमच्या शार्लटमधील गीता दातार यांचा नातू सोहम सुखटणकर हा या ८ विजेत्यांपैकी एक आहे ही मराठी शार्लटकरांच्यादृष्टीने अभिमानस्पद गोष्ट!

मुलांचा शब्दसंग्रह वाढावा या हेतूने नऊ वर्तमानपत्रांनी एकत्रितपणे सुरु केलेल्या या स्पर्धेचं हे ९२ वं वर्ष. अमेरिकतील सर्व राज्यांमधील विद्यार्थी यात भाग घेतात. त्यातही भारतीय मुलांचा सहभाग आणि जिंकणं उल्लेखनीय आहे. किमान वयाची अट नसलेल्या या स्पर्धेत आठवीनंतर भाग घेता येत नाही. दरवर्षीप्रमाणे, याही वर्षी आठ महिन्यांपूर्वी ११ मिलियन शाळकरी मुलं स्पेलिंग बी स्पर्धेचा अंतिम टप्पा गाठण्याचं स्वप्न उराशी बाळगत स्पर्धेत उतरली. ११ मिलियन मुलांमधली ५६५ मुलं अखेरच्या टप्प्यातील पहिल्या फेरीत पोचली. त्यानंतरच्या २० फेर्‍यांमधून शेवटी उरलेले स्पर्धक होते ३०. स्पर्धकांचा विजेतेपदाकडे प्रवास चालू असताना परिक्षकांच्या थैलीतले (डिक्शनरी) शब्द हळूहळू कमी व्हायला लागले. अखेर संपलेही. एका स्पर्धेकाने उत्सुकतेपोटी परिक्षकांना किती वाजले असंही विचारलं इतका वेळ ही स्पर्धा चालू होती. स्पर्धकांना स्पेलिंग सांगायला जेव्हा शब्दच उरले नाहीत, तेव्हा या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच ८ जणांना विजेते घोषित करण्याशिवायही पर्याय उरला नाही.

स्पर्धा म्हटली की मेहनत, जिद्द, चिकाटी आली त्याबरोबर पालकांचा सहभाग आणि तसंच मतमतांतरंदेखील. एक मतप्रवाह असा आहे की मुलांच्या डोक्यावर शाळेतल्या विषयांचं इतकं ओझं असतं, त्यात अजून त्यांना शब्दांच्या ओझ्याखाली गाडण्यात अर्थ नाही; यामुळे मुलांना बालपण मुक्तपणे अनुभवता येत नाही. या स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा दृष्टीकोन मात्र वेगळा आहे. त्यांना वाटतं कर्तुत्ववान होण्याकरता लहानपणीच मेहनत, जिद्द, चिकाटीचं बीज रुजणं भाग आहे जे अशा स्पर्धांनीच रुजतं. लहानपण हा मोठं होण्याचा पाया आहे तो भक्कम व्हायला हवा असेल तर बालपणाची व्याख्या खेळणं आणि मजा इतकीच नसावी. याचा विचारधारेचा मागोवा घेणारे आणि या स्पर्धावर आधारित आतापर्यंत दोन चित्रपटही प्रसिद्ध झाले आहेत- ‘स्पेलबाऊंड’ आणि ‘अकिला ॲड द बी.’

स्पेलबाऊंड! २००२ सालचा ॲकॅडमी ॲ‍वॉर्ड नामांकन प्राप्त माहितीपट. बारा ते चौदा वयोगट असलेल्या, आठ स्पर्धक मुलांच्या दैनंदिन जीवनाचं चित्र या माहितीपटात आहे. यात आहेत पाच मुली, तीन मुलगे. त्यांचं दैनंदिन जीवन, स्पर्धेसाठी केली जाणारी तयारी, पालकांचा सहभाग, शाळांकडून मिळणारं उत्तेजन, भावंडांची मदत, गावातील लोकांना या मुलांबद्दल वाटणारा अभिमान अशा कितीतरी बाजू या माहितीपटातून पुढे येतात. मुलांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीत वैविध्य असल्याने हा माहितीपट रंगतदार होतो. उपांत्य फेरीतील तीव्र स्पर्धेचं दर्शनही यातून घडतं. आठही मुलं आधीच्या वर्षी बाद होऊन पुन्हा या वर्षी स्पर्धेत भाग घेतलेली आणि या वेळेस विजेतेपद मिळवायचं, असा ध्यास धरलेली. प्राथमिक फेरीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत या मुलांना कॅमेऱ्यात बंदिस्त केलं आहे. भारतीय कुटुंबातील सुखवस्तू घरातील दोन मुलं यात आहेत. नूपुर लाला आणि नील कडाकिया.

नीलचे वडील त्याची या स्पर्धेसाठी तयारी करून घेत आहेत. वडिलांनी आतापर्यंतच्या स्पर्धेतील सगळे शब्द एकत्र तर केले आहेतच पण कोणत्या शब्दामुळे मुलं हरली आहेत त्या शब्दांचाही त्यांनी अभ्यास केला आहे. नीलला संगणकाचा मुबलक वापर, चार चार शिकवण्या अशा साऱ्या सुविधा आहेत. शिवाय पूर्वी या स्पर्धेत भाग घेतलेल्या बहिणीचा अनुभव आणि मार्गदर्शनही आहे. इतकंच नाही तर प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळेस नीलला यश मिळावं म्हणून नीलच्या बाबांनी हजार माणसांना भारतात प्रार्थना करण्यासाठी पैसे दिले आहेत. नीलच्या वडिलांना त्याला विजेतेपद मिळेल किंवा नाही यापेक्षा एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन त्यासाठी केलेले प्रयत्न महत्त्वपूर्ण वाटतात.

नूपुर लाला. अंतिम फेरीत पोचण्यासाठी प्राथमिक फेरीतच नूपुरला तिच्याच शाळेतल्या तीन हुशार मुलांबरोबर सामना करावा लागला. ती मुलं म्हणतात, ’आम्हाला खरं तर नूपुरला हरवायचं होतं, पण तिला सगळी स्पेलिंग येत होती’ एजंला आरनेवर एका साध्यासुध्या फार वर्षांपूर्वी बेकायदेशीररीत्या या देशात आलेल्या मेक्सिकन कामगाराची मुलगी. फारसं इंग्लिश बोलू न शकणाऱ्या आई -वडिलांच्या या मुलीची, एंजलाची धडपड फार कौतुकास्पद वाटते. एप्रिल डेजिडीओचे बाबाही छोटंस दुकान चालवितात. ही स्पर्धा एप्रिलने जिंकली तर आर्थिक विवंचना थोडीफार कमी होईल अशा आशेवर जिद्दीने त्यांची तयारी चालू आहे. इतर मुलांची कौटुंबिक स्थिती उत्तम आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात या माहितीपटाने डोकावता आल्याने, मुलांची मेहनत पाहता आल्याने उपान्त्य आणि अंतिम फेरी आपली उत्कंठा वाढवतेे. कुणीच बाद होऊ नये असं वाटत राहतं, पण एकेकजण स्पर्धेतून गळायला लागतो तेव्हा इथे पोचेपर्यंत रोजचे सहा सात तास त्यांनी इतर गोष्टी बाजूला ठेवून केलेली शब्द, स्पेलिंग यासाठी घेतलेली मेहनत आठवते. तहानभूक विसरुन मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी केलेल्या तयारीचं फळ त्यांच्या पदरी पडत नाही हे पाहून अंतिम फेरीपर्यंत मजल मारता न आलेल्या या मुलांबद्दल वाईट वाटतं. विशेषत: वयाच्या अटीमुळे ज्या मुलांना पुन्हा पुढच्या वर्षी भाग घेता येणार नाही त्यांच्याबद्दल. अंतिम फेरीत या आठ मुलांमधले चारचजण पोचतात. त्यात नील कडाकिया आणि नूपुर लालाचा समावेश आहे. माहितीपट संपतो तो १९९९ च्या स्पर्धेच्या विजेतेपदाच्या चषकाने. शेवटच्या शब्दाचं स्पेलिंग सांगतानाच नूपुरच्या चेहऱ्यावर विजेतेपदाचं स्मित दिसतं आणि लगेचच तिच्या नावाची घोषणा होते. नूपुर दोन्ही हात उंचावत खुशीने उडी मारते. हातातला चषक आनंदाने उंचावते. आपणही नकळत बसल्याजागी तिचा विजय टाळ्या वाजवून साजरा करतो; इतका हा माहितीपट गुंगवून टाकणारा आहे.

‘अकीला ॲड द बी’ हा २००६ साली प्रसिद्ध झालेला याच विषयावरचा दुसरा चित्रपट. कृष्णवर्णीय अकीला, लॉस एंजिलिसच्या सहसा कुणी फिरकतही नाही अशा भागात वाढणारी अकरा वर्षांची मुलगी. चित्रपटाच्या सुरुवातीलाच तिची ओळख करून देताना ती म्हणते, ’आमच्यासारखी मुलं कुठेही गेली तरी आम्हाला पटकन कुणी सामावून घेत नाही.’ ती हे बोलत असतानाच त्या भागातील अस्वच्छता, रस्त्यावरून फिरणारी टारगट मुलं अशी दृश्य पाहता पाहता आपण अकिलाच्या शाळेत पोहोचतो. नंतरच्या दृश्यात वर्गात शिक्षिका मुलांना तपासलेले पेपर देते. अकिलाच्या हातात तिची गुणपत्रिका देताना शिक्षिका विचारते.
‘किती अभ्यास केला होतास?’ मुलं जोरजोरात हसायला लागतात. मागे मुली चिडवत, हसत खिदळत नाचत असतात.
‘नव्हता केला.’ पोटात गोळा आलेली अकीला घाबरत उत्तर देते. आणि हातातल्या कागदावर हळूच आपले गुण पाहते. पैकीच्या पैकी! परीक्षा असते स्पेलिंगची. शिक्षिका तिला आंतर शालेय स्पेलिंग बी स्पर्धेचा अर्ज भरायला सांगते. अकीलाला या स्पर्धेबद्दल माहिती तर नसतेच पण त्यात रसही नसतो. शिक्षिका आणि मुख्याध्यापकांनी भरीला घातल्यावर नाईलाजाने ती तयार होते. अभ्यासात रस आणि गती नसलेलीच बरीचशी मुलं असल्याने शाळेत स्पर्धा जिंकणं अकीलाला फारच सोपं असतं.

शाळेच्या स्पर्धेच्या वेळी हजर असलेले प्रोफेसर लारा तिचे मार्गदर्शक व्हायची तयारी दाखवितात. आत्मविश्वास नसलेली तरीही बेफिकीर असलेली अकीला त्यांच्या घरी उशिरा पोचते. जिला वेळ पाळणं जमत नाही अशा मुलांसाठी मी माझा वेळ फुकट घालवू इच्छित नाही. वेळ पाळणं आणि दृष्टीकोन बदलणं जमत असेल तरच ते तिला मार्गदर्शन करू इच्छितात हे प्रोफेसर लारा स्पष्ट करतात. अकीलाला कशाचीच खात्री नसते. आधीच बरोबरच्या मुलांनी ‘घासू’ म्हणत तिला बाजूला टाकायला सुरुवात केलेली आणि घरात गोळीबारात वडिलांच्या झालेल्या मृत्यूच्या दु:खातून वर न आलेली आई. अखेर शाळेखातर तिने या स्पर्धेत भाग घेतला. तिने या स्पर्धेत भाग घेतला तर शाळेचं नाव होईल या भरवशावर शाळा तिला अभ्यासाच्या बाबतीत बऱ्याच सवलती देते. अकीलाची इतर विषयात प्रगती बेताचीच, पण वडिलांच्या आठवणीने व्याकुळ झाल्यावर स्पेलिंग पाठ करणं हा तिने शोधून काढलेला पर्याय तिला या स्पर्धेची दारं उघडून देतो. शाळा, आंतर शालेय, उपान्त्यपूर्व आणि अंतिम फेरी या सर्वातून आधी गोऱ्या मुलांबरोबर वावरताना घाबरलेली, अडखळणारी अकीला हळुहळू या वातावरणाला सरावते आणि कसं विजेतेपद मिळवते त्याचा प्रवास लक्षणीय आहे.

अकीलाची गोष्ट काल्पनिक असली, तरी चित्रपटाची कथा आणि सर्वाचा अभिनय श्रेष्ठ आहे. आपल्याला गुंतवून टाकणारा हा चित्रपट आहे. गंमत म्हणजे, या चित्रपटाची पटकथा व दिग्दर्शक आणि निर्माता जवळ जवळ दहा वर्षांपूर्वीच तयार असूनही प्रायोजक मिळत नव्हते, ते थेट ‘स्पेलबाऊंड’ हा माहितीपट ॲ‍कॅडमीॲ‍वॉर्डसाठी नामांकित होईपर्यंत.

‘स्पेलबाऊंड’मुळे ही स्पर्धा अधिक प्रसिद्धीझोतात आली आणि यावर्षी ८ विजेत्यांमुळे रंगली, प्रसारमाध्यमात उमटलेल्या पडसादांमुळे, चर्चेमुळे पुन्हा कुणाच्यातरी घरात, मनात स्वप्नांची रुजूवात लागली असणार. पुढच्या वर्षीची स्पेलिंग बी होण्याची रुजूवात!

पूर्वप्रसिद्धी - लोकमत 'सखी' पुरवणी.

SpellBee.JPG

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

स्पर्धा म्हटली की मेहनत, जिद्द, चिकाटी आली त्याबरोबर पालकांचा सहभाग आणि तसंच मतमतांतरंदेखील. एक मतप्रवाह असा आहे की >>> दोन्ही मत प्रवाह आपापल्या तर्‍हेने योग्य.
काही तरी सकारात्मक करायची जिद्द निर्माण होणे महत्वाचे.

लेख सुरेखच, ही माहिती नव्यानेच मिळाली, अनेक धन्यवाद... Happy

स्पेलिन्ग बी साठी आता रीतसर कोचिन्ग क्लासेस व अ‍ॅप उपलब्ध आहेत. व त्यांचेस विद्यार्थी विनर झाले आहेत असे वाचनात आले.

ह्याचा पुढे काय उपयोग होतो? विजेत्याचे हार्दिक अभिनंदन. अभिमान वगैरे काही वाटला नाही.

मुलांचं कौतुक आहेच पण मला अजूनही स्पेलिंग्ज पाठ करून त्याची अशी स्पर्धा घेऊन पुढे त्याचा उपयोग काय हे कळलेले नाही. इथे जर्मनीतील शिक्षणपद्धती मुलांना पाठांतर करायला शिकवत नाही, कोणताही विषय असो, तो समजून घेऊन त्याचा वापर करायला मुलांना शिकवले जाते. मग ते विज्ञान असो अथवा भाषा. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत अशी स्पर्धा ठेवण्यामागचा उद्देश मला कळला नाहीये. इथे जर्मन अमेरिकन लायब्ररी गेली काही वर्षे ही स्पर्धा आयोजित करते. त्याला प्रतिसाद मात्र नाममात्र मिळतो.

संपदाने लिहिलंय तसच मलाही वाटलं. ऑस्ट्रेलियात अशा स्पर्धा होतात की नाही माहिती नाही पण माझ्या आतापर्यंतच्या (इथल्या) शैक्षणिक अनुभवात मी माझ्या मुलींना कधीच स्पेलिंग पाठ करताना बघितलं नाही. उच्चारानुसार त्या स्पेलिंग लिहितात.
खरंच काय उपयोग होतो मुलांना या स्पर्धेचा? आत्तापर्यंत ही स्पर्धा जिकलेल्या मुलांनी पुढे आयुष्यात काय केले म्हणजे कोणते क्षेत्र निवडले वगैरे जाणून घाययला आवडेल. वर कोणीतरी म्हटलं आहे की या स्पर्धेसाठी कोचिंग क्लासेसही असतात.

इतकंच नाही तर प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळेस नीलला यश मिळावं म्हणून नीलच्या बाबांनी हजार माणसांना भारतात प्रार्थना करण्यासाठी पैसे दिले आहेत. <<<<<
Uhoh

संगणकाचा मुबलक वापर, चार चार शिकवण्या स्पेलिंगच्या स्पर्धेसाठी?

स्पेलिंग बी चा काय उपयोग होतो हा प्रश्नाच्या अनुशंगानं थोडसं... अमेरिकन शिक्षणपद्धती किंवा एकंदरीतच समाजजीवन पाहिलं तर लहान मुलांच्या जडणघडणीत, ह्या स्पेलिंग बी, क्वीझ काँटेस्ट्स वगैरे स्पर्धा, शाळेतले रिडींग क्लब, चेस क्लब असे वेगवेगळे क्लब्स, टी-बॉलपासून, फेन्सिंग (तलवारबाजी) - फूटबॉलपर्यंत अनेक खेळ, त्याच्या नियमित स्पर्धा, पियानो, व्हायोलिन ची रेसिटेशन्स, स्काऊट अ‍ॅक्टीव्हीटीज, कँपिंग वगैरे गोष्टींचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे एखाद्या स्पेलिंग बी चा फायदा काय असं आयसोलेशन मधे नाही बघता येणार.

>>खरंच काय उपयोग होतो मुलांना या स्पर्धेचा?<<
धागाकर्ती या प्रश्नाचं विस्तारीत उत्तर देतीलंच, पण मला हा प्रश्न "मेरीट मधे आलेली मुलं पुढे काय करतात?" या प्रश्नासारखा वाटला. माझ्या मते कुठल्याहि स्पर्धात्मक खेळांत भाग घेतल्याने मुलांचा आत्मविश्वास, स्टेज प्रेझेंस, अनॅलिटिकल थिंकिंग इ. गुणांमध्ये वाढ व्हायला मदतच होते. स्पेलिंग सांगणे, विशेषतः माहित नसलेल्या शब्दाचं स्पेलिंग सांगणे हे घोकंपट्टीवर अजिबात अवलंबुन नसुन ते त्या शब्दाचा उगम, फोनेटिक्स इ. बाबींचा विचार करुन स्पेलिंग बांधण्याच्या प्रक्रियेचा भाग असतो. वर उल्लेख केलेल्या शिकवण्या याचंच प्रशिक्षण देतात...

माझ्या मते कुठल्याहि स्पर्धात्मक खेळांत भाग घेतल्याने मुलांचा आत्मविश्वास, स्टेज प्रेझेंस, अनॅलिटिकल थिंकिंग इ. गुणांमध्ये वाढ व्हायला मदतच होते. >+१

ह्याचा पुढे काय उपयोग होतो? विजेत्याचे हार्दिक अभिनंदन. अभिमान वगैरे काही वाटला नाही. >>>
ब्रॅगिंग राइट्स मिळतात हा उपयोग नाही का?

अमेरिकन शिक्षणपद्धती किंवा एकंदरीतच समाजजीवन पाहिलं तर....>>>
सगळ्यांना बक्षिसे मिळतात (किमान पार्टिसिपेशन अ‍ॅवॉर्ड तरी नक्कीच मिळते), छान छान म्हटले जाते. सगळेजण कसे एकदम आनंदात.

स्पेलिंग बी हे मला बघताना कधी फार एक्सायटिंग वाटले नाही पण त्याला समहाऊ ग्लॅमर आहे खरे! कदाचित मिडियानेच घेतलेली स्पर्धा म्हणून त्याला कव्हरेज मिळत असावे.
पण तरी देखिल, ही निव्वळ पाठांतर स्पर्धा असेल असे वाटत नाही. एखादा शब्द कसा लिहायचा हे त्याचा उगम कोणत्या भाषेत आहे, त्यावरून आणि मग उच्चाराप्रमाणे ई असेल की ए ई असेल की ई आय असेल ते ठरवायचे. थोडी भाषांची माहिती , व्होकॅब वगैरे लागत असावी.

<<< स्पेलिंग बी हे मला बघताना कधी फार एक्सायटिंग वाटले नाही पण त्याला समहाऊ ग्लॅमर आहे खरे! >>>
आधी खूप भारी वाटले होते, पण भरपूर पाठांतर करून यात भाग घेतात हे बघून इतके काही ग्लॅमरस नाही असे वाटू लागले. याउलट कुणी मॅरॅथॉन जिंकली (किंवा नुसती पूर्ण जरी केली) तरी खूप आदर वाटतो. अर्थात प्रत्येकाचे मत वेगवेगळे.

"छान छान म्हटले जाते. सगळेजण कसे एकदम आनंदात." - हा तर माझा अत्यंत आवडता भाग आहे. आनंदात जगण्याचं निधान शोधत बसण्यापेक्षा असा आनंद वाटत जगावं.

सर्वांना धन्यवाद.

मुळात ही स्पर्धा का या प्रश्नाला फेरफटका, राज, चीकू या सर्वांनी उत्तरं दिली आहेतच पण असा प्रश्न पडला की कोणतीही स्पर्धा का असाही पडतोच. फक्त या स्पर्धेचाच विचार करायचा तर मुलांना शब्दाचं उगमस्थान, अर्थ कळायला मदत होते (इंग्रजी जर्मंनाकडून ब्रिटनमध्ये पोचली आहे आणि इतर भाषेच्या प्रभावामुळे बर्‍याच भाषेतले शब्द या भाषेत आलेले आहेत). पूर्ण डिक्शनरी पाठ असणं हे अतिशय जिद्दीचं, चिकाटीचं काम आहे. आणि इतक्या लहान वयात खरंच हे सोपं नाही. शालेय पातळीवर जेव्हा स्पर्धा होते तेव्हा मुलांना जे शब्द ठाऊक असायला हवेत तेवढेही सहसा मुलांचे शब्द पाठ होत नाहीत. मुलं आणि पालक यांची अपरंपार मेहनत यामागे आहे. इतक्या लहान मुलांकडून हे करवून घेणंही सोपं नाही. त्यापुढचा भाग म्हणजे अपयशाला तोंड द्यायला मुलं शिकतात. पुढच्यावर्षी पुन्हा भाग घेण्याच्या इर्षेने पुन्हा शब्दांचा अभ्यास करायला शिकतात. एकूणच फेरफटका यांनी म्हटल्याप्रमाणे ही स्पर्धा आहे आणि त्याला महत्त्व प्राप्त झालेलं असल्यामुळे अर्थातच हिरीहिरीने भाग घेणारेही आहेत.

विजेत्यांना शाळा शिष्यवृत्ती देतात, महाविद्यालयीन प्रवेश सोपा होतो, माहितीपटात आहे त्याप्रमाणे ५०,००० डॉलर्स एखाद्या कुटुंबाचं आयुष्य बदलतात. लहान वयातच अंगात आलेल्या चिकाटीमुळे पुढे या मुलांची शैक्षणिक प्रगती उत्तम होते असं जाणकार म्हणतात (पण मला याबाबत नक्की कल्पना नाही)

<<<अभिमान वगैरे काही वाटला नाही.>>> अमा, म्हणूनच मराठी शार्लटकरांना अभिमान असं लिहिलं आहे. ज्यांची मुलं या स्पर्धेत भाग घेतात, दूरदर्शनवर ही स्पर्धा पाहतात त्यांना नक्की वाटतो अभिमान ओळखीचं कुणी जिंकलं तर.

<<<‘अकीला ॲड द बी’ बघायला आवडेल.>>> हर्पेन स्पेल बाऊंड पण पाहा. माहितीपट असला तरी रंजक आहे.

छान!
बाकी याचा काय फायदा? मनोवृत्तीच्या लोकांना फक्त डायरेक्टली पैसे मिळवायत मदत होणार्‍याच गोष्टी माणसाने कायम कराव्या असं वाटतं. सो उन्हे अपने हाल पे छोड दो.
भारतात आपल्याला स्पेलिंग घोकुन पाठ करायला लावायचे ती अगदीच बेकार पद्धत होती. आपण मराठी शब्द फोनेटिकली विचार करुन जसे लिहितो, तसेच फोनेटिकली प्रत्येक अक्षराचे उच्चार आणि ते कसे एकत्र करायचे, त्यात शब्दाच्या ओरिजिन प्रमाणे वर मै म्हणत्येय तसं कुठला स्वर येईल, अपवाद काय असतील.. इत्यादी प्रकारे स्पेलिंग लिहितात मुलं.
दुसरीतील माझ्या मुलगा टोटल अनोळखी शब्दांची स्पेलिंग इतकी मस्त ट्राय करतो... की स्पेलिंग बी मधली मुलं पण नक्कीच असं करत असतील.
फेरफटका, राज, मै +१

छान माहिती.

या स्पर्धेबद्दल ऐकले होते पण स्पेल्लिंग कसे लक्षात ठेवले जाते त्याबद्दल काहीही माहिती नव्हती. काही विडिओ व्हाट्सअप्पवर बघितलेत ज्यात मुले एकेक अक्षर उच्चारत स्पेलिंग सांगतात, ते कसे काय हा प्रश्न पडायचा. त्याचे काही प्रमाणात उत्तर या लेखात मिळाले. धन्यवाद.

दोन्ही चित्रपट पाहायला आवडतील.

स्पेल्लिंगमध्ये शब्दाचा जिथे उगम झाला ती भाषा, फोनेटिकस वगैरेचा हात आहे हे इथे भारतीयांना कळणे शक्य नाही, त्यांना एकच पद्धत माहीत आहे, त्यामुळे इथल्या बऱ्याच कमेंट्स तशा का हे कळते. Happy Happy (पदवीपूर्व बी ए च्या अभ्यासक्रमात इंग्रजी भाषेतील शब्दाचा उगम व फोनेटीकस हा अतिशय इंटरेस्टींग विषय आहे पण त्याकडे सामूहिक दुर्लक्ष केले जाते).

छान आहे लेख. पण अशा स्पर्धांसाठी ट्युशन्स वगैरे पटत नाही. स्वअभ्यास आला पाहिजे जिथे अडत तिथे मार्गदर्शन ठिके.
आणि पैसे देऊन प्रार्थना अति हास्यास्पद.. त्यामुळे ही स्पर्धा जिंकणं हे मुलांपेक्षा पालकांच्या स्टेटस आणि जिद्दीचा भाग वाटतोय. मुलांना मनापासून वाटत असेल, तशी आवड असेल तर निराळी गोष्टं. वडिलांनी शब्दाची लिस्ट बनवणे , चुकलेल्या शब्दांचा अभ्यास करणे अतिशय अयोग्य वाटले. हे त्या मुलाचे काम आहे , जर त्याला जिंकायची जिद्द असेल तर.

<<स्पेल्लिंगमध्ये शब्दाचा जिथे उगम झाला ती भाषा, फोनेटिकस वगैरेचा हात आहे हे इथे भारतीयांना कळणे शक्य नाही,>>>>
अगदीच असे नाहीये. आता ठाणे मुंबई च्या शाळात तरी फोनेटिक्स असत अगदी छोट्या मुलांना , त्याचे क्लास असतात.
तरी काही पालक पाठांतरापेक्षा वेगळा काही विचार करूच शकत नसल्यामुळे मुलांना स्पेलिंग्ज पाठ करायला लावतात हे वेगळे...
इथेही स्पेल बी आणि स्पेल क्वेस्ट या स्पर्धा असतात. अमेरिकन स्पर्धे एवढ्या मोठ्या पातळीवर नाहित अर्थात. या स्पर्धेची पुस्तके पाहिली तर फोनेटिक्स , त्याचे लिखित सिम्बॉल अशा गोष्टी असतात . शब्दांचे वाक्यात उपायोग, म्हणी त्यांचे उपयोग अशा गोष्टी असतात.
आमच्या दृष्टीने भाषा शिकण्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो. आमच्या घरात तरी पाठांतर अजिबात नाही.
त्याशिवाय वाचन वाढवलं की शब्द पाठ करायची गरज राहात नाही असा अनुभव आहे..

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.

सावली <<<पैसे देऊन प्रार्थना अति हास्यास्पद>>> माहितीपटातील माहिती मी फक्त नमूद केली. <<<त्यामुळे ही स्पर्धा जिंकणं हे मुलांपेक्षा पालकांच्या स्टेटस आणि जिद्दीचा भाग वाटतोय... >>> प्राथमिक शाळात ही स्पर्धा वर्गापासून सुरु होते. मुलं जशीजशी पुढे जायला लागतात तसं मुलांचा रस वाढत जातो. अंतिम स्पर्धेपर्यंत पोचेपर्यंत इतक्या फेर्‍या असतात की आपोआपच मुलांच्या जिद्दीला पालकांचा हातभार लागत असावा. विजेती मुलं १३, १४ वर्षांची आहेत. त्यांचा या स्पर्धेचा प्रवास सुरु होतो तो खूप आधी. एक वर्ष मुलं जर काही फेर्‍या जिंकली तर त्यांना पुढच्या वर्षी भाग घ्यायचा असतो किंवा काही सोडूनही देतात. जी पुढेपुढे जातात त्यांना अर्थातच पालकांची मदत घ्यावी लागत असणारच.

Pages